बीएमएमच्या निमित्ताने उमेश कामत - प्रिया बापट यांच्याशी झालेल्या गप्पा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 March, 2013 - 02:44

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या जुलैमध्ये होणार्‍या अधिवेशनात 'युवांकुर' हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात मराठीतील आजची लोकप्रिय जोडी उमेश कामत व प्रिया बापट सहभागी होणार आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात हे दोघं त्यांच्या नाट्यप्रयोगांच्या निमित्तानं आले होते. दोन प्रयोगांच्या मधल्या वेळात त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी मायबोलीकर हर्पेन आणि chaitrali यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पा -

P3171228.JPG

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात ’युवांकुर’मध्ये तुम्ही जो नृत्याचा कार्यक्रम करणार आहात, त्याची काही विशेष तयारी केली आहे का?

प्रिया बापट - तयारी आता लवकरच सुरू करू. नाटकाच्या प्रयोगांमध्ये, सिनेमांच्या चित्रीकरणात आम्ही इतके व्यग्र आहोत, की तयारीसाठी वेळच मिळत नाहीये. आम्ही दोघं एकत्र एक नृत्य सादर करणार आहोत, आणि शिवाय एक-एक सोलो नृत्य असेल. मे महिन्यापासून आम्ही रीतसर तयारी सुरू करू. कार्यक्रम उत्तमच झाला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, आणि तो तसा व्हावा, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही अधिवेशनाला हजर राहणार असल्यानं कार्यक्रम निर्दोष सादर करणं, ही आमची जबाबदारी आहे.

परदेशात जाऊन कार्यक्रम सादर करायचा अनुभव कसा वाटतो? सगळे उत्सुक आहेत इतक्या मराठी कलाकारांना तिथे बघण्यासाठी.

उमेश कामत - आम्हीसुद्धा खूप उत्सुक आहोत, कारण हा आमचा परदेशातील तसा पहिलाच कार्यक्रम आहे. याआधी आम्ही फक्त एक नाटकाचा प्रयोग केला होता दुबईला, तिथल्या महाराष्ट्र मंडळापुढे. पण बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन हे खूप मोठं व्यासपीठ आहे. तिथे इतरही अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्यामुळे सर्वोत्तम कार्यक्रम सादर करण्याचाच आम्ही प्रयत्न करू.

तुम्ही दोघंही अभिनयक्षेत्राकडे कसे वळलात?

उमेश कामत - माझा मोठा भाऊ जयेश मोहन वाघांच्या ’चंद्रलेखा’ या संस्थेच्या नाटकांत काम करायचा. ती बघायला मी जायचो आईबाबांबरोबर कारण त्यांना फार आवडायचं की आपला मुलगा नाटकात काम करतोय. आणि एक दिवस अचानक मोहन वाघांनी मला विचारलं, 'काय रे, तू करशील का नाटकात काम?' आणि तिथूनच सुरुवात झाली. मी आधी व्यावसायिक नाटकं केली आणि मग आंतरमहाविद्यालयीन नाटकं केली. आज माझा भाऊ या क्षेत्रात नाही, पण मी इथेच रमलो.

प्रिया बापट - माझ्या कुटुंबातील कोणीच या क्षेत्रात नाही, पण मी आमच्या शाळेच्या (बालमोहन विद्यामंदिर) नाटकांमध्ये नेहमी भाग घ्यायचे. तेव्हा आमच्या चित्रकलेच्या बाईंनी, विद्याताई पटवर्धनांनी, मला 'नाटकात काम करशील का?’ म्हणून विचारलं, मी ’हो’ म्हटलं आणि तेव्हापासून माझा हा प्रवास सुरूच आहे. कॉलेजमध्ये असताना मात्र मी एकाही नाटकात काम केलं नाही. बालकलाकार म्हणून बर्‍याच दूरचित्रवाणी मालिकांमधून काम केलं होतं.

बालकलाकार म्हणून इतकं काम केल्यावर मुख्य भूमिकेतील रोल मिळायला काही अडचण आली का?

प्रिया बापट - सुदैवानं नाही. दहावी-बारावीचा, पदवीचा अभ्यास करताना मी नाटक केलं नाही. पण एवढ्या काळ नाटकांपासून, मालिकांपासून लांब राहूनही मला पुढे काम मिळत गेलं.

तुमचं पहिलं नाटक, पहिली मालिका कोणती?

उमेश कामत - मी आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापीठीय, राष्ट्रीय अशा सर्व स्तरांवर एकांकीका, नाटकं खूप केली. आणि हे करत असताना मला जाणवलं की आपल्याला हे आवडतंय. मी एम.कॉमला असताना ठरवलं की नाटकातच करियर करायचं. माझं पहिलं नाटक होतं 'रणांगण', 'चंद्रलेखा’चं. त्यानंतर मला 'आभाळमाया' मिळाली. यात मी बदली भूमिका केली होती. ’भेट’, 'काय द्याचं बोला' अशा चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. 'समर-एक संघर्ष'मध्ये मी एका पोलिओ झालेल्या मुलाची भूमिका केली होती.

प्रिया बापट - माझं पहिलं नाटक होतं 'वाटेवरती काचा गं!' मीना नाईक यांचं. लहान मुलांचं लैंगिक शोषण हा या नाटकाचा विषय होता. आम्ही त्यात हातावरच्या बाहुल्यांच्या साहाय्यानं सगळं दाखवलं होतं. आणि दुसरं 'नवा गडी नवा राज्य'. 'भेट', आभाळमाया'मध्ये मी बालकलाकार म्हणून काम केलंय. मुख्य भूमिका असलेली माझी पहिली मालिका म्हणजे 'शुभंकरोती'.

उमेश कामत - प्रिया बापट - अशा नाटका-मालिकांमधून आमच्या अधूनमधून भेटी होत राहिल्या व तिथेच आमचे ऋणानुबंध जुळले असावेत !

नौकरी.कॉमसारख्या जाहिरातीतून दिसल्यावर परत तुम्ही जाहिरातीत फारसे दिसला नाहीत.

उमेश कामत - काय होतं, तुम्ही जरी पंचवीसेक जाहिराती केल्या, तरी त्यातल्या पाचच दाखवल्या जातात, सगळ्या नाही. नौकरी.कॉमची जाहिरात खूप गाजली म्हणून जास्त वेळा दाखवली गेली. शिवाय जाहिरातींचं आयुष्यही कमी असतं. अगदी एखाद्या मिनिटाचं.

प्रिय बापट - जाहिराती मिळण्यासाठी तुम्ही सतत ऑडिशन देत राहणं जरुरीचं असतं. पण एकदा नाटक, सिनेमा यांत तुम्ही व्यग्र झालात की, ऑडिशन द्यायला जमतच असं नाही आणि त्यामुळे तिकडे जास्त लक्ष देता येत नाही. मी सातवीत असताना ’चेतना सेल्फ स्टडी’ची जाहिरात केली होती, अणि नंतर कॉलेजात असताना ’सनसिल्क’ची. मी उमेशच्या आधी जाहिरातींमध्ये काम करायला सुरुवात केली असली, तरी त्यानं माझ्यापेक्षा जास्त जाहिराती केल्या आहेत.

तुमच्या नव्या नाटकांबद्दल, चित्रपटांबद्दल सांगाल?

उमेश कामत - 'नवा गडी.. ’वर बेतलेला चित्रपट येतोय, ’टाइम प्लीज’ या नावानं. जुलैमध्ये तो प्रदर्शित होईल. 'परिस' हा चित्रपट शिक्षणक्षेत्राशी संबंधित आहे. ’माय डिअर यश’ हा स्वमग्नतेवरचा चित्रपट मी करतोय. शिवाय 'पुणे व्हाया बिहार' नावाचा माझा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होईल.

प्रिया बापट - सध्या माझं 'नवा गडी..' चालू आहेच. राजकुमार हिरानींनी मला विचारलं तर परत काम करायला आवडेल हिंदीत. कारण त्यांच्या चित्रपटामधली छोट्यातली छोटी व्यक्तिरेखासुद्धा लोकांच्या लक्षात राहील, अशी असते.

आपले सगळ्यांचेच आपल्या शाळा-कॉलेजाबरोबर किंवा काही व्यक्तींबरोबर ऋणानुबंध असतात. तुमचे ऋणानुबंध कोणाशी जुळले आहेत?

प्रिया बापट - अर्थात विद्याताई पटवर्धन. मी, केतकी थत्ते, मेघना एरंडे, नीलेश मयेकर, आम्ही सगळे त्यांचेच विद्यार्थी. पण शिक्षक म्हटल्यावर आपल्याला जसा आदरयुक्त धाक वाटतो, तसा आम्हांला फक्त धाक न वाटता त्या आमच्या कुटुंबातल्याच वाटतात. माझं पहिलं नाटक, माझी पहिली मालिका, पहिली जाहिरात आणि हो, 'मुन्नाभाई.. 'सुद्धा मला त्यांच्या मुळेच मिळाला.

उमेश कामत - माझे ऋणानुबंध सध्या तरी प्रियाशीच आहेत! आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझ्या बीपीएम, खार, शाळेतल्या काणेबाई. आईबाबांचा पाठिंबा तर होताच मला, पण बाईंनीही माझ्यातले गुण हेरून मला सतत प्रोत्साहन दिलं. त्या मला कधी बोलल्या नाहीत, पण आईबाबांना म्हणाल्या होत्या, ’याचं स्नेहसंमेलनातलं काम बघून मला नेहमी याला बक्षीस द्यावं, एखादी कॅडबरी द्यावी, असं वाटायचं. पण हा कायम मुलांच्या घोळक्यात. त्याला बोलावलं तरी तो सगळ्यांना घेऊनच यायचा. मग एकट्याला कसं देणार बक्षीस’?’ असं विद्यार्थी-शिक्षक यांपलीकडेही नातं जपणारा शिक्षक हवा. फक्त शाळा, परीक्षा यांपलीकडेही शिक्षकांशी जवळीक असावी. अशी नाती आयुष्यात पुढेही उपयोगी पडतात.

तुमच्या इतक्या धावपळीतून मायबोलीसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिवेशनाची नावनोंदणी सुरु आहे
http://www.bmm2013.org

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हे दोघेही प्रचंड आवडतात
नवा गडी नवं राज्य पहाण्यासाठी मी य वेळा प्रयत्न केलेत पण नेहमीच काही ना काही तरी होतं आणि माझं जाणं रद्द होतं Angry
आता पहाणारच!

मुलाखत छान!

मुलाखत आवडल्याचे नमूद केलेल्या सर्वांचे आभार,

खरेतर ही मुलाखत, मुलाखत न रहाता दिलखुलास गप्पांमधे कधी बदलली हेच कळले नाही.(अर्थातच त्या दोघांमुळे) दोघेही अत्यंत मनमोकळ्या स्वभावाचे व ज्याला इंग्रजीत डाऊन टू अर्थ असे म्हणतात तसे आहेत. आम्हाला दडपण तर नाहीच पण उलट मजाच आली त्यांच्या सोबत बोलून.

तसेच मायबोली प्रशासनाने ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार!

बीएमएम हा फुकटचा खर्च टाळुन महाराष्ट्रातल्या दुष्काळा ला मदत का नाही करत?>>>> मस्त प्रश्न..

१. मुंबईतले सगळे गाडीवाले एक दिवस बसने फिरून वाचवलेले पैसे का नाही देत?
२. एक महिना माहाराष्ट्रात सगळ्यानी हॉटेलिंग बंद करून घरी खाल्ले तर?
३. शीत पेयांऐवजी नळाचे पाणी पिऊन उरलेले पैसे ....?

असे हजारो प्रश्न विचारता येतील त्याबरोबर..

बीएमेम.. स्वत:च्या खिश्यातून खर्च करत नाही. जे लोक येतात ते पैसे भरून / तिकिटं काढून येतात आणि त्यातून हा खर्च होतो. (काही Sponsor पण असतात, पण त्यांना धंदा करायचा असतो)...
मुळात लोकांना बोलावले नाही तर पैसे जमा होणार नाहीत, नाही का?

आता इथले लोकच का नाही मदत करत , असा तुमचा प्रश्न असेल तर सांगतो,

१. इथली मराठी माणसे मदत करतच आहेत, फक्त प्रत्येकाचे नांव पेपरात छापून येत नाही.
२. मदत करताना ती कुणा राजकारण्या/गुंडाच्या खिशात पडू नये म्हणूनही लक्ष ठेवतो.

अजून काही सूचना असल्यास सांगा...

असे हजारो प्रश्न विचारता येतील त्याबरोबर.. >>>> मस्त उत्तर

म्हणजे त्यांनी वासरू मारलं म्हणून तुम्ही गाय मारणार. या सगळ्या लोकांनी म्हणजे शीतपेये न पिऊन, गाडी न वापरून वगैरे वगैरे करून वाचलेले पैसे दिले की मग तुम्ही देणार. अरेच्या नाही नाही, त्यानंतर पुढचे हजार प्रश्न येतीलच की... नाही का? असो. मस्त प्रश्नाचं उत्तर भारी वाटलं म्हणून हा प्रतिसादप्रपंच. बाकी चालू द्या...

"त्यांनी वासरू मारलं म्हणून तुम्ही गाय <<<< अर्धवट वाचनाचा परीणाम .. दुसरं काय?""

अगदी खरं आहे... Lol एक वाक्य वाचलं ते सुद्धा अर्धवट... असो चालू द्या म्हटलंच आहे. -- इतिश्री --