अगदी आजचा अनुभव . ....

Submitted by मी मी on 14 March, 2013 - 14:23

आईचा निरोप घेऊन निघाले तेव्हा अंधारलेच होते जरा. कालंच पाउस पडून गेलाय वातावरण पण गार झालय छान. मी माझ्याच तंद्रीत वातावरणाची मजा घेत पुढे चाललेले, थोडी भाजी फळे घेऊन डिक्कीत टाकले आणि गाडी वळवली... संध्याकाळची वेळ आणि धंतोली एरिया ....पुढे बघते तर सिग्नलवर लांबच लांब गाड्या उभ्या मग तशीच वळवलेली गाडी सिग्नल च्या आधीच्या गलीतून टाकली.

या गलीचा रस्ता तसा अरुंदच आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दवाखाने त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्यांची गर्दी असतेच पण ते दर दोन मिनिटांनी (आपल्या स्पीड च्या अनुषंगाने बर का) येणाऱ्या सिग्नल पेक्षा तरी बरे वाटतात. पुढल्या एखाद्या वळणावरून वळून मेनरोड वर येऊया अस ठरवून होते. पण आता हि गल्लीच बरी वाटू लागली आणि मी तिथूनच सरळ जात गेले. अनेक वळणं आलीत खरतर वळून मुख्य रस्त्यावर येता येणार होते. पण एका विशिष्ट अंतरानंतर तसे भान सुद्धा राहिले नाही. मी माझ्याच विचारात सरळ जात होते कधी नव्हे ते गाडी ची स्पीड सुद्धा तशी फार जास्त नव्हती.....रहदारी कमी होऊ लागली.....एका विशिष्ट सर्कल नंतर पुढे जास्तच अंधार होता स्ट्रीट लाईट सुद्धा नव्हते तिथे, पण माझ्या हे लक्षातच आले नाही....या गल्लीतून सरळ सरळ जाणे आताशा जास्तच सोयीस्कर वाटू लागले होते कदाचित आणि म्हणून मेंदूने किंवा मनाने इतर कोणत्याही गोष्टींची नोंद घेणे सुद्धा सोडून दिले होते ..... आणि

अचानक जोरात ब्रेक लावला, खरतर लावावा लागला ...तंद्री तुटली आणि मी भानावर आले बघते तर काय रस्ता संपला होता. पुढ्यात एक लांबच लांब भिंत आणि मी उभी होते त्या भिंतीला जुळलेल्या एकमेव छोटेखानी खोलीच्या दाराच्या एकदम पुढ्यात ......पूर्ण अवाक्क होऊन....आजूबाजूला अजिब्बतच काही नाही डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला झाडी, गवत आणि इतर सर्वत्र कुट्ट अंधार. प्रकाश होता तर फक्त त्या खोलीत....मला काहीच समजले नाही काय झाले ते. भानावर आले तेव्हा समोर असलेल्या खोलीत ८-१० पुरुष मजूर बसलेले होते, एक दोघे उभे होते दाराशी .....कमरेला लुंगी आणि उघड्या खांद्यावर एक पंचा असे काहीसे घातलेले. त्या सगळ्यांची नजर एकाच वेळी माझ्यावर खिळलेली होती....कदाचित मी अचानक जोरात ब्रेक लावला म्हणून असेल.....कि मग ?...... पुढे ८-१० पुरुष भोवताल संपूर्ण अंधार आणि गोंधळलेली मी, एकटी स्त्री जात.

मी प्रचंड घाबरले ....मन चिंती ते वैरी न चीन्ती.
या तीन मिनिटात नाही नाही ते सगळे विचार भरभर भरभर मनात येत गेले जात गेले. या सगळ्यात काही मिनिट अशीच निघून गेली.. गाडी संपूर्ण यु-टर्न करायची होती. पुढे सरकणे म्हणजे त्यांच्या अजून जवळ जाणे ...मागे वळायला जागा हवी होती, मी त्यासाठी धडपडत होते ...आणि ...तेवढ्यात १८-२० वर्षांचा त्यांच्यातला एक मुलगा लगबगीने धावत माझ्याच कडे येतांना दिसला.... ऊफ्फ्फ
बॉम्बस्फोट व्हावा इतक्या जोरात छातीत धडकी भरली....डोळे विस्फारले...घसा कोरडा पडला...गरगरायला लागलं. मी पायाने गाडी मागे नेण्याचा प्रयत्न करत होते ...पण माझा जोर तो केव्हढा पडणार सूतभर गाडी मागे सरकली असेल नसेल इतक्यात तर तो पुढ्यात येउन उभा होता...आता हा काहीतरी विपरीत करणार असेल तर...तर पूर्ण शक्तीनिशी याला ढकलून द्यायचे, असेच काहीसे मनात अर्धवट आलेच होते कि ......कि.......

तो म्हणाला, "ताई हिकड कुठ आला जी तुमी? हिकडून रस्ता नाई पुढं. हितून मांग न्या गाडी...फुडून उजवीकड रोडान पलटा डाव्या रोडावर जाचं नाई सांगतो, मोठ्ठा खड्डा खनलाय तिकडं...रस्ता बंद करून ठीवलाय. गीट्टीत गाडी फसन बिसन त पाहाले कुत्रा बी नाही तिथं...मान्सायच्या रस्त्यानं जावा "

मी बघतच राहिले त्याच्याकडे. अडकून असलेला श्वास सुटला, घट्ट आवळलेल्या हँडल वरच्या मुठी हलक्या सोडल्या ..चेहेर्याच्या आठ्या कमी झाल्या, आखडलेले अंग ढिले सोडले आणि ओठांवर हसू फुटले....गाडी सावकाश टर्न केली आणि सगळी भीती झटकून गाडी स्टार्ट केली.

अलगद स्मित देऊन मी त्याच्याकडे वळून पहिले त्याच्या सूचना चालूच होत्या. डोळ्यात पूर्ण विश्वास साठवून मी त्याला 'बरर' म्हणाले.......निघाले

पण यावेळी हे 'बर' कदाचित Sorry आणि Thanks चेच synonyms वाटले माझेच मला...

'मान्सायच्या रस्त्यानं जावा' हे त्याचे शब्द वाजतच राहिले कानात....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त................आवड्ले. कधि कधि आपन फारच Nagative विचार करतो पण सगळेच लोक वाइट नसतात पेपर मधिल बतम्यान्चा कळ्त नकळ्त आपल्यावर परिणाम होत असतो.

विजय :- खरच....इकडून तिकडून ऐकलेल्या, पाहिलेल्या घटनेमुळे...वाईट झालेल्या परिस्थितीमुळे विश्वास कमी होऊ लागला आहे....नको नको म्हणतांना शंका मनात डोकावतातच......पण अश्या काही घटना आपण किती चांगल्या परिस्थितीत जगत आहोत अजूनही माणसांच्या घोळक्यात आहोत हे परत पटवून देतात....
धन्यवाद Happy

आयुष्यात शॉर्टकटपेक्षा बर्‍याचदा धोकेदायक ठरु शकतो , सगळे वाईट नसले तरी सगळेच चांगलेही नसतात.

श्री...आयुष्यात शॉर्टकटपेक्षा बर्‍याचदा धोकेदायक ठरु शकतो , सगळे वाईट नसले तरी सगळेच चांगलेही नसतात.>>>>>>>>>>>>>>वर एक कमेंट टाकलीये ...काही घटना आपण किती चांगल्या परिस्थितीत जगत आहोत अजूनही माणसांच्या घोळक्यात आहोत हे परत पटवून देतात.....दोन्ही बाजु आहेतच...थोडी नकारात्मकता बाजुला ठेवाय्ला पाहिजे..प्रत्येक ठीकाणी शंका नकोच अस मला वाटतं..
पण तुम्च्या भावना सुधा पोच्ल्या....खरच धन्यवाद Happy

प्रथम ........विध्याक......खरय Happy

"मान्सायच्या रस्त्यानं जावा" हे वाक्य ज्या मुलाने म्हणले त्याची प्रतिभा अत्त्युच्च आहे.

तुमचा अनुभव खतरा आहे. असा अनुभव येणे पुरुष असल्याने येणे नाही पण कल्पना करवते आहे.

हम्म.... खरं तर बातम्यांनीच आपलं मन जास्त घाबरलेलं असतं. प्रत्यक्षात माणुसकी जास्त असते.

मजुरांच्या भाषेवरुन ते बिहारी / इतर उत्तर भारतीय नव्हते आणि म्हणूनच कदाचित कथानकाचा घटनाक्रम माणुसकीच्या अंगाने सुखद शेवट होणारा ठरला असावा अन्यथा अश्या प्रसंगी / वेळी त्या ड्रायव्हर पात्राचे काही खरे नव्हते !!

बऱ्याच वर्षांपूर्वी 19 वर्षांची असताना मी एकदा एकटीच नागपूर-चंद्रपूर प्रवास करीत होते. काही मवाली मुले बसली होती. त्यांना टाळून मी सज्जन मध्यमवर्गीय
माणसाच्या शेजारी बसले. पण ह्या व्यक्तीने मला त्रास द्यायला सुरुवात केली. अनेकदा सांगून तो त्रास देत राहिला. या मवाली मुलांच्या हे लक्षात आलें. त्या व्यक्तीला उठवून सुनावले बाजारात जा.हवं ते मिळेल इथे त्रास देऊ नको. आणि नंतर 3 तास एकटीच बसून काहीही त्रास न होता प्रवास झाला.या प्रसंगातून एक शिकले don't judge book by its cover