डबल इन्कम नो किड्स

Submitted by सौ. वंदना बर्वे on 25 March, 2013 - 00:43

डबल इन्कम नो किड्स

मूल हवे असणे ही कुठल्याही स्त्रीची सहजसुलभ नैसर्गिक भावना असते. दांपत्यजीवनाची वीण आणखी घट्ट करण्याचे काम पुढची पिढी करते. निसर्गाला अपेक्षित असलेल्या निर्मितीशी अपत्यप्राप्ती ही संयुक्तिकच आहे. निसर्गत: ती जवाबदारी स्त्रीकडे आली आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकालची माता होते.

मूल हवे असणे ही स्त्रीची निसर्गसुलभ व सहजभावना असते हे त्रिकालाबाधित सत्य असले तरीही परिस्थितीनुसार त्यात माणूस बदल करीत आला आहे. मूल का हवे याच्या कारणपरंपरेनुसार त्याची व्याप्तीही बदलते. परंपरागत दृष्टीकोनातून पाहता बऱ्याच ठिकाणी मूल हवे असते ते वंशवृध्दीसाठी. आपले नाव लावणारं पुढे कुणीतरी असावे या भावनेतुन. म्हातारपणाची काठी, असेट, वैवाहिक आयुष्यातला अनुबंध दृढ करणे, प्रेम, भावनिक ओढ, कुटुंबातला दबाव, पुरुषाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याचा मर्दानगीशी लावलेला संबंध ही व अशी अनेक कारणे निसर्गसुलभ भावनेव्यतिरिक्त असतात. या भावनेला पूरक मूल होणे किंवा न होणे हे क्षमता, इच्छा, पर्यायाची निवड, प्राथमिकता या व इतर अशा अनेक कारणावर अवलंबून असतात.

आपले नाव लावणारे कुणीतरी असावे यासाठी, वंश वाढावा असं वाटणे ही भावना चुकीची नाही. आपल्या मागून आपले विचार आपले कार्य कुणीतरी पुढे न्यावे असे नवराबायकोला वाटणे ही सहजभावना आहे. त्याची पूर्तता केवळ मुलाकडूनचे होते मुलीकडून नाही हा विचार बदलत्या परिस्थितीनुसार बदलला पाहिजे. मुलगी ही मुलापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे स्विकारले पाहिजे. स्त्री हे दुसऱ्याचे धन त्या मुळे ती ज्या घरी जाते ते नाव लावते, आपले नाव लावणारा मुलगाच असतो या विचारातून मुलाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. केवळ नाव लावल्यानेच पुत्रत्व सिध्द होते का? दिवे लावणारा "वंशाचा दिवा" पाहून अनेक वृध्द जोडप्यांना अशा मुलापेक्षा जरी दुसऱ्या घरी असली तरी आस्थेने विचारपूस करणारी, भावनिक अनुबंध असणारी मुलगी जास्त जवळची व प्रिय वाटते. मुलगाच हवा या विचारातून स्त्रीभ्रूणहत्या करणे क्रूर व रानटीपणाचे आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने मुलगीसुध्दा आपले नाव पुढे नेते हा विचार जोपर्यंत रुजत नाही, तोवर स्त्रीभ्रूण हत्या थांबणार नाही.

म्हातारपणाची सोय म्हणून जोडप्याला मूल हवे असते. दांपत्यजिवनात सुरवातीच्या काळानंतर आपल्या दोघांशिवाय बोलायला, विचार शेअर करायला कुणीतरी हवं असतं. भावनिक अभिव्यक्ती ही जवळच्या किंवा विश्वासातल्या माणासाशी होते. संसार स्थिर होऊ लागला की बरेचदा मध्यमवयात एकाकीपणाही वाढतो. अवतीभवती माणसे असूनसुध्दा एकलेपणा छळतो. परावलंबित्व वाढीस लागतं. साध्या साध्या गोष्टीसाठीही इतरांवर अवलंबून रहावं लागतं. याकाळात स्वत:चं असं कुणीतरी असावं असे वाटणे सहाजिकच आहे. संभाळणे पैशाने विकत घेता येत नाही. प्राधान्यक्रमाने आधार हा भावनिकदृष्ट्या जवळच्या व्यक्तीचा घेतला जातो. शारीरिक परावलंबनाबरोबर आर्थिक परावलंबित्व येऊ नये. पैसे मागावेच पडले ते अपत्याशी मागावे ही भावना त्यामागे असते.

वैवाहिक सौख्य अपत्यप्राप्तीतच आहे असे मानणारी अनेक जोडपी आहेत. अपत्यप्राप्ती झाली नाही तर त्याना आपल्या आयुष्यात कमतरता वाटू लागते. जोडप्याला अशी ओढ असणे स्वाभाविक आहे. पण त्या जोडप्याला बळजबरी करणे अयोग्य आहे. मूल होवू द्यावे अथवा नाही किंवा ते कधी होऊ द्यावे याचा निर्णय त्यादोघांखेरीज कुटुंबातली इतर माणसे करताना दिसतात. वडिलधाऱ्यांची इच्छा हा भाग वेगळा आणि सक्ती हा भाग वेगळा. इच्छा जरूर असावी पण सक्ती नसावी. मूल न होण्यावरून टोमणे मारणे, वांझोटी ठरवणे हे उपद्रवी उद्योग दुर्दैवाने आम्ही बायकाच जास्त करतो. नवपरिणीत जोडप्यानेही आपले मुलांविषयीचे मत खुलेपणाने मांडले पाहिजे. होणारी घुसमट थांबते.

आजची युवा पिढी शिक्षणासाठी खूप कष्ट घेते. आपले करियर निवडते. त्यावरून यशस्वी वाटचाल करते. अशी वाटचाल करीत असताना त्यांना वाटेत अडथळे नको असतात. लग्न करणे ही गोष्ट सहसा नाकारली जात नाही. कारण दोघेही कमावती असतात. कुणीही कुणावर अवलंबून नसतं. त्यामुळे अडचण होत नाही. मुल होणे अडचणीचे असते. अनेक समस्या त्यातून निर्माण होतात. मूल संभाळायचं कुणी, त्यासाठी करियर सोडायचं का?, सोडायचच झालं तर कुणी? असे अनेकानेक प्रश्न उद्भवतात. यातूनच नवीन पिढीने काढलेला मार्ग म्हणजे डिंक (डबल इन्कम नो किड)

प्रजननाच्या निसर्गातल्या सहज नियमाला किंवा प्रक्रियेला खीळ बसणार नाही का? कुटुंब व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होणार नाही का? अपत्यसुख नकोच असेल तर मग लग्न तरी का करायचं? फक्त इन्कम डबल करायला? असे अनेक प्रश्न उभे राहतात. आपण काही पिढ्या मागे जाऊ. कुटुंबात किमान दहा मुले असणे सामान्य गोष्ट होती. आर्थिक स्थिती किंवा करियरचा प्रश्नच नव्हता. विभागणी ठरलेली होती. नवऱ्याने शेती, व्यवसाय किंवा नोकरी करायची व बायकोने घर संभाळायचे. बदलत्या काळानुसार स्त्री शिक्षणात पुढे आली. शिकून आपले कार्यक्षेत्र निवडून त्यावर मार्गक्रमण करू लागली. संसाराला हातभार लाऊ लागली. नोकरी किंवा करियर संभाळून अथवा वेळप्रसंगी करियर सोडून मुले व घर संभाळू लागली. आता करियरसाठी मूल नकोच अशी मानसिकता निर्माण होतेय, खास करून उच्चशिक्षित व उच्चमध्यमवर्गीय युवापिढीत.

मूल होणे म्हणजे नोकरीवरून घरी येताना उशीर झाला तर पार्सल आणण्याइतकं सोपं नाही. मूल ही दांपत्यजीवनातली सर्वात मोठी जवाबदारी आहे. मुलासाठी गुणात्मक वेळ देणे जमत नाही. पाळणाघरात ठेवावे लागते. पाळणाघरात ठेवले तरी घरी परतल्यावर त्याच्यासाठी बालविश्वात रमावेच लागते. उद्या मिटींग आहे, रिपोर्ट तयार करायचे आहेत हे त्याच्या आकलन शक्तीच्या बाहेरचे असते. मूलाला वेळही द्यायचा आहे आणि करियरही सोडायचे नाही अशा कुचंबणेत, मानसिक ओढाताणीत अनेक कुटुंबे अडकलेली दिसतात. अशा ओढाताणीत अडकण्यापेक्षा मूल नकोच अशा निर्णयाप्रत एखादे जोडपे आलेच तर त्याला गुन्हेगार ठरवणे चुकीचे ठरते. प्राप्त परिस्थितीनुसार दोघांचा जवाबदारीने घेतलेला निर्णय म्हणून त्याचे स्वागत करावे. त्याचा अवश्य आदर करावा.

काही अधोरेखित करण्यासारखे मुद्दे याबाबतीत समोर येतात. लग्न होण्याअगोदरच त्याबाबत होणाऱ्या जोडीदाराला तशी स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. निर्णय दोघांचा असावा. डिंकचे पुढचे होणारे परिणाम याविषयी साकल्याने विचार करणे व त्यावर ठाम राहणे हे दोघांनाही जमणे आवश्यक आहे. मध्येच मूल हवे असे कुणा एका जोडीदाराला वाटणे सहजीवनात समस्या निर्माण करणारे ठरू शकते. करियरीस्टीक पिढीला जसे मागची पिढी नकोशी असते तशीच पुढलीही. मूल ही जवाबदारीच्या जाणीवेने नको म्हणणाऱ्या जोडप्याने ते संभाळण्यासाठी स्वत:च्या पालकांचा पर्याय का निवडू नये? तसे नसेल तर करियर आणि पैसा हेच प्राधान्य ठरते. बाकी काहीच नाही.

डिंक ही अवस्था आहे की समस्या हा भाग वेगळा. तो पाहणाऱ्याच्या दृष्टीकोनावर ठरतो. सहजीवनातल्या प्राथमिकतेवर ठरतो. मला असे वाटते, बदलत्या काळात, बदलत्या कुटुंब व्यवस्थेच्या तुटलेल्या दुव्याना जोडले तर डिंक ही समस्या होणार नाही. मुलांना संभाळायला, संस्कार करायला समंजस व जवाबदार मागची पिढी आणि त्यांची जवाबदारीने, जाणीवेने काळजी घेणारी युवा पिढी सामंजस्याने लुडबूड न करता वावरली तर निश्चितच अपत्य ह्या निसर्ग सुलभ भावनेला "डिंक" लागणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार वाचले, बरेच विचार पटले आणि काही पटले नाहीत. पण हे समजले नाही की तुम्हाला म्हणायचे काय आहे?

कळावे

गं स

मूल होणे स्त्रीसुलभ भावना वगैरे सोडल्यास लेख बरा जमलाय.
तुमच्या प्रत्येक लेखात आजीआजोबांनी नातवंडाना सांभाळावे एकत्र कुटुंब असावे वगैरे निरागस भावना दिसतात.
म्हणजे प्रत्येक आजीआजोबाना एकच मूल असते का? दोन मुलगे असलेल्यानि किंवा एक मुलगा एक मुलगी असलेल्या आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी रहात असलेल्या आजीआजोबानी कुठल्या मुलाची मुले सांभाळावी.
की सगळ्यानी नवनविन करियर ऑप्शन न स्विकारता एकत्र राहता यावे म्हणुन आईबाबांच्या घरीच रहावे?
काही लोकाना मोठी घरे घेणे परवडत नाही त्यानी एकत्र रहायच्या सोसापायी छोट्या जागेत मन मारत प्रायवसी कॉम्प्रमाईज करत रहावे?

>>दांपत्यजीवनाची वीण आणखी घट्ट करण्याचे काम पुढची पिढी करते>><<
असे होतेच असे नाहीये. असे असते तर तुम्हीच मांडलेला विषय चर्चिला गेला नसता.. (घटस्पोट)
सध्यातरी, मुल असावे की नसावे हे रेलेटीव आहे.
पुर्वी खूपच वंशाला दिवा, लग्नाचे फुल म्हणजेच मूल असल्या कल्पना होत्या.

प्रजननाच्या निसर्गातल्या सहज नियमाला किंवा प्रक्रियेला खीळ बसणार नाही का? कुटुंब व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होणार नाही का? अपत्यसुख नकोच असेल तर मग लग्न तरी का करायचं? फक्त इन्कम डबल करायला?>>>> हा पॅराग्राफ, आणि

मूलाला वेळही द्यायचा आहे आणि करियरही सोडायचे नाही अशा कुचंबणेत, मानसिक ओढाताणीत अनेक कुटुंबे अडकलेली दिसतात. अशा ओढाताणीत अडकण्यापेक्षा मूल नकोच अशा निर्णयाप्रत एखादे जोडपे आलेच तर त्याला गुन्हेगार ठरवणे चुकीचे ठरते. प्राप्त परिस्थितीनुसार दोघांचा जवाबदारीने घेतलेला निर्णय म्हणून त्याचे स्वागत करावे. त्याचा अवश्य आदर करावा.>>>>

हि दोन्ही मतं, एकाच लेखात ...कॉन्ट्राडिक्टींग नाहित का? वाचणार्याचा गोन्धळ नाहि का उडणार? नक्की कोणत्या बाजुला आहात तुम्ही? आणि विषय तरी किती घिसापिटा Sad मग उगाच तिखट प्रतिक्रीया देणार्यांची तोंडं दिसतात.

वंदनाताई लेख फारसा पटला नाही. मुल होऊ देणे अथवा न होऊ देणे ह्या विचाराला जबाबदारी, करियर, इन्कम सोडूनही बरेच पैलु आहेत.

>>करियरीस्टीक पिढीला जसे मागची पिढी नकोशी असते तशीच पुढलीही>>
हे विधान फार जनरलाईज्ड केले आहे असे वाटत नाही का? शितावरुन भाताची परिक्षा केल्यासारखे?

>>मूल ही जवाबदारीच्या जाणीवेने नको म्हणणाऱ्या जोडप्याने ते संभाळण्यासाठी स्वत:च्या पालकांचा पर्याय का निवडू नये>><<
स्वतःच्या पालकांना यासाठी गृहित का धरावे?

आणि मला वाटते 'जबाबदारी' हा शब्द बरोबर आहे, तुम्ही जवाबदारी लिहिले आहे.

डिंक (डबल इन्कम नो किड) हे संबोधन मला आवडलं नाही. दुसर्‍याच्या उत्पन्नाबद्दल असं बोलू नये.

>> मूल हवे असणे ही कुठल्याही स्त्रीची सहजसुलभ नैसर्गिक भावना असते.
... असं brain-washing केलेलं असतं.

एकाच लेखात दोन परस्परविरोधी वाक्यं...
>> अपत्यसुख नकोच असेल तर मग लग्न तरी का करायचं?
>> प्राप्त परिस्थितीनुसार दोघांचा जवाबदारीने घेतलेला निर्णय म्हणून त्याचे स्वागत करावे.

माणंसं फक्त नैसर्गीक गोष्टीच करत राहिली असती तर अजून जंगलातच असली असती. प्राण्यांपासून आपण त्यामुळेच थोडे वेगळे आहोत.

>> आपण काही पिढ्या मागे जाऊ. कुटुंबात किमान दहा मुले असणे सामान्य गोष्ट होती.
तेंव्हा अजुन बर्‍याच गोष्टी 'सामान्य' होत्या. त्या आता तुम्हालातरी मान्य होतील का? Don't cherry-pick.

दोन सज्ञान , कमावत्या (किंवा न कमावत्या) व्यक्तींनी (स्त्री+पुरुष / २ स्त्रीया / २ पुरुष) लग्न करून (किंवा न करता) मूलं वाढवली (किंवा नाही वाढवली)... दुसर्‍याच्या व्यक्तिगत बाबीत मी तरी नाक खुपसणार नाही.

प्रजननाच्या निसर्गातल्या सहज नियमाला किंवा प्रक्रियेला खीळ बसणार नाही का? कुटुंब व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होणार नाही का? अपत्यसुख नकोच असेल तर मग लग्न तरी का करायचं? फक्त इन्कम डबल करायला?
<<<
बसु देत जरा लोकसंख्येला आळा!
मुल जन्माला घातलीच पाहिजेत असा रुल आहे का?
Just because you are married and fertile doesn't mean you have to give birth ( biologically).

>> डिंक (डबल इन्कम नो किड) हे संबोधन मला आवडलं नाही. <<
तो शब्दप्रयोग लेखिकेचा नाही. "डिन्क" हा शब्द -अ‍ॅक्रोनिम- फारा वर्षांपासून प्रचलित आहे.

>> दुसर्‍याच्या उत्पन्नाबद्दल असं बोलू नये.<<
शारूक किती कमवतो, अन तेलगीने किती कमवले इ. चरचा आपण करीतच असतो. इतरांच्या उत्पन्नाबद्दल बोलू नये हे फारतर तुमचे वै म असू द्यावे, हे वि.

हा लेख आधे कुठेतरी वाचला आहे असे वाटते .
.
.
अवांतर : ट्रिपल इनकम १ किड , किव्वा चौपट इन्कम २ किड्स ....इन जनरल .... एन इन्कम एन वजा २ किड्स ह्या प्लॅन्स बद्दल आपले काय मत आहे ??

आपल्या मागून आपले विचार आपले कार्य कुणीतरी पुढे न्यावे असे नवराबायकोला वाटणे ही सहजभावना आहे.>> Lol
मूल होणे म्हणजे नोकरीवरून घरी येताना उशीर झाला तर पार्सल आणण्याइतकं सोपं नाही>> काय वाक्य आहे, कडाडून टाळ्या झाल्या पाहिजेत!!!
कुटुंबात किमान दहा मुले असणे सामान्य गोष्ट होती.>>> अहो त्यातली किती जगतील याची शाश्वती नसे म्हणून मोअर द मेरिअर हे लॉजिक होते.

अनेक मुद्दे आल्याने गोंधळ झाला.
दोघं जण कमावते असल्याने मूल व्हायला उशीर होतो किंवा मूल झाल्यास त्याच्यासाठी गुणात्मक वेळ देता येत नाही हा सारांश आहे का लेखाचा ?

अशा ओढाताणीत अडकण्यापेक्षा मूल नकोच अशा निर्णयाप्रत एखादे जोडपे आलेच तर त्याला गुन्हेगार ठरवणे चुकीचे ठरते. प्राप्त परिस्थितीनुसार दोघांचा जवाबदारीने घेतलेला निर्णय म्हणून त्याचे स्वागत करावे. त्याचा अवश्य आदर करावा.

करियरीस्टीक पिढीला जसे मागची पिढी नकोशी असते तशीच पुढलीही.>>
एकाच लेखात अशी किती कॉन्ट्राडिक्टींग विधानं केली आहेत!

म्हातारपणाची सोय म्हणून जोडप्याला मूल हवे असते.>>>>> फार स्वार्थी आहात हो तुम्ही सौ. वंदना ताई.

तुमच्या मुलांना सांगीतलेत का त्यांच्या ह्या जगात येण्याचे एकमेव कारण म्हणजे सौ वंदना ताईंना आणी श्री वंदनाकाका बर्वे ना म्हातारपणाची सोय हवी होती

फारच बाई बाळबोध लिहीता तुम्ही!!! Happy पण आधीच्या लेखांवर शतकांनी प्रतिक्रिया येऊनही लिहायचे थांबला नाहीत, त्या प्रतिक्रियांवर वाद घातला नाहीत, थोडक्यात अनुल्लेख केलात याबद्दल तुमचे कौतुक वाटते.
असो!

ज्यांचा double इन्कम आहे असेच लोक असा विचार करतील्/करतात हा समज चुकीचा आहे...
माझ्याच मित्रपरीवारात एक जोडपे असे आहे की ज्यात बायको job करत नाही .. मधे लग्नाला थोडे दिवस झाल्यानंतर (२ वर्ष) job केला , पुन्हा सोडुन दिला ... त्यांच्या लग्नाला ५ वर्ष झाली असतिल ..
बाळाचा अजुन विचार नाही... हा वैयक्तिक प्रश्न आहे... आणि मी बाळ असण्याचा निर्णय घेतला आणि मला स्वत:हाला लहान बाळ असले तरी त्यांचा निर्णय मला त्यान्च्या परीने योग्यच वाटतो... प्रत्येकाचे विश्व वेगळे आणि priorities सुद्धा

परत एकदा अनेक मुद्द्यांची सरमिसळ!! Uhoh म्हणजे डिन्क असावं की नसावं? - तुमचं मत काय आहे? - हे संपूर्ण लेख वाचून समजलंच नाही!!

डिन्क जोडपी अपत्यजन्मावर डिंक लावतात की कोटी मात्र भारी आहे!

एक प्रश्न -

मुलांवर लहानपणापासून जो काही आपण खर्च करतो त्याची जर बिलं रेकॉर्डला ठेवली तर ते त्याला परतफेड करणे कायद्याने बंधनकारक आहे का?

किमान १८ वर्षांनंतर म्हणजे तो सज्ञान झाल्यानंतरचा खर्च... म्हणजे त्याच्याकडून तसे लिहूनच घ्यायचे बाँडपेपरवर..

किमान १८ वर्षांनंतर म्हणजे तो सज्ञान झाल्यानंतरचा खर्च... म्हणजे त्याच्याकडून तसे लिहूनच घ्यायचे बाँडपेपरवर..
>>>
अंड्या बाँडपेपरवर सहि करायला तो सज्ञान नको का? Happy

सिंगल किड सिंगल इनकम टू डॉग्जवाल्यांनी काय करायचे? पेट्स बद्दल काय मत आहे तुमचे.

लेख लिहीताना प्रतिक्रिया काय येणार याचा विचार करून संभाव्य प्रतिक्रियांची उत्तरे आधीच देण्याचा प्रयत्न झालाय असं वाचताना वाटतं. कदाचित त्यामुळेच अनेक मुद्दे आलेले असावेत. अशा रोजच्या आयुष्यातल्या लेखावर लिहायचं म्हणजे सामान्यपणे लिहून चालणार नाही. त्यासाठी

१. मूल होणे ही भावना / इच्छा नैसर्गिक आहे कि नाही याबद्दल सर्वेचे रिपोर्टस काय म्हणतात ?
२. मूल न होणे ही भावना देखील नैसर्गिक आहे कि शिक्षणपद्धती किंवा इतर घटकातून दृढ होत जाते ?
३. वरील १ व २ या मुद्यांची टक्केवारी काय आहे ?
४. मूल झाल्यास पालकांनी त्याला वेळ द्यावा कि पाळणाघरात ठेवावे याबद्दल तज्ञांचे काय म्हणणे आहे ?
५. मूल न होण्याचा निर्णय घेतल्यास एखाद्या जोडीदाराचा विचार बदलण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?

अशी भारदस्त माहिती लेखात असेल तर लेखास वजन येईल असं वाटतं. आणखीही काही मुद्दे त्यात अ‍ॅड करता येतील.

अंड्या, रेकॉर्ड ॓ठेवायची गरज कायद्याने नाही. मात्र आईवडिलांचा यथापरिस्थिती सांभाळ करणे किंबा तो होण्यासाठी पैसे पुरवणे हेकायद्याने बंधनकारक आहे.
तसे न केल्यास पालक कोर्टात पोटगीसाठी केस घालू शकतात.

जेव्हां अशा प्रकारचे लेख येतात तेव्हां अनुभव शेअर करण्याची संधी असते. लेखक / लेखिका कसा चुकला/ली यावर जरूरीपेक्षा जास्त भर न देता आमच्याकडे अशी अशी परिस्थिती आहे आणि त्यातून आम्ही कशा प्रकारे मार्ग काढला अशा प्रकारची पोस्ट उपयुक्त टरू शकते. ज्यांना ती पोस्ट आवडेल त्यांना कदाचित उपयोगही होईल. प्रत्येकाकडे परिस्थिती वेगळी असते, त्यातून ते मार्ग कढत असतात.

राजस्थानी दुकानात मागच्या छोट्याशा भागातच संसार थाटलेला दिसून येतो. ब-याचदा नवरा कमी शिकलेला आणि बायको तर चक्क अशिक्षित अशी परिस्थिती असते. हातावर पोट असतं. पण मुलांना शिकवण्याची जिद्द असते. अशा मुलांना सगळ्या विषयांच्या शिकवण्या लाअलेल्या दिसून येतात. काही वेळा दुकानातच आई मुलांकडून शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करून घेताना दिसते.

काही ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी, वेळ देण्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता दिलेली दिसते. आई किंवा वडील यापैकी एक जण नोकरी सोडून मुलांना वेळ देतात. काही ठिकाणी बाबा अभ्यास घेतात, काही ठिकाणी आई.

काहींकडे मुलांची हौसमौज पुरवण्याकडे जरा जास्त लक्ष असते. बाहेरचं जगही समजायला पाहीजे असं वाटणारेही आईबाबा असतात. तर काही ठिकाणी आई बाबा दोघेही घरी उशिरा येणारे. त्यांना पाळणाघर, आया, क्लास या शिवाय पर्याय नसतो.

या प्रत्येकाने आम्ही करतो तेच योग्य असं म्हणणं झेपणारच नाही. मुलांना दोघांनीही वेळ दिला पाहीजे असं तज्ञ म्हणतात, शिक्षकही म्हणत असतात, पण प्रत्येक जण जगण्याच्या लढाईशीही बांधील असतो.

म्हणूनच अशा विषयांवर निष्कर्षावर येणे शक्य नाही.

गिरीजा....!!!!! Happy Wink झिरो इन्कम, सरोगेट बेबी तिच्या आईने न नेल्याने सरोगेट आईकडे ह्याबद्दल मत विचारायला विसरलीस!

Pages