प्रारब्ध- भाग ५

Submitted by पारिजाता on 3 April, 2013 - 10:21

आधीच्या भागांची लिंक

भाग १ - http://www.maayboli.com/node/40847

भाग २ - http://www.maayboli.com/node/42011

भाग ३ - http://www.maayboli.com/node/42077

भाग ४ - http://www.maayboli.com/node/42134

पुढे..

रात्रभर सम्राटला उठावेसे वाटेना,सुचेना, सुन्न अवस्था झाली. नीट, सरळ, आरामात झोपताही येईना. एखादी गोष्ट विचार न करता जवळजवळ फेकून द्यावी तसं त्यानं आपलं शरीर त्या खोलीत सोडून दिलं होतं. मनाचंही काही वेगळं नव्हतं. पाठीला आणि मनाला कणा नसल्यासारखं झालं होतं. आणि शरीर आणि मन दोन्हीही नशिबानं करत असलेल्या या अन्यायी खेळाविरुद्ध न्यायाची मांडणी करत आक्रंदत होती. पण कुणासमोर दाद मागणार? त्याचा आक्रोश मनाच्याच भिंतीना धडकून परत परत त्यालाच ऐकू येत होता. आणि आपल्या कक्षेत हे सगळं ऐकणारं कुणीच नसल्याची जाणीव त्याला झाली. एकटे पडलो आपण. किती स्वच्छ वागलो. चुका टाळल्या, मोह आवरले. सरळ जगण्यासाठी मनाला बंध घातले. काय उपयोग झाला? सई गेल्यावर नाही म्हणायला त्यानं इतर मार्ग शोधले होते. पण ते अगदी गरज म्हणून आणि इथं गावात नव्हे. पार सातासमुद्रापार. क्वचित. कुणाला दुखवून पण नाही. गावातल्या वजनाचा कधी गैरवापर केला नाही. सगुणाच एकदा म्हणाली होती तसं मोठा मालदार माणूस म्हणून त्याला असं काही करणं अवघड नव्हतं. पर्याय सहज उपलब्ध होते. पण त्यानं ते टाळलं. मन गुंतवून, खोटी वचनं देऊन कुणाच्या आयुष्याशी तो खेळला नव्हता. जिथं मन गुंतलं तिथं सर्वस्व दिलं होतं. कशाचा विचार न करता आपलंसं केलं असतं सगुणाला. सईनंही कधी मन मोकळं करून सांगितलं असतं तर त्यानं सगळे प्रयत्न केले असते. पण ती बोलायच्या आधीच निर्णय घेऊन गेली. आपण सईच्या बाबतीत कुठं कमी पडलो हेही त्यानं विचारलं नाही. एकत्र वेळ कमी घालवला हे तिनं पुसटसं सांगितलेलं. खरं तर त्यानंच ते गृहित धरलेलं. पण मग त्याच्यापेक्षाही कमी वेळ घरात घालवणारी कित्येक माणसं सुखानी संसार करत होतीच आजुबाजूला. नशीब, बापू! प्राक्तन! प्रारब्ध!!
रात्र झाली होती. खाली घर शांत झालं होतं. शर्वरी झोपली असणार. माझं बाळ मला न भेटताच झोपलं. तो अजून अस्वस्थ झाला. माझ्या तक्रारींनी मी तिच्याकडे का दुर्लक्ष करतोय? सई गेली. शर्वरी बिचारी कुठे जाईल? जगात कुठंही गेलं तरी सामानातल्या अर्ध्या गोष्टी शर्वरीसाठी केलेल्या खरेदीतल्या असतात. शहरात न रहाता शर्वरीकडे जगातल्या लेटेस्ट फॅशनचं सगळं असतं. तिला विचारलं काय हवंय तर ती कधीच सांगत नाही. आपण हवं ते आणतो. ते वापरते मात्र हौसेनी. लगेच घालून दाखवते. तरीही त्या पलिकडे मी इथे असलो की ती खूश असते हे आक्कात्या सांगायच्या आणि त्यालाही जाणवायचं. यावेळी अजून पर्यन्त बॅग उघडून तिला भसाभसा सगळं देऊन टाकण्याचा कार्यक्रम झालाच नव्हता.
या विचारांनी जरा तो शांत होऊन खाली आला. घरात सामसूम. अंधार. सोप्यातला एक मंद दिवा तेवढा चालू होता. आणि देवघरात एक समई तेवत होती ते ही जाणवत होतं. किती महिने झाले असतील देवासमोर येऊन? त्याच्या नकळत तो गुढग्यांवर बसला. मान खाली घालून , डोळे बंद करून. विचार संपणार नव्हते. पण थांबले काही काळ. अतीव शांततेचा काळ.
लहानपणी आजीनं केलेल्या प्रसादाच्या आशेनी असंच बसायचा .पण त्यावेळी मनात कुठले विचार असायचे कुणास ठाऊक? मग सुट्टिला घरी आला की आल्यावर आणि जाताना राधाई आठवण करून द्यायच्या म्हणून हात जोडून उभा रहायचा शांत. सगुणा आयुष्यातून गेली आणि त्यानंतर आपण इथं असे थांबलोच नाही हे त्याच्या लक्षात आलं. सईबरोबर केलेले काही सत्यनारायण. पण त्यावेळी ती औपचारिकताच होती. आता नशीब नशीब म्हणतोय आपण. पण सगुणा गेल्यावर आपल्या देवावरच्या विश्वासानं बंडखोरीच केली होती.
आक्काआत्या म्हणायच्या म्हणून आपलं निघताना घाईनं नमस्कार केल्यासारखं करायचं. त्यापेक्षा कितीतरी जास्त श्रद्धा तो आक्कात्यापुढे वाकायचा तेव्हा असायची.
किती वेळ गेला कुणास ठाऊक? अचानक चाहूल लागली मागं. तो भयंकर दचकला. आक्कात्या त्याच्या मागे बसली होती. हात जोडून.
तो उठला त्यानंतर तिही नमस्कार संपवून उठली.
तो बाहेर जाऊन तुळशी वृंदावनापाशी ओट्यावर बसला. ती पण येऊन बसली.
बराच वेळ गेला. कुणीच काही बोललं नाही. न रहावून सम्राट ओट्यावरून खाली बसला आणि त्यानं आक्कात्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्याचं दमलेलं मन जरा विसावलं.
आक्कात्या फक्त त्याच्या केसातून हात फिरवत राहिली. नकळत त्याचे डोळे वहायला लागले. तेंव्हा मात्र आक्कात्यानं विचारलं,
"काय होतंय पोरा? कसलं दु:ख आहे तुला?"
सम्राट काही न बोलता हुंदके देत राहिला. बराच वेळ. भर ओसरला तशी सावरला. मग म्हणाला,
"काही नाही गं. फार दिवसांचं साचलेलं होतं. फ़ार बरं वाटलं गं. " तो उठून निघाला. आक्कात्या बघत राहिली. तिला सईची गोष्ट तर माहीत होती. पण आज अचानक काय झालं हे तिला कळलं नव्हतं. पण काहीतरी झालंय हे नक्की होतं.
सम्राट पुन्हा माडीवर गेला. आता तो थोडा सावरला होता. या गोष्टींनी आता आपलं आणि शर्वरीचं आयुष्य डिस्टर्ब करायचं नाही. नेहमीसारखं रहायचं. हे त्यानं ठरवलं. जमणार किती होतं काय माहित?
आणि त्यातही आपल्याला हवंय काय? सगुणाचं इथं नसणं? मग तिला जायला सांगता येईल की. पण हा विचारही त्याला नको वाटला. काय हवंय आपल्याला? त्याला समजेना. पण ते नंतर शोधता येईल. तिनं जरी त्यावेळी आपली साथ दिली नसली तरी, आपल्यापासून लग्नाची गोष्ट लपवून ठेवली असली तरी तिला आत्ता आसर्‍याची गरज आहे आणि आपण तो दिला पाहिजे एवढंच.
रात्रभर अस्वस्थतेत घालवून सम्राट दुसऱ्या दिवशी खाली आला तो उत्साहात. शर्वरीला सुट्टी होती. त्याचा उत्साह बघून ती पळत आली. धाडकन मिठी मारली. करकचून. जगातलं सगळ्यात मोठं सुख ते हेच. त्यानं तिला जवळ बसवलं. शंकरला हाक मारून बॅग आणायला सांगितली. सगळी शॉपिंग शर्वरीसमोर ठेवली. ती खूश झाली. मग आक्कात्यानं आणलेला चहा घेतला. दिवाणखान्यात जाऊन कामं पाहिली. जेवायला या असा निरोप आल्यावर आत गेला. बरंच काय काय केलं होतं. नेहमी त्याला आवडणारे सोडून इतर पण काही पदार्थ होते. सगुणा मान खाली घालून काम करत होती. "सगुणानं केलेत." आक्कात्यानं माहीती पुरवली. "सगुणामावशी ना मस्त करते सगळं. आणि बाबा तिला ना पास्ता पण येतो. आणि ती माझा अभ्यास पण घेते. आणि तिला ना कागदाची फ़ुलं पण येतात. आणि गाणी पण. " शर्वरी चालू झाली. तिची बडबड सम्राटला कितीही गोड वाटत असली तरी सगुणाचं गुणगान त्याला ऐकायचं नव्हतं. तेवढ्यात सगुणाच वाढायला आली. "शर्वरी, जेवताना बोलू नये. जेवण कमी जातं." सगुणा तिला वाढता वाढता म्हणाली.
जेवण झाल्याबरोबर सम्राट उठला. "आक्कात्या" त्यानं हाक मारली. आक्कात्या त्याच्यामागोमाग सोप्यात आली.
" त्या सगुणाला जरा बरया साड्या घे चार. आणि तिच्याबरोबर गेलीस की तुला पण घे."
"मला काय करायच्यात? पण तिच्याबद्दल मी म्हणणारच होते तुम्हाला." काल मायेनं पोरा म्हटलं तरी आज पुन्हा सम्राट बापू हजर झाले होते बोलण्यात.
"मग मला काय विचारायचं त्यात आक्कात्या? आता हे बायकांच्या साड्यांचं पण मला बघायला लावतेस का?" अक्कात्या हसली. आपण इतर वेळी नाही विचारत. आज गेलं तोंडातून.
दिवस जात होते. सम्राटचं काम चाललेलं.
आता सगुणा जरा बरी दिसायला लागली. आक्कात्या मायेनं वागवायच्या. फ़ार काम नसायचं. शर्वरीमुळं तिचा वेळ आनंदात जायचा. सम्राट आपल्याला घरात स्वीकारेल का ही भिती पण आता कमी झाली होती. वरवर तरी सगळं शांत होतं. नाहीतरी तो कमी वेळ घरात असायचा. आणि असलेला बहुतेक वेळ शर्वरीबरोबर असायचा. तरीही एकदा त्याच्याशी बोलावं आणि त्याच्या मनात आता काही कडवटपणा नाही ना हे बघावं असं तिच्या मनात येत होतं. पण सम्राट तिला ओळखत नसल्यासारखाच वागत होता. तो एक पहिला प्रसंग सोडला तर. कदाचित तो सगळं विसरला असेल आणि माझ्यासारख्या क्षुद्र व्यक्तीला त्याच्या सारखा माणूस कडवटपणा एवढं तरी महत्व का देईल? तरीही ती त्याच्याशी बोलण्याची वेळ शोधत होती. वाट बघत होती. आणि तरीही तिला कुठंही धोका नको होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users