न्याय

Submitted by प्रकाश कर्णिक on 8 March, 2013 - 14:23

Nyay.jpg

या. बसा. माझ्या या पेहेरावाकडे पाहून गोंधळू किंवा संकोचू नकात. मीच शोभा दादरकर. माझा फोटो तुम्ही पाहिला असालच पण आता माझ्यात खूप फरक पडला आहे याची जाणीव आहे मला. त्यात हे असे कपडे. आता चश्मा पण लागला आहे. इथे केसांना लावायला तेल मिळत नाही त्यामुळे कोरडे आणि निर्जीव दिसतात म्हणून घट्ट बांधते. माझा मूळचा गोरा रंग आता उन्हाने काळवंडला आहे आणि चेहेरा राठ झाला आहे हे खरं पण त्यातून मी स्वताकडे खूप दुर्लक्ष करते हे कारण. इथल्या नियमानुसार साधं कानातलं सुध्दा घालता येत नाही आणि मला इच्छा होत नाही हे पण तितकच खरं! गळ्यात आईने दिलेला ताईत मात्र घालते. त्यात साईबाबांच्या मंदिरातील उदी आहे. भक्ती पेक्षा आईची आठवण म्हणून वापरते झालं. देवावरचा विश्वास गमावला नाही, ना त्याच्या अस्तीव्तावर, पण आधीच कणखर असलेल्या माझ्या मनाला भट्टीत तापवून आणि सुलाखून निघालेल्या शस्त्राची धार आहे त्यात दुर्दैवाने भक्तीला पोषक भावना येत नाहीत. मला न्याय मिळाला, देवानेच मिळवून दिला अशी खात्री आहे मला. म्हणून आता कोणतीही कटुता किंवा अपराधाची भावना मनात राहिली नाही. मन शांत आहे आणि इथलं वास्तव्य मला आवडू लागलय. प्रथम तुम्ही एवढे प्रयास घेऊन इथवर आलात याबद्दल धन्यवाद. हो, तुमचं पत्र मिळालं आणि महिला आधार आणि सुरक्षा संस्थेची शिफारस सुद्धा. त्यांचे माझ्यावर खूप ऋण आहेत. त्यांनी मला कुठलाही पूर्वग्रह न बाळगता अविरत मदत केली. त्यांना त्यांच्या अतिशय वाखाणण्या सारख्या कामात माझ्या सहकार्याने जर मदत होत असेल तर मला आनंद आहे. माझ्या आयुष्यातील घटनांचा वृत्तान्त माझ्याकडून ऐकून इतर पीडित स्त्रियांना धीर मिळत असेल तर मी माझी गोष्ट सांगायला तयार आहे. तरीही मला काही बाबी आधीच स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक तर मी तुमच्याकडून कोणत्याही सहानभूतीची अथवा दयेची अपेक्षा करत नाही. जर तुम्ही माझा तिरस्कार करत असाल अथवा करणार असाल तरीही मला ते जाणून घेण्यात स्वारस्य नाही. तुम्ही किंवा तुमचे वाचक, श्रोते, संस्था काय मत प्रदर्शन किंवा उहापोह, चर्चा करतील ते कृपया मला कळवण्याची तसदी घेऊ नका. मी जे काही सांगेन ते माझ्या दृष्टीकोनातून पूर्ण सत्य असेल पण तुमच्या माहितीनुसार त्यात जर तफावत असेल तर मी तुमच्या उलट तपासणीसाठी तयार नाही. तुम्हाला योग्य वाटेल ते लिहायला तुम्ही मोकळे आहात. मला वाटतं सत्य हे एका कांद्या प्रमाणे आहे. जश्या पाकळ्या तुम्ही सोलत जाल तसे तुम्हाला अश्रू येतील पण शेवटी हाती ठोस काही लागणार नाही, पाकळ्यां शिवाय. त्यातील सत्य ही एक अनुभूती असेल. एका व्यक्तीचा अनुभव दुसऱ्या व्यक्तीची गोष्ट असते तर कधी एक गोष्ट दुसऱ्याचा अनुभव बनून जाते. तेंव्हा माझ्या गोष्टीतून काय घ्यायचं आणि काय नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न असेल. असो.

माझी कथा ही कोणाही एका सर्व सामान्य मुलीची गोष्ट आहे. माझ्यावर अतिप्रसंग ओढावला नसता तर तुम्ही सहजपणे आणि विनासंकोच म्हणू शकला असतात की ही तर तुमच्या मुलीची कहाणी आहे. चला, तुम्हाला मुलीची म्हणायची नसेल तर बहिणीची म्हणा, हवं तर बायकोची किंवा शेजारी राहणाऱ्या मुलीची म्हणा. पण माझी गोष्ट ऐकल्यावर तुम्ही तसं म्हणणार नाही याची मला खात्री आहे. मी त्याबद्दल तुम्हाला दोष देईन असं समजून ओशाळू नकात कारण तुम्ही काही आगळं वेगळं करत नाही आहात. तुम्हाला माझी कणव येते? दोषी व्यक्तींचा राग येतो? समाजाची चीड येते? जीव घाबरा होतो? कशाची तरी घृणा वाटते? साहजिक आहे पण परिस्थितीत त्यामुळे बदल होणे नाही. अशा बहुतेक घटना, प्रसंग, परिस्थिती, अनुभव असतात ज्या काही केल्या बदलता येत नाहीत किंवा परिस्थिती पूर्ववत करता येत नाही. समय हा एका दिशेने धावत असतो आणि त्याच्या दिशेचा बाण कोणालाच उलटा करता येत नाही, अगदी परमेश्वराला सुध्दा. एक वेळ खाली पडून फुटलेली बशी एकसंध करता येईल पण घायाळ झालेले मन, अत्याचारित शरीर, भीतीचा पगडा, उध्वस्त भवितव्य, आकांक्षांचा झालेला चुराडा आणि दुखावलेला आत्मसन्मान कसा पूर्ववत कराल?

माझा जन्म दादरच्या एका चाळीत झाला. माझ्या आईची आणि बाबांची ओळख, प्रेम आणि लग्न त्याच चाळीत झालं होतं कारण माझा, कापडाच्या गिरणीत काम करणारा मामा विष्णू आमोणेकर तिथच चाळीत रहात असे आणि तरुणपणी बाबा त्याचे मित्र होते म्हणे. आम्हाला चाळीशिवाय दुसरं जग माहित नव्हतं. माझ्या आठवणीत आहे की मी सरकारी शाळेत जात असे आणि फावला वेळ आईला केरोसिनच्या स्टोव्हवर स्वयपाकाला किंवा धुणं धुऊन चार मजले पाण्याच्या कळशा चढवायला मदत करत असे. इतर वेळ मुलींच्याबरोबर भातुकली खेळण्यात जाई. बाबांचा हृदयविकाराच्या झटक्याने अकाली मृत्यू झाला तेंव्हा श्री दोन वर्षांचा असावा. श्री म्हणजे श्रीपाद हे तुमच्या लक्षात आलं असेलच. या अचानक झालेल्या आघाताने आई पूर्णपणे सुन्न होऊन गेली. मी शाळा सोडून पूर्णवेळ श्रीला सांभाळत असे. बाबांच्या पोस्टातील नोकरीमुळे आईला पेन्शन सुरु झालं खरं पण ते पुरेसं नसावं. त्यावेळेला मामाची गिरणी बंद पडली आणि त्याच्याकडून काही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता नव्हती म्हणून मामानी तिला खोली विकून आमोण्याला म्हणजे गावी जायचा सल्ला दिला. मामाला गिरणी सुरु होण्याची आणि पगाराची थकबाकी मिळण्याची वाट पहात राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. अशा तऱ्हेने आई, मी आणि श्रीपाद आमोण्याला आलो. मामानं आजोबांचं घर नाहीतरी कितीतरी वर्षं बंदच ठेवलं होतं. बाबांच्या पोस्टातील सहकाऱ्यांनी आईला मदत केली आणि खोली विकून आलेली बहुतेक सर्व रक्कम आईने पोस्टात ठेवली आणि नंतर तिला काही आर्थिक चणचण भासल्याची मला जाणीव झाली नाही. आमोण्याला आमच्या गरजा सुध्दा अगदी कमी होत्या. परसातील चार नारळ, एक आंबा, एक फणस आणि कोकम आम्हा तिघांना पुरून उरे. मी परत शाळेत जाऊ लागले आणि आई सुध्दा स्थिर झाल्याचं मला कळत होतं. तिचा सर्व वेळ कामात जाई. घराची शाकारणी असो का घराचे आवार साफ करणे असो, तिला स्वतः काम करताना मी पाहिलं आहे. शेजारची घरं दूर दूर अंतरावर असत आणि मुंबईच्या चाळीप्रमाणे गजबज नव्हती. मला वाटतं त्यामुळे आईलाही स्वतःचा वेळ मिळाला आणि आपल्या पायावर उभे राहण्याची उमेद सुध्दा. अगदी आमच्या घरा सभोवतीची भिंत आणि परसातल्या विहिरीचा कठडा सुध्दा तिने एक गवंडी बोलावून ठीक करून घेतला. श्रीपाद त्यावेळेला चालू लागला होता म्हणून तिनं बहुतेक ही दक्षता घेतली असावी. आईला फुलझाडांची खूप आवड होती. अगदी चाळीत असताना सुध्दा तिने कुंड्यात तुळस आणि एक दोन फुलझाडे लावल्याचं मला आठवतं. गावी तर काय तिला रान मोकळं होतं! मग चाफा काय अन अबोली काय, तिचा बराच वेळ हा छंद जोपासण्यात जाई. मला वाटत श्रीपादला सुध्दा बाग कामाची आवड आईच्या मागे मागे फिरूनच लागली असावी. मला मात्र गोष्टीची पुस्तकं वाचायला खूप आवडे आणि आजतागायत माझा वाचनात वेळ बरा जातो.

मला माझ्या शाळेतल्या आणि चाळीतल्या मैत्रिणींची खूप आठवण येत असे. पण गावात शाळेशिवाय मला खेळायला मैत्रिणी नव्हत्या. शाळेतून इतर मुलींच्या बरोबर मी रेंगाळत घरी येत असे आणि एक एक करून सर्वजणी आपापल्या घरी जात. घरी आल्यावर मी श्रीपादशी खेळत असे. त्याच्यात आणि माझ्यात जवळजवळ नऊ वर्षांचं अंतर होतं हे मी विसरून जाई. गावी आल्यावर आई, मी आणि श्रीपाद एकमेकाच्या खूप जवळ आलो आणि एकसंध झालो जे चाळीत होणं अवघड होतं असं मला वाटतं. जशी वर्षं सरली तशी बाबांची आठवण अंधुक होत गेली. माणसाचं मन बऱ्याचदा क्लेश देणाऱ्या आठवणी आणि प्रसंग विस्मरणाच्या अडगळीत फेकून देतं, तसच काहीसं.

वर्षं भरभर गेली पण मामा काही गावी परतला नाही आणि आमचही कधी मुंबईला जाणं झालं नाही. आईचा आणि मामाचा तुरळक पत्र व्यवहार चाले पण जास्त निरोप मुंबईहून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांबरोबर असत. दिवाळीत मामाची भाऊबीज मात्र आईला दर वर्षी येत असे आणि आम्हाला कापड आणि खाऊ. मी परकर आणि पोलक्यातून बाहेर पडून ड्रेस कधी घालायला लागले हे पक्कं आठवत नाही पण शाळा संपायच्या सुमारास असावं.

इतर बऱ्याच मुलींना जसे तारुण्याचे अलगद आणि सुखद धक्के बसतात तसे मला कधी बसले नाहीत, न कधी मी विस्मयतेनं मैत्रिणींशी अनुभवांची देवाण घेवाण केली. बहुतेक याचं कारण माझं वाचन आणि कल्पनाविलास असू शकेल. शाळेतल्या वाचनालयातील गोष्टींच्या पुस्तकांचा भस्मासुरासारखा फडशा पाडल्यानंतर अनाहूतपणे मी गावातील वाचनालय आणि नंतर कॉलेज मधील लायब्ररी एखाद्या वाळवीप्रमाणे संपवू लागले. कॉलेजमध्ये माझा विषयच मराठी साहित्य होता त्यामुळे माशाला जसं पोहायचं ज्ञान उपजत असतं तसं मी मराठी साहित्याच्या सागरात मुक्तपणे पोहत होते. कथा कादंबरीतील आणि काव्यातील पात्रांशी मी समरस होऊन जाई आणि बऱ्याच वेळा मला माझा राजकुमार तेथेच भेटे. प्रेमाची, प्रणयाची आणि एखाद्या तरुणाबरोबर आयुष्य काढायची माझी कल्पना मंगल, दिव्य, सोज्वळ आणि नाजूक झाली. या कल्पनाविलासात अशुभ, क्रूर, बीभत्स आणि विद्रूप गोष्टींना अजिबात स्थान नव्हतं. एवढ असूनही मला वस्तुस्थितीची जाणीव नव्हती असं नाही. आईचं वाढतं वय आणि तिचा थकवा माझ्या ध्यानात येत असे. आईला अनेकदा बरं नसायचं. आई माझ्या आणि श्रीच्या भवितव्याकडे पाहून संसाराचा गाडा ओढते आहे हे मला कळत होतं. श्रीपाद अजुनही अल्लड होता पण मला आता आईला हातभार लावायची वेळ येऊन ठेपली होती. माझा प्लान स्पष्ट होता. एका वर्षात मी पदवीधर होणार आणि मग शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची माझी इच्छा होती. पुढं मी बी एड पण करायचं ठरवलं होतं. श्रीपादला कोणी विचारलं की “ तू मोठा झाल्यावर काय बनणार रे?” तर त्याचं उत्तर ठरलेल असे “मी डॉक्टर बनणार आणि आईला औषध देणार.” लहानग्या श्रीपादच्या मनात डॉक्टर फक्त आईला बरं करण्यासाठी व्हावयाचं होतं !
एक सेकंद हं ! मी आलेच. डोळ्यात बहुतेक धूळ गेली, पाण्यानं डोळे साफ करून आले.

हो. तर मी काय सांगत होते. माझ्या प्रँक्टीकॅल दृष्टीकोनाबद्दल. हो, मी खूप समजूतदार मुलगी होते अगदी लहानपणापासून. आईकडे सुध्दा माझा कशाबद्दलही फारसा हट्ट नसायचा आणि बाबा गेल्यानंतर तर मी अचानक मोठ्ठी झाले. त्या वयातही मला उगीचच श्रीपादची आणि आईची जबाबदारी वाटत असे. त्यामुळे श्रीपादचे शिक्षण पूर्ण होऊन त्याला नोकरी लागे पर्यंत लग्नबिग्न करण्याचा अजिबात विचार नव्हता. पण देवाने माझ्या विधिलिखितात दुसरच काही लिहिलं होतं आणि त्याची तसूभर देखिल कल्पना कोणाला येणं शक्य नव्हतं.

दिवाळीचे दिवस नुकतेच सरले होते आणि मामानं माझ्यासाठी पहिल्यांदा साडी पाठवली होती. साडीवरचा ब्लाउज मी शिवायला पण टाकला होता. पूर्वी कॉलेजच्या संमेलनात मी एक दोनदा आईची किंवा मैत्रिणीची साडी नेसले होते पण आता खास माझी साडी मला मिळाली होती आणि मला साडीचा आबोली रंग खूप आवडला होता.

एके दिवशी संध्याकाळी दिवेलागणीला आईनं विषय काढला, “ शोभा, तुझ्या मामाचं पत्र आलंय.”
“हो ग आई, मला माहित आहे. एक का, मामाची हल्ली बरीच पत्र आली आहेत. हो ना? तब्येत ठीक आहे नं मामाची? “ मी म्हणाले “ आणि त्याला कळवलस का मला साडी खूप आवडली ते?”
आई म्हणाली “ शोभा, मामानं तुझ्यासाठी स्थळ आणलंय.”
“स्थळ? म्हणजे मुलगा? पण आई तुला माहित आहे नं मला इतक्यात लग्न नाही करायचं ते?” मी म्हणाले
“शोभा, मुलगा चांगला आहे. आपल्याच चाळीतला. एकुलता. वडील बँकेतून निवृत्त झालेत पण मुलाला त्याच बँकेत लावलंय. उंचापुरा आणि दिसायला छान आहे असं मामानं लिहिलंय. फोटोत तुला पसंत केलंय मुलानं.“
“असेल ग आई पण तुला आणि श्री ला सोडून मला जायचं नाही. “ मी रडवेली होऊन बोलले
“शोभा, तू एवढी शिकलेली, एवढं वाचन केलेली, समजुतदार मुलगी. तुला कळायला हवं की बापाविना मुलीला सहजी स्थळं येत नाहीत. लोकांना उगीचच धास्ती वाटते की मुलीकडली जबाबदारी पडेल. तेंव्हा आलेलं चांगलं स्थळ असं सोडून नाही चालणार.” त्यावर मी निरुत्तर होते आणि मुख्य म्हणजे आईच्या शब्दा बाहेर तर कधीच नव्हते. बराच काथ्याकुट झाल्यानंतर असं ठरलं की मी नाताळच्या सुट्टीत मुंबईला मामाकडे जायचं. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम मामाकडे होता. सोबतीला श्रीपाद माझ्याबरोबर येणार होता. मामाची पण बऱ्याच वर्षांनी भेट होणार होती आणि मुंबई दर्शन सुध्दा.

प्रथमदर्शी मला लग्नाविषयी जरी निरुस्साह असला आणि दाखवण्याच्या कार्यक्रमाची धास्ती पण, तरीही मुलाला पाहायची उत्सुकता होतीच. त्यात मुंबईला जाण्याचं सामान्यता जे आकर्षण असावं तेही होतं. श्रीपाद तर आनंदानं नाचत सुटला होता. त्यानं त्याच्या सर्व मित्रांना अतिशय अभिमानानं आपल्या न पाहिलेल्या मामाविषयी आख्यायिका सांगितल्या होत्या आणि मुंबईला गेल्यावर तो कसा एका उंच इमारतीवर जाऊन मुंबई बघणार आहे ते पण त्यानं वर्णन करून सांगितलं. शेवटी आमच्या प्रवासाचा दिवस उजाडला. आईची धावपळ पाहण्यासारखी होती. तिनं मामासाठी लाडू बांधून दिले, आमच्यासाठी रात्री खायला चपाती आणि बटाटयाची भाजी डब्यात दिली. आमची बँग परत परत उघडून सर्व गोष्ठी घेतल्यात का नाही ते पाहिलं. सुकलेली कोकमं, काजूचे गर, नारळाच्या वड्या या शेवटी आठवलेल्या गोष्टी पण बांधून दिल्या. तिच्या डोळ्यात सतत अश्रू येत होते. बहुतेक बाबांची आठवण येत असणार. आम्ही बसमध्ये बसल्यावर तिनं पदरानं डोळे पुसले आणि म्हणाली “सांभाळून जा हो आणि पोचल्यावर पेडणेकरांकडे फोन करून मला निरोप धाडा.” आम्हाला त्या दुर्दैवी दिवशी बस मधे बसताना कुठं माहित होतं की चोरपावलांनी मागोवा घेत मृत्यू सुध्दा बस मधे चढला आहे.

पहिल्यांदा रात्री बस थांबली तिथं बरेच प्रवासी जेवायला उतरले. आम्ही आमची पोळी भाजी खाऊन घेतली. श्रीपादला खूप झोप येत होती. इतका लांबचा प्रवास आम्ही प्रथमच करत होतो. मामा सकाळी आम्हाला घ्यायला येणार होता. आईला मी म्हटलं “कसा ग मामा आम्हाला ओळखेल?” तर आई म्हणाली “का नाही ओळखणार? तू तर माझ्या सारखीच दिसशील त्याच्या नजरेला. आणि हो, मी नव्हता का तुझा फोटो पाठवला त्याला? वर श्रीपाद तुझ्या बरोबर आहे ही पण खूण नाही का? पण तुम्ही उतरल्या जागेवरून हलू नकात तो भेटेपर्यंत.”
हवेत गारवा होता आणि बाहेर कुट्ट अंधार. बस मधले सर्व प्रवासी हिंदकळत, पेंगत होते. मला पण डुलकी लागली. श्रीपाद माझ्या मांडीवर डोकं ठेऊन गाढ झोपला होता. मधेच कधीतरी जाग आली आणि लक्षात आलं की बस थांबली आहे. श्रीपाद पण जागा झाला आणि म्हणाला “ताई तहान लागले. बाटलीतलं पाणी संपलंय!” मी बाहेर पाहिलं तर होटेल दिसलं. उजेड पिवळा आणि मंद होता पण इमारत मोठ्ठी दिसली. बहुतेक प्रवासी झोपलेले होते. ड्रायव्हर जागेवर नव्हता. मी श्रीपादला म्हटलं “चल, हॉटेलात पाणी भरून घेऊ.” आम्ही दोघे बस मधून उतरलो. हॉटेलात एक दोन माणसं चहा पीत होती. टेबलावर ठेवलेल्या भांड्यातून मी बाटली भरून घेतली. मी गल्ल्यावर बसलेल्या मुलाला विचारलं “ बायकांची जागा कुठंय?”
गल्यावरचा मुलगा पंचविशीत असावा. त्याचं नाव होतं शामराव. अर्थात सर्व नावं मला खूप नंतर माहित झाली पण ती तुम्हाला पण आता माहित आहेत तेंव्हा नावांचा उल्लेख पहिल्यापासूनच करायला अडचण नाही, तुम्हाला समजायला पण सोपं जाईल.

हो, शामराव हा मालकाचा मुलगा आणि महाडच्या त्या हॉटेलचा मालक म्हणजे कोण हे तुम्हाला माहित आहेच, वासू गेंडे, अर्थात वसंत गेंडे. वासू गेंडे हा स्थानिक गुंड आहे आणि त्याचं राजकीय मंडळीत सुध्दा वजन आहे हे पुढल्या काळात स्पष्ट झालं आहे. शामराव दिसायला सावळा पण तरतरीत होता. त्याच्या हातातली जाड सोन्याची साखळी ठळकपणे दिसत होती. त्याच्या शर्टाची कॉलर उघडलेली होती जसे पूर्वीच्या काळातल्या सिनेमातले मवाली करत. त्याच्या समोर बीअरची बाटली होती जशी जाहिरातींच्या पोस्टर मधे दिसते तशी. शामराव बराच वेळ माझ्याकडे टक लावून पहात होता. शामरावनं हाक दिली “ किशन, इसको उपरका रूम दिखा. आप्पा, मुलाकडे बघ, बिस्कीट दे त्याला.”
मी श्रीपादला म्हणाले “श्री, बस इथं खुर्चीवर मी आलेच दोन मिनिटात.” अर्धवट पेंगत असलेला श्रीपाद खुर्चीत बसला आणि मी किशनने दाखविलेल्या जिन्याकडे वळाले. जिन्याच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताना श्रीपादची आणि माझी नजरभेट झाली आणि तीच शेवटची ठरली. भिंतीवरची पाल मोठ्यानं चुकचुकली. मी जिना चढले आणि ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्ठी घोडचूक होती.

जिना चढल्यावर एक लांबलचक आळी होती आणि दोन्ही बाजूला खोल्यांची दारं. आळीमधे दिव्याचा मंद पिवळा प्रकाश पडला होता. किशन पुढे झाला आणि त्यानं एका खोलीचं दार उघडून दिलं आणि आतला दिवा लावला. मी आत बघितलं तर बाथरूमचं अर्धवट उघडलेलं दार दिसत होतं. हायवेवरील गेस्ट हाउस कसे असतात याची मला कल्पना नव्हती आणि मी प्रथमच अशी खोली पहात होते. खोलीत एक पलंग, भिंतीवर मोठ्ठा आरसा आणि एक टेबल व खुर्ची होती. भिंतीवर एका बाईचं कँलेडर लटकवलेलं होतं. मी दरवाज्यातून बाथरूमच्या आतला दिवा लावला आणि मागं वळून पाहिलं. किशन नाहीसा झाला होता.

बाथरूम मधे मी फारतर दोन मिनिटं असेन. बेसिनमध्ये हात ओला करून मी विस्कटलेल्या केसांवर फिरवला आणि बाथरूमचं दार उघडलं आणि मला धस्स झालं, खोलीत उजेड नव्हता. मी दरवाज्याकडे धाव घेतली एव्हड्यात माझ्यावर कोणीतरी झडप घातली आणि मला आवळून धरलं. माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पडली! काही वेळ त्या व्यक्तीच्या हातून सुटण्याची मी खूप धडपड केली पण माझे हात त्याने आपल्या मिठीत जखडून टाकले होते. मी मोठ्यानं ओरडायला सुरवात केली. त्यानं हात सोडून एक जोरदार फटका माझ्या तोंडावर मारला त्यामुळे मी हेलपाटत जाऊन काँटवर पडले आणि मला क्षणभर भोवळ आली. मला आता त्याचा चेहेरा अंधुकसा दिसत होता. तो शामराव होता. त्यानं खिशातून रुमाल काढला आणि मला पालथ केलं. माझे दोन्ही हात रुमालानं गच्च बांधले. आता परत मी धडपड करून उठायचा प्रयत्न करू लागले आणि त्याला लाथा मारू लागले. शामराव माझ्या पाठीवर बसला आणि एक उशीचा अभ्रा त्याने काढला. त्या अभ्र्यानं त्यानं माझे दोन्ही पाय करकचून बांधले. दुसरा अभ्रा काढून त्याच्या एका टोकाचा बोळा केला आणि तो माझ्या तोंडात खुपसला. आता मला श्वास घेणं कठीण झालं होतं. या काही क्षणात देखिल मला फक्त श्रीपादची चिंता लागली होती.
शामराव उठून उभा राहिला आणि त्यानं मला पलंगावर पाठ टेकून बसवलं. रूम मधला दिवा लावला. माझे हात आणि पाय बांधलेले होते आणि तोंड कापडानं भरलेलं होतं. शामराव अजून धाप टाकत होता. त्याच्या तोंडाला आंबट वास येत होता त्यावरून तो खूप दारू प्याला असावा. त्याचे डोळे लाल दिसत होते. तो म्हणाला “ कशाला एवढा राडा घातलास? गप बसली असतीस तर पंदरा मिनटात बसवर पाठवलं असतं. बस उगाच का पंचर केली? आता रहा इथच खोलीत. जाऊदे बसला.“
मी खूप हालचाल करून आणि घशातून आवाज करून विचारायचा प्रयत्न केला. शामरावनं सगळं कळलंय या अविर्भावात सांगितलं “हो, तो पोरगा पाठवला गाडीत. जाऊ दे त्याला पुढं. तू नंतर जाशील, घाई काय आहे?”
मला जाणवलं की माझ्या नाकातून गरम रक्त वाहतंय, बहुतेक नाकाचा घोळणा फुटला असावा. मी परत बोलायचं प्रयत्न केला पण घशातून नुसताच हुंकार बाहेर येत होता. मी पाय झाडायला सुरुवात केली. शामरावनं माझ्याकडे हसून बघितला आणि माझ्या तोडातल्या लटकणाऱ्या फडक्यानं माझं नाक पुसलं. एवढ्यात खोलीचं दार किंचित उघडलं आणि किशन डोकावला, “ सेठ, वो लडका आवाज कर रहा है. आप्पा ने पकडके रखा है उसको. “ शामरावनं त्याच्याकडे बघितलं आणि तो ओरडला “ दरवाजा बंद रखो, लडकेको रूममे बंद करो, गेस्ट जाग जायेंगे. “ पुढं होऊन शामरावनं दाराला कडी घातली आणि तो माझ्याकडे वळला.
मी खूप प्रतिकार केला पण मी हळूहळू कमकुवत पडत गेले. मला शामरावा कडून बरीच मारहाण झाली, एक डोळा सुजला आणि त्या डोळ्यानं मला दिसेना, तोंडातून रक्त येत होतं, ओठ फाटला होता. केसाला धरून ओढून शामरावनं माझं डोकं भिंतीवर आपटलं त्यामुळे खोक पडली. अनेक वेदनांनी शरीर सुन्न झालं. नंतर काय प्रकार घडला हे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही जरी कोर्टात या सर्व प्रकाराची चिरफाड झाली. तुम्हाला या बीभत्स घटनेचे तपशील वाचायचे असतील तर ते कोर्टाच्या रेकॉर्ड मधे तुम्हाला मिळतील.

माझ्या शरीरावर किती वेळा अत्याचार झाला हे कळण्याच्या मी पलीकडे गेले. मला संवेदना नव्हत्या आणि मी मुर्छेच्या स्वाधीन झाले. जाग आली तेंव्हा सकाळ झाली होती आणि खिडकीतून कोवळं उन खोलीत येत होतं. माझं डोकं वेदनेनं ठणकत होतं आणि गरगरत होतं. माझ्या अंगावर काहीही वस्त्र नव्हतं. अंग ठिकठिकाणी सुकलेल्या रक्तानं काळं पडलं होतं. मला अतिशय घृणा आली आणि मी बाथरूम मधे धावत जाऊन ओकारी काढली तेंव्हा जरा डोकं स्थिर झालं. अजुनही डावा डोळा सुजला होता आणि बंद झाला होता. अस्ताव्यस्त पडलेले कपडे मी गोळा केले. मला अतिशय मलीन आणि अमंगल वाटत होतं. मी बाथरूम मधे जाऊन नळाखाली बसले. थंड पाण्याच्या स्पर्शाने शरीराला लागलेली घाण थोडातरी दूर होईल असं वाटत होतं. मला किशनच्या कालच्या बोलण्यावरून श्रीपादला कुठल्यातरी खोलीत डांबलं आहे हे लक्षात आलं होतं. मी खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण बाहेरून कडी घातली होती. मी दरवाज्यावर जोरजोरात गुद्दे आणि लाथा मारायला लागले. बाहेरून कुजबुज ऐकू आली तसं मी दरवाज्याला कान लावले. बाहेरून येणारे आवाज थांबले होते. अचानक दरवाजा जोरात उघडला आणि मी मागे फेकले गेले. दोन माणसं आत आली आणि त्यांनी दरवाजा लाऊन घेतला. त्यातला एकजण किशन होता आणि दुसरा आप्पा ज्याचं नाव मला नंतर पोलिसांच्या ओळख परेड मधे कळलं. किशननं माझ्यावर झडप घातली. आप्पाच्या हातात दोरी होती. माझे हात आणि पाय त्यांनी दोरीनं बांधले आणि मी ओरडू नये म्हणून माझं तोंड कापडानं करकचून बांधलं. मला खोलीच्या कोपऱ्यात टाकून ते निघून गेले. मला परत ग्लानी आली आणि मी झोपेच्या स्वाधीन झाले.
मला जाग आली तेंव्हा खिडकीतून येणारं उन नाहीसं झालं होतं आणि खोलीत अंधार पडला होता. मला खूप तहान लागली होती पण हात आणि पाय बांधलेल्या स्थितीत नळाकडे जाता येणं शक्य नव्हतं. तेव्हड्यात खोलीचं दार उघडलं आणि आप्पा आत आला. आप्पा वयस्कर माणूस होता, किशन सारखा पोरगेला नव्हता. त्याला अर्ध टक्कल होतं आणि त्यानं अंगात बंडी आणि विजार घातली होती. त्याच्या हातात जेवणाची थाळी होती. आप्पानं आतून खोलीचं दार लावून घेतलं. थाळी माझ्यापुढे ठेऊन आप्पा म्हणाला “ पोरी, भूक लागली नं? थोडं जेवून घे.“ आप्पानं माझ्या तोंडातला बोळा काढला आणि माझे हात सोडवले. माझ्या हाताला रग लागली होती. मी गप्प होते. आप्पा माझ्या समोर खाली बसला आणि त्यानं चपातीचा घास वाटीतल्या डाळीत बुडवून माझ्या समोर केला. मला रडू आवरेना आणि एखादा बांध फुटल्याप्रमाणे मी रडू लागले. जरा भावनांचा जोर कमी झाल्यावर मी विचारलं “ श्रीपाद, माझा भाऊ कूठं आहे?”
“धीर धर पोरी. तो इथं नाही पण मिळल. आता तू जेऊन घे.” आप्पा म्हणाला
“मला नाही जेवायचं. मला श्रीपादला भेटायचय.” मी हुंदके देत बोलले
आप्पा हळू आवाजात म्हणाला “ पोरी, नीट एकून घे. तुझ्या जीवाला लई धोखा हाये. आत्ता मालक वर येईल. तू निपचित पडून रहा. रात्र झाली की मी बाहेरून दरवाज्या उघडा ठेवीन. संधी मिळता तू इथून पळ काढ. कळला? आता जेवून घे, अंगात शक्ती होवी. आवाज करू नाका.”
“पण श्रीपाद? तो इथंच कुठल्या रूम मधे आहे नं ?” मी म्हणाले
“नाय, पोरगा खूप आवाज करत होता आणि लई आडदांडपणा पणा केला त्यानं. कोणालाच आवरेना. मालकांन दुसरीकडे न्हेला. दिलं असल रस्त्यावर सोडून दूर. पण तू एक पळ देखिल इथं थांबून त्याला शोधू नकोस. पकडली जाशील. मी येतो.“
“ पण श्रीपादला घेतल्या शिवाय मी जाऊ कशी इथून?“ मी आता रडू आवरलं होतं
“हे पहा पोरी, मला फार वेळ नाही. शामरावानं गाढवपणा केल्याचं कळल्यावर लगेच त्याला मालकानं गोव्याला धाडलाय. पण तू अजिबात इथं थांबू नकोस, पळ काढ! ” इतका बोलून आप्पा निघून गेला. बाहेरून दरवाज्याला कडी घातल्याचा आवाज आला.

मला खूप काळजी वाटू लागली होती. श्रीपादला गेस्ट हाउस मधे डांबलं नसेल तर कूठ नेलं असेल आणि तो कसा असेल या चिंतेनं मला अधिकच भीती वाटू लागली. श्रीपादला रस्त्यावर सोडून दिलं असेल तर तो काय करील, कुठं जाईल याची विवंचना मला भेडसावत होती. आम्ही पोचलो नाही म्हणून मामानं काय केलं असेल, आईला कळलं असेल का आम्ही हरवलो आहोत ते? मामा पोलिसात गेला असेल का? नाही, मामा आमोण्याला जायला निघाला असेल बहुतेक. मनात विचारांचं काहूर उठलं. मी थोडं खाऊन घ्यायचं ठरवलं आणि चापातीची गुंडाळी करून पाण्याच्या घोटानं घशाखाली उतरवली. मधेच श्रीपादच्या आठवणीनं हुंदके येत होते पण आता फक्त रडून चालणार नव्हतं. आप्पा मला का मदत करत होता आणि त्यानं एव्हड्या जोखमीनं मला पळून जायला का मदत देऊ केली हे एक नवीन कोडं होतं. पण मला वाटलं आप्पाची माणुसकी जागी झाली असावी. शामराव अघोरी कृत्य करून बेपत्ता का झाला हे लक्षात येईना. बहुतेक त्याच्या बापानं त्याला मारला असेल किंवा नशेतून जागं झाल्यावर त्याला भीती वाटली असेल. पण भीती कशाची, माझी? नाही मला वाटतं पोलिसांची असावी. म्हणजे बाहेर पडल्या वर पोलीसांकडे जायला हवं. निदान ते श्रीपादला गेस्ट हाउसमधे किंवा कोठेतरी शोधतीलच असं मला वाटू लागलं. मी जेवणाचं ताट पलंगाखाली सारलं आणि तोंडात कापडाचा गुंडाळा घातला. पायातली दोरी सोडवून हलकी बांधल्यासारखे केले. दाराबाहेर आवाज आला. मी हात मागे बांधल्यासारखे धरुन आणि डोळे मिटून निपचीत पडले.

खोलीचा दरवाजा उघडला आणि मी डोळे किलकिले केले. एक उंचापुरा माणूस आत आला. त्याला आप्पा सारखं टक्कल होतं. अंगात बंडी होती आणि गळ्यात जाडजूड सोन्याची साखळी चमकत होती. त्याच्या हातात जळती सिगारेट होती. तोच वासू गेंडे होता. मागून किशन आणि आप्पा डोकावले. वासूनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला “हिच कारे ती अवदसा शामला बाधनारी. आयला, काय लफडं आहे. आईन् निवडणुकीच्या वेळेला काय लचांड उद्भवलय. आता काय करायचं हीचं किशन अन् आप्पा सांगा. इलाज आहे का दुसरा. नाहीये नं? पहाटे तीन नंतर आपला डंपर काढा.” हातातली सिगारेट जमिनीवर टाकून वासूनं ती चपलेनं चिरडली आणि वळून तो खोली बाहेर निघून गेला. आप्पाच्या हातात बँग होती ती त्यानं भिंती लगत ठेवली आणि किशनला म्हणाला “ चलो अब, तीन बजे आनेका है !”
किशन खिदळत म्हणाला “ आप्पा, तुम तीण बजे आना. शामराव इधर नही है. मै होटल बंद होणेबाद एक चक्कर जरूर काटूंगा लडकीकी तबियत देखणे!” दोघं बाहेर निघून गेले आणि दार मागं बंद केलं. मी झटकन उठले. आप्पानं ठेवलेली बँग आमचीच होती. मी खोलीच्या दरवाज्याचं हँड्ल फिरवलं. आप्पानं सांगितल्या प्रमाणे बाहेरून कडी घातली नव्हती आणि दार उघडलं. मी दार परत पटकन बंद केलं आणि बँग उघडली. सर्व गोष्टी अस्ताव्यस्त झाल्या होत्या म्हणजे कोणीतरी बँग उपसली होती. मी तळाला हात घातला तर माझ्या नव्या साडीची घडी अजून मोडली नव्हती. त्याच्या पदराखाली ठेवलेले पैसे मी काढले. माझं मन मला दार उघडून ताबडतोब बाहेर पळत जायची आज्ञा करत होतं पण अंतर्मनानं रोखून धरलं. माझ्या अंगावरच्या कपड्यांना आता घाण वास येत होता. मी बाथरूम मधे जाऊन नळाच्या थंड पाण्याखाली बसले. आता धीर आला होता आणि मी देवाचा जप करू लागले. मला जास्त वेळ घालवायचा नव्हता. श्रीपाद काय अवस्थेत आणि कुठे असेल याचीच काळजी लागून राहिली होती. मी एक ड्रेस बँगेतून काढून अंगात घातला. खोलीतील लाकडी खुर्ची मी बाथरूम मधे नेली आणि दार बंद करून जोरात जमिनीवर आपटली. खुर्चीचा एक पाय निखळला. मला त्याचा स्वसंरक्षणासाठी हत्यार म्हणून वापर करायचा होता. सहजपणे लक्षात येऊ नये म्हणून मी त्याच्या भोवती माझा एक दुपट्टा गुंडाळला. बिछान्यावर उशांची आकृती करून त्यावर मी पांघरूण घातलं आणि खोलीतील दिवा विझवून मी वाट पाहू लागले.

किशन माझ्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर आला. त्यानं आत शिरून दिवा लावला आणि पलंगाकडे पाहून क्षणभर थबकला. बहुतेक त्याला संशय आला असणार पण तो वळायच्या आतच त्याच्या डोक्यावर माझ्या लाकडी गदेचा जोरदार फटका बसला. त्याला विचार करायला आणि मागे वळायला वेळ मिळाला नाही कारण तो जागेवरच कोसळला. आता माझा मार्ग मोकळा होता. दोरीनं किशनचे हात अन् पाय मी बांधले आणि तोंडात फडक्याचा बोळा घातला. कसाबसा ओढून आणि उचलून मी बेशुद्ध किशनला बिछान्यावर आडवं केलं आणि प्रेताला गुंडाळावं तसं त्याला चादरीत पूर्णपणे गुंडाळलं. खोलीचा दिवा बंद करून आणि हातात माझं लाकडी शस्त्र घेऊन मी बाहेर पडले. आता मला काही अडथळा असण्याचं कारण नव्हतं.

मी जिन्यावरून उतरल्या बरोबर गेस्टहाउसच्या मागे जायला मार्ग दिसला आणि मला होटेल मधे जायची गरज पडली नाही. बाहेर अंधार होता पण मला अंधाराची भीती नव्हती. मला कसंही करून श्रीपादला शोधायचं होतं. गेस्ट हाउसला वळसा घालून मी रस्त्याला लागले. किती वेळ चालत होते कोणास ठाऊक पण मी बस स्थानकावर पोहोचले होते आणि समोरच पोलिस स्टेशन दिसलं. आत शिरले तर सब इन्स्पेक्टर साहेब बसले होते. त्याच्या पुढे मी तुम्हाला वर्णन केलेली सर्व हकीकत सांगितली. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं सब इन्स्पेक्टर राणे ज्यांनी पुढे सर्व तपास केला वगैरे. पण माझी सर्व बाब ऐकून घेतल्यावर त्यांनी मला धीर दिला. ते म्हणाले “ बाई, सर्वात प्रथम तुम्हाला मी महिला अधिकाऱ्या बरोबर हॉस्पिटल मधे पाठवतो. तिथं डॉक्टरांना तुमची चाचणी करावी लागेल तसंच तुमच्या जखमांवर ते इलाज करतील. बहुतेक अँडमिट करून घेतील. मी हॉस्पिटल मधे येऊन तुमचं स्टेटमेन्ट नंतर घेईन पण प्रथम मला तुमच्या भावाचा शोध घ्यायला गेस्ट हाउस मधे गेलं पाहिजे.“
मी राणेना मान डोलावून होकार दिला. राणेंनी पोलिस काँलनीतून महिला अधिकाऱ्याला बोलावणं पाठवलं.
मी राणेंना गावी पेडणेकरांना फोन लावायची विनंती केली. त्यांना मी फक्त सुखरूप आहे एवढच आईला आत्ता निरोप द्या असं सांगितलं. मी महिला अधिकाऱ्या बरोबर सरकारी हॉस्पिटल मधे दाखल झाले.

पुढच्या चोवीस तासात बरंच काही घडलं पण श्रीपाद सापडला नाही. माझी वैद्यकीय तपासणी झाली आणि माझ्या सुजलेल्या डोळ्यावर आणि डोक्यावरील जखमेवर मलम पट्टी सुध्दा. मला झोपेचं इंजेक्शन देण्यात आलं आणि मी सकाळ पर्यंत निद्रावस्थेत होते. सकाळी राणे आले आणि त्यांनी माझं स्टेटमेंट घेतलं. राणेंनी सांगितलं की आप्पा आणि वासू यांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय आणि शामरावला गोव्यात पोलिस शोधताहेत. आश्चर्य म्हणजे पोलिसांना माझी बँग मिळाली नाही आणि किशनचा पण पत्ता नव्हता. तुम्हाला केस पेपर वाचून माहित असेल म्हणा पण सांगते की किशनचा आजतागायत पत्ता लागलेला नाही. किशन अदृश्य झाला.
संध्याकाळी मामा आला. त्याला राणेंनी सर्वकाही घटना सांगितल्या होत्या. मी बऱ्याच वर्षांनी मामाला पहात होते पण मामा जवळजवळ तसाच दिसत होता फक्त आता वयस्कर झाला होता एवढंच. आम्ही बराच वेळ नं बोलता बसलो होतो पण नंतर माझा बांध फुटला आणि मी गदगदून रडू लागले. त्या क्षणी मला फक्त आई आणि श्रीपाद हवे होते जे तिथं नव्हते.
दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. मामा रात्रभर खुर्चीत बसून होता आणि मला पण तुटक तुटक झोप येत होती. श्रीपाद कुठं असेल याच विचारानं मला ग्रासलं होतं. माझा तो चिमुकला लाडका भाऊ होता ज्याला मी लहान असताना माझ्या कडेवर घेऊन हिंडत असे. श्रीपाद खूप लाडावलेला होता. आई आणि मी सतत त्याच्या अवती भवती फिरत असू. त्याचा सर्व हट्ट पुरवण्याची आमची धडपड असे. आईने नुकतीच त्याला नवीन सायकल घेऊन दिली होती त्यावर ढांग टाकून तो गावभर फिरत असे. जसं त्याला शोधण्यात उशीर होऊ लागला होता तसं मनात चर्र होऊ लागलं होतं. आप्पानं मला का म्हटलं की जीवाला धोका आहे? , श्रीपादला शोधायला इथं अजिबात थांबू नको असं आप्पा का म्हणाला? त्याला माहित असेल का श्रीपाद कुठे आहे? वासू गेंडे मला रात्री तीन वाजता कुठं घेऊन जाणार होता या प्रश्नांची उत्तरं माझ्या कडे नव्हती. पण श्रीपादच्या जीवाला काही बरं वाईट केलं नसेल ना अशी शंका मनात येऊ लागली होती. श्रीपाद सारख्या कोवळ्या मुलानं काय या नराधमांचं बिघडवलं होतं?

दुपारी तीन वाजता सब इन्स्पेक्टर राणे आले व खुर्चीवर बसले. त्याच्या बरोबर महिला अधिकारी होती. राणेंनी मामाला जरा बाहेर जायला सांगितलं आणि मामा गेल्यावर राणें माझ्याकडे पाहून म्हणाले “शामरावला पोलीसांनी ताब्यात घेतलंय पण तो आपल्याला काहीच माहित नाही असं दाखवतोय. त्याच्या बरोबर दोन मित्र होते. त्यांनी शामराव तीन दिवस त्यांच्या बरोबर असल्याचं सांगितलं. शामरावचा मेडीकल रेपोर्ट घेतलाय पण त्याच्या अंगावर झटापट झाल्याच्या खुणा नाहीत. तुम्ही पोलिस स्टेशनमधे येण्यापूर्वी स्नान केलं होतं ना?” मी म्हणाले “हो, मारहाणीत आणि बेशुद्धावस्थेत कपडयात लघवी झाली, रक्त लागलं होतं अतिशय दुर्गंधी येत होती. मला शरीर फार घाण झाल्या सारख वाटत होतं.”
“मला समजतंय तुमचं कारण, पण डॉक्टर म्हणता आहेत की त्यामुळे शामरावच जबाबदार आहे हे सिद्ध करणं जरा कठीण जाणार. पाहू आप्पाला झोडल्यावर काय स्टेटमेंट देतो ते.” राणे म्हणाले
“साहेब, आप्पा मुळे आज मी इथं आहे नाहीतर माझ्यावर आणखी काय काय आपत्ती ...” मला हुंदका आला
“ हो बाई. शांत व्हा. पण मोठ्ठा गुन्हेगार हाती लागायला अश्या निरपराध्यांचे बळी जातात. अश्या गुन्ह्यात पोलिसात येऊन सांगितलं नाही म्हणून अँक्सेसरी अथवा भागीदार होतो. कळलं का? ”
“हो.” मी मान डोलावली
“आता मन घट्ट करून ऐका. महाड पासून वीस किलोमीटर वर सावित्री नदीच्या काठाला एका मुलाची बॉडी मिळाली आहे. खूप फुगली आहे आणि लहान माशांनी कुरतडली आहे. आताच अँम्ब्युलंस पाठवली आहे. हॉस्पीटलात येताच तुम्हाला आणि तुमच्या मामांना पाहायला मिळेल.” राणे म्हणाले
माझ्या शरीरात कापरं भरलं आणि मी कसलीही पर्वा नं करता मोठ्यानं रडू लागले. महिला अधिकारी माझ्या शेजारी पलंगावर येऊन बसली आणि मला धीर द्यायचा प्रयत्न करू लागली. राणे उठून उभे राहिले आणि म्हणाले “हे पहा. ती बॉडी तुमच्या भावाची असेल असं नाही. नदीवर शाळकरी मुलांच्या अविचाराने असे अपघात होतात. पण तुमचा भाऊ नाही नं याची खात्री पटण्यासाठी तुम्हाला बॉडी पहावी लागेल. मनाची तयारी ठेवा.” राणे निघून गेले आणि मामा आत आला.

नंतरचे तीन तास माझ्या आयुष्यातील सर्वात अधिक दुखःद होते. श्रीपादचं शरीर अतिशय वाईट स्थितीत होतं. त्याला कशामुळे मृत्यू आला हे पोस्ट माँर्टेम नंतर कळणार होतं पण मला खात्री होती की वासू गेंडेनंच श्रीपादला मारलं होतं. माझा एकुलता एक लाडका भाऊ विनाकारण मृत्युमुखी पडला होता. मला माझ्या शरीरावर झालेले आघात कस्पटासमान वाटू लागले. माझ्या निरपराध भावाला त्यांनी सोडून दिलं असतं तर मी एकवेळ गप्प राहले असते असं माझ्या मनात आलं. मला श्रीपाद भेटला असता तर आम्ही एक क्षण महाडमधे थाबलो नसतो, त्या रात्रीच पळालो असतो याची मला खात्री आहे पण काळानं डाव साधला.

मी आणखी हॉस्पिटल मधे रहाण्याचं काही कारण नव्हतं. राणेंच्या चांगुलपणामुळे मी पोलिस निवासात महिला अधिकाऱ्याच्या घरी गेले. त्या एकट्या राहत होत्या. मामा आईला आणायला आमोण्याला गेला.
सब इन्स्पेक्टर राणेंनी सांगितल्या नुसार आप्पा एका रात्रीत बोलता झाला पण त्याला साक्षीदार म्हणून उभं राहण्याची अजिबात हिम्मत नव्हती. पंक्चर केलली बस सुटायच्या अगोदर आमची बँग उतरवली गेली. श्रीपादला त्या रात्री एका खोलीत कोंडलं होतं. श्रीपादनं खूप आरडा ओरड केली आणि तो किशनला आणि आप्पाला आवरेनासा झाला. किशननं त्याला बरीच मारहाण केली आणि त्यात श्रीपाद बेशुद्ध पडला. किशननं त्याचे हात आणि पाय दोरीनं घट्ट बांधले आणि बेशुद्धावस्थेत असलेल्या श्रीपादच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि ते खोली बंद करून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी किशन श्रीपादला ठेवलेल्या खोलीत गेला तेंव्हा त्याला श्रीपाद मृत झालेला मिळाला. बहुतेक गुदमरून मृत्यु झाला असावा. वासू गेडेनं शामरावला गोव्याला पाठवलं आणि श्रीपादचा मृत देह आपल्या डंपर मधून नेऊन सावित्री नदीत टाकला. आप्पाला भीती वाटली की वासू गेंडे आणि किशन मला पण रात्री नदीत फेकतील म्हणून त्यानं मला पळून जायला मदत केली. राणेंनी दिलेल्या माहिती नुसार पोस्टमाँर्टेम रेपोर्ट मध्ये श्रीपादला गुदमरून मृत्यू आला असे नमूद करण्यात आले होते पण त्याच्या अंगावर मारहाणीच्या अथवा गळा दाबल्याच्या काही खुणा शिल्लक नव्हत्या. वासू गेंडेला जामीन मिळाला, एक प्रतिष्टीत व्यक्ती म्हणून. पण त्याच्यावर पोलिस स्टेशनवर दररोज हाजिरी लावायची अट होती. शामरावला पोलिस त्याब्यात ठेवण्याची आठ दिवसांची मुदत होती आणि त्या नंतर तो पण जामिनावर सुटण्याची शक्यता राणेंनी बोलून दाखवली.

मामा आणि आई महाडला पोचले तेंव्हा श्रीपादचा अचेतन देह शवगृहात ठेवण्यात आला होता. आईनं श्रीपाद च्या मृत्युची अभद्र बातमी कशी सहन केली हे पाहायला मी नव्हते पण आई मला भेटली तेंव्हा आम्हाला दुखः अनावर झालं आणि आम्ही मनसोक्त रडलो. मामानं शव ताब्यात घेण्याचे सोपस्कार पूर्ण केले. माझ्या विनंती नुसार राणेंनी चेहरा सोडून सर्व शरीर पांढऱ्या कापडात बांधण्याच्या सूचना हॉस्पिटलला दिल्या होत्या त्यामुळे आईला श्रीपादच्या पर्थिव शरीराचे दर्शन घेता आले. श्रीपादला अग्नी दिला तेंव्हा आमच्या समवेत सब इन्स्पेक्टर राणे, महिला अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि हॉस्पिटल मधील काही कर्मचारी होते. अतिशय दुखःद भावनेनं, नजरेनं आणि जड पावलानी आम्ही दहनभूमी सोडली.

श्रीपादच्या अस्थी घेऊन आम्ही मामाबरोबर मुंबईला जायला निघालो. आप्पा आणि शामराव अजुनही पोलिस कोठडीत होते पण राणेंनी आमचा मुंबईचा आणि आमोण्याचा पत्ता नोंद करून आम्हाला जायची परवानगी दिली. सब इंस्पेक्टर राणेंनी वासू गेंडे, शामराव, किशन आणि आप्पा यांच्यावर किडनॅप, मारहाण करणे, स्त्रीला बंदिस्त करणे, बलात्कार आणि खून वगैरे अनेक कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. आम्हाला केस प्रथम दर्ज्याच्या मँजिस्ट्रेट समोर उभी राहून साक्षीला बोलावे पर्यंत महाडला थांबण्याची गरज नव्हती तसेच श्रीपादच्या मृत्यूचे विधी करायचे होते.

एक गोष्ट माझ्या ध्यानात आली नव्हती पण मामाच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बरंच विचार केल्यावर मामाची चिंता माझ्याच लक्षात आली आणि मी मामाला विचारलं “ मामा, तुला वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची भीती वाटते का? मी समजू शकते तुझी अडचण. चाळीतला प्रोब्लेम टाळण्यासाठी आम्ही तडक आमोण्याला जातो.”
मामा म्हणाला “नाही ग पोरी. मी नाही भीत पण तुझी आई आणि मामी लोकांच्या नजरेला आणि टोमण्यांना कश्या सहन करतील याची मला चिंता आहे.”

मी हॉस्पिटल मधे असल्या पासून वृत्तपत्र वाचायचं पूर्ण पणे टाळलं होतं. वासू गेंडे सारखा श्रीमंत आणि राजकारणी माणूस एक दिवसासाठी सुध्दा पोलीसांनी ताब्यात घेतला ही महाड मधे खूप मोठ्ठी बातमी असणार एवढं माझ्यासारख्या सुशिक्षित मुलीला कळत होतं. पण श्रीपादचा देह सापडल्यावर बातम्यांनी काहूर माजवलं असणार याची खात्री होती. राणेंनी माझ्या सुरक्षिततेचा भाग म्हणून पत्रकारांना मला भेटायला मज्जाव केला होता. हॉस्पिटल मधे पुराव्यासाठी काढलेले माझे फोटो आणि पोलिस फाईल साठी असलेला फोटो सोडून माझे कुठल्याही वृत्तपत्रात नाव सुध्दा येण्याची शक्यता नव्हती इतकी खबरदारी पोलिस घेतात. परंतु श्रीपादच्या मृत्यू नंतर मी कोण हे सहज कोणाच्याही ध्यानात आलं असेल. मुंबईच्या वर्तमान पत्रात एवड्या ठळक पणे नसेल तरीही बातमी असणार हे नक्की होतं. मी मामाला म्हटलं “काही दिवसांचा प्रश्न आहे. नंतर आम्ही गावी जाऊ. लोकांच्या बोलण्याची पर्वा मी करत नाही आणि तू करू नकोस. माझा श्रीपाद का कोणी मला परत आणून देऊ शकेल?”
मुंबईच्या आमच्या या थोडक्या वास्तव्यातच मला महिला आधार आणि सुरक्षा संस्थेच्या विश्वस्त येऊन भेटल्या. मला प्रथम त्यांच्या उद्देशां विषयी संदेह वाटला पण मग संस्थेचा इतिहास, त्यांनी केलेले कार्य आणि इतर महिला कार्यकर्त्यांना भेटल्यावर समाधान वाटले. या संस्थेनं मला शक्ती दिली पण कधीही माझ्या साठी योग्य अयोग्य ठरवलं नाही का पूर्वगृह बाळगला नाही. मला कोर्टात हजर राहण्यापासून वकिलाचा सर्व खर्च या संस्थेनं उचलला पण सर्वात अधिक म्हणजे माझ्याबरोबर कोणी तरी आहे आणि मी या जगात एकटी नाही याची ग्वाही दिली.

आम्ही मुंबईला दोन आठवड्यावर राहिलो नाही. मामानं श्रीपादचं क्रियाकर्म अतिशय थोडक्यात त्रंबकेश्वरला केलं. आईला सतत घरची आठवण होत होती. तिला एकांत सुध्दा हवा होता जो मुंबईला मिळणं अशक्य होतं. तिला फार मोठ्ठं दुखः पचवायचं होतं आणि त्याला खूप काळ लागणार होता. तिची प्रकृती सुध्दा ढासळत चालली होती. मामाला राणेंचा फोन आला की शामराव जामिनावर सुटला. आता फक्त आप्पा तुरुंगात होता.
आम्ही आमोण्याला परत आलो आणि आईचा आजार बळावला. तिला खूप अशक्तपणामुळे झोपून रहावे लागले आणि घराची सर्व कामं मी करू लागले. कॉलेजमध्ये जाणं मी बंद केलं आणि बाहेरूनच पदवीची परीक्षा द्यायचं ठरवलं. सरकारी हॉस्पिटल मधे आईच्या आजारपणाचं निदान व्हायला दोनच दिवस लागले आणि डॉक्टरनी मला बाजूला घेऊन सांगितलं की आईला क्षय झाला आहे आणि खूप काळजी घेतली पाहिजे. माझ्यावर संकटावर संकटं कोसळत होती आणि मग त्यात मला उलट्या सुरु झाल्या.

मला वाटतं की स्त्रीला एक उपजत ज्ञान असतं जेणेकरून तिला आपल्या शरीरातील नैसर्गिक बदल आपोआप कळत असतात आणि कुठल्याही शिकवणीची किंवा पुस्तकी ज्ञानाची तिला गरज भासत नाही. इतर व्यापामुळे आणि मुख्यता आईच्या ढासळलेल्या प्रकृतीमुळे मला स्वताकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नव्हता आणि एकामागून एक विचित्र घटना सुध्दा त्याला कारणीभूत होत्या. पण मला उमगायला वेळ नाही लागला की मी प्रेग्नंट आहे. या शक्यतेची मला कधीही जाणीव झाली नाही याचं कारण मात्र अननुभव. तरीही मी डॉक्टरकडे जाऊन खात्री करून घ्यायचं ठरवलं पण आईला अजिबात सांगितलं नाही.

मला पेडणेकरांच्या फोनवर राणेंचा निरोप आला तेंव्हा मी त्यांना पोस्टातून फोन केला. राणेंनी मला महाडला बोलावलं होतं कारण कोर्टात तारीख लागली होती. महत्वाचं म्हणजे आप्पाला कोर्टात माफीचा साक्षीदार करायच्या अर्जावर त्या दिवशी सुनावणी होती आणि माझी संमती कोर्टासमोर हवी होती. मी राणेंना तेंव्हाच सांगितलं की मी प्रेग्नंट राहिले आहे. राणे म्हणाले की मी डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊन यावं आणि सरकारी वकील ते कोर्टात सादर करतील. राणेंनी माझ्यावर ओढावलेल्या प्रसंगाबद्दल प्रथमच दिलगिरी व्यक्त केली. बहुतेक जे त्यांना एक कणखर पोलिस अधिकारी म्हणून प्रत्यक्षात करता आलं नाही ते त्यांनी फोनवर व्यक्त केलं.

एका स्त्रीच्या आयुष्यात आई होणं ही सर्वात मोठ्ठी गोष्ट आहे. आयुष्यातल्या दुसऱ्या कुठल्याही नैसर्गिक घटनेला आई होण्याइतकी महत्ता येऊ शकत नाही, अगदी मृत्यूला सुध्दा. मला वाटतं की निसर्गानं पुरुषाकडे फक्त बीज पुरवण्याचं कार्य दिलय याच्या पलीकडे त्याला फारसं महत्व नाही. पण पुरुष प्रधान समाजाने हे जाणूनच पुरुषाला सामाजिक महत्व देऊ केलं. समाजाने पुरुषावर अधिक जबाबदारी लादण्याच्या दृष्टी कोनातून उसना मोठेपणा दिला. भविष्यात जशी जशी स्त्री पुरुष प्रधान समाज्याच्या पूर्वापार चालत आलेल्या कृत्रिम जोखडातून मुक्त होऊन सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं स्वतंत्र होईल तसं स्त्री तिच्या प्रजोत्पत्ती साठी बीजाची निवड स्वतः करू लागेल आणि हा पुरुष जातीवर तिचा सर्वात मोठ्ठा विजय असेल.

जेव्हा माझ्या लक्षात आलं की एक कोंब माझ्या पोटात फुटलाय तेंव्हा पासून मातृत्वाची कोमल भावना माझ्या मनात उमटू लागली. माझी स्वतःचीच आई माझं मातृत्वाचं प्रतिक होतं आणि तीचं प्रेम, जिव्हाळा आणि त्याग हीच तिची अव्यक्त शिकवण होती. डॉक्टरांनी मला जेव्हा तपासलं आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव आली तेंव्हा विचारलं “ लग्न नाही नं झालं? काय विचार आहे?“
तेंव्हा मी निःसंदेह उत्तर दिलं “कशाही परिस्थितीनं माझ्या पदरात पडलेलं हे मूल मला हवंय नाहीतर ज्या चुकीच्या दृष्टीतून समाज मला पाहतोय आणि यापुढे पहात राहील त्या आणि या पोटात वाढणाऱ्या निष्पाप जीवाकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीत काय फरक?“

महाडला पोहोचताच मला महिला आधार आणि सुरक्षा संस्थेची कार्यकर्ती भेटली. तिने एका कुटुंबात आमची दोघींची राहायची सोय केली होती. या जगात मला संकटात टाकणारे नराधम भेटण्या पूर्वी चांगले लोक होते आणि माझं जग उलटं पालटं झाल्यावरही जगात चांगुल पणा आहे याची सदोदित खात्री पटवणारी माणसं होती.
मँजिस्ट्रेट कोर्टात गर्दी होती बहुतेक अनेक दावे आणि निकाल असावेत. आमची पाळी येईपर्यंत दुपार झाली आणि सब इन्स्पेक्टर राणेंनी मला मँजिस्ट्रेट पुढे उभं केलं. तेव्हड्यात दोन हवालदार आप्पाला घेऊन आले. त्याचे दोन्ही दंड हवालदारांनी धरले होते. आप्पाची दाढी वाढली होती आणि तरीही तो खूप रोडावला आहे हे कळत होतं. इतक्या थोडया दिवसातच तो अधिक म्हातारा दिसतोय हे मला जाणवलं. त्याच्या नजरेत मला खूप अगतिकता दिसली.
मँजिस्ट्रेटनी आपल्या वाचण्याच्या चष्म्या वरून माझ्या कडे पाहिलं “मिस शोभा दादरकर?” मी हो म्हणाले
“या आप्पा परभ यानं अप्रुव्हर म्हणजे क्षमेचा साक्षीदार होण्याचा अर्ज केला आहे, तुमची संमती आहे?”
मी म्हणाले “हो, माझी संमती आहे.” माझं वाक्य संपे संपे पर्यंत कोर्ट म्हणालं “ ग्रांटेड, इमिडीयट रिलीज” आणि कोर्टानं लाकडी हातोडा आपटला. ताबडतोब त्या दोन हवालदारांनी आप्पाच्या दंडावरील हात चटका लागल्या प्रमाणे काढून घेतले. आप्पा मुक्त झाला होता!.

देवाने मानवाचं हे जग अतिशय क्लिष्ट करून ठेवलं आहे. मी असं वाचलं होतं की फक्त माणसालाच सारासारविवेकबुद्धी देऊन मोकळं सोडलं होतं तेंव्हा पासून मानव न्याय कसा द्यावा यावर संभ्रमित आहे. असंही ज्ञानी लोक म्हणतात की मानवी न्याय निवाड्याच्या वर देवाचे कोर्ट असते आणि तोच शिक्षा देऊन पृथ्वीवर पाठवतो. असं असेल तर मानवानं निवडा करावाच का? सगळंच देवावर सोडावं, नाही का? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं कारण हे मी पूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा असेल का? कोणास ठाऊक. पण श्रीपाद वर झालेल्या अन्यायाची शिक्षा या गेंडे बापलेकांना मी देणारच हा माझा निर्धार होता.

गावी परतले आणि मला माझ्यावरच्या प्रचंड जबाबदारीची जाणीव झाली. आई जवळ जवळ बिछान्याला खिळली होती आणि तिला विश्रांतीची खूप गरज होती. मला तिच्यापुढे माझी परिस्थिती सांगायचा धीर झाला नाही. मी विचार केला की हळू हळू माझ्या कडे पाहूनच तिला कळून चुकेल आणि एकदम बसणारा धक्का टळेल. मी महिला आधार आणि सुरक्षा संस्थेच्या महाडला भेटलेल्या कार्यकर्तीला माझा अपत्याला जन्म देण्याचा विचार सांगीतला होता. घरी परतल्यावर आठवडाभरातच मला संस्थेकडून पत्र आलं त्यात त्यांनी माझ्या निर्णयाचं कौतुक केलं होतं आणि वर्षंभरासाठी माझ्या औषधाच्या खर्चाचे म्हणून दरमहा तीनशे रुपये मंजूर केले होते.

मी माझी दिनचर्या सुरु केली. अभ्यास तर होताच पण सर्व घरकाम आणि आईची काळजी घेणे, तिची औषधे आणणे आणि तिच्यासाठी वेगळा आहार करणे यात माझा वेळ जाऊ लागला. श्रीपादची आठवण मधेच दिवसभरात येत असे आणि लक्षात येई की तो शाळेतून घरी येणार नाही. माझे हुंदके मी दाबून दूर बागेत जात असे आणि मनसोक्त रडून घेई. आई बरंच वेळ शून्यात डोळे लावून निपचित पडलेली असे.
महाडहून येऊन साधारण दहा दिवस झाले असतील, मी दुपारी मराठी पेपर चाळत होते तेंव्हा ती बातमी आतल्या पानाच्या एका कोपऱ्यात दिसली आणि माझ्या छातीचा ठोका चुकला. बातमी एका आप्पा परभचे प्रेत सावित्री नदीत मिळाल्याचे लिहिले होते. पोलीसांनी पोस्ट माँर्टेम नंतर आत्महत्या म्हणून नोंदणी केली होती आणि स्थानिक राजकारणी लोकांनी सब इन्स्पेक्टर राणेंच्या दबावामुळे आप्पा परभ याने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. पेपर एक दिवस जुना होता. मी ताबडतोब पोस्टात गेले आणि महाड पोलिस स्टेशनला फोन लावला. फोन सब इन्स्पेक्टर कदम यांनी घेतला. मी राणेंविषयी विचारलं तेंव्हा कळलं की त्यांना सस्पेंड करण्यात आलं होतं.

पुढच्या काही महिन्यात माझं बाळ वाढत होतं आणि कोर्टाच्या तारखा लांबत होत्या. आईनं माझी अवस्था तिच्या ध्यानात येताच तिच्या अशक्त आवाजात मला खडसावून विचारलं होतं. प्रथम आईला वाटलं की मी आता उतावीळ होऊन कोणाशी तरी मैत्री केली आहे आणि त्याचं हे फळ आहे. पण मग तिला सत्य कळता ती अगतिक आणि हताश झाली. मला वाटतं तिचं परिस्थितीशी झगडण्याचं बळ आणि प्रतिकार शक्ती संपुष्टात आले होते.

माझं कोर्टात जाणं आता जवळ जवळ बंद झालं होतं. साक्षी झाल्या होत्या आणि कितीतरी खोटे साक्षीदार वासू गेंडेनं उभे केले होते. माझ्या चारित्र्याच्या चिंधड्या केल्या आणि संमतीने आणि सहकार्याने संभोग दाखवण्याचा प्रयास केला गेला. श्रीपादचा मृत्यू एका पळून गेलेल्या शाळकरी मुलाचा अपघात दाखवण्यात त्यांना यश आले. एकुलता एक खरा साक्षीदार आप्पा मरण पावला होता किंवा त्याला मारण्यात आलं होतं. मला माणसांच्या न्यायदेवतेचा न्याय मिळणार नव्हता हे स्पष्ट होतं आणि तसंच झालं.

महिला आधार आणि सुरक्षा संस्थेनं मला उच्च न्यायालयात अपील करायला मदत आणि आर्थिक सहाय्य देऊ केलं पण मी ते नाकारलं. त्यांना मी सांगितलं की योग्य वेळी मी येईन तेंव्हा मला मदत द्या. आता मला माझ्या होणाऱ्या बाळाकडे जास्त लक्ष द्यायला हवं.

आईला अजुनही आराम पडत नव्हता. तुम्हीच सांगा कसा पडेल? तिच्या मनाला सुख किंवा शांती नव्हती. ती आता माझ्या काळजीनं ग्रासली होती. माझ्या बाळंतपणाला मामीला वयोपरत्वे आमोण्याला येणं कठीण होतं. तिला आईची देखभाल आणि माझं बाळंतपण दोन्ही शक्य नव्हतं आणि ते सुध्दा आमोण्याच्या घरी जिथं वावरायची तिला सवय नव्हती. मामानं सुचवलं की आईला जयसिंगपूरला सँनिटोरिअम मधे ठेवायचं आणि मी मुंबईला मामाकडे डिलीवरीला जायचं. मामा आमोण्याला आला आणि आम्ही भाड्याची गाडी करून निघालो. आम्हाला कल्पना नव्हती की आमच्या घराचं शेवटचं दर्शन आम्ही घेत आहोत. जयसिंगपूरला आईला ठेऊन आम्ही मुंबईला आलो.
मामा आणि मामीला मुलबाळ नव्हतं. येणाऱ्या बाळाच्या चाहुलीने मामा आणि मामी खुश होऊन गेले. त्यांचा उत्साह दिवसेदिवस वाढत गेला आणि क्षणभर आमच्या कुटुंबावर कोसळलेल्या असंख्य विपत्ती आम्ही घरात येणाऱ्या चैतन्यानं विसरून गेलो. या मुदतीत महिला आधार आणि सुरक्षा संस्थेच्या कार्यकर्त्या मला भेटायला येत आणि माझी अनेक जणींशी मैत्री झाली.

माझं बाळ सहजी जगात यायला तयार नव्हतं. बराच वेळ वाट पाहून डॉक्टरांनी सी सेक्शन करायचा निर्णय घेतला आणि मी सूईनं टोचलेल्या सुखद निद्रेच्या स्वाधीन झाले. मला स्वप्न पडलं त्यात श्रीपाद मला ताई ताई म्हणून हाक मारत होता आणि मी अंगणभर त्याच्या पाठी पळत होते. नंतर श्रीपाद घरात शिरून गायब झाला. मला पोटातल्या कळेनं जाग आली तेंव्हा मामी शेजारी दिसली. तिचा चेहेरा हसमुख होता. मी कण्हत म्हणाले “कूठं आहे?” मामीनं पाळण्यातून उचलून बाळाला माझ्या जवळ ठेवलं आणि म्हणाली “ शोभे, तुला मुलगा झालाय.” मी बाळाच्या चेहेऱ्याकडे पाहिलं आणि हळुवार हाक मारली “श्री ....” डँबिस डोळे मिटून अंगठा चोखत झोपला होता.

मी जवळ जवळ महिना बिछान्यावर होते म्हणजे मला मामीनं उठू दिलं नाही. खूप लाड केले, माझें आणि श्रीचे सुध्दा. श्रीला तेल चोळून गरम पाण्याची अंघोळ घालायला मामीला अतिशय आवडायचं आणि तो चोरटा सुध्दा कसा आनंदानं लाड करून घेई. मामानं मला बजावलं की आता गावी जाणे नाही आणि आम्ही मामाकडेच राहायचं. मामा मामीला माझी आणि श्री ची खूप सवय झाली होती. मामानं गावाला जाऊन घर विकून टाकलं. मधल्या काळात तो अनेकदा जयसिंगपूरला जाऊन आईला भेटून आला पण आईला सहा महिने किंवा वर्षभर सुध्दा तेथे राहायला लागणार होतं. श्री आता बाहेरचं दूध पिऊ लागला होता. मी मामाला म्हटलं की आईला भेटून येते. तिला श्रीचे फोटो दाखवीन म्हणते. मामाने माझ्या बरोबर यायची तयारी दाखवली पण मीच नाही म्हटलं. “मामा, अरे किती दगदग करशील, वय झालं तुझं. आणि मी श्रीला ठेऊन जाते तेंव्हा मामीला मदत लागेल. तू घरी असणं बरं.”

माझा मनाचा निश्चय पक्का झाला होता. मी प्रथम महिला आधार आणि सुरक्षा संस्थेच्या कार्यालयात गेले आणि विश्वस्तांना भेटले. त्यांना माझ्यासाठी वकील पाहण्याची विनंती केली. त्यांना वाटलं की मी उच्च न्यायालयात अपील करत आहे. त्यांना आणखी एक विनंती केली की मला आईची देखभाल करायला दोन आठवड्याहून अधिक उशीर झाला तर मामा आणि मामीना मदत करा. घरी येताना एक सुंदर बँग आणि माझ्या साठी जीन्स व टाँप्स घेतले, लाल रंगाची लिपस्टिक आणि रूज पण खरेदी केले. वाटेत वेगवेगळया रंगाची कानातली आणि गळ्यातली ज्याला खोटे दागिने म्हणता येईल ते पण घेतले. कपडे वाळत घालतात तशी नायलॉन दोरीचा गुंडाळा आणि धारधार चाकू सुध्दा.

मी आईला दाखवायला श्रीचे फोटो बरोबर घेतले आणि जयसिंगपूरला जायला ट्रेन मधे चढले. श्री पासून दूर जाताना परत मला रडू फुटलं. त्या बाळाला काही कळत नव्हतं पण आईचा स्पर्श कळत होता. जयसिंगपूरला पोचेपर्यंत श्री ची आठवण येत होती. आता एका श्रीची दुसऱ्या श्रीनं जागा घेतली होती पण अजून श्रीपादला न्याय मिळवून द्यायचा होता. आईची तब्येत मला फारच खालावली असं दिसलं. आम्हा पासून दूर एका हॉस्पिटल मधे दिवस काढणं तिला फार कठीण जात होतं हे मला दिसत होतं पण आता थोडया दिवसांचा प्रश्न होता असं मला वाटलं. माझं काम झालं कि मी आईला मुंबईला घेऊन जायचं ठरवलं. आईला श्री चे फोटो पाहून खूप आनंद झाला. ती म्हणाली “ शोभा, तुझं बाळ अगदी श्रीपाद सारखं दिसतंय, जणू श्रीपादनं तुझ्या पोटी जन्म घेतलाय.” मला आईच्या बोलण्यानं धन्य वाटलं. आईचा निरोप घेताना मन विषण्ण झालं.

मी जयसिंगपूरहून महाबळेश्वरची बस घेतली. तीन तासांचा प्रवास होता. महाबळेश्वरला एका छोटया हॉटेल मधे रूम मिळाली. माझी बँग एका जुन्या बागेत घालून मी प्रवास करत होते. मी जयसिंगपूरला आईच्या नावावर झोपेच्या गोळ्यांची बाटली घेतली होती. आता फक्त अँसिडची बाटली घ्यायची होती. दुकान दारानं विचारलं “कशाला पाहिजे ताई?” मी म्हणाले “ आंघोळ करायला!” दुकानदार ओशाळला ” तसं नाही हो पण जालीम असतंय म्हणून म्हटलं.“ मी त्याच्याच सुरात म्हणाले “ दादा, यानं बाथरूम धुतली जाईल काहो, का आणखी जालीम अँसिड हवंय?” दुकानदार बोलला “ ताई, पाणी घालून वापरा नाहीतर फरशीला भोकं पडतील.” मी अँसिडची बाटली काळजी पूर्वक ठेवली.

मी महाबळेश्वरच्या पारशी लेडीज ब्युटी पार्लर मधून बाहेर पडले तेंव्हा माझा गोरा चेहेरा एखाद्या पारशीणी सारखा दिसत होतां नी केस एखाद्या गोवेकरीण ख्रिश्चन मुली सारखे. माझ्या होटेल मधे शिरले तेंव्हा होटेलचा पारशी मालक गोंधळून गेला. त्याला मी म्हटलं “ सर, मेरेको सातारा जानेके लिये टँक्सी मांगता है.” मी माझी बँग आणायला खोलीत गेले. माझी नवी बँग काढली आणि जुनी रिकामी बँग दुसऱ्याच एका खोली समोर ठेऊन मी खाली उतरले. टँक्सीत बसले आणि ड्रायव्हरला म्हणाले “ महाड चलो “ तो माझ्याकडे पहात राहिला आणि उदगारला “सातारा नही जाना?” मी विचारलं “कोणी सांगितलं?” तो म्हणाला “होटेल मालकानं” मी हसून म्हणाले “ बावा कुठचा “ ड्रायव्हर बोलला “ मँडम, परतीका भाडा?” मी त्याला हसून म्हणाले, “मिल जायेगा“. आम्हाला फार तर दीड तास लागणार होता. मी वाटेत गाडी एका चांगल्या होटेल पाशी थांबवली आणि माझा ड्रेस बदलून जीन्स आणि टाँप्स घातले. आता मी स्वतालाही ओळखू शकत नव्हते.

मी महाड बस स्थानकावर टँक्सी सोडून दिली आणि काही वेळ रेंगाळल्यावर ऑटो घेऊन मी त्या भयानक गेस्ट हाउस वर पोचले. संध्याकाळचे सहा साडे सहा वाजले असावेत. हॉटेलच्या गल्ल्यावर कोणी नव्हतं आणि होटेलमधे साफ सफाई चालली होती. मी विचारलं “मालक कुठेत?”
हॉटेलच्या पोऱ्यानं सांगितलं “ सात, साडे सातला येतील. काय पायजे.“
मी म्हणाले “ रूम पाहिजे“
पोऱ्यानं मला त्याच जिन्या वरून नेलं जिथून माझा भीषण प्रवास सुरु झाला जो आजतागायत संपला नव्हता.
पोऱ्यानं मला रूम उघडून दिली आणि म्हणाला “ मालक आल्यावर खाली बोलावतो रजिस्टर लिहायला.”
मी ठीक आहे म्हणून त्याला दोन रुपये दिले आणि खोलीत प्रवेश केला.
जवळ जवळ एक वर्षांनी मी त्या गेस्ट हाउस मधे परत तशाच दिसणाऱ्या घाणेरड्या खोलीत पोचले होते पण आज मी अगतिक नव्हते तर पूर्ण तयारी निशी आले होते. दार लाऊन मी माझी बँग उघडली आणि खोटी आभूषणं घालायला सुरुवात केली. तोंडाला रूज फासून आणि लिपस्टिक लाऊन मी आरशात स्वताला अजिबात ओळखू शकले नाही एवढा माझ्यात बदल झाला होता. मी लाकडाची खुर्ची बाथरूम मधे नेऊन तिचा एक पाय आपटून उखडला आणि माझं हत्यार तयार केलं. नायलॉनच्या दोरीचे योग्य आकाराचे तुकडे केले. माझी जय्यत तयारी झाली होती. झोपेच्या गोळ्यांची बाटली उघडून त्यातून चार पाच गोळ्या काढल्या आणि टेबलावर ग्लासने त्याची पूड केली आणि कागदाच्या पुडीत बांधली. एवढ्यात दारावर थाप पडली. मी विचारलं “कौन है “ उत्तर आलं “मी विजय, मालक आलेत.” मी विचारलं “ कौन मालक “
विजयनं उत्तर दिलं “शामराव साहेब, छोटे मालक“ मी म्हणाले “ ठीक है. आती हुं”

मी शांत पणे जिना उतरले. शामरावचं लक्ष जिन्यावर असावं पण आपण पहात नाही असं त्यानं दाखवलं.
मी गल्ल्यावर जाऊन म्हणाले “ मँनेजर, किधर है रजिस्टर?” त्याला पहिला झटका मिळाला “आय, ओनर, नॉट मँनेजर” मी म्हणाले “ माफ करना. मुझे मालूम नही. इधर ठंडा बिअर मिलेगा?”
आता शामराव खुलला, त्याला माझा परफ्यूम चाळवत होता ‘ हां, मिलेगा. कितना?”
मी आगीत तेल घातलं “क्या करू, मेरा फोटोग्राफी का क्रू गोवा से कल आयेगा तब तक अकेला पीना पडेगा.” मी रजिस्टर मधे लिली मिरांडा असं नाव लिहून सही करत बोलले. “दो बोतल ठीक है “
माझं सारं संभाषण हिंदीत चाललं होतं कारण मला माझा डाव शामरावला संशय नं येऊ देता साधायचा होता.”
शामराव आता उतावळा होत होता आणि त्यानं लाज सोडली “ मी स्वतः आणतो तीन बॉटल. एक मी पण घेईन तुझ्या बरोबर लिली, ऑन द हाऊज “ त्यानं आपला सोन्याचा दात दाखवला
मी म्हणाले “ थँक यू. पण मी लवकर झोपणार आहे हां. आणि स्वच्छ ग्लास पायजे. रूम मधे खराब आहे.” “अँन्ड व्हॉट इज युअर नेम, ओनर?” मी खिदळले
“आय शामराव.” त्यानं आपलं गचाळ आडनाव गाळलं
“इन सबको बताना नही तुम मेरे साथ हो “ मी चोरून त्याच्याकडे पाहिलं
“नो नो नो. मी बाहेर जाणार आणि मागच्या डोर नी आत येणार. कोणाला माहित नाही पडणार” शामराव ला आता उकळ्या फुटत होत्या.
शामरावला बराच वेळ लागला यायला. मला शंका यायला लागली होती की तो येतो का नाही त्याची. त्याच्या हातात पिशवी होती आणि त्यानं चार बीअरच्या बाटल्या, ग्लासेस आणि पोटँटो वेफर काढून टेबलवर मांडले. मी ग्लास भरायला सुरुवात केली. खूप फेस येऊ लागला तेव्हा त्यानं माझ्या हातून बाटली काढून घेतली आणि स्वतः भरायला लागला. मला ग्लास तोंडाला लावायची सुद्धा शिसारी आली पण नाटक चालू ठेवणं महत्वाचं होतं. सावज जाळ्यात अडकलं होतं. मी शामरावला खोलीचं दार बंद करायला सांगितलं. शामरावनं चक्क एक झोकांडी खाल्ली. तो बहुतेक आधीच पिऊन आला होता. मी संधी साधून कागदाची संपूर्ण पुडी त्याच्या ग्लास मध्ये रिकामी केली आणि माझा ग्लास घेऊन मी पलंगावर बसले. त्यानं ग्लास एका दमात संपवला आणि दुसरा ग्लास भरून तो पलंगाच्या दुसऱ्या टोकावर जाऊन बसला. मी त्याला विचारलं “ तुझा फादर काय करतो?”
शामराव म्हणाला “ फादर बिग मँन. नेक्स्ट ईयर झेड पी इलेक्शन.”
त्याची जीभ जड होऊ लागली होती आणि मान खांद्यावर पडत होती. मला फार वेळ वाट पहावी लागली नाही. शामराव पलंगावर कलंडला.
मी वेळ अजिबात दवडला नाही. शामरावला बाथरूम मध्ये ओढत नेला आणि पाठ भिंतीला टेकवून बसवला त्याचे हात पुढे घेऊन नायलॉनच्या दोरीनं करकचून बांधले. त्याच्या पायाच्या मधे प्लास्टीकची पाण्याची बादली ठेवली आणि बांधलेले हात बादलीत सोडले. आता त्याचे पाय जे बादलीला कवटाळत होते, दोरीनं जखडून टाकले. रूमचा दिवा बंद करून, हातात चाकू घेऊन मी बाथरूम मध्ये आले आणि शावर सुरु केला. थंड पाण्यानं शामरावचं शरीर शहारलं. मी त्याला खांदे हलवून उठवला. “ शामराव, माझ्याकडे पहा. मी शोभा दादरकर. तुझी लग्न नं झालेली बायको. आणि हा पहा तुझ्या मुलाचा फोटो. दिसतो नं माझ्या भावा सारखा? का विसरलास एका वर्षात?”
शामरावनं कष्टाने डोळे उघडले. त्याला आता लक्षात आलं होतं काय घडतंय ते. मी त्याच्या मनगटावरची नस चाकुनं टवकारली. भरलेल्या पाण्याच्या बादलीत रक्त हळू हळू वलयं घेऊ लागलं. त्यानं रक्ताकडे पाहिलं आणि त्याच्या चेहेऱ्यावर भीतीचं सावट आलं. अजूनही त्याच्यावर दारूचा आणि झोपेच्या गोळ्यांचा पगडा होता पण तो फक्त त्याच्या अवयवांच्या कार्यशक्तीवर. पण त्याच्या मनाला पूर्ण पणे कळून चुकलं होतं की तो मरतो आहे. हळू हळू त्याच्या नजरेत भीतीच्या जागी अगतिकता आली आणि त्याचे डोळे खिन्न दिसू लागले . मला जाणवलं की श्रीपादची अवस्था त्या भयाण रात्री अंधाऱ्या खोलीत कशी झाली असेल आणि त्याचे डोळे प्राण जाताना एखाद्या विझत जाणाऱ्या दिव्या सारखे कसे निर्जीव होत गेले असतील. शामराव परत ग्लानीत गेला.
मी खोलीचं दार लॉक करून खाली हॉटेल मधे गेले. तिथं गल्ल्यावर कोणी नव्हतं. मी हातानं रजिस्टर खाली पाडलं आणि उचलताना त्याचं पान फाडलं ज्यावर मी खोटं नाव लिहिलं होतं. एव्हड्यात तिथला वेटर आला. मी म्हणाले “मालक कुठे आहेत?”
वेटर म्हणाला “छोटे मालक आता उद्या येणार. काय हवाय तुम्हाला?”
मी म्हणाले “मोठ्ठ्या मालकांचा फोन नंबर देणार होते ते. उद्या त्यांची मुलाखत घेणार पेपरात छापायला.”
वेटरनं भिंतीवर लावलेल्या लिस्ट मधून एक नंबर सांगितला तो मी फाडलेल्या रजिस्टरच्या पानावर लिहून घेतला आणि जिना चढून वर आले. येताना एका दुसऱ्या खोली समोर ठेवलेली खुर्ची मी ओढत आत आणली. खोलीत येऊन मी दार बंद केलं. बाथरूम मध्ये जाऊन पाहिलं तर बादलीतील पाणी लाल झालं होतं. शामरावचा श्वास आता मंद झाला होता.
मी खोलीतल्या फोन वरून नंबर फिरवला. पलीकडून आवाज आला “ कोण ?”
मी वासू गेंडे चा आवाज विसरले नव्हते. मी म्हणाले “ मिस्टर गेंडे सर?”
वासू गेंडे बोलला “ हो मीच बोलतोय “
मी म्हणाले “ सर, मी आताच तुमच्या गेस्ट हाउस मधे पोचले. साताऱ्याला दैनिक हेराल्ड साठी मिनिस्टर साहेबांची मुलाखत घेऊन त्यांच्या खास सांगण्यानुसार मी तुम्हाला भेटायला आले. तुमची पंधरा मिनिटाची मुलाखत आणि माझ्या कँमेरावर तुमचा फोटो घ्यायचा आहे. उद्या मिनिस्टर साहेबांबरोबरच छापून येईल. माझे सहकारी तासाभरात मला घ्यायला येतील आणि मी परत साताऱ्याला निघाले. तुम्ही येऊ शकाल का?”
क्षणभर शांतता पसरली आणि मला तो क्षण एका तासाहून अधिक वाटला. बहुतेक वासू गेंडेला माझं बोलणं खरं वाटेना. पण गेंडेला शंका दाखवून संधी पण घालवायची नव्हती. गेंडे म्हणाला “ असं? मिनिस्टर साहेब म्हणाले?” मी बोलले “हो पण का बोलले ते माहित नाही. मागच्या वर्षी तुम्हाला कसलं तरी तिकीट नाकारून अन्याय झाला म्हणाले. बहुतेक या वर्षी ते झेड पी चं द्यायचं म्हणत होते.”
आता वासू गिंडे पुरता फसला. तो म्हणाला “ मँडम, मी पंदरा मिनटात आलो.” त्यानं फोन ठेवला.

मी जिना उतरून परत खाली गेले आणि त्या वेटरला खुण करून बोलावलं. “ हे पहा ब्रदर” मी प्रेमानं हाक मारली, “मी मोठ्ठ्या मालकांला फोन केला तेंव्हा ते रागावले. म्हणाले कोणी नंबर दिला. तुमचं नाव नं सांगता मी माझ्याकडे होता म्हणून सांगितलं. मोठ्ठे साहेब आज माझ्या रूम मध्ये राहणार आहेत. मी त्यांची मुलाखत पण घेणार आहे. पण तुम्ही जर डिस्टर्ब केलत तर ते अतिशय रागावतील. ते आल्या आल्या जास्त नं बोलता माझ्या खोलीत पाठवा आणि सकाळ पर्यंत दार सुद्धा ठोठावू नका. आता एक बिअर बाटली द्या बघू. उद्या हिशोब करेन.”
वेटर अवाक होऊन माझ्याकडे पाहत राहिला आणि नंतर त्यानं आरोळी ठोकली “मोठ्ठे मालक येताहेत रे, पटापट कामाला लागा “

काम अतिशय सोपं होतं. माझ्या हातात कपडयात गुंडाळलेली लाकडाची गदा होती. मी दरवाज्या उघडला तेंव्हा माझ्या कडे पाहून वासू गेंडेचा चेहेरा प्रफुल्लित झाला. मी त्याला खुर्ची वर बसायची विंनती केली आणि खोलीचं दार लावलं. खुर्ची दाराला पाठ करून आणि पलंगा समोर ठेवली होती, जसं काही मी पलंगावर बसणार होते. वासू गेंडे खुर्चीवर बसतो नं बसतो तोवर त्याच्या डोक्यावर मी माझी गदा हाणली. वासू खुर्चीतून कोसळला. त्या गलेलट्ठ माणसाला परत खुर्चीवर बसवे पर्यंत माझी दमछाक झाली. वासूला हात पाय बांधून मी खुर्चीला पण बांधलं.

मी साऱ्या बिअर च्या बाटल्या उघडल्या आणि एक एक करून वासूच्या डोक्यावर ओतल्या. वासूला आता जाग येऊ लागली होती. मी बाथरूमचं दार उघडलं. समोर शामराव बादलीत हात बुडवून बसला होता. वासू कण्हू लागला होता. मी त्याच्या तोंडातून नायलॉनची दोरी घालून घट्ट बांधली. वासूचे डोळे उघडले. प्रथम त्याच्या समोरच्या दृश्याचं त्याला आकलन होईना पण जेंव्हा झालं तेंव्हा त्यानं घशातून अत्यंत आर्द्र स्वर काढला. मला खात्री झाली की माझ्या आईला आणि मला श्रीपादच्या मृत्यूची बातमी एकून जे दुखः झालं तसंच वासूला झालं असणार. मी आणखी त्यानं आवाज करू नये म्हणून तोंडात कापड घातलं. मी म्हणाले “हे पहा नराधमा. मी तुला मारणार नाही पण जे दृश्य तू आता पाहिलं आहेस तेचं सदैव तुझ्या नजरे समोर असेल आणि त्यातच तू खाक होशील.”
मी अँसिड ची बाटली काढली आणि काळजी पूर्वक त्याच्या उजव्या उघड्या डोळ्यात ओतली. वासूनं अंगाला मोठ्ठा झटका दिला. त्याला असह्य वेदना होत असणार हे उघड होतं. तो माझ्याकडे बघून एका डोळ्यानं दयेची भीक मागत होता, एवढ्यात त्याच्या दुसऱ्या डोळ्याची ज्योत मालवली आणि वासू बेशुद्ध झाला.
मी शिस्त बद्ध पद्धतीनं माझ्या हाताचे ठसे पुसून टाकले. ग्लास, बाटल्या, बादली खुर्ची टेबल आणि जिथं शक्य आहे तिथं मी पुसून काढलं. माझी बँग घेतली, खोलीला कुलूप घातलं आणि ज्या वाटेनं मी मागल्या वर्षी गेले होते त्याचं वाटेनं मी बस स्टँड वर पोहोचले. माझा पेहेराव पूर्ण बदलला होता आणि मी एक साधी मागे केस घट्ट बांधलेली मुलगी दिसत होते. मी साताऱ्याची बस घेतली आणि महाडला राम राम ठोकला.

जयसिंगपूरला आईचं दर्शन घेऊन मी मुंबईला परतले. महिला आधार आणि सुरक्षा संस्थेनं एक तरुण पण हुशार वकील शोधला होता. मी त्याला एकांतात भेटले आणि सर्व हकीकत सांगितली. तो पंधरा मिनिटं नुसतच माझ्याकडे बघत राहिला आणि मग त्याच्या तोंडून शब्द आले, “ मी तुमची केस घेतली.”

पोलिसांनी माझ्या घराचा दरवाजा चार दिवसांनी ठोठावला पण वकील तयार होता. एक दिवसात जामिनावर बेल मिळाला. केस दोन वर्ष चालली आणि मला खंबीर पुराव्यां अभावी सात वर्षांची शिक्षा झाली. त्यातली तीन वर्ष पूर्ण झाली आहेत आणि दोन वर्षात सुटका होईल. म्हणजे शिक्षा कमी होऊन.
अशी माझी गोष्ट आहे. आईचा देहांत झाला एक वर्षा अगोदर. श्री आता पाच वर्षांचा आहे. भेटायचं आहे तुम्हाला? इथंच बाल संगोपन आणि विकास केंद्रात असतो. आम्हाला म्हणजे कैद्यांना फक्त रविवारीच मुलांना भेटायची परवानगी आहे. आम्ही दिवसभर एकत्र असतो. संद्याकाळी जाताना श्री ला खूप वाईट वाटतं पण मी त्याच्या डोळ्यात बघायचं टाळते कारण त्याच्या डोळ्यात मला अगतिकता दिसते जशी शामरावच्या डोळ्यात मरताना दिसली!

-------------********------------********------------*********---------********------------*********----

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा वाचताना "एक हसीना थी" मधली ऊर्मिला मार्तोंडकर डोळ्यासमोर आली....जबरदस्त लेखन कर्णिकसाहेब...आई भवानी तुम्हाला नेहमी अशा जबरदस्त लेखनाची उर्मी देत राहो हीच प्रार्थना...

छान, पण एखद्या विशीतील स्त्रीला इतकं धैर्य असु शकतं हेच पटत नाही. खरं तर असणं आवश्यक आहे!

जबरदस्त कर्णिक साहेब........कथा आवडली.....
अप्रतिम लेखनशैली!!!!!

जबर्दस्त कथा आणि शैली.
मला वाटते जेव्हा एखद्या तरूणीवर तस्सच भयानक प्रसन्ग आला तर तिला तसच
भयानक रितीने बदला घेण्याच धैर्य येत असाव.

जबर्दस्त कथा आणि शैली.
मला वाटते जेव्हा एखद्या तरूणीवर तस्सच भयानक प्रसन्ग आला तर तिला तसच
भयानक रितीने बदला घेण्याच धैर्य येत असाव.

Pages