गुत्ते पे गुत्ता - २

Submitted by बाबूराव on 17 March, 2013 - 00:13

मारत्या लै वाईट व्हता अशातला भाग बी नव्हता. कुटलाच दारुडा वाईट नसतु. कधि कधि त्यो सोत्ताच रडत बसायचा मीच वाइट म्हनुन. पन दारुड्याचि नाटकं म्हनुन कुनी त्येच्या भावना समजुन घ्यायाचं नाय. समद्याच दारुड्यांच असं व्हतंय. मन बी खातं, लाचारि बी असतिय , कळतं पन वळत नाय अशि अवस्था असतिय पन घरच्यांना हे कळत नाय. मंग याच्यावर येकच विलाज असतु. आपल्याच सारखं दुख्खी आत्मं शोधुन येक येक पेग लावायचं. येका दारुड्याचं दुख्ख दुस-यालाच समजु शकतं.

गुत्ता गावच्या भाईर व्हता त्ये येक ब्येस व्हतं. कंजारभाटाचा गुत्ता व्हता. दारुला कदी नाहि म्हनत नव्हता. पैकं असु नसु. लैच उधारि झाल्यावर त्येच्या शब्दावर मारवाडि पैकं द्यायाचा पन किडुक मिडुक नायतर जमीन लिवुन घित व्हता. पन दारुची आबाळ होऊं देत नव्हता. दोघं बी लैच देवमानसं व्हती. म्हमद्या ची बॉडी रिवर्स गिअर मदी गेली व्हती तरी त्याचा चिचा अजुन ठणठणीत व्हता. त्याचं नाव मकबुल असलं तरी दुनिया त्याला बाबुरावच म्हनायचि. बाबुराव चिचा असं नव्या मानसाला कानाला वंगाळ वाटलं तरी चिचाचं आता ह्येच नाव व्हतं. शंभर वर्षाचं झालं तरी म्हतारं हिंडाय फिराय जबर व्हतं. त्येच्या पायात बूट असायचं. त्या बुटाबिगर चिचाला आजपत्तुर कुनीच बघितल्यालं नव्हतं. येकदाच चाम्भाराकडं दिल्तं तवा पायातनं काडल्यालि असं चाम्भार म्हनायचा. त्ये बी त्याचं पैकं अजुन मिळाल्यालं नव्हतं म्हनुन त्येच्या ध्यानात व्हतं. झोपताना बी चिचा बुट काडत नव्हता. आपलं बुटाड कोनतरी चोरुन नेईल असं त्येला वाटायचं.

चिचाकडं बघितलं तर त्याच्या तब्येतीचं कारन काय असं कोनबी इचारायचं. तवा चिचा छाती फुगवुन दोन पेग एचबी असं अभिमानानं सान्गायचं. हातभट्टीला एचबी म्हनत्यात हे व्हिस्की अन रम पिना-यांना काय कळावं ? चिचाकडं बगुन लोक म्हनायचं बि, मानुस दारुनं मरत न्हाय. चिचाकडं बगा. चिचाकडं बगुन लोक बिनघोर गुत्त्यावर आपलि हजेरि देवुन जात व्हतं. कंजारभाटाला हे समदं कळत व्हतं म्हनुन चिचाकडनं पैकं बी त्यो घेत नव्हता.

दोन दोन पेग मारलं का, कि म्होरच्या येका झोपड्यात समदी जमायचि. मंग चकना यायचा. तवाच ध्यान लागाय सुरवात व्हायचि. या झोपडितुन मंग येकायेकाचं इमान उडाया लागायचं. येका परीनं हे ठिकान म्हंजी इमानतळच व्हतं. चिचाला या टोळक्यात लैच मान व्हता. त्येंचा त्यो म्होरक्या म्हनला तरी चालल. चिचा सगळ्यांची विचारपुस करायचा तवा समद्यांना बरं वाटायचं. असं त्यांच्याशी कोनबी बोलत नव्हतं. खुद्द चिचाबी घरच्यांशी असं बोलत नव्हता. घरची समदी चोर हायेत असं त्याचं मत झाल्तं. तवाच तर त्ये बुट काडत नव्हतं.

येकदा गावात प्रवचन आलं व्हतं. गावातलं समदं दारुचं अड्डं बंद झाल्तं. हा गुत्ता भाईर असला तरीबी गावतल्या मंडळींनी चार पाच दिस गुत्ता बंद ठिवा म्हनुन इनंती केल्ति. कंजारभाटाचं काय म्हननं नव्हतं. आत्ताच्या वख्ताला गावाचि मर्जी साम्भाळलि कि काम भागत व्हतं. पन दारुड्यांची लैच बेकार परस्थिती झालि व्हती. म्हमद्याच्या अन्गाला थरथर सुटलि तवा त्येला खोकल्याच्या अवशधाची आख्खी बाटलि पाजलि व्हति. पन चिचा लैच अस्वस्थ झाल्ता. आजवर येक दिस बी त्येचा खाडा नव्हता. ड्राय डेला बी काळजिन स्टॉक ठिवत असल्यानं त्येची कधिच आबाळ झालि नव्हति. तसा ह्यो गुत्ता बी कधि बन्द नव्हता. पन आताच हे आक्रित घडलं व्हतं. चिचाचं प्लानिन्ग फेल झालं व्हतं.

सकाळच्यालाच समदं दारुडं गुत्त्यावर जमलं व्हतं. पन कंजारभाटाचा बि पत्ता नव्हता, अन त्येच्या कारभारनीचा बी. भट्टी तीच लावायची. अंगापिंडानं मजबुत अस्ल्यानं दोन चार मर्दाना सहज लोळवल अशी व्हती ती. त्याच्यामुळं तिच्याशी बोलताना बी समदं अदबीनंच बोलायचं. कंजारभाट बी कमी नव्हता. कधी काळी कमावल्यालं शरीर आता सुटलं असलं तरी लै भ्याव वाटायचं. त्येचं भाव बी असलंच व्हतं. पन आता कुनाचाच पत्ता नव्हता. कंजारभाट वस्ती हिथनं जरा लाम्ब व्हती.

चिचाकडं बगवत नव्हतं. लांबुन दारु आनायला जावं तर तसं धडधाकट कोनच नव्हतं. चिचा चिन्चेकडं नजर लावुन बसला व्हता. तवा किश्या म्हनला, आकडं काडु का चिचा ? किशाला समदीच खवळली. पान्याचं एक मटकं व्हतं. किशानं गुमान येका ग्लासात पानी भरुन आनलं अन चिचाला पाजलं. पन समदं पानी भायेर आलं. आप्पानं चिचाला हात लावुन बगितलं तर चिचा गेला व्हता.

अन चिचाबद्दलचा उमाळा भाईर पडला. समदी रडारड सुरु झालि. तसा आप्पा उठला अन खेकसला. आता या मुडद्याचं कायतरी कराय पायजेल हाय असं त्यो म्हनला तवा समद्यानि माना डोलावल्या. म्हमद्याचं नरम गरम असल्यानं त्येला सान्गुन उपेग नव्हता. चिचाचं घरच्यांशि पटत नव्हतं. मुलीबाळी कवाच लगीन होउन आपापल्या गावी गेलत्या. एकुलतं एक पोरगं बायकुच्या ऐकन्यातलं व्हतं. त्ये चिचाचं त्वांड बी बगत नव्हतं. त्येच्या बायकुला कळवलं तर ती म्हनली आता घरात गडी मानुस कोनच नाय. गावातबी आता कोनच नव्ह्तं. प्रवचनाला येनारं महाराज पाच कोसावरच्या देवळात आलं व्हतं. तिकडंच समदं गेल्तं.

मुडदा असा ठिवुन चालनार नव्हतं. गावातला मुल्ला जाग्यावर सापडला. त्येच्यामुळं मुडदा पुरायचा कसा हे कळलं. पन बाकिचं कायबी म्हीत नसल्यानं तिथं समदं आपलं आपलं डोस्कं देत व्हतं. झोपडीभाईरच्या झाडाखालि एक सभा झालि. प्रत्येकानं आपल्या भावना बोलुन दावल्या. चिचा म्हंजी प्रत्येकाला आपल्या जन्मदात्या बापापेक्षाबी प्यारा झाला व्हता.

अशा समद्यांच्या भावना तरल झाल्याल्या असताना कोनतरी म्हनलं चिचाची अन्त्ययात्रा निगायला पायजे. समद्यानीच माना डोलावल्या. आपला बाप हितं मरुन पडलाय अन तुमी बसताय काय असं कोन तरी वरडलं तवा समद्यांच्या अंगात आलं. आजवर झालि नाय अशि अन्त्ययात्रा निगाय पायजे व्हती. हिकडं येनारी समदीच ओवाळुन टाकल्यालि असल्यानं गावात मयत झालि तरी यातल्या कुनाचं काम नसायचं. म्हनुनशान अशा वख्ताला काय करायचं हे कुनाच्याच डोस्क्यात शिरत नव्हतं. त्यातुन मयत मुसलमानाचि. पन मयत जोरात झालि पायजे येवडं येकच समद्यांचं म्हननं व्हतं.

- बाबूराव

करम शहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी, आपल्या सर्वांचा मी आभारी हाये.
गावाकडं येक लैच अर्जंट काम आल्यानं जरा गडबड व्हईल असं वाटतंय. तरीबी फुडचा भाग लवकर देन्याचा प्रयत्न मी करनारच हाय. या बाबुरावला जरा सम्भाळुन घेताल नव्हं ?

गावाकडं येक लैच अर्जंट काम आल्यानं >>>

बाबूराव, एकवेळ कथा पूर्ण झाली नाही तरी चालेल, आधी सोताच्या प्रायॉरिटीजकडं लक्ष द्यायचं Happy