मोक्ष

Submitted by प्रकाश कर्णिक on 30 March, 2013 - 23:48

siddha.png

त्याला आता खूप दम लागला होता पण अजून अर्धा पर्वत सुध्दा चढून झाला नव्हता. त्यानं पाठीवरच्या बँगपँक मधील पाण्याची बाटली काढली आणि तो एका मोठ्ठ्या शिळेवर विसावला. वरून सूर्य तळपत होता आणि अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. बाटलीतील पाणी देखिल गरम झाल्यानं मचूळ लागलं. हाताचा आडोसा धरून त्यानं किलकिल्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहिलं तेंव्हा त्याचे डोळे दिपले आणि डोळे मिटताच अंधारी आली. हल्ली त्याला त्याचं वाढतं वय जाणवू लागलं होतं. या गोष्टीची त्याला क्षणभर गम्मत वाटली. गिर्यारोहणाचा अनुभव त्याला काही नवीन नव्हता. अनेक वर्ष त्यानं पर्वत खाईतून आणि डोंगरदरीतून पायपीट केली होती आणि ती सुध्दा एकट्यानं! अरुणाचल, पटनमतीत्थ, मानसरोवर, चारधाम, लडाख, तिबेटचे पहाड, विंद्या आणि सैह्याद्री, युरोप आणि अगदी ईजिप्त मधील सिनाई पर्वत सुध्दा तो चढला होता. पण त्याच्या शोधाला अजून यश आलं नव्हतं. त्याची जिद्द अजूनही कायम होती आणि त्याची प्रबळ इच्छाशक्ती सुध्दा. प्रत्येक वेळी त्याला वाटत असे की आता मार्ग मिळाला पण त्याची निराशा होत राही आणि निश्चय वृद्धिंगत होत असे. त्याला जाणीव होती की शरीर पूर्णपणे थकायच्या पूर्वी त्याला उद्दिष्ट गाठणं आवश्यक आहे. यावेळेला मात्र त्याला जवळ जवळ खात्री झाली होती की तो पहात असलेला पर्वत अगदी हाच आहे आणि आता त्याची पायपीट संपुष्टात आली आहे. कित्येक हजार मैलांचे अंतर पार करून ज्या आशेनं तो इथवर आला होता ती आता पूर्ण होणार होती आणि या विचारांनी तो जरुरीपेक्षा अधिक वेळ त्या शिळेवर रेंगाळला. त्याचे डोळे बंद होते आणि नेहमी प्रमाणे त्याच्या मनःपटलावर विनासायास तो पर्वत दिसू लागला. आता त्याला माहित झालं होतं की जो पर्वत त्याला दिसतो आहे त्याच पर्वतावर तो चढू लागलाय. पण आश्चर्य म्हणजे आता त्याला पूर्ण पर्वत दिसत नव्हता तर फक्त त्याच्या पुढचा दृष्टीक्षेपातील पर्वतच दिसत होता. जरी त्याला आपल्या बंद डोळ्यासमोरचं पर्वताचं दृश्य दूर करण्यासाठी प्रयास करावे लागले तरी त्यासाठी आतापर्यंत योग्य ती क्लुप्ती त्याला अवगत झाली होती. त्यानं आपल्या दिवंगत पत्नीची आठवण केली आणि ती डोळ्यासमोर अवतरताच पर्वताचं दृश्य नाहीसं झालं.
तिला जाऊन बरीच वर्ष झाली होती. त्यांची मुलं जगाच्या पाठीवर वेगवेगळया ठिकाणी पांगली होती आणि त्यांचा दुरावा तिला सतत यातना देत असे. ती पूर्णपणे आयुष्याशी समरस जगली आणि त्याच्या ध्यासाशी तिचा सुतराम संबंध नव्हता. तो मुलांच्या आठवणीतून केंव्हाच मुक्त झाला होता पण तिला तडफडताना पाहून तिच्या यातनांची झळ त्याला लागत असे. ती शांतपणे नं त्रास होता शरीर सोडून गेली याचं त्याला एकार्थी समाधान होतं. त्यानं तिच्याकडे निरखून पाहिलं. गेल्या काही दिवसांत ती अधिक वृध्द झाली होती. त्याला स्वतःला वाढत्या वयाची कधी खंत वाटली नाही तरीही तिच्याकडे पाहून त्याला स्पर्श झाला. तो कधी आरश्यात पहात नसे पण काही दिवसांपूर्वी झऱ्यातून ओंजळीने पाणी पिताना त्यानं आपल्या हलणाऱ्या छबिकडे निर्विकारपणे पाहिलं होतं. त्या क्षणापासून पासून ती त्याला अधिक वृध्द दिसू लागली होती. तो म्हणाला सुध्दा “ किती ग केस रुपेरी झालेत आणि हे काय चेहेऱ्यावर सुरकुत्या सुध्दा ! जरा काळजी घे प्रकृतीची.” त्यावर ती हसून उद्गारली “तुम्ही पण काय हे लांबलचक केस आणि दाढी वाढवली आहे. पांढरे केस आणि पांढरी दाढी पाहून लोक म्हणतील, हा पहा कालिदासाच्या शकुंतलेचा बाप आला.”
त्यानं डोळे उघडले आणि आपल्या भगव्या अंगरख्याकडे बघितलं. घामानं ठीकठीकाणी अंगरखा ओला झाला होता. तो सुर्योदया पासून चालत होता आणि मध्यान्ह झाली होती. थोड्याच वेळात निवारा पाहून थांबायचं त्यानं ठरवलं. तिथच फलाहार करून थोडी विश्रांती घ्यायचा त्यानं विचार केला. ज्या गतीनं तो पर्वत चढत होता त्यावरून शिखरावर पोहोचे पर्यंत सूर्यास्त होण्याची चिन्हं दिसत होती.

आज गुरु पोर्णिमा होती म्हणून तो संपूर्ण दिवस फलाहारावर काढणार होता. त्यानं झाडाखाली बसून प्रार्थना केली आणि बरोबर आणलेलं फळ खाल्लं. खरं तर त्यानं कर्मकांड, उपास तापास, पूजाअर्चा या गोष्टींना केंव्हाच त्यागलं होतं पण जसा शरीरधर्म कसल्याही साधनेत सुध्दा अपरिहार्य असतो तसा कृतज्ञतेनं तो काही गोष्टी पाळत असे त्यातीलच एक म्हणजे आहारापूर्वीची प्रार्थना. धार्मिक विधींचा अंतिम लक्ष गाठण्यासाठी काही उपयोग नाही किंबहुना त्याच्यामुळे फक्त दिशाभूल आणि वेळेचा अपव्यय होतो याची त्याला पूर्ण खात्री पटली होती. तसं तर तो दोन तीन दिवस शिखरावर राहण्याच्या तयारीनं आला होता. त्याला आपण काय पाहणार आहोत आणि काय करणार आहोत याची पुसट देखिल कल्पना नव्हती. पण अंर्तज्ञानाच्या शोधात वाट अशीच अगम्य असते असा त्याचा विश्वास होता. आता त्या वाटेचा शेवट होण्याचा क्षण आला आहे याची त्याला खात्री वाटत होती. त्यानं झाडाला पाठ टेकून डोळे मिटले.

पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर पर्वत उभा राहिला. त्याला आता सवय झाली होती. कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे त्याला पक्क कधी ते आठवत नव्हतं तेंव्हा पासून पर्वत त्याला दिसू लागला होता. प्रथम त्याला तो पर्वत क्वचित दिसे पण हळू हळू जसा तो पर्वताकडे लक्ष देऊ लागला तसा पर्वत स्पष्टपणे आणि अनेकदा दिसू लागला आणि अनेक वर्षांच्या कालावधीत त्याचं सर्व लक्ष पर्वताकडे केंद्रित होऊ लागलं. त्याची पत्नी स्वर्गवासी झाल्यापासून तर तो पर्वतच त्याचा साथीदार बनला होता आणि आज तर तो प्रत्यक्ष पर्वताच्या सान्निध्यात होता. प्रयासानं त्यानं पर्वताला बाजूला केलं आणि त्याची पत्नी आता समोर आली. तिनं विचारलं “खाल्लंत का काही? हल्ली अजिबात खाण्यावर लक्ष नसतं तुमचं. किती कृश झाला आहात!” त्याला उत्तर द्यायची आवश्यकता भासली नाही. आजकल त्याचं उत्तर तिला आपोआपच कळत असे.
“ मी मोक्षाजवळ पोचलो आहे.” त्यानं अबोलपणे तिला सांगितलं. ती म्हणाली “ हो का? मी आहे नं तुमच्या बरोबर!” ती थांबून बोलली “ माहित नाही? बरं पाहू.” त्याच्या कडे उत्तर नव्हतं म्हणून तिला त्यानं दूर केलं.
परत पर्वत समोर आला. आत्ता पर्यंत तो पर्वताला नुसता शोधत होता पण आज तो त्याच्या सान्निध्यात होता. त्याच्या लक्षात आलं की पर्वत आहे, म्हणजे स्थित आहे, नव्हे फक्त आहे. त्याला काय वाटत होतं हे शब्दातून व्यक्त करणं कठीण होतं तरीही त्याला दोन तीन शब्द सुचलेच ‘जागृत’, ‘अस्तिव’ आणि ‘सजीव’. त्याला आपल्या तुटपुंज्या भाषेची लाज वाटणं कधीच बंद झालं होतं. त्याच्या ध्यानात आलं होतं की एक व्यक्ती आपली अनुभूती दुसऱ्याला सांगण्याचा कसा दयनीय प्रयत्न करते आणि दुसरी व्यक्ती त्यावर समजले असल्याची ग्वाही देते पण दोन्ही व्यक्तींच्या अनुभूती आणि आकलन किती वेगळे असतात ते. त्याला हे पण जाणवलं की आत्तापर्यंत तो पर्वताकडे एक दृश्य म्हणून पाही पण आज पर्वत स्थूल अनुभवात आहे. त्यानं ग्लानी झटकली आणि तो उठून उभा राहिला. सूर्यावर आलेले एक दोन पांढरे ढग पुढे सरकले आणि सूर्य पूर्ण तेजाने झळाळू लागला. त्यानं परत चढायला सुरुवात केली.

शिखरावर पोहोचेपर्यंत सूर्य अस्ताला आला होता. त्यानं वळून पाहिलं. चंद्रोदय झाला होता आणि पौर्णिमेच्या चंद्राचा गोल सूर्यापेक्षा मोठ्ठा दिसत होता. त्यानं उत्तरेकडे पाहिलं. सर्व शिखरं खुजी दिसत होती तरीही त्यांच्यावर पडलेला लाल सूर्यप्रकाश विश्वकर्म्याच्या भव्य कलाकृतीचं दर्शन अधिक भारदस्त करत होता. आता थोडया वेळातच रजनीचं साम्राज्य पसरणार होतं. त्याला उत्सुकता लागली आणि त्यानं डोळे मिटले. त्याच्या डोळ्यासमोर आता पर्वत नव्हता तर वृक्ष होते. त्यानं दक्षिणेकडे वळून पाहिलं तेंव्हा काही अंतरावर त्याला दाट झाडी दिसली. त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. झपाझप चालत तो झाडीत शिरला. झाडीत खूप अंधार होता आणि कसलाच प्रकाश गर्द झाडीतून आत शिरत नव्हता तरीही तो सहजपणे एका नैसर्गिक पायवाटेने पुढे चालला होता. त्याला अचंबा वाटला कारण फांद्याच काय पण पानं सुध्दा त्याची वाट आडवत नव्हती. काही वेळ चालल्यावर तो एका गुहेच्या तोंडाशी आला. गुहेचं द्वार आतून पडणाऱ्या उजेडामुळं ओळखू येत होतं. तो आत शिरला. गुहा फार मोठ्ठी नसावी असं त्याला वाटलं पण प्रथम त्याची नजर वर गेली जिथून चंद्राच्या प्रकाशाची शुभ्र किरीणे आत येत होती. आणि मग त्याचं लक्ष गेलं! प्रकाशाच्या झोतात एक साधू पहुडला होता. त्याला चित्रात पाहिलेल्या गौतम बुद्धाची आठवण झाली. बुद्धाप्रमाणे त्या साधूनं कोपरावर मस्तक विसावलं होतं. शुभ्र लांब दाढी पिंजारली होती आणि लांब पांढरे केस खांद्यावरून ओघळले होते. अंगावर त्याच्यासारखाच भगवा अंगरखा होता. तो चकित झाला. त्याला साधू ओळखीचा वाटला. क्षणभर त्याला ओहोळात ओंजळीने पाणी पिताना पाहिलेल्या प्रतिमेचा भास झाला.
साधू त्याच्याकडे रोखून पहात होता.
साधू म्हणाला “ ये, बस “
त्याने साधूकडे पहिले आणि साधूने त्याच्या डोळ्यात. क्षणार्धात त्याला ओळख पटली पण त्याला तो साधू कुठेही भेटल्याचे काही आठवेना. साधूनं त्याला विचारलं “ तू कोण?” तो म्हणाला “मी साधक, तुम्ही कोण?”
साधू बोलला “ मी सिद्ध!”
साधक नुसताच बसून होता कितीतरी काळ. मग त्याला रहावेना आणि तो सिद्धाला म्हणाला “ मी शोध घेतोय “
सिद्धाने प्रश्न केला “ कशाचा?”
साधक म्हणाला “ मोक्षाचा “
सिद्धाने विचारलं “म्हणजे काय?“
साधक म्हणाला “अंर्तज्ञान, मुक्ती.’
सिद्ध म्हणाला “अंर्तज्ञान? मग तू बाहेर का शोधतो आहेस? आणि मुक्ती कोणापासून?”
“मी जीवन मरणाच्या रहाटगाड्यापासून मुक्ती शोधतोय” साधक म्हणाला
“ते कसं शक्य आहे. तुझं शरीर कधीच नष्ट होणार नाही, ते अनंत काळापर्यंत आहे. हा तर ब्रम्हांडाचा नियम आहे. हे ब्रम्हांडाचं स्वरूप आहे. “
“मी शरीर नश्वत आहे हेच सर्व ग्रंथां मधे वाचलंय आणि अचेतन देहाला नाही का अग्नी देत?”
‘हो पण अग्नी सुध्दा त्याचा नाश नाही करू शकत. अग्नीच्या पवित्र सान्निध्यात फक्त बदल घडतो. पण परत या पंचमहाभूतात शरीराचं वेगळ्या रुपात अस्तित्व असतच. शरीर पंचमहाभूतातून निर्माण होतं आणि त्यात विलीन होतं, नाश नाही पावत. आणि अग्नी सुध्दा या ब्रम्हांडाच्या उर्जेचा भाग आहे. ब्रम्हांडातील एक तत्व दुसऱ्या तत्वाचा नाश नाही करू शकत, फक्त बदल घडू शकतो ” सिद्ध म्हणाला
“आलं ध्यानात, पण मग पुनर्जन्म आणि या भूतलावरील दुखः या पासून कशी मुक्तता होईल?
“पुनर्जन्म? कुणाचा आणि कशाचा?”
“माझा.”
“मृत्यूनंतर तुला वेगळं अस्तित्व कसं रहाणार? पावसाचा थेंब आकाशात असेपर्यंत अस्तित्व टिकवून ठेवतो पण सागरात पडल्यावर त्या थेंबाला कोण आणि कशासाठी शोधणार? तीच त्याची मुक्ती. “
“मग हे आयुष्य काय आहे? मुक्तीचा ध्यास नाही?” साधक गोंधळून गेला होता.
“आयुष्य काय आहे? हे त्या नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला विचार, त्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या पक्षाला विचार, उमलणाऱ्या कळीला विचार, नाचणाऱ्या मोराला विचार. आयुष्य काय आहे हे आयुष्य जगणाऱ्यांना विचार. आयुष्य काय असतं हे मृत्यूच्या दारात असलेल्यांना विचार. ज्यांना आयुष्य हरवायचं नसतं त्यांना मृत्युचं भय वाटतं. आणि जे सहज पणे मृत्यूला सामोरं जातात त्यांना आशा असते की काहीतरी भव्य दिव्य त्या दारा पलीकडे आहे.” सिध्द म्हणाला
“पण, या सृष्टीच्या सृजन कर्त्याचं दर्शन मला कसं होईल?” साधक खिन्न होत म्हणाला
“ सोपं आहे. जर तुला सृजन कर्त्याचं क्षणोक्षणी दर्शन होत नसेल तर तू आंधळा आहेस. समजा तुझी पंचेंद्रिय काढून घेतली तर काय होईल?” सिद्ध म्हणाला
“मला दिसणार नाही, मी ऐकू शकणार नाही, स्पर्श आणि गंध मला कळणार नाही आणि कशाचीही चव मला लागणार नाही.” साधक म्हणाला. त्याला कळेना की सिद्धाला काय सांगायचं आहे.
“आणि जर तुला विमृती झाली तर?” सिद्धानं आणखी प्रश्न केला
“तर मला काहीच विचार असणार नाहीत कारण इंद्रियांनी दिलेल्या माहितीनुसार मी विचार करतो “ साधकानं पुढे उत्तर दिलं. त्याला सिद्धाच्या बोलण्याचा अर्थ समजायची घाई झाली होती.
“पण त्या परिस्थितीतही तुला तुझं अस्तित्व मात्र जाणवत राहील” सिद्ध म्हणाला
‘हो, मी अस्तित्वात आहे याची मला जाण असेल.” साधक विस्मयतेने म्हणाला
“तुला ती जाण असेल नाही तर सतत आहे. नाही का ?” सिद्ध म्हणाला
“हो , माझ्या अस्तित्वाची जाण अखंड आहे , अगदी झोपेत सुध्दा “
“आणि अशा वेळी जर अग्निनं तुझं संवेदना नसलेलं शरीर भस्म केलं तर?” सिद्धानं प्रश्न केला
“ तर मग मीच असेन. शरीर नसल्याने माझ्या अस्तित्वात काही फरक पडणार नाही ” साधकाच्या तोंडून शब्द आले
“मग त्या स्थितीत जायची घाई का? सर्वांनाच मुक्ती मिळते तशी तुला पण मिळेल, सहज पणे. सायास या शरीरासाठी करायला लागतो, मुक्ती साठी नाही.” सिद्ध म्हणाला
साधक पूर्णपणे गोंधळून गेला होता. त्याच्या आयुष्याचं सार त्याच्या मोक्षाच्या आणि मुक्तीच्या ध्यासात होतं. संपूर्ण आयुष्य त्यानं या अंतिम क्षणासाठी खर्ची केलं होतं आणि शेवटी सिद्ध म्हणतो त्याइतकं सोपं होतं?
त्यानं धाडस करून विचारलं “ मग तुम्ही सिध्द आहात ते कसे?”
सिद्धच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटलं “ तूच म्हणालास की जो पर्यंत इंद्रिय आहेत तो पर्यंत हे विश्व आहे. शरीर एक संगणक आहे त्याला मुलभूत अस्तित्वासाठी लागणारी माहिती म्हणजे साँफ्टवेअर जन्मजात प्रत्येक पेशीत लिहून येतं.”
साधक मधेच म्हणाला “आश्चर्य आहे की तुम्हाला संगणका विषयी माहिती आहे “
“आश्चर्य कशासाठी? जे तुला माहिती आहे ते मला माहिती आहे. मी फक्त तुझ्या भाषेत तुला सांगू शकतो हिच तर मर्यादेची बाब आहे. “ सिद्ध म्हणाला “ हो तर, शरीर नंतरच्या कालात इंद्रियांच्या द्वारे आणखी साँफ्टवेअर गोळा करते. त्यात माहितीची साठवण म्हणजे मेमरी आणखी भर टाकते. अशा रितीने बरीच अडगळ जमा होत राहते. या साँफ्टवेअर मधे आणि माहिती मधे अडकून मनुष्य स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला हरवून बसतो. मृत्यू म्हणजे या संगणकाचा नाश अगदी साँफ्टवेअर सकट त्यालाही मुक्ती म्हणता येईल. पण जर या संगणकाचा जनक संगणका पासून, साँफ्टवेअर पासून पूर्णतः मुक्त झाला तर त्याला मोक्ष म्हणतात “
साधकाला रहावेना, त्यानं विचारलं “ मग तुम्हाला मोक्ष मिळालाय?”
सिद्ध म्हणाला “ अजून नाही. मोक्षा नंतर शरीर नाही. मी तुझ्याशी जोडला गेलोय. तूही पर्वताशी म्हणजे मोक्षाच्या इच्छेशी आणि पत्नीशी जोडला गेल्याने तुला मोक्ष नाही “

साधक उठला. त्याची या वेळी देखिल निराशा झाली होती. त्याला मोकळी हवा घ्यावीशी वाटली. सिद्ध म्हणतो एवढं साधं असेल तर आयुष्यभरचे प्रयास व्यर्थ गेले असं त्याला वाटलं. तो बाहेर आला आणि त्यानं झाडी पार केली. बाहेर सुध्दा खूप अंधार होता. त्याला आकाशात चंद्र कुठे दिसेना. त्यानं ताऱ्यांकडे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की अमावस्या आहे. त्याला आश्चर्य वाटलं. गुहेत सिद्धाबरोबर समय पुढे सरत नाही पण बाहेर मात्र दिवस आणि रात्र यांचं चक्र चालू आहे याची अनुभूती त्याला झाली. तो एका शिळेवर बसला आणि त्यानं डोळे मिटले पण आता त्याला नेहमी प्रमाणे पर्वत दिसेना. त्यानं त्याच्या पत्नीला भेटायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. त्याच्या लक्षात आलं की आपला पर्वताबरोबर संबंध संपला. त्याने परत डोळे उघडले, आकाशात आता चंद्रोदय झाला होता आणि त्याच्या मंद प्रकाशात शिळा उजळून निघाली होती. परत त्याच्या नकळत समय पुढे सरला होता. आता समय त्याच्या अपरोक्ष व्यतित होणार असं त्याला वाटलं. शिळेकडे पहात असताना त्याच्या अवती भवतीचं जग वेडं वाकडं दिसू लागलं त्याला वाटलं आपण एक बर्फाचा तुकडा आहोत आणि बर्फाचा खडा कसा पाण्यात विरघळतो तसं आजूबाजूचं सर्व काही पारदर्शक होऊन विरघळू लागलंय. त्याला खूप घाम फुटला आणि छातीची स्पंदनं अतोनात वाढली. त्याच्या लक्षात आलं की अवकाश आणि काळ याच्या पलीकडचं काहीतरी त्याला जाणवतंय. त्याला आता स्वतःला हरवायचं नव्हतं. त्यानं कशाच्यातरी आधारासाठी डोळे गच्च बंद केले आणि क्षणात त्याच्या समोर एक नुकतचं जन्मलेलं अर्भक आलं. त्याची नाळ सुध्दा अजून कापलेली नव्हती. अर्भकाचे डोळे अगदी थोडे उघडले आणि त्या क्षणी त्याची आणि त्या नवजात अर्भकाची दृष्टीगाठ पडली. लगेच त्यांची ओळख पटली आणि अर्भकानं टाहो फोडला. त्याला हे नवीन होतं, तो गुहेकडे धावत सुटला. त्याला अवतीभवतीचं जग वितळू लागल्याचं जाणवत होतं. गुहेत धापा टाकत येऊन खाली बसणार तर त्याला सिध्द तेथे दिसेना. त्यानं त्या छोटया गुहेत सगळीकडे नजर टाकली पण सिध्द अदृश्य झाला होता. वरून चंद्र प्रकाशाची तिरीप सिद्धाच्या आसनावर पडत होती. क्षणार्धात सर्व काही त्याच्या जाणीवेच्या कक्षात आलं. आता त्याच्या चेहेऱ्यावर बुद्धाप्रमाणे मंद स्मित उमटलं. तो सिद्धाच्या जागी चंद्रप्रकाशात पहुडला आणि कोपरावर डोकं ठेऊन त्या नुकत्याच दृष्टीभेट झालेल्या साधकाची वाट तो पाहू लागला.

--------------------------------------------*------*-------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users