दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

Submitted by अभय आर्वीकर on 24 March, 2013 - 15:35

                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे

कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे

अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे

कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे

मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे

तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे

"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे

                                                       - गंगाधर मुटे "अभय"
-------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त हो मुटेसाहेब!! Happy
एकदम झकास , अफाट वैगेरे वैगेरे.....
रदीफ फार आवडली.

धन्स रिया -गझल
वर आणल्याबद्दल..
मी मिसली होती ही गझल..

मुटे साहेब,
व्वा ! क्या बात है. सर्व दृष्टीने उत्तम !!!

"अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे ...."
सुंदर!

"मात्र त्या ओळी अर्थातच व्दिअर्थी व किंचितश्या अश्लिलतेकडे झुकणार्‍या होत्या... आणि मी.. स्वतःच स्वतःविषयी काही स्टेटस/मर्यादा/बंधने राखणारा असल्याने मला त्या माझ्याच ऑळी स्विकारता आल्या नाहीत."
- पुलंची आठवण आली - "मी कधी कमरेखाली प्रहार केला नाही" (विनोद किंवा वाद करतांना).

mansmi18,

"ओ फुलोंकी रानी, बहारों की मलिका" या चालीवर पूर्णतः बसू शकते आणि किंचितशी वेगळी चाल तयार होते.

असं करा की मुळ गाणे

तेरा मुस्कराना गजब हो गया
ऐवजी
तेरा मुस्कराना गजब हो गयाला.. आहे असे समजून त्याच चालीत ते गाणे गुणगुणा. मात्र हो गया येथे चाल पुढे वाढवत न्या.

"गजब हो गया" एवढ्या शब्दांना असलेली चाल सोडून अगदी मुक्तपणे ठसक्यात "वगैरे वगैरे" म्हणा.

तसेच अंतरा म्हणतानाही करा.

जमतेय. Happy

मात्र किंचितशी वेगळी चाल तयार होते. Happy
---------------------------------------------------

व्वा,मस्त,छान, . असे बोलणे वा लिहिणे वगैरे वगैरे
लहान तोंडी मोठा घास घेणे -तरी लिहिल्याशिवाय न राहविणे वगैरे वगैरे

खूप आवडली...
<<< कराग्रे विहरणे वगैरे वगैरे >>> तर खासच....
फक्त शेवटचे कडवे मला Somehow सुसंगत वाटले नाही....
पण बाकी सर्व मस्तच...

अरे वा रिया, धन्यवाद वर काढल्याबद्दल.
माझी मिस झाली होती वाचायची.
फारच सुंदर आहे गझल. अतिशय रोमँटिक Happy

मला फार आवडते ही गझल Happy
ज्यांनी मिस्ली त्यांच्यासाठी
Submitted by रीया on 25 May, 2017 - 14:42

धन्यवाद रीया... ही गझल बरेचदा वर आणल्याबद्दल. ५ वर्षांनी आभार मानतो त्याबद्दल दिलगीर. Happy

५ वर्षांनी आभार मानतो त्याबद्दल दिलगीर >> दिलगीरी कशाला. उलट त्यामुळे नवीन वाचकांना वाचायला मिळाली. धन्यवाद.

आपल्याकडे उत्तर भारतातल्या सारखी कविसंमेलन होता नाहीत. तस असत तर हे जे काय आहे त्याला लोकांनी डोक्यावर घेतले असते. सुपर डूपर हिट! प्रत्येक वेळा लोकांनी वगैरेे वगैरेे म्हणून साथ दिली असती.

Pages