इंटर नेटच्या कृपेमुळे बहुतांशी लेखकांचे लिखाण ई - बुक स्वरूपात उपलब्ध झालेले आहे. विमानाच्या/रेल्वेच्या प्रवासात 'आय पॅड' अथवा 'नोटबुक' वर अनेक लोकांना अशी पुस्तके वाचताना पाहतो. काही पुस्तके मीही 'नोटबुक' वर घेऊन ठेवलेली आहेत पण खरे सांगायचे तर मला अशा ई - बुक्सचे वाचन फारसे भावत नाही. याचे कधी कधी मला आश्चर्य वाटते कारण एक तंत्र म्हणून मी इंटर नेटच्या अगदी कह्यात गेलेला माणूस आहे. बँकेचे व्यवहार, तिकीट आरक्षण, बिलांचा भरणा आणि किरकोळ खरेदी यांसाठी मी या माध्यमाचा भरपूर वापर करतो. बारीक सारीक माहितीसाठी यावरच विसंबून असतो. जगभरात असलेल्या मित्रांशी, वारंवार भेटू न शकणाऱ्या नातेवाईकांशी याच्यामुळेच ऋणानुबंध टिकून राहिले आहेत यातही मला शंका नाही. असे असताना केवळ वाचनाच्या बाबतीतच असे का होते याचा जमेल तसा शोध घ्यावा असे वाटत आहे.
माझ्यालेखी पुस्तक हातात घेऊन वाचणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. याची बीजे बालपणात आहेत. आई वडिलांच्या पुण्याईमुळे शाळेत प्रत्येक वर्षी नवीन पुस्तके मिळाली. वर्गातील कित्येक मुलांना हे भाग्य नव्हते. शाळा सुरु होण्याआधी ही नवी कोरी पुस्तके वाचण्यात एक अजब मजा असायची. त्यांच्या नवेपणाचा वास नाकात घर करून राहायचा. तेव्हापासूनच पुस्तक हातात धरून वाचणे या प्रक्रियेशी अद्वैत साधले गेले. घरात आजी-आजोबां पासून झाडून सर्वाना वाचनाची आवड होती हेही एक ठळक कारण आहेच.
अवांतर वाचनाची सवय लहानपणातच लागली. शाळेत उत्तम लायब्ररी होती. भा.रा. भागवत, मालती दांडेकर, लैला महाजन, भालबा केळकर अशी अट्टाहासाने मुलांसाठीच लिहिणारी थोर नावे या लायब्ररीमुळेच परिचयाची झाली. फास्टर फेणेने वेड लावले. संपूर्ण फास्टर फ़ेणेचा संच आपल्या कपाटात असावा ही त्यावेळी जागृत झालेली इच्छा हल्ली पाच सहा वर्षांपूर्वी पूर्ण झाली त्यावेळी मला जग जिंकल्याचा आनंद झाला होता. आता हा संच माझ्या मुलाने उघडून वाचण्याची वाट पाहत आहे.
वाढत्या वयाबरोबर वाचनाची भूकही वाढत गेली. यथावकाश त्याला इंग्रजी वाचनाची जोड मिळाली. इतर छंद जडले पण वाचन सगळ्याच्या मध्यभागी राहिले. सगळ्यानी वाचनवेडाला नेहेमी प्रोत्साहन दिले. अनेक लेखकांनी वेड लावले. एक तर प्रत्येक छापील लेखन हे वाचक स्वतःच्या आवाजात मनाशी वाचत असतो. म्हणजे खरे तर हे एक प्रकारचे लेखकाच्या हातात नसलेले आणि वाचकाने केलेले लेखानोत्तर संस्करणच असते. कदाचित यामुळेच वाचनाचा आस्वाद स्वतः वाचल्याशिवाय पूर्ण झाला असे वाटत नाही. एखादे पारंपारिक अर्थाने दुर्बोध अथवा 'कठोर' लेखन वाचताना पहिल्यांदा स्वतःच्या 'कम्फर्ट झोन' ला विस्तारित करावे लागते. त्यामुळेच पुस्तके ही केवळ लेखकाची निर्मिती न राहता त्यात आपल्या भाव-भावनादेखील मिसळल्या जातात. ही व्यामिश्र प्रक्रिया हातात पुस्तक घेऊन वाचताना जास्त परिपूर्ण वाटते.
याचवेळी पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय लागली. अर्थात त्यावेळी नवीन पुस्तके परवडणे अशक्यच होते पण जुन्या पुस्तकांची दुनिया गवसली. मुंबईला गेल्यावर फोर्ट - माटुंगा भागातील जुना बाजार , कोल्हापुरातील जुने पुस्तक विक्रेते, आणि नंतर दिल्लीतील नेताजी बझार/नयी सडक इथून भरपूर पुस्तके घासाघीस करून, कधी मान तुकवून विकत घेतली. कोल्हापुरात सिद्धीविनायक मंदिराजवळील पुलावर एक जुन्या पुस्तकांची गाडी होती. त्या विक्रेत्याचा मी आयुष्यभर ऋणी राहीन कारण त्याने मला पी.जी. वुडहाउसची ओळख करवून दिली. पु.लं.च्या लिखाणातून वुडहाउसविषयी बक्कळ वाचले होते पण प्रत्यक्ष त्याचे पुस्तक मिळत नव्हते. ह्या मळका पांढरा झब्बा - लेंगा घालणाऱ्या, हळू हळू बोलणाऱ्या माणसाकडून (त्याचे यशवंत वाचनालय म्हणून स्वबळावर उभे केलेले छोटेखानी परंतु सुसज्ज असे ग्रंथालयही होते हे नंतर कळले) वुडहाउसची कित्येक पुस्तके मिळाली आणि मला जणू गतजन्मीचा सुहृद गवसला. मी जगलो, मेलो - स्थूल, सूक्ष्म, बाष्प, घन कशाही अवस्थेत असलो तरी पु.ल. आणि वुडहाउस हे माझ्या भाव-विश्वात राहतील याची मला वेडी खात्री आहे. पु.लं.नी ज्यांच्याबद्दल भरभरून लिहिले असे मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभू ह्या सर्वांचे साहित्य वाचावे अशी भूक पु.लं. नीच निर्माण केली. पु.ल. ना भेटायचा योग आला, वुडहाउसबाबा परदेशात - शिवाय माझ्या जन्माच्या आधीच पार झालेले - त्यांना आता दुसऱ्या मितीत भेटावे लागणार!
विकत घेतलेल्या पुस्तकांबद्दल मालकीची भावना आली. नाही म्हणत ७०-८० पुस्तके जमली. आवडीच्या पुस्तकाचे हवे तव्हा कपाटातून काढून पुनर्वाचन करण्यातली गंमत कळू लागली. जाणिवा प्रगल्भ झाल्या तसे पुस्तकाचे मुखपृष्ठ, प्रकाशक, प्रस्तावनेतून हलकेच दिसणारा लेखकाचा चेहरा याचा आस्वाद घेता येऊ लागला. पुस्तक वाचन हा स्वतःशीच साजरा केला जाणारा सोहळा बनू लागला. या सर्व कारणांनीच आजही प्रकाशित-मुद्रित पुस्तकांचे मोल ई - बुक्स पेक्षाही कितीतरी अधिक वाटते. आज पुस्तक संग्रह आणखी छान वाढला आहे. अर्थात ही सर्वस्वी वैयक्तिक भावना आहे. पुस्तकांच्या बाबतीत तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःशी गायला पाहिजे असा हा राग आहे. घेतलेल्या प्रत्येक पुस्तकाशी काही आठवणी निगडीत आहेत. माझ्यासाठी ही पुस्तके वेगवेगळ्या टप्प्यांवर उमटलेल्या आयुष्यखुणाच आहेत. काही फाटली - तुटली आहेत पण मुले जशी तुटकी खेळणीही जपून ठेवतात तशीच मीही अशी पुस्तके जपून सांभाळली आहेत. यामुळेच त्यांच्या प्रत्यक्ष स्पर्शाचे - सहवासाचे मोल माझ्यालेखी अधिक आहे. आपलं माणूस फोटोत किंवा अगदी 'स्काईप' वर बघणं ही गोड तडजोड असते पण तेच आपल्या समोर- शेजारी हातात हात घालून बसलं असेल तर आयुष्याचा महोत्सव होतो तसंच काहीसं छापलेल्या पुस्तकांबद्दलही म्हणता येईल.
आयुष्याची संध्याकाळ होईल तेव्हा एकच मागणे आहे. खोलीत चारही बाजूंनी छतापर्यंत उंच जाणारी कपाटे असावीत. वाटले ते पुस्तक काढून घेण्याइतके गात्रांमध्ये बळ असावे. वाचन करण्याजोगी दृष्टी शाबूत असावी आणि जेव्हा निरोपाची वेळ येईल तेव्हा आयुष्यभर साथ दिलेल्या जिवाभावाच्या माणसांप्रमाणेच माझ्या जिवाभावाची पुस्तकेही माझ्या अवती भवती, माझ्या मनात रुजलेली असावीत. माझी खात्री आहे.....पुस्तकातून मला भेटलेले अनेक लेखक 'तथास्तु' म्हणून आशीर्वादच देत असतील. निर्व्याज 'देण्या'व्यतिरिक्त पुस्तकांना आणि पर्यायाने त्यांच्या लेखकांना दुसरे काय करता येते?
ई - बुक्स आणि 'पुस्तके'
Submitted by अमेय२८०८०७ on 15 February, 2013 - 09:41
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्र्युत्युंजय वाचतो आहे
म्र्युत्युंजय वाचतो आहे किंडलवर, खुपच विशेषण बंबाळ, शब्द बंबाळ वाटत आहे हे पुस्तक.
आवडलं
आवडलं
कागदाचा वापर म्हणजे हजारो
कागदाचा वापर म्हणजे हजारो झाडांची तोड करून पर्यावरण समस्या निर्माण करणे आहे.
पुढील पिढीला हातात आपले साहित्य पोहोचवायचे असेल तर ईबुक समान काही तरी वापरून साठवले पाहिजे.
Pages