घर

Submitted by समीर चव्हाण on 27 February, 2013 - 02:47

अधिक आयुष्य सुंदर होत आहे
तुझे माझे नवे घर होत आहे

करूदे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे

असेही चित्र डोळ्यांना दिसावे
उले पाऊल घरभर होत आहे

तुझे माझे जमेना लाख तरिही
तुझ्याविण जन्म दुर्धर होत आहे

मला सांभाळुनी घेशील ना तू
सुखाची जीर्ण चादर होत आहे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करूदे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे.... क्या बात ! क्या ब्बात!

तुझे माझे जमेना लाख तरिही
तुझ्याविण जन्म दुर्धर होत आहे.......सहीय...कातिल शेर !

धन्यवाद!

सर्व शेर खूप आवडले

फक्त<<<उले पाऊल घरभर होत आहे>>> या ओळीचा शब्दार्थ व भावार्थ तेवढा समजला नाही ...सांगाल का

सगळ्यांचे धन्यवाद.

वैभवः
उले पाऊल घरभर होत आहे

उले हा काही शब्दकोशातील शब्द नव्हे.
इथे तो इवले अर्थाने घेतला आहे.
मूल घराला घरपण आणते असे म्हणतात.
इच्छा आहे की बाळाचे पाऊल घरभर होताना दिसू दे.

धन्यवाद समीरजी आता अर्थ पोचला खूप छान शेर

उले चा हाच अर्थ मीही काढला होता या शेरातील भावभावना मला माझ्या वाचनातून तरीही पोचल्या नव्हत्या म्हणून विचारले

उले हा काही शब्दकोशातील शब्द नव्हे.>>>>>मला त्याच्याशी काही कर्तव्य नसते कधीच (तो प्रांत देवपूरकरांचा Lol )

पुनश्च धन्स

मस्त गझल.

करूदे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे

असेही चित्र डोळ्यांना दिसावे
उले पाऊल घरभर होत आहे

हे शेर फार आवडले.

समीर चव्हाण हे मराठीतले दिग्गज गझलकार आहेत हे मी खूपदा ऐकले होते
इथे मायबोलीवर आपण आलात त्यामुळे पहायलाही मिळते आहे
अश्या एकमेवाद्वितीय गझल्स वाचून "गझल" अनुभवायलाही मिळते आहे व खूप काही शिकायलाही मिळते आहे

यासर्व गोष्टींसाठी आपले खूप खूप आभार समीर जी

मीही जमेल तश्या गझल लिहितो व इथे प्रकाशितही करतो अधून मधून

आपणास जमेल तेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा मार्गदर्शन आवर्जून करावे ही प्रार्थना

आपला कृपाभिलाषी
~नवाच एक कुणीतरी

मला सांभाळुनी घेशील ना तू
सुखाची जीर्ण चादर होत आहे

<<< व्वा, हा शेर विसरूनच गेलो होतो या गझलेतील. पूर्ण गझल सुरेखच

हा शेर नवीन आहे.>>>>>

तर मग मुळात चारच शेर होते का ह्या गझल मधे ?
... की आधीचा एक वगळून हा शेर ५वा म्हणून इथे दिला आहे ?
असे असल्यास तो आधीचा ५ वा शेर काय होता ते सांगावे ही विनंती समीरजी
Happy

किती छान आणि मोजक्या शेरांत व्यक्त होतोस रे...
प्रचंड सुंदर आहे ही गज़ल... एक एक शेर चवीने वाचला वेळ देऊन.. खास आवडलीच...

तुझे माझे जमेना लाख तरिही
तुझ्याविण जन्म दुर्धर होत आहे
.
मला सांभाळुनी घेशील ना तू
सुखाची जीर्ण चादर होत आहे

हे दोन विशेष आवडलेत. Happy

सगळे शेर मस्तच...

>>
करूदे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे >>

हा खूपच आवडला समीरजी..

Happy