मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे

Submitted by वैवकु on 4 April, 2013 - 08:48

फुटल्या मना, मी का दशा वेचीत आहे ना तुझ्या ?
माझेपणा प्रत्येक त्या ठिकरीत आहे ना तुझ्या !

मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे
ती आठवांच्या केवढ्या गर्दीत आहे ना तुझ्या !

ही रात्र ओसरली तरी का धुंदतो आहेच मी
तो मी दिलेला मोगरा वेणीत आहे ना तुझ्या !

मी मानतो आहे मला नेशील तू केंव्हातरी
पण मी यमा त्या वेंधळ्या यादीत आहे ना तुझ्या ?

दुष्काळ आहे माजला पण पीक हे वाढेल बघ
घामातला ओलेपणा मातीत आहे ना तुझ्या !

वाचायचा आहे मला तुकया तुझा विठ्ठल अता
मी पाहिला नाही तसा ओवीत आहे ना तुझ्या ?

केंव्हातरी शिकशील माझी वैभवा तू शायरी
माझ्यातला साधेपणा ऐटीत आहे ना तुझ्या !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे
ती आठवांच्या केवढ्या गर्दीत आहे ना तुझ्या !

ही रात्र ओसरली तरी का धुंदतो आहेच मी
तो मी दिलेला मोगरा वेणीत आहे ना तुझ्या !

मी मानतो आहे मला नेशील तू केंव्हातरी
पण मी यमा त्या वेंधळ्या यादीत आहे ना तुझ्या ?

दुष्काळ आहे माजला पण पीक हे वाढेल बघ
घामातला ओलेपणा मातीत आहे ना तुझ्या !

वाचायचा आहे मला तुकया तुझा विठ्ठल अता
मी पाहिला नाही तसा ओवीत आहे ना तुझ्या ?

केंव्हातरी शिकशील माझी वैभवा तू शायरी
माझ्यातला साधेपणा ऐटीत आहे ना तुझ्या !<<< शेर आवडले. चांगली गझल.

गझल चांगली झाली आहे वैभवराव...

ओवीत आणि मातीत..खूप आवडले..

'वेणीत' मध्ये जुनाच खयाल असला तरी मांडण्याची पद्धत खूपच सुरेख...

मतल्यातील 'उला' मध्ये 'मी का दशा वेचीत आहे ना तुझ्या ?' या ओळीत काहीतरी गडबड वाटते आहे..

'का ' आणि ' ना ' हे दोन्ही एकाच मिसर्यात आले आहेत...यापैकी एकच वापरायला हवा माझ्यामते...

एकूण गझल आवडली..

छान.

अनेक मिसरे आवडले.

थोडा संयम आवश्यक होता हे वैयक्तिक मत. त्यामुळे शेरांच्या बांधीवपणाला बाधा आलेली आहे असे वाटले. हळूहळू तेही होईल असे वाटते.

शुभेच्छा!

व्वा!!

का आणि ना बद्दल वैभवशी सहमत.

मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे
>> सुरेख आशय! पण "वाट आहे काढली" असे उलटसुलट वापरल्यामुळे (आणि त्यानंतरही वाक्य असल्यामुळे) मला थोडं अडखळायला झालं.. "नेईल जी माझ्याकडे, मी वाट आहे काढली" ही एक सुचवणी. काढली नंतर काही नसावं म्हणून. पण शेर आवडला आहेच.

तसेच मतला आणि दुष्काळ फार आवडले. शुभेच्छा!

मी मानतो आहे मला नेशील तू केंव्हातरी
पण मी यमा त्या वेंधळ्या यादीत आहे ना तुझ्या ?

दुष्काळ आहे माजला पण पीक हे वाढेल बघ
घामातला ओलेपणा मातीत आहे ना तुझ्या !

वाचायचा आहे मला तुकया तुझा विठ्ठल अता
मी पाहिला नाही तसा ओवीत आहे ना तुझ्या ?

केंव्हातरी शिकशील माझी वैभवा तू शायरी
माझ्यातला साधेपणा ऐटीत आहे ना तुझ्या !

सगळीच सुंदर रचना.

मस्त गझल !
दुष्काळ आहे माजला पण पीक हे वाढेल बघ
घामातला ओलेपणा मातीत आहे ना तुझ्या ! - खूप छान

मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे
ती आठवांच्या केवढ्या गर्दीत आहे ना तुझ्या !

ही रात्र ओसरली तरी का धुंदतो आहेच मी
तो मी दिलेला मोगरा वेणीत आहे ना तुझ्या !

मी मानतो आहे मला नेशील तू केंव्हातरी
पण मी यमा त्या वेंधळ्या यादीत आहे ना तुझ्या ?

दुष्काळ आहे माजला पण पीक हे वाढेल बघ
घामातला ओलेपणा मातीत आहे ना तुझ्या !

व्वा... सुंदर शेर ...
मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे
ती आठवांच्या केवढ्या गर्दीत आहे ना तुझ्या !.. अप्रतीम शेर..

मतला मात्र नाही आवडला

तिलकधारी आला आहे.

केंव्हातरी शिकशील माझी वैभवा तू शायरी
माझ्यातला साधेपणा ऐटीत आहे ना तुझ्या ! - बहोत खूब मक्ता. बात है.

बरेचसे खयाल येऊन गेलेले, तुकयाचा विठ्ठल हा खयाल नवा. अभिव्यक्ती अजून सशक्त हवी.

तिलकधारी निघत आहे.

आभार मानण्यात उशीर झाल्याबद्दल दिलगीर !

कणखरजींचे मत मतल्यासंदर्भात एकदम मान्य !!!
पहिलीच ओळ गडबडीची वाटते हे खरे पण का -ना एकाच ओळीत वापरले आहेत ते चुकीचे नाहीत
इथे फुटलेल्या मनाशी माझा संवाद आहे त्याचे तुकडे मी वेचत असताना त्याने विचारले की तू असे का करतोय्स ? तोच प्रश्न मी पहिल्या ओळीत त्याच्याशी संवाद साधत की तू असेच विचरतोय्स ना ...म्हणत,, उर्धृत करून दुसर्‍या ओळीत उत्तर देत आहे

पण भाषेच्या अशा कधीतरीच होणार्‍या वापरामुळे वाचकांची राईड स्मूथ होत नाही अहे त्यासाठी क्षमस्व !!!

हा शेरच मी संयम न बाळगता प्रसिद्ध केलाय (कणखरजी इथे बरोबर आहेत)
मुळात गझलेत मतला असायलाच हवा म्हणून मी हा केला हा या गझलेत सुचलेला सर्वात अखेरचा शेर आहे
ही रदीफ एकाच शेरात २ दा वापरायची हे पाहूनच मनात धडकी भरली ...खयालांची तर माझ्याकडे सततचीच वानवा असते त्यातून काफियानुसारी शेर करावा म्हटले तर काफियाही सुचेना शेवटी मी माझ्या तोकड्या क्षमता ओळखल्या आता इथे गुरुचरणाशिवाय तरणोपाय नाही म्हणत त्याना फोन करून एक मतलाच उसना मागावा असे वाटले ...मग म्हटले की आपण करून तर पाहूया जमेल तसा जमेल गुरूदेव सांगतीलच की कसा झाला आहे ते.... त्याच प्रमाणे झालेही !! त्यांनी मतला सोडून सर्वच शेर उल्लेखित करत अपेक्षित कौल दिलेलाच आहे आता प्रत्यक्ष भेटीत अधिक काय ते जाणून घेईनच.......पुण्यात आलोच आहे मी Happy

यात्रीजींनी दिलला बदल व त्याचे कारण नाही पटले.... क्षमस्व त्याबद्दल यथावकाश त्याना खुलासेवार विपू करीनच
Happy

बाकी विशेष काही नाही
सर्वांचा ऋणी

~वैवकु

मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे
ती आठवांच्या केवढ्या गर्दीत आहे ना तुझ्या !

नुकतीच ती बातमी वाचनात आली. या शेराबद्दल काय बोलायचं ? नि:शब्द
( कुणाच्याच बाफवर प्रतिसाद देत नाही सध्या. पण इथं राहवलं नाही. काळजी घ्या )

आवडलीच वैवकु साहेब.....
मतला,मोगरा अन् विठ्ठल तर अप्रतिमच.!!

फुटल्या मना, मी का दशा वेचीत आहे ना तुझ्या ?
माझेपणा प्रत्येक त्या ठिकरीत आहे ना तुझ्या
!<<<<<<<<

फुटक्या मना म्हटल्यावर दशा वेचणे पटत नाही, तुकडे वेचणे, ठिक-या वेचणे असे चालेल! फाटलेल्या मना म्हटले तर दशा वेचणे, चिंध्या वेचणे वगैरे बरोबर वाटेल!

चिंध्या मना, अद्याप मी वेचीत आहे ना तुझ्या?
माझेपणा प्रत्येक त्या चिंधीत आहे ना तुझ्या!
तुका म्हणे त्यातल्या त्यात असे वाचता यावा हा शेर.........वै.म.

मी वाट आहे काढली नेईल जी माझ्याकडे
ती आठवांच्या केवढ्या गर्दीत आहे ना तुझ्या !
<<<

जी वाट जाते माझिया पर्यंत, मी धुंडाळली.....
ती आठवांच्या केवढ्या गर्दीत आहे ना तुझ्या !
......असा वाचला तुझा हा शेर!

ही रात्र ओसरली तरी का धुंदतो आहेच मी
तो मी दिलेला मोगरा वेणीत आहे ना तुझ्या !
<<<

ही रात्र ओसरली तरी आहे नशेमध्येच मी!
गजरा तुझा मी ! त्यामुळे धुंदीत आहे ना तुझ्या!
असा वाचला तुझा हा शेर!

उर्तवरीत गझलेवर नंतर बोलेन!

उर्तवरीत गझलेवर नंतर बोलेन!>>>>>>>>
नको नको प्लीज राहुचद्यात

खुरसाले साहेब धन्यवाद

वैभवा,
उर्तवरीत गझलेवर नंतर बोलेन!>>>>>>>>
नको नको प्लीज राहुचद्यात

हे काय? राहूच द्यात वगैरे ठीक आहे, पण
आम्ही जे म्हटले त्यावर काही तर्कशुद्ध बोलशील की, नाही?
काही कारणमीमांसा देशील की, नाही, की गुरूच्या वाक्यापुढे तुझे काही चालत नाही?
हा शुद्ध पलायनवाद झाला, जो आम्हास भावत नाही!
नुसतीच वाहवा पाहिजे असेल तर तसे सांग, म्हणजे तसा छापील गोडव्यात्मकच प्रतिसाद तुला नेहमी द्यायला!
तुझा एक हितचिंतक,
........गझलप्रेमी

"दादा ते आले ना!"

देवपूरकरमामा, आपल्या अल्प गैरहजेरीने चाहत्यांचा जीव कासावीस झाला होता. दर्शनाने अनेकांना बरे वाटले असेल.

'आज्ञा शिरसावंद्य' असे सांगून पुन्हा आपण बटबटीत फाँटात लिहू लागलात हे बरे नव्हे.

खवटुन्निसाजी,
आपण म्हणता ते बरोबर आहे, म्हणूनच आम्हास नाइलाजाने असा शेर लिहावा लागला........पण, काय करणार एका हितचिंतक गझलकाराची पोटतिडीक आहे ही!

एवढे त्यांना सलाया, मी तरी थांबू कशाला?
लादणे अस्तित्व सुद्धा एक अत्याचार आहे!

टीप: इच्छा असूनही एक अवाक्षरही बोल्ड केलेले नाही, कृपया याची रास्त नोंद घेण्यात यावी!
समस्त मायबोलीकरांचा, रसिकांचा, गझलकारांचा हितचिंतक,
.........गझलप्रेमी

लादणे अस्तित्व सुद्धा एक अत्याचार आहे >>>>>>हे समजतय ना सर तुम्हाला .मग पर्यायी नका देत जाऊ

तुम्ही दिलेल्या पर्यायी बद्दल मी बोलण्या आधी तुम्ही दिलेली स्पष्टीकरणे खुलासे मला पटत नाहीयेत -नेहमीप्रमाणे इतकेच सांगतो

माझ्या शेरात काहीही चुकीचे नाही आहे काही कसर वाट्णे जे व्यक्तिसापेक्ष असते ते असू शकते चुका मात्र नाहीयेत

तुम्हाला कशापद्धतीने शेर केले की अवडतात हेच तुमच्या पर्यायीतून दिसत आले आहे ...त्याचा अर्थ शेर असावा तर असा!.......असा कधीच होत नाही ..

आणखी एक.: खरी गम्मत ही आहे की मी तुम्हाला /कुणाला आवडावेत कामियाब वाटावेत गोटीबंद वाटावेत वगैरे वगैरे म्हणून शेर केलेच नाहीयेत आजवर तरी

या शेरातून जो वैवकु दिसून येतो तो तुमच्या शेरातून दिसूच शकत नाही हे ही एक कारण आहेच पर्यायी न आवडण्याचे

वाटल्यास मतदान घेवूया की तुमचे पर्याय व माझे ओरीजनल यात अधिक चांगले कोणते ते मग तर तुम्हाला समजेलच ना .........(नाही नाही ...नकोच ..वाचकांचा तोकडा सौंदर्यबोध ,त्याना नसलेली काव्यजाणीव इत्यादी शस्त्रे आहेतच तुमच्याकडे त्यांच्यावर उगारायला!! :))

असो
पर्यायी नक्कीच मला आवडतील असे नाहीयेत हे खात्रीलायक्रित्या सांगू शकतो
फक्त <<<<गजरा तुझा मी !>>>>> ही ओळ तेवढी आवडली

तरीही बाकीच्या शेराना पर्याय देण्याची आपल्याला गरज वाटत असेलच तर अवश्य द्यावेत त्यांचे स्वागतच असेल !!

थांबतो !!

जाता जाता माझाच एक शेर देवून जातो

कर नेमक्या समीक्षा रे वैभवा स्वतःच्या
नुसतीच वाहवाही करणे अपाय आहे

(याचा अर्थ की मला आपली समीक्षा नेमकी वाटत नाहीये क्षमस्व!!)

वैभू,
परत सोयीस्कर पलायनवादी व संक्षिप्त प्रतिसाद देऊन मोकळा झालास ना?
शेराचे सोड, पण निदान अरे शब्दांविषयी तुला बोलता येत नव्हते काय?
इथे कुणाची गझल, कुणाचा शेर श्रेष्ठ हा तुझा दृष्टीकोनच अप्रशस्त आहे!
ही एक निखळ, व्यक्तिनिरपेक्ष शब्दांच्या जाणिवांची चर्चा होती, तिला तू उगाचच नसलेल्या स्पर्धेचे लेबल डकवून मोकळा झालास, नेहमीप्रमाणे!

अरे बाबा फुटक्या मना म्हटल्यावर दशा वेचणे कसे बरोबर होईल, यावर काहीच वदला नाहीस ते?
सानी मिस-यातल्या ठिक-या शब्द अचूक आहे, मग तोच शब्द उला मिस-यात वापरायला काय हरकत होती रे बाबा?असाही तो मतला तुला लिहिता आला असता जर तुला आलेला प्रत्यय फुटलेल्या मनाचा असता तर.......

फुटल्या मना, ठिक-याच मी वेचीत आहे ना तुझ्या ?
माझेपणा प्रत्येक त्या ठिकरीत आहे ना तुझ्या !

मी दिलेला मोगरा तुझ्या वेणीत असणे आणि रात्र ओसरली तरी मी धुंदतच(?) असणे
ही दोन विधाने कशी पटावीत वैभवा?
मी दिलेला मोगरा जर तुझ्या वेणीत आहे तर तू धुंदत असायला हवी ना , की मी धुंदत असणे म्हणणे तर्काला धरून बरोबर होईल, वैभू?

असे केले असतेस तर तुला आलेल्या मूळ काव्यात्मक प्रत्ययाशी ते जास्त प्रामाणिक नसते झाले काय?
उलट,

गजरा तुझा मी ! त्यामुळे धुंदीत आहे ना तुझ्या! असे म्हणणे जास्त रास्त व तर्कशुद्ध होणार नाही का सानी मिसरा?

टीप: स्वत:शी, स्वत:ला आलेल्या काव्यात्मक प्रत्ययाशी प्रामाणिक राहून उत्तर द्यावे!
समस्त मायबोलीकरांचा हितचिंतक,
............गझलप्रेमी

वैभू, तू तर्काला धरून बोलू लाग, आम्ही आमची समस्त अभ्यासपूर्वक काढलेली सूक्ष्म निरिक्षणे (खुचपटे नव्हेत) नोंदवू! ही गझल तुझी आहे की, आमची वा अन्य कोणाची, ते फारच गौण आहे रे बाबा! निखळ चर्चेने आपण सर्वचजण शिकता येईल ते शिकायला नको का?
की, तुझे-माझेच करत बसायचे जे प्रत्येकाच्या दृष्टीने घातक नव्हे काय?
आपल्या अंतर्देवतेला स्मरून सांग!
समस्त मायबोलीकरांचा हितचिंतक,
.........गझलप्रेमी

तिलकधारी आला आहे.

अनेक वर्षांनी मराठी गझलेत पुन्हा एकदा गुरू-शिष्य परंपरा आरंभणार्‍या या महाभागांचा निषेध! कवितेत कोणी कोणाचा गुरू नसतो, शिष्य नसतो. कवी एक तर कवी असतो तरी किंवा नसतो तरी. फार फार तर गझलतंत्र शिकवता येईल, गझल कशी शिकवणार? लवकरच गंडेदोरे विकायला काही जण येथे पथार्‍या पसरून बसणार असे एक भयावह दृष्य डोळ्यासमोर तरळले.

तिलकधारी निघत आहे.

तिलकधारीजी टोमणा समजला Sad
____________________________

देवसर त्या २ शेरांबाबत सविस्तर सांगेन प्रत्यक्ष भेटीत