पुस्तक परिचय- 'द मिसमेजर ऑफ मॅन'

Submitted by लसावि on 1 April, 2013 - 23:48

सामान्य माणूस सहसा विज्ञान, वैज्ञानिक आणि एकंदरीतच शास्त्रीय प्रक्रिया याकडे एकतर जादूची कांडी (पुराणमतवादी असतील तर यक्षीणीची वगैरे!) किंवा अतीविशेष बुद्धी असलेल्या मोजक्या लोकांचे काम अशा दोनच टोकाच्या भूमिकेतून पाहतो. यात भर म्हणून ’सायन्सला तरी सगळे कुठे कळले आहे’ आणि ’आमच्या लोकांनी हे सगळे आधीच शोधले होते’ हे दोन आत्यंतिक पवित्रे आहेतच. या सर्वांमुळे विज्ञानाकडे पाहण्याची स्वच्छ नजर तयार होण्यास अडथळे येतात. ’विज्ञान हे मानवी कार्य आहे- सायन्स इज ह्युमन एंडेव्हर’ या दृष्टीने सर्व शास्त्रीय व्यवहाराकडे पाहिले जाणे फ़ार गरजेचे आहे. कारण अशा दृष्टीकोनामुळेच विज्ञान हे मूठभरांनी केलेले चमत्कार न उरता तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांनी अथक परिश्रमाने घडवलेली आणि पुढे नेलेली गोष्ट आहे हे अधोरेखीत होईल. इतर कोणत्याही मानवी व्यवहारांप्रमाणेच विज्ञानही वैज्ञानिकांचे गुणदोष, पूर्वग्रह, त्यांच्या काळातील राजकीय-सामाजीक-आर्थिक धारणा व त्यांचा विज्ञानावर पडणारा प्रभाव यापासून वेगळे राहू शकत नाही हे लक्षात येते. स्टीफ़न जे गोल्ड ( Stephen Jay Gould) लिखित ’द मिसमेझर ऑफ मॅन’ (The Mismeasure of Man) या पुस्तकात हाच मुद्दा वर्णवंशवादाच्या पार्श्वभूमीवर मांडला आहे.

’सामाजिक भेदभावाच्या जीवशास्त्रीय समर्थनाचा उहापोह’ हे या पुस्तकाचे मुख्य सूत्र म्हणता येईल. विविध मानवी समाजघटकातील (वंश, जाती आणि लिंग) आर्थिक-सामाजिक विषमता आणि भेद ह्यांचे मूळ आनुवांशिक, जन्मजात फ़रकामुळे आहे. किंबहुना सामाजिक भेद हे जीवशास्त्रीय भेदाची निष्पत्ती आहे ह्या मांडणीचा सखोल अभ्यास यामधे करण्यात आला आहे. गोल्डने पाच महत्वाच्या संशोधनांचा सखोल पुनरभ्यास करताना तत्कालिन समाजपरिस्थिती आणि राजकारण, शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक धारणा यांचा विचार तर केलाच आहे पण त्यांच्या मूळ प्रयोगांचे अत्यंत कठोर विश्लेषण केले आहे. त्याने अनेक ठिकाणी मूळ प्रयोग पुन्हा करुन पाहिले, जुना डेटा आणि रिझल्ट्स परत पडताळले. पुराव्यांच्या फ़ेरफ़ार, मोडतोडीचा किंवा प्रयोगातील लबाडीचाही शोध घेतला.

पहिल्या प्रकरणात डार्वीनचा उत्क्रांतीसिद्धांत येण्याआधीचा ’शास्त्रीय’ वंशवाद आणि त्याला कवटीमापनशास्त्रतून मिळालेला तथाकथित पुरावा याची चर्चा आहे. इथे गोल्डने उत्तर युरोपिअन गोर्‍या शास्त्रज्ञांच्या वंशश्रेष्ठत्वाच्या ठाम कल्पना आणि आणि त्यांच्या मनात पक्की असलेली मानवी समाजाची उतरंड यावर प्रकाश टाकला आहे. उत्क्रांतीसिद्धांत आल्यावरही पॉल ब्रोकासारख्या अत्यंत परिश्रमी आणि बुद्धिमान शास्त्रज्ञाच्या मेंदूमापन प्रयोगातून याच पूर्वग्रहाला कसे खतपाणी मिळाले याची चर्चा दुसर्‍या प्रकरणात आहे. तिसर्‍या प्रकरणात मानववंशशास्त्राचा गुन्हेगारी प्रवृत्ती शोधण्यासाठी झालेला प्रयत्न आणि पुन्हा त्याच्या मदतीने जुन्याच उतरंडीला मिळालेले समर्थन हा भाग येतो. मला सर्वात गुंगवून टाकलेले चौथे प्रकरण बुद्धिमापन चाचण्यांच्या इतिहासावरचे आहे. या चाचण्यांच्या मदतीने अमेरिकेत सुरू झालेला वांशिक भेदभाव, आपल्याकडील आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा फ़ारसा वेगळा नाही. शेवटच्या प्रकरणात सिरील बर्टच्या; वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत वाढवल्या गेलेल्या जुळ्या मुलांवरील धादांत खोट्या ’संशोधना’चा परखड लेखाजोखा आहे.
ही सर्व प्रकरणे पुढील एका सूत्रात बांधलेली आहेत- बुद्धिमत्ता मेंदूत एकवटलेली आहे, त्यामुळे कवटी/मेंदूचा आकार तिच्या प्रमाणात असतो, बुद्धिमत्ता मोजता येण्याजोगी व संख्येत दाखवता येण्यासारखी ठोस गोष्ट आहे, ह्या संख्येचा वापर करुन लोकांचे सरळसोट एकरेषीय वर्गीकरण करणे किंवा उतरंड करणे शक्य आहे. अशा वर्गीकरणात सर्वात खालच्या पातळीवर असणार्या वंश, वर्ग किंवा लिंगाच्या व्यक्ती (उदा. अफ़्रिकन आणि स्त्रिया) त्याच लायकीच्या आहेत कारण बुद्धिमत्ता पूर्णपणे अनुवांशिकच असते. त्यामुळे सामाजिक भेदभाव संपूर्णपणे शास्त्रियदृष्ट्या समर्थनीय आहे.

संपूर्ण पुस्तकात या सर्व समर्थनासाठी गोळा झालेला अत्यंत अपुरा, अर्धवट पुरावा व त्याच्यामागील राजकिय कारण यांची मिमांसा आहे, पण हे करताना गोल्ड कधीही असे समर्थन शोधू पाहणारे शास्त्रज्ञ वाईट होते किंवा ते सदैव चूकच होते अशी बाळबोध मांडणी करीत नाही. त्याचा मुख्य आक्षेप विज्ञानाच्या तथाकथित शुद्ध, तर्ककठोर वगैरे प्रतिमेवरच आहे. शास्त्रीय व्यवहार हा एक सामाजिक घटना आहे, ती मानवनिर्मिती आहे आणि त्यामुळे तिच्यात सर्व मानवी गुणदोष हे येणारच हा मुद्दा तो वारंवार मांडतो. शास्त्रज्ञाच्या भावना, त्याचे सांस्कृतीक संचित त्याच्या कामावर सतत प्रभाव टाकत असते आणि तो त्यापासून अस्पर्श्य राहू शकत नाही. वैज्ञानिक प्रतिभा ही निव्वळ माहिती आणि प्रयोग यामध्ये बांधलेली, त्यापुरती मर्यादित नाही. ती या प्रयोगामधील कल्पनेच्या अविष्कारात, माहितीमधून ज्ञान निर्माण करण्याच्या मानवी ताकदीत आहे. आणि अशा प्रतिभेवर त्या शास्त्रज्ञाच्या सामाजिक-सांस्कृतीक वातावरणाचा प्रचंड संस्कार असतोच ही अत्यंत कळीची बाब गोल्ड अप्रतिमरित्या अधोरेखीत करतो.

केवळ शास्त्रिय माहिती देणारे किंवा शास्त्रज्ञांचे जीवनचरित्र रंजकपणे सांगणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. पण संपूर्ण शास्त्र व्यवहाराचाच अभ्यास करणारे आणि विज्ञान कशाप्रकारे काम करते (अथवा करीत नाही) याचे दुर्मिळ विश्लेषण करणारे हे पुस्तक आहे. माझा हा पुस्तक परिचय वाचून हे फ़ारच क्लिष्ट किंवा कंटाळवाणे पुस्तक आहे असा आपला समज झाला असल्यास तो माझ्या लिखाणाचा दोष आहे! गोल्डची शैली अत्यंत सहज, वाचकाला बरोबर घेउन जाणारी आहे. नर्मविनोद, एकापेक्षा एक थक्क करणारे किस्से आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लेखकाचे सहृदय विवेचन पुस्तक वाचताना फ़ार मजा आणते.
विज्ञान आपल्याला शुद्ध, अंतिम पूर्णसत्याकडे नेणारा खात्रीचा मार्ग नसून आपल्या विचार-आचारातील विसंगती, त्रूटी आणि ढोबळपणा कमी करण्याचे शास्त्र आहे एवढे यातून नक्कीच घेण्यासारखे आहे.
________________________________________________________________________
The Mismeasure of Man (1981)
Author: Stephen Jay Gould
Publisher: W. W. Norton & Company
ISBN 0-393-01489-4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे छानच लिहिले आहेस, पण या पुस्तकाबद्दल - त्यातील काही किस्से, काही भाग असं काही वाचायला आवडेलच ...
पुस्तकाबद्दल नक्कीच खूप उत्कंठा निर्माण झाली आहे .....
पुस्तक परिचयाबद्दल मनापासून धन्यवाद.

चांगला परिचय.

या कवटीमापनाच्या प्रयोगांबद्दल नुकतेच कुठेतरी वाचले होते, आता हे पुस्तकदेखील नक्की वाचणार.
शक्य झालं तर प्रकाशक अथवा आयएसबीएन देखील नमूद कर प्लीज.

आगाऊ,

>> विज्ञान आपल्याला शुद्ध, अंतिम पूर्णसत्याकडे नेणारा खात्रीचा मार्ग नसून आपल्या विचार-आचारातील
>> विसंगती, त्रूटी आणि ढोबळपणा कमी करण्याचे शास्त्र आहे एवढे यातून नक्कीच घेण्यासारखे आहे.

आपल्या या विधानाशी १००% सहमत. पुस्तकपरिचय आवडला. Happy

आ.न.,
-गा.पै.

" विज्ञान आपल्याला शुद्ध, अंतिम पूर्णसत्याकडे नेणारा खात्रीचा मार्ग नसून आपल्या विचार-आचारातील विसंगती, त्रूटी आणि ढोबळपणा कमी करण्याचे शास्त्र आहे एवढे यातून नक्कीच घेण्यासारखे आहे "

हे,

" सामान्य माणूस सहसा विज्ञान, वैज्ञानिक आणि एकंदरीतच शास्त्रीय प्रक्रिया याकडे एकतर जादूची कांडी (पुराणमतवादी असतील तर यक्षीणीची वगैरे!) किंवा अतीविशेष बुद्धी असलेल्या मोजक्या लोकांचे काम अशा दोनच टोकाच्या भूमिकेतून पाहतो. यात भर म्हणून ’सायन्सला तरी सगळे कुठे कळले आहे’ आणि ’आमच्या लोकांनी हे सगळे आधीच शोधले होते’ हे दोन आत्यंतिक पवित्रे आहेतच."

या
प्रस्तावने नंतर यावे, हे काही समजले नाही..
समारोपाच्या वाक्यात काही घोळ झालाय का?

समारोपाच्या वाक्यात काहीही घोळ नाही.
विज्ञानाची एक्स्ट्रीम ऑब्जेक्टीव्हिटिची प्रतिमाच गोल्डला मान्य नाही. त्याच्या मते चुकतमाकत, धडपडत पुढे जाणारा हा एक प्रवास आहे, आणि शास्त्रज्ञ हे काही रोबो नव्हेत. मी प्रस्तावनेत लिहिलेली वाक्ये विज्ञानाच्या या चुकीच्या प्रतिमेचाच परिपाक आहेत. उदा. ’सायन्सला तरी सगळे कुठे कळले आहे’- नाहीच कळलेले 'अजून'! पण म्हणून आत्तापर्यंत जे कळले आहे त्याचे महत्व, ते ज्यामुळे कळले आहे त्या प्रक्रियेचे महत्व कमी होत नाही. मुळात सायन्सने सगळे कळायलाच हवे हा हट्ट्च चुकीचा आहे.
आणि तरीही त्याचा हा विश्वासही आहे की याच धडपड्या मार्गाने कदाचित आपल्याला 'रिअ‍ॅलीटी'चे ज्ञान होईल!

Stephen Jay Gould यांचं The Mismeasure of Man ना? पुस्तक आणि/किंवा लेखकाचे नाव मूळ भाषेत दिले तर शोधायला सोपे जाते. मला लेखक माहित असल्याने मी शोधले कारण पुस्तकाच्या नावाने काही अर्थच लागेना. 'झ' का लिहिलंय? Happy
पुस्तक परिचय चांगला लिहिला आहे.

मला Gould चं लेखन आवडतं पण हे पुस्तक मात्र अजुन वाचलं नाही. इतरत्र वाचलेल्या वेचकांनुसार, यात त्याचा मुख्य रोष/रोख बेल कर्व्हवर होता. एका मितीत जोखण्याऐवजी अनेक मितींमधे बेल कर्व्ह पाहिल्यास कोणत्याही मितींमधील आऊटलायर्स मासेसना आपल्याकडे ओढु शकतात (मिम्सच्या सहाय्यानी). त्यामुळे ऑब्जेक्टीव गोष्टी घडणे सोपे नसते.

विज्ञान पडत-झडतच पुढे सरकायला हवं असं नाही, पण वरील कारणांमुळे तसं होणं साहजीक आहे. पण निरपेक्ष सत्य असतं असा अट्टाहास का? Gould तसं काही असलंच पाहिजे असं म्हणतो?

अरे! जबरी!!
पुस्तकाचा विषय पण जरा वेगळा आहे.. आणि लिहिलंयस पण छान.

(लोला, 'झूल' आणि 'झिम्मा' असे 'झ'चे दोन उच्चार होत असल्यामुळे जरा गोंधळ झाला असेल. माझाही काही सेकंद झाला होता.)

@लोला- धन्यवाद! योग्य ते बदल केले आहेत.
@ अश्चिग - मी या पुस्तकाची जुनी (१९८१) एडीशन वाचली. तू म्हणतोस तो बेल कर्व्हचा भाग याच पुस्तकाच्या रिवाइज्ड एडीशनमधे (१९९६) आहे.
आणि फॅक्चुअल रिअ‍ॅलिटी अस्तित्वात आहे व विज्ञान (ते इम्परफेक्ट असले तरीही) त्याचा शोध लाउ शकते असे त्याचे म्हणणे आहे.

परिचय छानच,धन्यवाद.
पुस्तकाचा विषयच स्फोटक इतिहास असलेला.यावर निर्मम संशोधन होणे खरेच आवश्यक.संशोधनात सामान्य नियम मिळतील,असामान्य/अपवादात्मक घटिते शिल्लक रहातातच.
रच्याकने,चौथ्या प्रकरणाच्या कंटेंट्सबद्दल अधिक लिहायला हवे होते..

> आणि फॅक्चुअल रिअ‍ॅलिटी अस्तित्वात आहे व विज्ञान (ते इम्परफेक्ट असले तरीही) त्याचा शोध लाउ शकते असे त्याचे म्हणणे आहे.

हम्म्म ....
बहुदा निरपेक्ष सत्य अस्तित्वात असण्याच्या कल्पनेनी अनेकांना अनेक गोष्टी करायला आधार मिळतो.

बहुदा निरपेक्ष सत्य अस्तित्वात असण्याच्या कल्पनेनी अनेकांना अनेक गोष्टी करायला आधार मिळतो.
<<
सहमत. (if you mean what i think you mean Wink )
पण पुस्तक वाचून झाल्यावर पुढचे लिहीन..

उत्तम परिचय. गूल्डचे नाव मुख्यतः रिचर्ड डॉकिन्सच्या पुस्तकातून-भाषणातून वाचले आहे. पुस्तक नक्की वाचेन.

आगाऊ, पुस्तकाचा परिचय आवडला.

सोशल डार्विनिझम बद्दल गेल्या वर्षात बरेच काही वाचनात आले. शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे आपले सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांतांद्वारे गुलामगिरी, वंशभेद, वर्णभेद यांचे समर्थन केल्याचेही तपशील काही लेक्चर्समध्ये ऐकले व वाचले. नरसंहार, मास जेनोसाईडस (सामूहिक हत्या), हिंसाचार व शोषणात या सिद्धांतांचा मोठा वाटा होता. ह्यूमन झू हे देखील त्यातूनच जन्माला आले. त्याबद्दल लेखक काही भाष्य करतो का?