वांग्याची भाजी, खरडा, भाकरी : एक हिट्ट मेनू

Submitted by अमेय२८०८०७ on 3 March, 2013 - 08:58

अंड्यातला 'अ' जरी काढला तरी हाहाकार उडेल, मेरूमंडळ ढळेल आणि एकंदरीत मायन लोक जिची आतुरतेने वाट पहायचे ती जगबुडी साक्षात येईल असे घरचे पारंपारिक वातावरण होते. 'अ' 'आ' मध्येच इतका प्रॉब्लेम असल्याने 'च' चिकनचा, 'म' मटणातला वगैरे तर फारच दूरचे दिवे. बाबा - काका यांची पिढी बाहेर 'चोरून' खायला शिकली होती पण आजीच्या धाकामुळे वर तोंड करून कबूल करायची प्राज्ञा नव्हती. लग्नानंतर आपले दिवस पालटतील आणि सासूबाईंना 'नॉन वेज शिवाय कसं जेवणच जात नाही' असं सांगणार्‍या मॉडर्न मत्स्यगंधा छाप सुना येऊन घरात चिकन, मासे यांच्या सुगंधाचे 'खारे' वारे वाहायला लागेल असा त्या दोघांचा कोंडीफोडू आशावादही फोल ठरला. माझी आई आणि काकू यांचे इतर अनेक बाबतीत सासूशी 'बौद्धिक मतभेद' (उदाहरणार्थ भांडण) झाले पण शाकाहाराच्या बाबतीत मात्र तिघाही बायकांचे भयंकर एकमत होते. त्यामुळे पुनश्च बिचारे बाबा व काका हॉटेलांच्या वाटेला लागले. पण आम्हा पोरांना लहानपणापासूनच 'खायला' शिकवून दोघांनी माफक वचपा काढला. पुढे 'दिलवाले दुल्हनिया...' मधील फरिदा जलालचे 'मेरी बेटी मेरे जैसे समझौते नही करेगी' वगैरे डाय्लॉग ऐकले तेव्हा बाबांच्या खाद्यसंस्कारांची आठवण येऊन डोळ्यांना नसले तरी तोंडाला पाणी सुटल्याची हृद्य आठवण आहे. याच विदग्ध संस्कारांमुळे लग्नानंतर पत्नी शुद्ध शाकाहारी असूनही (खानदानी प्रॉब्लेम!) 'घरात नॉन वेज करून खाणे हा माझा हक्क आहे आणि मी तो मिळवणारच' असे मी बाणेदारपणे स्पष्ट करू शकलो (तरीही पत्नीसुद्धा घराण्यातील बाकी स्त्रियांप्रमाणेच 'तेजोमय' असल्याने 'नॉन-वेज' खाण्यासाठी मला आधीचे तीन-चार दिवस चांगले वागणे, वेळेवर घरी येणे वगैरे गुंतवणुकी कराव्या लागतातच, निदान खायला तरी मिळते. पिढीनुसार प्रगती होते ती अशी!)'
पण घरची मुर्गी शाकाहारी असली तरी अगदीच 'दाल' बराबर नव्हती काही! काकू आणि आई उत्तम सुगरणी होत्या. आईच्या काहीकाही पदार्थांसाठी तर ज्यांच्या घरात 'तांबड्या-पांढर्‍या'च्या नद्या वाहतात असे माझे मित्रही घरी आसुसून यायचे. असाच एक 'हिट' मेनू म्हणजे भाकरी, वांग्याची भाजी आणि खरडा. आता या आद्य महाराष्ट्रीयन पदार्थांना बनवणे हे रॉकेट सायन्स नसो बापडे. वर्ल्ड गूरमे क्युझीनमध्येही हे येत नसतील, काही हरकत नाही पण या पदार्थांच्या कम्फर्ट व्हॅल्युला तोड नाही. या पदार्थांचा मूळ बाज एकच असला तरी व्यक्तिनुसार, घरानुसार यात बारीकसारीक बदल होत असतात. यांची अमुक एकच 'आय एस आय' मार्क वाली रेसिपी नाही याची जाणीव असल्याने खाली दिलेली रेसिपी म्हणजे या विषयावरचे ब्रह्मवाक्य असा माझा मुळीच दावा नाही. पण माझ्यासाठी हे पदार्थ म्हणजे घरापासून दूर असताना ज्यांची आठवण येऊन 'गमते उदास' होते, रसनेची देवी जागृत होऊन चंडीप्रमाणे प्रसादासाठी थयथयाट करू लागते अशा प्रतवारीचे आहेत त्यामुळे आज भरल्या पोटाने याची पा.कृ. लिहिताना आनंदाचे भरते येत आहे.

साहित्यः-

१. वांग्याची रसभाजी

प्रमुख भूमिका:-

७-८ छोटी वांगी (कृष्णा, थेम्स, मिसिसीपी अशा सोयीच्या नदीच्या काठची)
ताजे मटार अर्धी वाटी
एक मोठा बटाटा मध्यम आकाराच्या फोडी करून
एक मोठा कांदा, बारीक चिरून
दोन मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
७-८ लसूण पाकळ्या बारीक चिरून
कांदा-लसूण तिखट ३ टी.स्पून
ताजे दाण्याचे कूट - ३-४ टी.स्पून
तेल

बाकी हळद, कोथिंबीर, मीठ, पाव चमचा तिखट वगैरे सहाय्यक अभिनेते आवडीनुसार प्रमाणाने

पटकथा

वांगी, मटार, बटाटा सोडून बाकी सर्व मसाला एका बाऊल मध्ये एकजीव करून थोडासा कुस्करून घ्यावा. वांग्यांना उभे क्रॉस काप देऊन त्यांत मसाला भरून ठेवावा. काही मसाला उरेल तो बाजूला ठेवावा.
कढईत थोडे तेल गरम करून त्यात भरली वांगी टाकून एक वाफ द्यावी. नंतर उरलेला मसाला, बटाटा आणि मटार घालून तेल सुटेपर्यंत पुन्हा वाफवून घावे. वाफ आल्यावर पाहिजे तेवढ्या ग्रेव्हीच्या अन्दाजाने गरम पाणी घालून सर्व भाज्या बोटचेप्या होईपर्यन्त शिजवावे. शेवटी कोथिंबीर घालावी.

1.jpg

२. खरडा

लसूण - मिरची (८-१० मोठ्या मिरच्या + एक पूर्ण गड्डा लसूण) अशा प्रमाणात
तेल. मीठ

मिरच्या अर्ध्या चिरून लसणाबरोबर तव्यात टाकाव्या. पाण्याचा हलका हबका मारून अर्धवट शिजेपर्यन्त झाकून वाफ द्यावी.
अर्ध्या शिजल्यावर बत्त्याने किंवा पसरट वाटीने तव्यातच बारीक करून घ्याव्यात. दोन छोटे चमचे तेल टाकावे. मीठ घालून मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्यावे.

2.jpg

भाजी, भाकरी, खरड्याचे ताट (सोलकढी सहित .. मिरची-मसाल्याला थोडा उतारा म्हणून!)

3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages