शून्य प्रहर- दोन बातम्या...

Submitted by झुलेलाल on 8 March, 2013 - 04:01

दोन बातम्या...

एखादा दिवस निवांत असतो. ठरवलेलंही काहीच नसतं. मग वेळ रेंगाळत राहतो, आणि कंटाळवाणेपण येतं..
हा प्रत्येकाचाच अनुभव असतो. असं कंटाळवाणेपण घालवण्यासाठी प्रत्येकजण आपलीआपली युक्ती शोधतं. अशाच एका कंटाळवाण्या वेळात एकदा कॉम्प्युटरवर निरपेक्ष धांडोळा घेताना, मी मेलबॉक्स उघडला. बरेच मेल डिलीट करायचेच राहून गेलेले. रिकामपण असलं, की असा भरगच्च मेलबॉक्स उघडून जुने मेल वाचायला मजा येते, हे मला जाणवलं. पूर्वी आमच्या घरी एक हुकाच्या आकाराची तार होती. त्याला खाली एक लाल, लाकडी चकती होती. त्यामध्ये जुनी पत्रं लटकलेली असायची. वेळ जाईनासा झाला, की मी ती जुनी पत्रं पुन्हापुन्हा वाचायचो. प्रत्येक वेळी काही ना काही खजिना हाती आल्याचा आनंद व्हायचाच. प्रत्येक पत्रातला माणूस, आपल्याशी पुन्हा बोलतोय, असा जिवंत भास व्हायचा. पुढे ती तार गेली.
.. आता इंटरनेटची सवय वाढल्यावर, पत्रांच्या त्या तारेऐवजी, मेलबॉक्स उघडायला आवडू लागलं. अनुभव मात्र, तोच. जुनाच!
त्या दिवशी अशाच अनुभवाच्या अपेक्षेने मी मेलबॉक्स उघडला. एकदम मागे गेलो, आणि एका जुन्या ई-मेलवर क्लिक केलं. एक लिंक समोर आली. मी त्या लिंकवर क्लिक केलं, आणि एक पान उघडलं गेलं. एक बातमी होती. जुनी.. साठवलेली. मग आठवलं, आपणच ती जपून ठेवली होती. कधीतरी, कशाच्या तरी संदर्भात वापरता येईल म्हणून..
आज ती बातमी समोर उघडली, आणि आजच वाचलेली एक ताजी बातमी लगेचच समोर पुन्हा उभी राहिली. दोन्ही बातम्यांचा एकमेकांशी खरं तर काहीच संबंध नव्हता.
.. असं काही झालं, की रिकामपणामुळे शिणलेलं डोकंदेखील नव्या कामाला लागतं.
ती जुनी बातमी एव्हाना मी पुन्हा वाचून काढली होती. गुजरातमधली बातमी होती. ऑगस्ट २०११ मधली. मेहसाणा जिल्ह्यच्या वडगाम नावाच्या गावात, एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानं आत्महत्या केली होती. खरं तर आत्महत्या, बलात्काराच्या घटना जवळपास रोजच घडत असतात. पण ही बातमी वेगळी होती. मरणाचा, मरणानंतर काय असतं, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या कुतूहलातून त्यानं आत्महत्या केली होती. ही माझी आत्महत्या नाही, तर मरण समजून घेण्याचा आणि त्याच्या अनुभवाचा शोध आहे, असं त्या प्राचार्यानं मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. त्याच्या त्या मृत्यूपूर्व नोंदीचा पूर्ण तपशील त्या बातमीत होता. पण मला तो पुन्हा वाचवेना. मी बातमी बंद केली.
उदासउदास झालं. असा अनुभवही कधीकधी प्रत्येकालाच येत असतो. डोक्यात भणभणणारी ती बातमी झटकण्याचा मी प्रयत्न करू लागलो.
.. आणि अचानक ती, ताजीताजी वाचलेली बातमी आठवली. मग शिणवटा गेला.
मरणाला कवटाळणाऱ्या त्या माणसाचं जगणंही कदाचित उदास असेल. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नच त्यानं कधी केला नसेल. कदाचित, बाहेर पडण्याच्या वाटा शोधण्याची त्याची इच्छादेखील नसेल. तसं असतं, तर मरणामागचं गूढ शोधण्याऐवजी, जगण्यातला आनंद शोधण्यात त्यानं आयुष्य वेचलं असतं. त्या शोधात त्याला कदाचित, उणंपुरं आयुष्यही कमी वाटलं असतं..
..त्या दुसऱ्या बातमीमुळे हा विचार माझ्या मनात आला. ती दुसरी बातमी अमेरिकेतली होती.
अमेरिकेतल्या ओहियोत रेबा विलियम्स नावाच्या एका वृद्धेनं, ८७ वर्षांंपूर्वी अर्धवट राहिलेलं शालेय शिक्षण तिनं १०६ व्या वर्षी पूर्ण केलं होतं. शाळा सुटल्यानंतर पुढे तिचं लग्न झालं, मुलंबाळं झाली, आणि त्यांचा छोटासा कौटुंबिक व्यवसायही बहरला. मग आपलं राहून गेलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा तिला ध्यास लागला. तिनं त्याचा पिच्छा पुरवला, आणि ओहियोच्या स्कूल बोर्डानं अलीकडेच तिला शिक्षण पूर्ण केल्याचा दाखला दिला..
.. अति वृद्धत्वामुळे अंथरुणाला खिळलेल्या त्या वृद्धेच्या डोळ्यात ही बातमी ऐकल्यानंतर जी चमक उमटली असेल, त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, हे मला जाणवलं. त्या ध्यासापोटी तिनं आपलं वृद्ध आयुष्य पणाला लावलं होतं. त्यासाठीच जणू ती जगली असेल. त्या जगण्यातच तिनं आपला आनंद शोधला असेल. शारीरिक वृद्धत्वातही तिचं मन मात्र, उमेदीनं भारलेलंच असेल.
गुजरातेतल्या त्या प्राचार्याच्या मरणाच्या शोधाची बातमी वाचल्यानंतर बरोब्बर एक वर्षांनंतर वाचलेली आणखी एक बातमी मला आठवली. १०६ वर्षांंच्या रेबाच्या बातमीत त्या बातमीचेच प्रतिबिंब आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये, ओहियोमधीलच अ‍ॅन कोलगिओव्हनी नावाच्या ९७ वर्षांंच्या वृद्धेनं आपलं पदवीचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच दिवशी तिचा नातूदेखील पदवी घेऊन बाहेर पडला होता. शिकण्याच्या वयातच, मंदीचा विळखा पडला आणि अ‍ॅनला वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी शिक्षण अध्र्यावरच सोडून द्यावं लागलं. पदवीदान समारंभातून बाहेर पडताना अ‍ॅनच्या थकलेल्या डोळ्यातून तिच्या सुरकुतलेल्या गालांवर अश्रू ओघळत होते, पण ती रडत नव्हती. ‘येस.. आय अ‍ॅम ग्रॅज्युएट नाऊ’ असं म्हणत तिनं डोळे पुसले, आणि नातवासोबत थरथरती पावलं पुढे टाकत ती पदवीदान सभागृहातून बाहेर पडली, तेव्हा सभागृहातील साऱ्या नजरा वृद्धत्वानं वाकलेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात आदरानं झुकल्या होत्या..
.. ऐन उमेदीत मरणाचा अनुभव शोधणं, आणि मरणाच्या उंबरठय़ावर असतानाही, उमेदीनं जगण्यातला आनंद शोधणं, यातलं अंतर या बातम्यांनी दाखवून दिलं होतं.
अशा वेळी, कितीही रिकामा वेळ असला, तरी तो पुरेनासा होतो, हेच खरं!

http://www.lokprabha.com/20130315/shunya-prahar.htm

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

लेख आवडला, पण मला स्वतःला प्राचार्यांचा दृष्टीकोनही पटला. त्यांचे आयुष्य खडतरच असेल, असे कशावरुन ? केवळ अनुभवासाठी पण त्यांनी मरण जवळ केले असेल.