सुकं भरलं वांगं (सांबार मसाल्यासहित)

Submitted by ललिता-प्रीति on 14 March, 2013 - 00:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

छोटी वांगी - ६
छोटे कांदे - २
छोटे बटाटे - २
डाळीचं पीठ (बेसन) - एक ते सव्वा वाटी (किंचित जाडसर बेसन असल्यास उत्तम.)
सांबार मसाला - ३-४ चमचे
धने पूड - अर्धा चमचा
जीरेपूड - अर्धा चमचा
चिंचेचा पातळ कोळ - पाऊण वाटी
मीठ - चवीनुसार
तिखट - चवीनुसार
तेल

क्रमवार पाककृती: 

- वांगी धुवून आणि कांदे, बटाटे सालं काढून उभी चीर पाडून घ्यावेत. (देठाचा थोडा भाग ठेवला, तर वांगी पालटायला सोपी जातात.)
- चिंचेचा कोळ आणि तेल वगळता अन्य कोरडं साहित्य एका भांड्यात चांगलं मिसळून घ्यावं.
- आता या मिश्रणात अंदाज घेत थोडा थोडा चिंचेचा कोळ घालावा. मिश्रणाचा ओला लगदा होता कामा नये. केवळ त्याचा भुरभुरीतपणा जावा आणि ते वांग्यात व्यवस्थित भरता यावं इतकाच कोळ घालायचा.
- हा मसाला कांदा-वांगं-बटाट्यात भरावा.
- कढईत तेलाची चळचळीत फोडणी करून त्यावर भरली वांगी-कांदे-बटाटे ठेवावेत.
- झाकण टाकून एक वाफ द्यावी.
- झाकण काढून मसाला उरला असेल तर तो भाजीवर पसरावा. वांगी-कांदे-बटाटे थोडे हलवावेत. (हे अलगद करावं लागतं. नाहीतर अर्धा कोरडा मसाला बाहेर येतो.) २-३ चमचे चिंचेचा कोळ सगळीकडे पसरून घालावा. पुन्हा झाकण ठेवून वाफ द्यावी. भाजी खरपूस शिजेपर्यंत हे करावं. (३-४ वेळा कोळ घालावा लागतो.)
- पोळी/भाकरीबरोबर भाजी वाढावी. (मी तर नुसतीही खाते. :फिदी:)

Copy of DSC03739.JPG

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. प्रत्येक कांदा-वांगं-बटाट्यासाठी एक-एक चमचा बेसन आणि पाव-पाव चमचा सांबार मसाला असं प्रमाणही वापरू शकता.
२. ही भाजी अगदी मंद गॅसवर कढईतच करावी लागते; प्रेशर-कुकर/प्रेशर पॅनमधे नाही.
३. जरा पेशन्सचं काम आहे, पण चव अप्रतिम लागते.
४. नुसत्या वांग्यांचीही भाजी चांगली लागते. एकदा मी केलेला मसाला जास्त झाला. म्हणून मी त्यात कांदे-बटाटे पण घातले. ते चांगले लागले. तेव्हापासून या तीनही भाज्या वापरून करते.
५. मी चमचा-वाटी मोजून काटेकोर प्रमाण कधी घेत नाही. मात्र कोळ घालण्यापूर्वी कोरड्या मिश्रणाची चव घेऊन पाहते.
६. ३० मिनिटे हा वेळ भाज्या चिरण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.

माहितीचा स्रोत: 
मंजीचं सासर.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. मला वांग्यांपेक्षा त्यातले कांदे खायला जास्त आवडेल.

मानुषीच्या मैत्रिणीची वाफवायची आयड्या पण चांगली आहे, डायट मुड असेल तेव्हा वापरायला Happy

केली. मस्तं झालीय.
माझ्या कोंकणी मनाला एवढं आंबट घातल्यावर थोडा गूळ घातल्याशिवाय चाललं नाही.
मस्तंच लागतायत.
धन्यवाद!

लली यु टु ....

वांगी खात नाही ( हाय रे दैया वगैरे !!!)

पण ही कांदा भरायची आयडिया लै भारी. ह्या मसाल्याने भेंडी, बटाटा, कांदा भरुन ही भाजी करण्यात येइल....

मीरा Proud

इकडची वांगी खाल्ली नाहीत काय घरच्यांनी? "वांगी ती वांगी" म्हणतायत ते! >>>>>>>
अगं लोला इकडची वांगी म्हणजे तूही आमच्या सांगली सातारा भागातली की काय?
आणि वांग्यांवरचा नेहमीचा वाद.........ज्यांनी कुणी ती कृष्णाकाठची हिरवी चविष्ट वांगी खाल्ली आहेत त्यांना दुसरी कुठलीच वांगी आवडणार नाहीत.
पण सासरी हा वादाचा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं वांग्यावांग्यात (जळ्ळा) असा काय तो फरक असणारे?
इतकं काय ते सांगलीची वांगी(२ दा!)?

Pages