अमिरी खमण किंवा सेंव खमणी.

Submitted by सुलेखा on 29 March, 2013 - 12:11
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अमिरी खमण करण्यासाठी पूर्वतयारी लागते.त्यानंतरच्या कृतिसाठी एकुण अर्धा तास लागतो.त्यामुळे हा प्रकार थोडा वेळखाऊ बनतो पण परिणाम सगळ्यांच्या पसंतीस पडणारा आहे.मूळ कृतिप्रमाणे केले तर बिघडण्याचे चान्सेस कुठेही नाहीतच.प्रमाण काटेकोर नाही त्यामुळे घडले-बिघडले असे काहीही होणार नाही.ह्यात खाण्याचा सोडा ,इनो असे काहीही वापरायचे नाही पण सायट्रीक अ‍ॅसिड वापरायचे आहे.
अमिरी खमणचे साहित्यः--
१ वाटी चणाडाळ.
१ इंच आले किसलेले.
८ हिरव्या मिरच्या. ...............[एकुण कृतिसाठी]
१ टी स्पून प्रत्येकी हिंग व हळद..[ " " ]
१ टी स्पून प्रत्येकी मोहोरी व जिरे .
४ टेबलस्पून तेल.
१ टी स्पून मीठ,
२ टी स्पून साखर.
१ टी स्पून सायट्रीक अ‍ॅसिड.
चिरलेली कोथिंबीर.
अर्ध्या लिंबाचा रस.
पाणी गरजेनुसार.
बारीक शेव.
डाळींबाचे दाणे.
गव्हाची चाळणी.

क्रमवार पाककृती: 

चणाडाळ धुवुन एक तासभर पाण्यात भिजवुन ठेवावी.
भिजलेली चणाडाळ ,किसलेले आले व २ हिरव्या मिरच्या मिक्सरमधे पाणी कमी घालुन वाटुन घ्यावे.वाटलेले मिश्रण सरभरीत असावे तसेच अगदी बारीक नसावे.
khamani-1.JPG
ही वाटलेली डाळ एका मोठ्या बाऊलमधे काढुन घ्या.त्यात अर्धा टी स्पून हळ्द,अर्धा टी स्पून हिंग,१ टी स्पून मीठ ,१ टी स्पून साखर आणि १ टी स्पून सायट्रीक अ‍ॅसिड,१ टेबलस्पून तेल घाला्.हाताने हे मिश्रण एकाच दिशेने फेटा.लागले तर थोडे पाणी घाला.मिश्रण सरभरीत असावे.
आता कूकरमधे भरपूर पाणी घालुन [वरणभाताच्या डब्यांसाठी घालतो त्याच्या दुप्पट.] त्यात एक वेळणी /लहान रिंग ठेवुन गॅसवर तापायला ठेवावे.त्यातल्या वेळणीवर एक मोठा कूकरचा डबा किंवा बाऊल तेलाचा हात लावुन गरम करायला ठेवा.
कूकरमधले पाणी उकळायला लागले कि त्यातल्या बाऊल मधे डाळीचे फेटलेले मिश्रण टाकावे.मिश्रणाचा वरचा पृष्ठभाग चमच्याने सारखा --लेव्हल-करुन घ्यावा .कूकरला रिंग लावावी पण शीटी लावु नये.गॅस मध्यम आचेवर करुन १५ मिनिटे हे मिश्रण वाफवुन घ्यावे.
कूकरचे झाकण ऊघडुन आतील डबा बाहेर काढुन थंड होवु द्यावा.
साधारण अर्ध्या तासाने डब्यातले वाफवलेले मिश्रण एका ताटात केक सारखे उपडे करुन काढुन घ्यावे.
khamani-2.JPG
हाताने त्याचे लहान लहान तुकडे मोडुन घ्यावे.
एका दुसर्‍या ताटावर गहू चाळणी ठेवुन त्यात मोडलेले डाळीचे मिश्रण घालावे व चाळणीवर हाताने दाबुन ते गाळुन घ्यावे.खाली एकसारखा भुगा पडलेला दिसेल.[हे च ते "अमिरी खमण "]पण अजुन तयार झाले नाही थोडी महत्वाची कृति बाकी आहे.]
चाळणीवर राहिलेले थोडीसे डाळवजा मिश्रण एका वाटीत काढुन घ्या. याची चटणी वाटायची आहे.
khamani-4.JPGkhamani-5.JPG
मिक्सरमधे ही वाटीतली खडवळ १ हिरवी मिरची बारीक चिरुन ,चिरलेली कोथिंबीर,अर्धी वाटी पाणी,१ टी स्पून साखर्,अर्ध्या लिंबाचा रस असे पातळसर वाटुन घ्या्. ही चटणी तयार झाली आहे.
मायक्रोवेव्ह बाऊल मधे ४ मिरच्याना १ टी स्पून तेल आणि थोडेसे मीठ लावुन ३० सेकंद मावेत ठेवा.या मिरच्या तयार झाल्या अमिरी खमणबरोबर खायला .
आता गॅसवर एका कढईत फोडणीसाठी ३ टेबलस्पून तेल गरम करा .त्यात मोहोरी-जिरे-हिंग-हळद व एक हिरवी मिरची मोठे तुकडे चिरुन ,कढीपत्ता पाने हाताने तोडुन छान परता .आता फोडणीत पाऊण वाटी पाणी घाला . हे फोडणी मिश्रीत पाणी छान उकळले कि त्यात चाळणीवर चाळलेले अमिरी खमण घालुन छान परता.गॅस बंद करा.
आता प्लेट मधे अमिरी खंमण घेवुन त्यावर चिरलेली कोथिंबीर,ओले खोबरे,बारीक शेव डाळिंबाचे दाणे ,आवडेल तितकी हिरवी चटणी घाला. त्यातच मावे.त केलेली हिरवी मिरची खोचुन खायला घ्या.
khamani-6.JPG
हे अमिरी खमण गरम वा थंड दोन्ही प्रकारे छान लागते.तरीही जर गरम खायचे असेल तर ते गरम रहावे म्हणुन एका मोठ्या पातेल्यात पाणी सतत गरम राहील अशा रीतीने गॅसवर ठेवुन त्यात मावेल अशा दुसर्‍या पातेल्यात अमिरी खमण घालुन ठेवावे आणि मोठ्या पातेल्यावर एक झाकण ठेवावे.
हे अमिरी खमण आपल्याकडच्या "वाटल्या डाळीच्या " चवीची आठवण करुन देते.वाटली डाळ करताना ती सतत परतावी लागते नाहीतर कढईला चिकटते व तेल जास्त घातले तरच ती चवीला छान लागते आणि मोकळी होते.पण जर या पद्धतीने केली तर कमी तेलात करता येईल.थंड झालेली डाळही मऊ रहाते.फोडणीत परल्यावर कैरी किसलेली कैरी त्यात घातली तर वाटली डाळ अप्रतिम चवीची होते.

माहितीचा स्रोत: 
मारु रंग रंगिलु गुजरात.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त. आमिरी खमण म्हणजे ( बिघडलेला) ढोकळा चुरुन असेच वाटायचे मला. एवढा खटाटोप असेल असे वाटलेच नव्हते.
फोटोंवरुन व्यवस्थित कल्पना येतेय कसे करावे ह्याची. तयार ढोकळ्याचा फोटो तोंपासु Happy

खूप खटपटीचा पदार्थ(आई करते..). मी त्या खमणात साखर घालून खाते. (चाळणीतून काढलेल्या मिश्रणात).

मस्त आहे रेसिपी .. Happy

(अजूनही ढोकळा नामक प्रकरण करायला नाहीच धाडस होत, ह्यात सोडा नसला तरी .. :))

फोटोतल्या आमिरी खमणावर डाळींबाचे दाणे नाही का घातले? Happy

आमच्याकडे वॉशिंग्टन/व्हर्जिनिया भागात पटेलकडे मिळते सायट्रिक अ‍ॅसिड.

झंपी,फोडणीच्या पाण्यात २ टी स्पून साखर घालायची त्यात मिश्रण परतले कि तुला आवडणारी गोड चव अप्रतिम येईल.मला तितकी गोड चव आवडत नसल्याने मी फोडणीच्या पाण्यात साखर घालत नाही.

दोन्ही ढोकळ्याच्या रेसिपीज उत्तम आहेत!आता नम्बर खाटा ढोकळ्याचा! ढोकळा मोहोत्सव करूया मायबोली वर! सुलेखा तुसी ग्रेट हो!

शुम्पी, मी मूळ रेसिपीप्रमाणे केले व लिहीले आहे.सायट्रीक अ‍ॅसिड ऐवजी लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर वापरलीस तरी चालेल.चव छान येते.बिघडणार काहीही नाही.