खेडेगावातच नव्हे तर आपल्या आजूबाजूला वावरणा-या ई-जनरशेन मधेही लेकीचं मातृत्व किती सहजपणे नाकारलं जातं. हे पाहून वाईट वाटतं ते त्या होऊ घातलेल्या "लेकीच्या आई"साठी !
लेकीचं आईपण म्हणजे.. लेकीच्या जन्मापासून त्या नात्यातला तो प्रत्येक क्षण, आईपणाचा तो प्रवास, ज्यात लेकच नव्हे तर तिची आईही मोठी होत असते.
लेक लहान असते तेव्हा, वेगवेगळ्या रंगीबेरंगी पिना, हेअरबॆन्ड, क्लिप्स, रबरबॆन्ड, फ्रॊक्स, जीन्स, टॊप्स, स्कर्टस, इअररिंग्ज, बांगड्या इतकंच काय, बार्बीज, बाहुल्या, भातुकली अशा किती किती गोष्टीत जणू आपणच आपली राहिलेली हौस मौज पुरवतोय की काय असं आईला वाटतं. कुठल्याही कार्यक्रम/ पार्टीसाठी लेकीला तयार करताना इतकं मग्न व्हायला होतं की आपलीही तयारी करायची आहे हे तिच्या लक्षातच येत नाही. फ्रिलवाल्या फ्रॊकमधे ती टुलूटुलू चालते तेव्हा आपणच जणू ढगांवर चालतोय असं आईला भासतं. ती थोडी मोठी होऊन भातुकली मांडू लागते, तेव्हा तिच्या हातचा कुरमु-यांचा खोटा खोटा भात खाताना पोट भरुन जातं आणि ऊरही !
लेक आरशात बघून मग स्वत: नटू लागते. चेह-यावरच्या छोट्याशा पुळीने अस्वस्थ होते. नैसर्गिक, मानसिक, शारिरिक बदलाने आमूलाग्र बदलते. अचानक पूर्वीचं ते कोवळेपण, निरागस बाल्य चेह-यावरुन नाहीसं होतं आणि ती थोडंसं कौमार्य चेह-यावर मिरवू लागते. तिचा तो वयात येणारा काळ म्हणजे लेकीच्या आईसाठी परिक्षा असते. तिला सावरणं तिला आवरणं, तिचे प्रश्न- त्याची समर्पक उत्तरं, तिचं बदललेलं ताळतंत्र हे सांभाळताना लेकीच्या आईची दमछाक होते. पण त्याचबरोबर मुलगी मोठी होताना पाहाणं हा तिच्यासाठी एक सोहळा असतो. जणू ते स्वत:च स्वत:ला वयात येताना पाहाणं असतं, स्वत:चं तारुण्य पुन्हा अनुभवणं असतं. जगणं असतं. असं वाटतं, जणू आपल्या शरिराचा, आपल्याच मनाचा एक भाग स्वतंत्र होऊन वेगळा आकार घेतो आहे.
लेक शाळेत जाते, नवं नवं शिकते, तिच्या मैत्रिणींच्या अल्लड गप्पांत आईसुद्धा लहान होते. रमून जाते. लेक कॊलेजात जाते, तिचं विश्व आणखी विस्तारत जातं. कधी आईच अवघं विश्व असणा-या, लेकीच्या विस्तारल्या विश्वात तिची आई एक छोटासा ठिपका होऊन जाते. कधी दोघींचं पटत नाही. आईचे धडे, सल्ले लेकीला कंटाळवाणे वाटतात. तिच्याबद्दल वाटणा-या अतोनात काळजीबरोबरच आईला असतं ते तिच्या विश्वाचं प्रचंड अप्रूप ! तिच्या मैत्रिणी, तिचे मित्र.. मन धास्तावतं तरी मनाच्या एका कोप-यात वाटतं, मला होती बंधनं.. ! पण मी नाही तुला इतकी बंधनं घालणार ! तुझ्यावर विश्वास आहे गं माझा ! आईला आवडत असतात आपल्या लेकीच्या महत्वाकांक्षा ! लेकीचं आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असणं, ध्येयासाठी वेडावणं, आवडतं तिला. वाटतं, आपल्याला नाही जमलं असं प्लॆन्ड आणि फोकस्ड आयुष्य. पण आपल्या लेकीने जमवलं हो ! तिचा ऊर अभिमानाने भरुन येतो.
लेक मार्गाला लागते. कमावती होते. लेकीच्या कर्तृत्वाने आई पुन्हा सुखावते. लेक बोहल्यावर चढते. आई तृप्त होते. साश्रु नयनाने लेकीला निरोप देताना कृतार्थ होते. लेक पहिल्या बाळंतपणाला माघारी येते. पहिल्या बाळाला जन्म देते आणि खरतर आजी झालेली ती पुन्हा आई होते. नातवंडाची आई.. !
मुलगा आणि मुलगी या दोघांचीही आई असलेल्या मला एक अनुभव प्रकर्षाने वेगवेगळ्या क्षणी येतच राहतो. आई होणं, ही स्त्री जन्मासाठी परिपूर्णता असतेच. पण त्यातूनही एका "लेकीची आई" होणं हे माझ्या मते एका स्त्रीला अधिक समृद्ध करतं. तिच्यातल्या "स्त्री"त्वाला अधिक प्रगल्भ करतं. लेकीचं आईपण म्हणजे स्वत:चं स्वत:लाच शोधणं असतं. आणि हा न संपणारा शोध, प्रत्येक क्षणाला काही वेगळंच समाधान आणि अमाप सुख देऊन जातो. तात्पर्य, "लेकीचं आईपण" म्हणजे एक सोहळा आहे सोहळा !! आणि हो.. ! "लेकीचा बाप" होण्यातली गम्मत तर निव्वळ अवर्णनीयच... ! केवळ "वंशाचा दिवा" ह्या हव्यासापोटी, हे सुख, हे भाग्य अव्हेरणा-यांएवढे दुर्दैवी आणि कर्मदरिद्री तेच !!
अनुराधा म्हापणकर
वरील लेख रविवार ३१ मार्च २०१३ रोजी मटा मधे आला होता.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19299017.cms
खूप छान लेख... अगदी सुंदर आणि
खूप छान लेख... अगदी सुंदर आणि नेमका लिहिलाय.
पण त्यातूनही एका "लेकीची आई" होणं हे माझ्या मते एका स्त्रीला अधिक समृद्ध करतं. तिच्यातल्या "स्त्री"त्वाला अधिक प्रगल्भ करतं. लेकीचं आईपण म्हणजे स्वत:चं स्वत:लाच शोधणं असतं. आणि हा न संपणारा शोध, प्रत्येक क्षणाला काही वेगळंच समाधान आणि अमाप सुख देऊन जातो. <<< हे खूप आवडलं.
खूपच छान लेख.. मी ही एका
खूपच छान लेख.. मी ही एका लेकीची आई आहे. माझ्या ८ वर्षाच्या मुली बरोबर प्रत्येक वेळी मी माझे बालपण परत जगते आहे.. तिच्या बरोबर भातुकली मान्डताना, तिच्या dolly शी खेळताना, तिच्या बरोबर shopping ला जाताना, तिच्या friendsचे gossip share करण्यात वेगळाच आनन्द असतो.
>>>लेकीचं आईपण म्हणजे स्वत:चं स्वत:लाच शोधणं असतं. आणि हा न संपणारा शोध, प्रत्येक क्षणाला काही वेगळंच समाधान आणि अमाप सुख देऊन जातो.>>> very well said....नविन द्रुष्टिकोन मिळाला..
खुप छान लिहिलयं.
खुप छान लिहिलयं.
मस्तच !!!
मस्तच !!!
खूप सुरेख लिहिलंय . अगदी नेमक
खूप सुरेख लिहिलंय . अगदी नेमक
खूप छान लेख.
खूप छान लेख.
प्रचंड आवडलंय !
प्रचंड आवडलंय !
छान ...सुंदर लिहिले आहे, मला
छान ...सुंदर लिहिले आहे, मला वाटते तुम्ही व्यक्त केलेले विचार बहुदा प्रत्येक "लेकीच्या आईचे" असावेत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इतके positive आणि समाधान देणारे क्षण तुम्हाला जाणवले आणि व्यक्तही करता आले पण दुर्दैवाने बहुतेक लोक नको जुनाट, पारंपारिक समजूतीपाई वा विचारांपाई ह्या क्षणांना आनंदाला मुकताहेत.
मस्तच
मस्तच
लेख काल वाचला होता. छान आणि
लेख काल वाचला होता. छान आणि खरेखुरे लिहिलेले आहे. धन्यवाद.
लेकीचं आईपण... मला अगदी
लेकीचं आईपण... मला अगदी मनापासून मुलगी व्हावी असं वाटायचं. मुलगा झाल्यावर समजूत घातली स्वतःची... मुलगा मुलगी... काही वगळं नाही.
पण नाही... मुलाचं अन मुलीचं आईपण वेगळ्च असतं.
अत्यंत सुरेख लिहिलय. ते पिना, हेअर बॅन्ड्स, नटणं, शेअर करणं... अगदी अगदी... झालं वाचताना... अनुभव नसूनही मी माझा असावा तशी रमले.
असो...
लेकीचं बापपणही इतक्याच ताकदीनं अन सहजपणानं लिहाल, अनुराधा.
खूप आवडलं.
खूप भावलं लेखन मलाही ६
खूप भावलं लेखन
मलाही ६ वर्षांची लेक आहे आणि सध्या अगदी >>>>>लेक लहान असते तेव्हा, वेगवेगळ्या रंगीबेरंगी पिना, हेअरबॆन्ड, क्लिप्स, रबरबॆन्ड, फ्रॊक्स, जीन्स, टॊप्स, स्कर्टस, इअररिंग्ज, बांगड्या इतकंच काय, बार्बीज, बाहुल्या, भातुकली ................. ती थोडी मोठी होऊन भातुकली मांडू लागते, तेव्हा तिच्या हातचा कुरमु-यांचा खोटा खोटा भात खाताना पोट भरुन जातं आणि ऊरही !<< याच फेज मधे आहे
पुलेशु
खूप सुंदर. अनेकींना आठवणीत
खूप सुंदर. अनेकींना आठवणीत रमवून टाकणारा लेख.
दादप्रमाणेच माझ्यासारख्यांना अनुभव नसतानाही स्तब्ध करणारा लेख.
खूप आवडल... सुंदर लिहिल आहे.
खूप आवडल... सुंदर लिहिल आहे.
खूप आवडलं. सुंदर लिहिलंय.मटात
खूप आवडलं. सुंदर लिहिलंय.मटात ही वाचलं होतं.
लेकीच्या आईच्याच फेजमधून जात आहे.
लेकीची आई होणं व लेकाची आई होणं यात फरक आहे असं वाटतं.शिवाय आणखी एक गोष्ट अशी जाणवते की लेकी मोठ्या झाल्या तरी आईशी मानसिक लेवल वर बाँडिंग राहतं.आईला समजून घेतात . आईची एखादी गोष्ट जरी पटली नाही तरी समजून घेतात.
मिलिंद बोकिल यांच्या
मिलिंद बोकिल यांच्या 'उदकाचिया आर्ती' या पुस्तकात त्याच नावाच्या कथेमधे नायिकेच्या आईला नायिकेला मुलगी व्हावी, आपल्याला नात असावी अशी इच्छा असते.
तिला असे का वाटते असा नायिकेच्या मनात आल्यावर 'काही नाही गं.. आपली साखळी पुढे चालू राहते' असे आई तिला म्हणते.
ह्यावरुनच संस्कार एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे जाण्याच्या प्रक्रियेत आई-मुलगी ह्या नात्याची भूमिका काय आहे ते कळते.
तुमचा लेख फार सुंदर आहे, मटामधेही वाचला होता, इथे पुन्हा वाचला.
सुंदर लेख. Pregnant असताना
सुंदर लेख.
Pregnant असताना वाटायचे की आपल्याला मुलगा - मुलगी कोणीही चालेल. मुलगी झाल्यावर काही विषेश वाटले नाही. पण तिला वाढवताना जाणवत गेले की ही खरी मजा आहे. मी तिच्याशी छान relate करू शकते.
माझे हे वाटणे अनुराधा तुम्ही योग्य शब्दात मांडलेत.
"लेकीचं आईपण" म्हणजे एक सोहळा
"लेकीचं आईपण" म्हणजे एक सोहळा आहे सोहळा !! >>> सही लिहिलाय सगळा लेख.. ह्या ओळीवर तर जीव कुर्बान!!
फार सुंदर लेख. मीही एका
फार सुंदर लेख. मीही एका लेकिची आई आहे! तिच्यासाठी फ्रॉक, हेअरपिन्स, मोजे वगैरे जमवणं, तिला छान छान सजवणं हा जणू माझाच छंद बनून गेलाय! ऑफिसमधून घरी आल्यावर तिला असं भरपूर सजवून भूर्रर्रर्र घेऊन जाताना तिचा निरागस आनंद पाहिला कि दिवसभराचा सगळा शीण उतरून जातो. मी यायची चाहूल लागली की दुडुदुडू रांगत तिचं माझ्यापाशी येणं आणि फक्त मलाच समजणार्या तिच्या अगम्य भाषेत मला दिवसभरातल्या गमती सांगणं... आणि मायलेकीचं हे हितगूज लांबून बघताना माझ्या आईचं हळूच हसणं.... खरोखर... माझ्या लेकीनं मला नव्यानं जन्म दिलेला आहे!
माझ्या खालच्या लेखाची आठवण झाली...
http://www.maayboli.com/node/39565
धन्यवाद.. अगदी मनःपूर्वक आभार
धन्यवाद.. अगदी मनःपूर्वक आभार प्रत्येकाचे !
"लेकीचा बाप" होण्यातली गम्मत
"लेकीचा बाप" होण्यातली गम्मत तर निव्वळ अवर्णनीयच... ! केवळ "वंशाचा दिवा" ह्या हव्यासापोटी, हे सुख, हे भाग्य अव्हेरणा-यांएवढे दुर्दैवी आणि कर्मदरिद्री तेच !!>>>>+१०००००००००
खुप छान लेख.
खुप छान! त्यातूनही एका
खुप छान!
त्यातूनही एका "लेकीची आई" होणं हे माझ्या मते एका स्त्रीला अधिक समृद्ध करतं. तिच्यातल्या "स्त्री"त्वाला अधिक प्रगल्भ करतं. लेकीचं आईपण म्हणजे स्वत:चं स्वत:लाच शोधणं असतं. आणि हा न संपणारा शोध, प्रत्येक क्षणाला काही वेगळंच समाधान आणि अमाप सुख देऊन जातो >>> हे खुपच आवडल.
तुमचा दुसरा लेख सुद्धा खुप चांगला आहे. छान लिहिता तुम्हि.
फार छान लिहिले आहे.
फार छान लिहिले आहे.
खुप छान लेख. लेकीचं आईपण
खुप छान लेख.
लेकीचं आईपण म्हणजे स्वत:चं स्वत:लाच शोधणं असतं. आणि हा न संपणारा शोध, प्रत्येक क्षणाला काही वेगळंच समाधान आणि अमाप सुख देऊन जातो. <<< हे खूप आवडलं. ++१
"लेकीचं आईपण" म्हणजे एक सोहळा
"लेकीचं आईपण" म्हणजे एक सोहळा आहे सोहळा !! >>> हा सोहळा माझ्या घरीही गेली नऊ वर्ष सुरु आहे

ह्या वर्षांमधे खूप काही भरभरुन दिलय तिने मला...... मी तिला वाढवतेय असं म्हणण्यापेक्षा मीच तिच्या सोबतीने मोठी होतेय, रोज नविन काहीतरी शिकतेय...... खूप पुर्वी निसटून गेलेली माझी मी, मला सापडत चालली आहे
अप्रतिम लेख.....
वा ! सुंदर लेख.
वा ! सुंदर लेख.
खुप छान लेख.. मी पण अनभुवते
खुप छान लेख..
मी पण अनभुवते आहे हा सोहळा आणि मी कल्पना केली होती त्यापेक्षा खुप जास्त आनंददायी आहे हा सोहळा.
लेख आवडला.
लेख आवडला.
खूप छान व सुंदर लेख !
खूप छान व सुंदर लेख !
खूप सुंदर, मॅच्युअर्ड लिखाण
खूप सुंदर, मॅच्युअर्ड लिखाण ....
Pages