नो इन्कम डबल किड्स

Submitted by बेफ़िकीर on 25 March, 2013 - 04:15

"आम्हाला जन्माला का घातलेत?"

दोन वर्षाचा बाळू चिमुकल्या हाताची मूठ भातुकलीच्या टी सेटवर त्वेषाने आपटून बापकडे बघत म्हणाला.

बाप तिरमिरला. हा प्रश्न आपल्या थोबाडावर इतक्या लवकर आपटेल याची त्याला कल्पना नव्हती. बापने आपल्या एक वर्षाच्या चिमीकडे बघितले. चिमीच्या चेहर्‍यावर बाळूला सहस्त्र मोदकांचे अनुमोदन असल्याचे सुस्पष्ट दिसले बापला! बापने मग असहाय्यपणे आईकडे बघितले. लज्जित चेहर्‍याने आई बापला म्हणाली.

"तुम्हीच द्या ना उत्तर! मी तरी काय बोलू?"

बाळू संतापलेलाच होता. त्याने बापकडे हिंस्त्र नजरेने पाहात पुन्हा विचारले.

"दिडकी कमवायची नव्हती तर लोकसंख्या का वाढवलीत?"

बाप दोन्ही हातांनी चेहरा झाकून ओक्साबोक्शी रडू लागला. त्याचे अभद्र विव्हळणे आणि आक्रोश पाहवत नव्हता. आईला तर घेरीच आली. घेरी आल्यामुळे आत्तापर्यंत तोल जात असलेली आई आता सरळ उभी राहू शकली.

एक वर्षाची चिमी उठली व तिने बापकडे बघत आणि बाळूकडे बोट दाखवत कर्कश्श आवाजात सवाल केला.

"हा असताना माझी गलजच काय? मी काय तुमच्या वंशाचा दिवा आहे? की तुमचे आदनांव लावनाल आहे मी? मी पलक्याचे धन आहे. तुमचा तर काही कंत्लोलच नैय्ये की ब्वॉ आपल्या पोटी पलक्याचे धन निपजनाल की वंशाचा दिवा! मग हे नस्ते उद्योग कताला केलेत? जुगाली प्लव्लूत्ती आहे ही! मी तुम्हा दोघांचा झाईल निषेध कलते. पुढे लग्न झाल्यानंतय मी शाशली गेल्यावय हा बालू जल तुमच्याशी नीट वागला नाही तल तुमची भावनिक विचालपूश कलायला एक हक्काची व्यक्ती अशावी म्हनून शलल मला जन्माला घालता?"

"नाही गं चिमे नाही" - मानसिक यातना असह्य होऊन तडफडत आई म्हणाली.

बापने किंचित अंतर्मुख होत अत्यंत गंभीर स्वरात खालमानेने आरोप मान्य करावा तश्या थाटात उत्तर दिले.

"आमच्यावर कोणत्याही कुटुंबियाचे प्रेशर नव्हते की आम्हाला मूल व्हायलाच हवे असे! त्यामुळे आम्हाला दोन मुले झाली. आणि ती नेमकी तुम्हीच दोघे आहात."

हे ऐकून बाळू कडाडला.

"तुम्हाला आणि आईला कोणीही टोमणे मारले नाहीत? एकाही नालायक कुटुंबियाने तुमच्यात मर्दानगी नाही असे तोंडावर बोलून दाखवले नाही? नात्यात इतक्या बायका असताना एकही बाई आईला वांझ म्हणाली नाही?"

आईने स्वतःचे हात स्वतःच्या कानांवर आक्रोशत तारस्वरात उत्तर दिले.

"नाही नाही नाही"

बापने आईला थोपटले. हमसून हमसून रडणारी आई चिमीकडे पाहात म्हणाली...

"चिमे, आम्ही खूप प्रयत्न केला मूल न होण्याचा! माझ्याच काय ह्यांच्याही सगळ्या टेस्ट्स झाल्या. डॉक्टर म्हणाले की दोघांमध्येही दोष आहे. त्यामुळे खूप मनापासून प्रयत्न केलेत तरच मूल न होणे शक्य आहे. पण दैवात असते ते काय चुकते का गं? आमचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. आम्हाला मुले झालीच"

हे ऐकून बाळूने भातुकलीमधील एक बाहुली लाथेने खिडकीबाहेर उडवली आणि हातवारे करत किंचाळत तो म्हणाला...

"तुमच्या लग्नाआधी या विषयावर चर्चा केली नव्हतीत तुम्ही?"

बापने चमकून बाळूकडे बघितले. बाळू थेट या विषयावर येईल असे बापला वाटले नव्हते. पण आता उत्तर द्यावे लागणारच होते. बाप म्हणाला...

"केली होती चर्चा! आम्हाला मूल नको होते. हिलाही नको होते आणि मलाही! आम्हाला आमचे करिअर प्यारे होते. त्यातच आमचे मन गुंतलेले होते. दोघांच्याही घरच्यांनी 'मूल होणार नसेल तरच लग्न करू' असेही ठरवलेले होते. दोघांकडची एकही बाई भोचक आणि टोमणे मारणारी नव्हती. दोघांच्याही घरच्यांचे म्हणणे होते की मूल न होण्यामधूनच पुरुषाची मर्दानगी सिद्ध होते. इतकेच काय, आमच्या म्हातारपणची सोयही आम्हाला बघायची नव्हती. आम्हाला आमच्या वैवाहिक आयुष्यातला अनुबंधही दृढ करायचा नव्हता. आमचे नांव लावणारे कोणी असावे असेही आम्हाला वाटत नव्हते. इतकेच काय, आमचे कार्य आमच्याच बरोबर नष्ट व्हावे ही तर आमची प्राथमिक अट होती विवाहाची! बाळू, अरे तुझी आई तासभराची पत्नी आणि क्षणाची माता आहे रे! पण......"

चिमी थैमान घालत म्हणाली...

"पन? पन काय बाप? पन काय??????"

चिमीला तिच्या आईने उत्तर दिले...

"चिमे, आम्हाला वाटलं की मूल होणं म्हणजे काही नोकरीवरून घरी यायला उशीर झाला तर येताना पार्सल आणण्याइतके सोपे नसेल.... पण... "

"बोल आई... बोल... पन काय????" - चिमी चीत्कारली.

"पण चिमे... ते तर त्याहीपेक्षा सोपे होते गं... घात झाला आमचा"

बाळू आणि चिमीने एकमेकांकडे पाहिले. आपण दोघे म्हणजे फक्त आपल्या आई वडिलांच्या झालेल्या घाताचे दृष्य परिणाम आहोत ही भावना त्यांना सहन होईना! तीव्र संतापाच्या भरात बाळूने अख्खी भातुकली खिडकीबाहेर फेकली. चिमी हाताला लागेल ती वस्तू इतस्ततः फेकू लागली. तिचे ते भयानक रूप पाहून आई व बाप गळाठले. बाळू आणि चिमी या दोघांना ते स्वतः 'एक अवस्था आहेत की समस्या' हेच समजेना!

बर्‍याच वेळाने राग आटोक्यात आल्यावर बाळूने गंभीर होत बापला विचारले.

"तुमच्या दोघांच्या करिअरचे काय? आमचे पुढे काय? आम्ही कसे जगायचे?"

बापने धीर करून उत्तर दिले.

"आम्हाला डिंक फॅमिली व्हायचे होते. डबल इन्कम नो किड्स! पण आम्ही विचार केला. नुसतेच पैसे कमवून काय उपयोग? त्यापेक्षा एक दोन मुलांना जन्माला घालून त्यांच्या स्वप्नात आपली स्वप्ने पाहू. आयुष्य मजेत जाईल. आपण त्यांच्यावर प्रेम केले तर ते आपोआपच म्हातारपणी आपल्याला आधार देतील. तो काही लेनदेनचा प्रकार मानायचे कारण नाही. मूल झाल्यावरच आयुष्याला अर्थ येतो असे नाही, पण ज्यांचे आच हार विचार चांगले आहेत, वर्तन व्यवस्थित आहे त्यांनी मूल जन्माला घातल्यास सकस लोकसंख्या तरी वाढेल. तेही एक कर्तव्यच! बाकी करिअर म्हणशील तर तुमच्या दोघांच्या संगोपनात बिझी झाल्यामुळे आमच्या दोघांच्याही नोकर्‍या गेल्या. आता तुम्ही हेच आमचे करिअर. राहू गरिबीत, पण मजेत राहू, असा आम्ही विचार केला"

बाळू आणि चिमीला हे विचार पटले अ‍ॅन्ड दे ऑल लीव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर!

=======================

-'बेफिकीर'!

=================

टीप - कृपया हलके घ्यावे.

=================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपरोध उपहास छान हाताळला गेला आहे
अनेक पंचेस कल्पक व मनमुराद हसवणारे आहेत

पण उपरोध-उपहासाची मात्रा जरा जास्त उगाळली गेली आहे ( अतिशयोक्तीही झाली आहे जराशी)
काही जागी विशेष्तः समारोपाकडे हा विशय गंभीरपणे आजच्या परिस्थितीवर नेमके व उपयुक्त भाष्य करणारा आहे हे दिसले असते तर लेखन अधिक उत्तम ठरले असते

सर्व मते वैयक्तिक गै न

एखाद्या व्रात्य मुलाने पाठच्या बाकावर बसून पुढे मॅडम शिकवीत असलेल्या धड्याचे शीघ्र विडंबन करून मित्रमंडळात वही फिरवावी तसे वाटतेय. Wink
मुलाला पुढच्या बाकावर बसवलं तर पाठ्यपुस्तक स्वतःच लिहेल अशी प्रतिभा आहे. Happy

likhan chan ahe pan tumch likhan mhatalyavarti kahitari extra expectation chi savay zaliye.... mhanun bahutek kahitari sutlyasarkh vatatay.....
mhanajech chan ahe pan nehami sarkhi maja aali nahi..... Happy

बेफिकीर, नाही आवडला हा. जमल्यासारखाच नाही वाटला खरं तर. आवडणे - न आवडणे, पटणे-न पटणे ह्या पलिकडे तुमच्या लिखाणात जो एक ओघ असतो, वाचकाची पकड घ्यायची क्षमता असते, ते रसायन नाही जाणवलं.

फालतू बकवास.

विनोदाच्या नावाखाली >>तुझी आई तासभराची पत्नी आणि क्षणाची माता आहे रे! पण....<< असली हिणकस वाक्ये.

विनोदी सदराखालील हास्यास्पद लेखन.

"हा असताना माझी गलजच काय? मी काय तुमच्या वंशाचा दिवा आहे? की तुमचे आदनांव लावनाल आहे मी? मी पलक्याचे धन आहे. तुमचा तर काही कंत्लोलच नैय्ये की ब्वॉ आपल्या पोटी पलक्याचे धन निपजनाल की वंशाचा दिवा! मग हे नस्ते उद्योग कताला केलेत? जुगाली प्लव्लूत्ती आहे ही! मी तुम्हा दोघांचा झाईल निषेध कलते. पुढे लग्न झाल्यानंतय मी शाशली गेल्यावय हा बालू जल तुमच्याशी नीट वागला नाही तल तुमची भावनिक विचालपूश कलायला एक हक्काची व्यक्ती अशावी म्हनून शलल मला जन्माला घालता?"

>> हे फारच क्युट.. बादवे.. ते हा अ"श"ताना माझी गलजच काय? असे हवे होते Happy

मुलाला पुढच्या बाकावर बसवलं तर पाठ्यपुस्तक स्वतःच लिहेल अशी प्रतिभा आहे. >> बरोबर आहे . मुळ लेखापेक्षा विडंबन भारी !

आपल्या लेखनाचा मी फॅन आहे. पण हे लेखन केवळ ’बकवास’ याच श्रेणीत मोडु शकते. आज पहिल्यांदा भ्रमनिरास झाला.

अहो हे विडंबन आहे या लेखाचं, >> तेच नीट जमलं नाही अस म्हणतोय मी.
ह्याच्यापेक्षा बोका सेरीज मधले जोक्स जबरी होते.