वेताळ आणि वेताळ

Submitted by झुलेलाल on 21 March, 2013 - 23:40

‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल..
परवा कुठल्या तरी ‘न्यूज पोर्टल’वर हा प्रश्न मला दिसला. असे प्रश्न एकदा मनाला चिकटले की विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखे चिवटपणे मनात रुतून राहातात. उत्तर मिळेपर्यंत हटत नाहीत.
मग मी उत्तराच्या मागे लागलो. आणि पंतप्रधानांची आश्वासनं आठवली. अर्थमंत्र्यांनी दिलेली विकासदराची ग्वाही आठवली.. आणखी काही वर्षांनी देश महासत्तांच्या रांगेत जाणार, या घोषणा कानाशी दुमदुमू लागल्या. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत भारतीय बुद्धीने मारलेल्या भराऱ्या आठवल्या.. सारे जग जेव्हा मंदीच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतं, तेव्हा भारत सहजपणे मंदीचा महापूर तरला, ते आठवलं आणि उत्तर ठरलं.
‘हो.. आपला देश भविष्याच्या योग्य वाटेवरूनच पुढे चालला आहे!’
असं उत्तर मिळालं की मानगुटीवर बसलेला विचाराच्या वेताळाचा विळखा सोडविण्याची घाई होते. आपण उत्तर देऊन टाकतो. उत्तर चुकीचं ठरलं तर आपल्याच डोक्याची शंभर शकलं होतील, या इशाऱ्याचं भानच राहात नाही.
तसंच झालं. आणि आपलं उत्तर काहीतरी चुकतंय, असं उगीचच वाटू लागलं. मानगुटीवरचा प्रश्नाचा वेताळ आपली पकड आणखीनच घट्ट करतोय, असं वाटू लागलं. मग बेचैनी.. अस्वस्थता! अशा वेळी कुणालाही, कुणाचा तरी आधार लागतो. मीही उत्तराच्या शोधात भटकू लागलो आणि आसपासच्याच अनेक घटनांतून, अगोदर मनात आलेल्या सगळ्या सकारात्मक उत्तरांना छेद मिळू लागला.
.. ट्रेनमध्ये खिडकी मिळाल्यावर निवांतपणे कानाच्या हेडफोनमधून गाण्याची आवडती धून ऐकत बसलेलो असतानाच, कुणीतरी हलक्या हाताने पायावर थोपटल्याचं मला जाणवलं आणि मी चमकून समोर बघितलं.
केसांचं अस्ताव्यस्त जंजाळ पसरलेली, नजरेतलं केविलवाणेपण जाणीवपूर्वक माझ्या डोळ्यात घुसवत चिमुकल्या पंजाची बोटं एकत्र करून तोंडाजवळ नेणारी पाच सहा वर्षांची एक मुलगी भीक मागत समोर उभी होती.
पुन्हा बाहेर बघत मी हातानंच नकार दिला. तरीही तिचं केविलवाणं हात पसरणं सुरूच होतं. तिनं चक्क पायावर डोकं ठेवलं आणि मला अवघडल्यासारखं झालं. खिशात हात घालून मी एक नाणं तिच्या हातावर ठेवलं. तिनं ते बघितलं, केविलवाणे डोळे क्षणार्धासाठी आनंदानं चमकले. तिनं ते नाणं मुठीत घट्ट धरलं. एका स्टेशनवर गाडी थांबत असतानाच धावत्या गाडीतून फलाटावर उडी घेतली आणि माझ्यासकट डब्यातल्या सगळ्यांचा श्वास क्षणासाठी रोखला गेला.
दरवाज्याशी उभे असलेल्यांच्या नजरा, मागे जाणाऱ्या फलाटावर वळल्या. ती मुलगी धडपडत उठली होती. तिनं स्वतला सावरलं आणि शांतपणे, जणू काहीच झालं नाही अशा आविर्भावात ती बाकडय़ाकडे वळली. मग तिनं ती मूठ उघडली.. एव्हाना गाडीनं वेग घेतला होता. पण तिच्या मुठीतलं ते नाणं सुरक्षित आहे, हे जाणवल्यावर तिचे डोळे नक्कीच चमकले असणार, असं मला मनोमन वाटून गेलं.
कोण असेल ती मुलगी? तिचे आईबाप, भावंडं, घर कुठे असेल?.. तिचं भवितव्य काय असेल?.. अशीच, फलाटावर आणि धावत्या गाडीत भीक मागतच तिचं आयुष्य संपेल?.. बंद मुठीतलं नाणं सांभाळत धावत्या गाडीतून उडी मारताना तिला काही झालं तर?..
असे असंख्य प्रश्न समोर उभे राहिले.
आणि ‘त्या’ प्रश्नाला थेट जाऊन भिडले. मी अस्वस्थ!
घरी पोहोचल्यावर सवयीप्रमाणे कॉम्प्युटर काढला आणि लक्षात आलं..
तो ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा दिवस होता.
उगीचच, सवयीप्रमाणे, इकडच्या तिकडच्या बातम्या धुंडाळत बसलो आणि एका साईटवर स्थिरावल्यावर पुन्हा तो प्रश्न समोर उभा राहिला.
लोकसभेत अनाथ, निराधार मुलांसंदर्भात एक चर्चा त्याच दिवशी झाली होती. कुणा खासदारानं युनिसेफच्या अहवालाचा हवाला देत देशातील अशा मुलांच्या भवितव्यावरचे प्रश्नचिन्ह सभागृहात उभे करण्याचा प्रयत्न केला होता. देशभरातील अनाथ, निराधार मुलांपैकी ८९ टक्के मुलगे आणि ११ टक्के मुली आहेत. ४९ टक्के मुलं ११ ते १५ वयोगटातली आहेत, चार टक्क्य़ांना आपलं नावसुद्धा माहीत नसतं, आणि ९२ टक्के मुलं, दारू आणि नशिल्या पदार्थाच्या आहारी जाऊन माणसांच्या जगापासून स्वतला वेगळं करून घेतात..
देशभरातील सरकारी बालगृहांमध्ये अशी तब्बल ७५ हजार मुलं दाखल आहेत.. हे त्यावर मंत्र्यांनी दिलेलं उत्तर.
ही आकडेवारी फक्त अधिकृत बालगृहांमधली. रस्त्यावर भटकणारी, आकाशाच्या छपराखाली एकाकीपणे भटकणारी, आणखी किती असतील?..
डोक्याची शंभर शकलं पुन्हा समोर लोंबतायत, असं मला वाटू लागलं. मी कॉम्प्युटर बंद केला. आणि ‘त्या’ प्रश्नाचं खरं उत्तर काय असेल, या प्रश्नाचा भुंगा पुन्हा डोक्यात भणभणू लागला. ..दादर स्टेशनवर एक महिन्याच्या एका बाळाला कुणीतरी चोरून नेलं आणि चोराचा शोध जारी आहे, अशी बातमी नंतर काही दिवसांनी पुन्हा छळू लागली. .. रेल्वे स्टेशनांच्या फलाटांवर, रस्त्याकडेच्या फूटपाथवर, कचराकुंडय़ांच्या आसपास, कधी कुणी लहान मुलं दिसली की पुन्हा हा प्रश्न डोक्यातून बाहेर येतो.
‘खरंच, आपल्या देशाच्या भविष्याची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे?’

http://www.lokprabha.com/20130329/sunya.htm

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या विषयावर बोलायला मी खूप लहान असल्यासारखे वाटतेय, चांगले लिहिले आणि योग्य मांडले एवढेच बोलू शकेन.