धन्य तुका देखियला...

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2013 - 05:20

धन्य तुका देखियला...

लळा इतुका लागला
करमेना विठ्ठलासी
धाडी विमान देहूसी
राही आता वैकुंठासी

भक्ति-वैराग्याच्या खुणा
अंगी ठाकल्या रोकड्या
देव स्वर्गींचे धाऊनी
घाली तुम्हा पायघड्या

मूर्तिमंत ब्रह्मरस
तुम्हाआंगी सामावला
शब्द कल्लोळ तेजाचे
वाटे वेद मुखे आला

माय-मराठी आपुली
धन्य धन्य तुवा केली
जन्म घेऊ वारंवार
तुम्हा शब्दांचीच भुली

धन्य संताजी मैतर
गाथाशब्द स्थिर केला
धन्य महाराष्ट्र भूमि
धन्य तुका देखियला

भावभक्तिमय गाथा
वाचू, थोडी आचरुन
क्षण क्षण जीवनाचे
जरा घेऊ उजळून

(तुकारामबीजेच्या निमित्ताने - फाल्गुन वद्य द्वितीया)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवड्ली
मनातून खोलवरून कुठूनतरी उगम पावून एखाद्या शांत निर्मळ झर्‍याप्रमाणे एकसंथ वाहत वाहत जाते ही कविता ...वाचकाच्याही मनातून !!