एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

Submitted by पाषाणभेद on 31 March, 2013 - 12:05

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.

निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.

शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!

निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?

शिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते. शिळपादन या दुर्लक्षीत गणल्या जाणार्‍या प्रकाराबद्दल श्रोत्यांची जाणीव वाढून त्याचे रसीक वाढत आहेत हे पाहून अभिमानही वाटतो आहे.

निवेदकः मला सांगा, ही शिळपादनाची सवय आपणास कशी लागली?

शिळबाबा: लहाणपणापासून मी स्थूल प्रकृतीचा आहे. मी जन्माला आलो तेव्हाही माझे वजन जास्त होते. घरचे सांगतात की त्या हॉस्पीटलात जन्माला येणारा मी पहीलाच इतक्या जास्त वजनाचा होतो. मोठा होत असतांना माझ्या अंगात आळसाचा शिरकाव झाला. प्रत्येक गोष्टीत मला आळस करण्याची सवय लागली. दुपारचे जेवण झाल्यानंतर मी आहे तेथेच झोपून जात असे. नंतर आई मला पाठीत रट्टा देवून रात्रीच्या जेवणालाच उठवत असे. अशा रीतीने दिवस जात होते. दरम्यान मी शाळेत जाण्याचाही कंटाळा सुरू केला. सुदैवाने घरची परिस्थिती चांगली असल्याने शाळेत जाण्याबद्दल मला कुणी आग्रह करत नसत. वडिलांचा सोनारकीचा धंदा होता. पुढे थोडा मोठा झाल्यानंतर मी पण त्यांच्या सोन्याच्या दुकानात जावून बसत असे. या सर्व परिस्थितीमुळे शिळपादनासाठी माझी शारिरीक स्थिती अनुकूल झाली आणि ती सवय पुढे वाढीस लागली.

निवेदकः अच्छा. पण मग या शिळपादनाच्या सवयीचे छंदात कसे रूपांतर झाले? ती सवय वाढीस कशी लागली?

शिळबाबा: आमचे दुकान पंचक्रोशीत मोठे व प्रसिद्ध होते. दुकानात बसत असतांना मी शिळपादन करत असे. माझी सवय पाहून आमच्या दुकानाच्या मॅनेजरने माझ्यासाठी एक मोठी कॅबीन दुकानात तयार केली. घरून निघून मी दुकानात कॅबीनमध्ये बसत असे. तेथेच जेवण चहा पाणी व्हायचे. सुरूवातीला मी कमी वेळेच्या शिळा वाजवत असे. नंतर नंतर मला जास्त वेळेच्या शिळांची सवय लागली. पुढे मग मला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा झाली. मी एकदा एका गाण्याच्या मुखड्यावर शिळपादन करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला. पुढे मी निरनिराळ्या गाण्यांच्या मुखड्यांवर सराव केला व तो जमू लागला.

निवेदकः अं फारच छान. बाहेर फाल्गून महिन्याचे फारच छान वातावरण आहे. तूम्ही बसा. आपण आपल्या श्रोत्यांना बाहेरची हवा चाखायला सांगू. मी पण त्यांच्याबरोबर एक ब्रेक घेतो. श्रोतेहो तूम्ही कोठेही जावू नका. आम्ही आलोच एक छोटा ब्रेक घेवून.

निवेदकः (परत ताजेतवाने होवून येतो): श्रोतेहो, आपण प्रसिद्ध शिळ्पादक श्री. शिळबाबा यांच्याशी बोलत आहोत. शिळबाबा, मला सांगा, शिळपादनाची वेळ वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले?

शिळबाबा: तो एक नियमीत सरावाचा भाग आहे. सुरूवातीला फारच कमी वेळ शिळपादन व्ह्यायचे. नंतर नंतर मी खुप सरावाने पोटातील हवानियमन करायला लागलो. यात योग क्रियेचा फार मोठा वाटा आहे. बाबा कामदेव यांच्या आश्रमात मला माझ्या बाबांनी उपचारासाठी सहा महीने पाठवले होते. तेथे शवासन या योगक्रियेचा मी झाडून अभ्यास केला. बाबा कामदेव यांनी मला माझ्यावर मेहेनत घेवून दोन महीन्यातच सर्व अभ्यासक्रम शिकवला आणि सन्मानपुर्वक मी आश्रम सोडला. त्यांनंतर दुकानातील एकांत कॅबीनमध्ये मी शिळपादनाचा रियाज करायला लागलो.

यात आहाराचाही भाग महत्वाचा आहे. मला काही पदार्थांचे नियमीत सेवन करावे लागते. चणे, फुटाणे माझ्या खिशात तर नेहमीच बाळगावे लागतात. हवाबाण हरडे, तत्सम आयुर्वेदीक औषधे यांचे मी नियमीत सेवन करतो.

निवेदकः अच्छा म्हणजे तूम्ही फारच मेहेनत घेतात तर. हे जे तूम्ही शिळपादन करतात ते अचूक कसे करतात? म्हणजे सुर कसा लावतात? त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना जरा सांगाना.

शिळबाबा: मी दुकानात टेपवर गाणी ऐकायचो. त्यात काही अभिजात भारतीय वाद्यांच्या रागावर आधारित कॅसेटस आमच्या मॅनेजरने मला दिल्या. त्या ऐकून मला एखाद्या रागावर आधारित शिळपादन करण्याची कल्पना सुचली व मी ती अंमलात आणली. आधी सांगितल्याप्रमाणे योगक्रियेचादेखील मला उपयोग होतो.

निवेदकः तुमचे कार्यक्रम वैगेरे होतात. त्याबद्दल जरा...

शिळबाबा: कार्यक्रम म्हणजे असे काही नाही, पण एखाद्या बैठकीत जाणे होते. मग माझे शिळपादनाचे कार्यक्रम होतात. मला बंदिस्त ठिकाणी कार्यक्रम करायला आवडत नाहीत. खुले मैदान वैगेरे असेल तर बरे पडते. आणखी एक सांगतो. माझ्या कार्यक्रमाची मी बिदागी काही घेत नाही. जाण्यायेण्याचा खर्च देखील मी आयोजकांकडून मागत नाही. सर्व काही मी मोफत करतो.

निवेदकः तुमच्या काही आगामी योजना आहेत काय? तुमचे काय मत?

आगामी योजना म्हणजे हा जो काही शिळपादनाचा प्रकार आहे त्याला अंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून देणे जेणे करून सर्वसामान्य जनतेपर्यंत याची माहिती मिळावी व शिळपादन सारख्या दुर्लक्षीत, हलक्या समजल्या जाणार्‍या प्रकाराबद्दल जागृती निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. बघूया. तुमच्यासारख्यांचे प्रोत्साहन असेल तर ते कार्यही सिद्धीस जाईल.

निवेदकः नक्कीच नक्कीच. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठिशी आहेतच. शेवटी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छीता?

शिळबाबा: काही संदेश देणे वैगेरे करण्याइतका मी काही मोठा नाही, पण मेहेनत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जगातला प्रत्येक व्यक्ती शिळपादनात यशस्वी होवू शकतो हेच माझे सांगणे आहे.

निवेदकः शिळबाबा, तुम्ही आज आमच्या स्टूडीओत आलात. आम्ही तुमचे आभारी आहोत. जाता जाता आमच्या श्रोत्यांना आपल्या शिळपादनाची एक झलक म्हणून तूम्ही काहीतरी ऐकवा.

शिळबाबा: मी सुद्धा तूमचा आभारी आहे. माझ्यासारख्या कलाकाराला बोलायला मिळते हे माझ्य भाग्य आहे. आता मी तुमच्या आग्रहाखातर राग 'बहारी ठसधमाल' मध्ये 'आओ सैया खेले होली, जरा नजदीकसे मारो पिचकारी' ही चीज दृतलयीत ऐकवतो. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार.

(ही मुलाखत एकाचवेळी आंतरजालावर निरनिराळ्या संकेतस्थळांवर प्रकाशित केली गेली.)

- पाषाणभेद

Group content visibility: 
Public - accessible to all site users