अाकाशगंगा

Submitted by kaushiknagarkar on 12 March, 2013 - 11:58

आकाशगंगा

पाहीली मी एकदाची फिरुनी ती आकाशगंगा
मंद्रशीतल नादलहरी खुलवून जाती अंतरंगा

पाहता पाहिला तो सूर्य जाता मावळूनी
पक्षी गेले निजघराला ऊन त्याचे अावरूनी

श्यामवर्णी नभाची नीलकांती पारदर्शी
एक झाला गौरप्रभु ज्या सर्वगामी सागराशी

दिव्य व्योमाची निळाई ओसरूनी गेली जशी
गाव अाला तारकांचा पाहण्या पृथ्वी अशी

कृष्णवदनी गगन होता हर्षवेगे सज्ज झालो
दूरदर्षी जोडून नेत्रा अमृताचे पूर प्यालो

दर्षिला तेजस्वी गुरुराज सोबत सौंगडी
पृथ्वी नाही विश्वकेंद्री सांगते जी चौकडी

वेध घेऊनी मृगाचा गर्भोदरी अवलोकीले
तरल धूसर मेघजाली चार हीरक जन्मले

मोडवेना निजसमाधी अनिवार तरी होतेच जाणे
परतलो मी तृप्तहृदये ऐकीत अंतरिक्षाचे तराणे

-- पॅनस्टार्स हा धूमकेतु पाहाण्यासाठी मी परवा बाहेर पडलो. उंच 'सिरस' ढगांची पश्चिम क्षितिजावर दाटी झालेली असल्यामुळे पॅनस्टार्सचे दर्शन हुकले, पण इतरत्र आकाश निरभ्र असल्याने आकाशगंगा, गुरू, मृगनक्षत्र आणि इतर काही अवकाशातील चमत्कृतींचे निरीक्षण करता आले.

हा झाला तांत्रिक भाग. परंतु ज्या भाग्यवंतांनी पूर्णकाळ्या रात्री, चंद्र नसताना, भरगच्च तार्‍यांनी डवरलेल्या आकाशगंगेचे दर्शन घेतलेले आहे, त्यांना जाणवले असेल की मी जे अनुभवले ते या रूक्ष 'रिपोर्ट' मधे अजिबात आलेले नाही. म्हणून हा कविताप्रपंच. त्यातील काही उल्लेख (संदर्भ) आकाशप्रेमीना लगेच समजतील असे वाटते. हवे असल्यास नंतर स्पष्टीकरण देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!
मी शाळेत असताना पाहिली होती. महाराष्ट्रात black out झाला होता तेंव्हा. पाहून आवाक झालो होतो. (अर्थात मला कविता करता आली नाही). तेंव्हा एरवी मी तारे/ग्रह ओळखायचो... पण तेंव्हा काहीच कळेना इतके तारे होते!
Contact मधील जूडी फोस्टरची आठवण झाली,
Ellie Arroway: [Witnessing a celestial light show up close] Some celestial event. No - no words. No words to describe it. Poetry! They should've sent a poet. So beautiful. So beautiful... I had no idea.

एकदा एक रात्र हरिश्चंद्रगडावरच्या कोकणकड्यावर घालवली असता, अशक्य अशा चांदण्याच चांदण्या बघायला मिळालेली रात्र म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव आहे.

मोडवेना निजसमाधी अनिवार तरी होतेच जाणे
परतलो मी तृप्तहृदये ऐकीत अंतरिक्षाचे तराणे
अगदी अशाच भावनेने आम्ही तंबूत परतलो होतो.

कविता अगदी ऑथेंटिक आकाशप्रेमिकाने लिहिलेली आहे तेव्हा आवडणारच. आता आकाशगंगेवरच्या लेखाची प्रतिक्षा आहे.

एकदाचा पाहिला तो धूमकेतु. काल १२ मार्चला हवा स्वच्छ होती, ढगही सुदैवाने नव्हते. सूर्यास्तानंतर सुमारे तीस मिनिटांनी पुरेसा काळोख झाला तेंव्हा मोठ्या कष्टाने दुर्बिणीतून दिसला. खूपच पुसट दिसत होता, नुसत्या डोळ्याने दिसणे शक्य झाले नसते. अर्थात हा भर शहरातील प्र्काश-प्रदूषीत आकाशाचा अनुभव आहे. तरी देखिल धूमकेतुची शेपूट आणि 'coma' छान दिसला. हे पाहण्यासाठी एक उंच इमारती मधे जावे लागले, त्यामुळे फोटो काढताना अडचण झाली खिडकीच्या काचेची. पहिला फोटो आहे त्यात नुस्ता चंद्रच पाहायचा पण त्याने स्केलचा अंदाज येइल. दुसर्‍या फोटोत चंद्राच्या डाव्याबाजूस अस्पष्ट दिसतोय. उजव्या बाजूस वर कोपर्‍यात थोडा मोठा करून दाखविला आहे. आज पुन्हा एकदा दर्शन घेण्याचा प्रयत्न ढगांनी हाणून पाडला.

https://picasaweb.google.com/lh/photo/TjOMWjyGGv3lbi9u-Yv5v9MTjNZETYmyPJ...

https://picasaweb.google.com/lh/photo/4ewWEJ7hiMW3aGNjtPB0I9MTjNZETYmyPJ...

आज रात्री काही कारणाने उशीरा ड्राइव्ह करण्याचा योग आला. निरभ्र आकाश, हायवेवरच्या काळोखात चमचमणार्‍या चांदण्या, ती रेखीव चंद्रकोर. गाडी हाकत दूर दूर भटकत रहावे. गाडीतून उतरताच वर बघितले, तर मृग नक्षत्र डोक्यावर. वा! अगदी पर्वणीच!

Happy

शक्य तितक्या लवकर मॅजेलानचे 'ढग' तुम्हाला पहायला मिळोत ही सदिच्छा. माझ्या माहितीप्रमाणे मराठीत त्यावर अजुन कवीता झालेली नाही.

सॅम, महाराष्ट्रात मी फक्त एकदाच पाहीली, ती राजगडावर गेलो असताना. तेवढ्यासाठी ब्लॅकआउट व्हावा असं वाटत ना?

हर्पेन, हरिश्चंद्रगडावर रात्र घालवण्याचं भाग्य मलाही लाभलं आहे, पण त्या आठवणीच्या खजिन्यात आकाशगंगा मात्र नाही. बहुधा शुक्ल् पक्ष असणार.

दिनेशदा, भारती, थँक्यू. अवश्य लिहीन.

स्वाती, मस्त आठवण आणि अनुभव. कधी कधी खरच असं वाटतं नाही का?

aschig, काय सुंदर सदिच्छा आहे. धन्यवाद. तुमच्या सदिच्छेने तसं लवकरात लवकर घडो. तीन वर्षांपूर्वी ब्रिस्बेन येथे गेलो असता सतत दहा दिवस आकाश ढगाळलेलं राहून आम्हाला काहीही दिसलं नव्हतं. एकेकाचं नशीब Happy