लेकीची आई

Submitted by अनुराधा म्हापणकर on 6 April, 2013 - 07:07

खेडेगावातच नव्हे तर आपल्या आजूबाजूला वावरणा-या ई-जनरशेन मधेही लेकीचं मातृत्व किती सहजपणे नाकारलं जातं. हे पाहून वाईट वाटतं ते त्या होऊ घातलेल्या "लेकीच्या आई"साठी !

लेकीचं आईपण म्हणजे.. लेकीच्या जन्मापासून त्या नात्यातला तो प्रत्येक क्षण, आईपणाचा तो प्रवास, ज्यात लेकच नव्हे तर तिची आईही मोठी होत असते.

लेक लहान असते तेव्हा, वेगवेगळ्या रंगीबेरंगी पिना, हेअरबॆन्ड, क्लिप्स, रबरबॆन्ड, फ्रॊक्स, जीन्स, टॊप्स, स्कर्टस, इअररिंग्ज, बांगड्या इतकंच काय, बार्बीज, बाहुल्या, भातुकली अशा किती किती गोष्टीत जणू आपणच आपली राहिलेली हौस मौज पुरवतोय की काय असं आईला वाटतं. कुठल्याही कार्यक्रम/ पार्टीसाठी लेकीला तयार करताना इतकं मग्न व्हायला होतं की आपलीही तयारी करायची आहे हे तिच्या लक्षातच येत नाही. फ्रिलवाल्या फ्रॊकमधे ती टुलूटुलू चालते तेव्हा आपणच जणू ढगांवर चालतोय असं आईला भासतं. ती थोडी मोठी होऊन भातुकली मांडू लागते, तेव्हा तिच्या हातचा कुरमु-यांचा खोटा खोटा भात खाताना पोट भरुन जातं आणि ऊरही !

लेक आरशात बघून मग स्वत: नटू लागते. चेह-यावरच्या छोट्याशा पुळीने अस्वस्थ होते. नैसर्गिक, मानसिक, शारिरिक बदलाने आमूलाग्र बदलते. अचानक पूर्वीचं ते कोवळेपण, निरागस बाल्य चेह-यावरुन नाहीसं होतं आणि ती थोडंसं कौमार्य चेह-यावर मिरवू लागते. तिचा तो वयात येणारा काळ म्हणजे लेकीच्या आईसाठी परिक्षा असते. तिला सावरणं तिला आवरणं, तिचे प्रश्न- त्याची समर्पक उत्तरं, तिचं बदललेलं ताळतंत्र हे सांभाळताना लेकीच्या आईची दमछाक होते. पण त्याचबरोबर मुलगी मोठी होताना पाहाणं हा तिच्यासाठी एक सोहळा असतो. जणू ते स्वत:च स्वत:ला वयात येताना पाहाणं असतं, स्वत:चं तारुण्य पुन्हा अनुभवणं असतं. जगणं असतं. असं वाटतं, जणू आपल्या शरिराचा, आपल्याच मनाचा एक भाग स्वतंत्र होऊन वेगळा आकार घेतो आहे.

लेक शाळेत जाते, नवं नवं शिकते, तिच्या मैत्रिणींच्या अल्लड गप्पांत आईसुद्धा लहान होते. रमून जाते. लेक कॊलेजात जाते, तिचं विश्व आणखी विस्तारत जातं. कधी आईच अवघं विश्व असणा-या, लेकीच्या विस्तारल्या विश्वात तिची आई एक छोटासा ठिपका होऊन जाते. कधी दोघींचं पटत नाही. आईचे धडे, सल्ले लेकीला कंटाळवाणे वाटतात. तिच्याबद्दल वाटणा-या अतोनात काळजीबरोबरच आईला असतं ते तिच्या विश्वाचं प्रचंड अप्रूप ! तिच्या मैत्रिणी, तिचे मित्र.. मन धास्तावतं तरी मनाच्या एका कोप-यात वाटतं, मला होती बंधनं.. ! पण मी नाही तुला इतकी बंधनं घालणार ! तुझ्यावर विश्वास आहे गं माझा ! आईला आवडत असतात आपल्या लेकीच्या महत्वाकांक्षा ! लेकीचं आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असणं, ध्येयासाठी वेडावणं, आवडतं तिला. वाटतं, आपल्याला नाही जमलं असं प्लॆन्ड आणि फोकस्ड आयुष्य. पण आपल्या लेकीने जमवलं हो ! तिचा ऊर अभिमानाने भरुन येतो.

लेक मार्गाला लागते. कमावती होते. लेकीच्या कर्तृत्वाने आई पुन्हा सुखावते. लेक बोहल्यावर चढते. आई तृप्त होते. साश्रु नयनाने लेकीला निरोप देताना कृतार्थ होते. लेक पहिल्या बाळंतपणाला माघारी येते. पहिल्या बाळाला जन्म देते आणि खरतर आजी झालेली ती पुन्हा आई होते. नातवंडाची आई.. !

मुलगा आणि मुलगी या दोघांचीही आई असलेल्या मला एक अनुभव प्रकर्षाने वेगवेगळ्या क्षणी येतच राहतो. आई होणं, ही स्त्री जन्मासाठी परिपूर्णता असतेच. पण त्यातूनही एका "लेकीची आई" होणं हे माझ्या मते एका स्त्रीला अधिक समृद्ध करतं. तिच्यातल्या "स्त्री"त्वाला अधिक प्रगल्भ करतं. लेकीचं आईपण म्हणजे स्वत:चं स्वत:लाच शोधणं असतं. आणि हा न संपणारा शोध, प्रत्येक क्षणाला काही वेगळंच समाधान आणि अमाप सुख देऊन जातो. तात्पर्य, "लेकीचं आईपण" म्हणजे एक सोहळा आहे सोहळा !! आणि हो.. ! "लेकीचा बाप" होण्यातली गम्मत तर निव्वळ अवर्णनीयच... ! केवळ "वंशाचा दिवा" ह्या हव्यासापोटी, हे सुख, हे भाग्य अव्हेरणा-यांएवढे दुर्दैवी आणि कर्मदरिद्री तेच !!

अनुराधा म्हापणकर

वरील लेख रविवार ३१ मार्च २०१३ रोजी मटा मधे आला होता.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19299017.cms

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुराधा, खुपच छान लिहिल बरका, मी तर एव्हडी रमले वाचतांना---. अगदी पुनःप्रत्ययाचा आनंद लुटत होते. कारण मी लेकीची आई तर आहेच. पण नातींची आजीही आहे. माझ्या लेकीला मात्र दोन्ही मुलच आहेत . ती आम्हा सासु- सुनेला नेहमी म्हणते,'' कीति भाग्यवान आहात ग. यातच सगळ काही आल.
तुम्ही अतिशय छान शब्दात व्यक्त केल्यात भावना. समस्त लेकीच्या आई सुखावल्या बर का/. धन्यवाद.
आपल्यातील सुप्त कला-गुणांनाहि वाव मिळतो. मुलीला सजवतांना-- वाढ्वतांना. हेही नसे थोडके.

>>>एका कोप-यात वाटतं, मला होती बंधनं.. ! पण मी नाही तुला इतकी बंधनं घालणार ! तुझ्यावर विश्वास आहे गं माझा ! आईला आवडत असतात आपल्या लेकीच्या महत्वाकांक्षा ! लेकीचं आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असणं, ध्येयासाठी वेडावणं, आवडतं तिला. वाटतं, आपल्याला नाही जमलं असं प्लॆन्ड आणि फोकस्ड आयुष्य. पण आपल्या लेकीने जमवलं हो ! तिचा ऊर अभिमानाने भरुन येतो>>><<

+१११११११११११११११
मुली(लेकीची आई होणं) वेगळा आनंद देतात व देतच रहातात.

पण आता हे आई आई नवरा ह्या परीघातून बाहेर पडून जे जीवन आहे त्या बद्दल लिहा. इट इस अ बिग वर्ल्ड आउट देअर.

सर्वांचे धन्यवाद..

अमा...

तुमची प्रतिक्रिया "लागली".... चांगल्या अर्थाने... Happy खास आभार !

अनुराधा म्हापणकर,

मी पडलो टोणगा. मला असल्या आई-मुलगी वगैरे तरल भावविश्वात वावरायला कससंच होतं! कसलं ते बायकाबायकांचं लिखाण!! मात्र हे तुम्ही अगदी प्रामाणिकपणे लिहिलंय. आतून आलेलं वाटतं. म्हणूनच दाद द्यावीशी वाटते. शिवाय अमा यांचा सल्ला चांगल्या प्रकारे लावून घेतलात, त्याचंही कौतुक आहे.

ज्याअर्थी तुम्हाला आई-मुलगी वगैरे अव्यक्त अनुभव शब्दांत व्यक्त करता येतात, त्याअर्थी इतर अनुभवदेखील सहज आणि नेमकेपणाने शब्दबद्ध करता येतील. अशा अर्थी अमा यांच्या वरील विधान विधानाचा अर्थ लावू इच्छितो. त्या अमा असल्या तर तुम्हीही अम्हा आहात! बरोबर? Wink

आ.न.,
-गा.पै.

Pages