ई - बुक्स आणि 'पुस्तके'

Submitted by अमेय२८०८०७ on 15 February, 2013 - 09:41

इंटर नेटच्या कृपेमुळे बहुतांशी लेखकांचे लिखाण ई - बुक स्वरूपात उपलब्ध झालेले आहे. विमानाच्या/रेल्वेच्या प्रवासात 'आय पॅड' अथवा 'नोटबुक' वर अनेक लोकांना अशी पुस्तके वाचताना पाहतो. काही पुस्तके मीही 'नोटबुक' वर घेऊन ठेवलेली आहेत पण खरे सांगायचे तर मला अशा ई - बुक्सचे वाचन फारसे भावत नाही. याचे कधी कधी मला आश्चर्य वाटते कारण एक तंत्र म्हणून मी इंटर नेटच्या अगदी कह्यात गेलेला माणूस आहे. बँकेचे व्यवहार, तिकीट आरक्षण, बिलांचा भरणा आणि किरकोळ खरेदी यांसाठी मी या माध्यमाचा भरपूर वापर करतो. बारीक सारीक माहितीसाठी यावरच विसंबून असतो. जगभरात असलेल्या मित्रांशी, वारंवार भेटू न शकणाऱ्या नातेवाईकांशी याच्यामुळेच ऋणानुबंध टिकून राहिले आहेत यातही मला शंका नाही. असे असताना केवळ वाचनाच्या बाबतीतच असे का होते याचा जमेल तसा शोध घ्यावा असे वाटत आहे.
माझ्यालेखी पुस्तक हातात घेऊन वाचणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. याची बीजे बालपणात आहेत. आई वडिलांच्या पुण्याईमुळे शाळेत प्रत्येक वर्षी नवीन पुस्तके मिळाली. वर्गातील कित्येक मुलांना हे भाग्य नव्हते. शाळा सुरु होण्याआधी ही नवी कोरी पुस्तके वाचण्यात एक अजब मजा असायची. त्यांच्या नवेपणाचा वास नाकात घर करून राहायचा. तेव्हापासूनच पुस्तक हातात धरून वाचणे या प्रक्रियेशी अद्वैत साधले गेले. घरात आजी-आजोबां पासून झाडून सर्वाना वाचनाची आवड होती हेही एक ठळक कारण आहेच.
अवांतर वाचनाची सवय लहानपणातच लागली. शाळेत उत्तम लायब्ररी होती. भा.रा. भागवत, मालती दांडेकर, लैला महाजन, भालबा केळकर अशी अट्टाहासाने मुलांसाठीच लिहिणारी थोर नावे या लायब्ररीमुळेच परिचयाची झाली. फास्टर फेणेने वेड लावले. संपूर्ण फास्टर फ़ेणेचा संच आपल्या कपाटात असावा ही त्यावेळी जागृत झालेली इच्छा हल्ली पाच सहा वर्षांपूर्वी पूर्ण झाली त्यावेळी मला जग जिंकल्याचा आनंद झाला होता. आता हा संच माझ्या मुलाने उघडून वाचण्याची वाट पाहत आहे.
वाढत्या वयाबरोबर वाचनाची भूकही वाढत गेली. यथावकाश त्याला इंग्रजी वाचनाची जोड मिळाली. इतर छंद जडले पण वाचन सगळ्याच्या मध्यभागी राहिले. सगळ्यानी वाचनवेडाला नेहेमी प्रोत्साहन दिले. अनेक लेखकांनी वेड लावले. एक तर प्रत्येक छापील लेखन हे वाचक स्वतःच्या आवाजात मनाशी वाचत असतो. म्हणजे खरे तर हे एक प्रकारचे लेखकाच्या हातात नसलेले आणि वाचकाने केलेले लेखानोत्तर संस्करणच असते. कदाचित यामुळेच वाचनाचा आस्वाद स्वतः वाचल्याशिवाय पूर्ण झाला असे वाटत नाही. एखादे पारंपारिक अर्थाने दुर्बोध अथवा 'कठोर' लेखन वाचताना पहिल्यांदा स्वतःच्या 'कम्फर्ट झोन' ला विस्तारित करावे लागते. त्यामुळेच पुस्तके ही केवळ लेखकाची निर्मिती न राहता त्यात आपल्या भाव-भावनादेखील मिसळल्या जातात. ही व्यामिश्र प्रक्रिया हातात पुस्तक घेऊन वाचताना जास्त परिपूर्ण वाटते.
याचवेळी पुस्तक विकत घेऊन वाचण्याची सवय लागली. अर्थात त्यावेळी नवीन पुस्तके परवडणे अशक्यच होते पण जुन्या पुस्तकांची दुनिया गवसली. मुंबईला गेल्यावर फोर्ट - माटुंगा भागातील जुना बाजार , कोल्हापुरातील जुने पुस्तक विक्रेते, आणि नंतर दिल्लीतील नेताजी बझार/नयी सडक इथून भरपूर पुस्तके घासाघीस करून, कधी मान तुकवून विकत घेतली. कोल्हापुरात सिद्धीविनायक मंदिराजवळील पुलावर एक जुन्या पुस्तकांची गाडी होती. त्या विक्रेत्याचा मी आयुष्यभर ऋणी राहीन कारण त्याने मला पी.जी. वुडहाउसची ओळख करवून दिली. पु.लं.च्या लिखाणातून वुडहाउसविषयी बक्कळ वाचले होते पण प्रत्यक्ष त्याचे पुस्तक मिळत नव्हते. ह्या मळका पांढरा झब्बा - लेंगा घालणाऱ्या, हळू हळू बोलणाऱ्या माणसाकडून (त्याचे यशवंत वाचनालय म्हणून स्वबळावर उभे केलेले छोटेखानी परंतु सुसज्ज असे ग्रंथालयही होते हे नंतर कळले) वुडहाउसची कित्येक पुस्तके मिळाली आणि मला जणू गतजन्मीचा सुहृद गवसला. मी जगलो, मेलो - स्थूल, सूक्ष्म, बाष्प, घन कशाही अवस्थेत असलो तरी पु.ल. आणि वुडहाउस हे माझ्या भाव-विश्वात राहतील याची मला वेडी खात्री आहे. पु.लं.नी ज्यांच्याबद्दल भरभरून लिहिले असे मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभू ह्या सर्वांचे साहित्य वाचावे अशी भूक पु.लं. नीच निर्माण केली. पु.ल. ना भेटायचा योग आला, वुडहाउसबाबा परदेशात - शिवाय माझ्या जन्माच्या आधीच पार झालेले - त्यांना आता दुसऱ्या मितीत भेटावे लागणार!
विकत घेतलेल्या पुस्तकांबद्दल मालकीची भावना आली. नाही म्हणत ७०-८० पुस्तके जमली. आवडीच्या पुस्तकाचे हवे तव्हा कपाटातून काढून पुनर्वाचन करण्यातली गंमत कळू लागली. जाणिवा प्रगल्भ झाल्या तसे पुस्तकाचे मुखपृष्ठ, प्रकाशक, प्रस्तावनेतून हलकेच दिसणारा लेखकाचा चेहरा याचा आस्वाद घेता येऊ लागला. पुस्तक वाचन हा स्वतःशीच साजरा केला जाणारा सोहळा बनू लागला. या सर्व कारणांनीच आजही प्रकाशित-मुद्रित पुस्तकांचे मोल ई - बुक्स पेक्षाही कितीतरी अधिक वाटते. आज पुस्तक संग्रह आणखी छान वाढला आहे. अर्थात ही सर्वस्वी वैयक्तिक भावना आहे. पुस्तकांच्या बाबतीत तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःशी गायला पाहिजे असा हा राग आहे. घेतलेल्या प्रत्येक पुस्तकाशी काही आठवणी निगडीत आहेत. माझ्यासाठी ही पुस्तके वेगवेगळ्या टप्प्यांवर उमटलेल्या आयुष्यखुणाच आहेत. काही फाटली - तुटली आहेत पण मुले जशी तुटकी खेळणीही जपून ठेवतात तशीच मीही अशी पुस्तके जपून सांभाळली आहेत. यामुळेच त्यांच्या प्रत्यक्ष स्पर्शाचे - सहवासाचे मोल माझ्यालेखी अधिक आहे. आपलं माणूस फोटोत किंवा अगदी 'स्काईप' वर बघणं ही गोड तडजोड असते पण तेच आपल्या समोर- शेजारी हातात हात घालून बसलं असेल तर आयुष्याचा महोत्सव होतो तसंच काहीसं छापलेल्या पुस्तकांबद्दलही म्हणता येईल.
आयुष्याची संध्याकाळ होईल तेव्हा एकच मागणे आहे. खोलीत चारही बाजूंनी छतापर्यंत उंच जाणारी कपाटे असावीत. वाटले ते पुस्तक काढून घेण्याइतके गात्रांमध्ये बळ असावे. वाचन करण्याजोगी दृष्टी शाबूत असावी आणि जेव्हा निरोपाची वेळ येईल तेव्हा आयुष्यभर साथ दिलेल्या जिवाभावाच्या माणसांप्रमाणेच माझ्या जिवाभावाची पुस्तकेही माझ्या अवती भवती, माझ्या मनात रुजलेली असावीत. माझी खात्री आहे.....पुस्तकातून मला भेटलेले अनेक लेखक 'तथास्तु' म्हणून आशीर्वादच देत असतील. निर्व्याज 'देण्या'व्यतिरिक्त पुस्तकांना आणि पर्यायाने त्यांच्या लेखकांना दुसरे काय करता येते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
पुस्तकांच्या बाबतीत तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःशी गायला पाहिजे असा हा राग आहे. घेतलेल्या प्रत्येक पुस्तकाशी काही आठवणी निगडीत आहेत. माझ्यासाठी ही पुस्तके वेगवेगळ्या टप्प्यांवर उमटलेल्या आयुष्यखुणाच आहेत. काही फाटली - तुटली आहेत पण मुले जशी तुटकी खेळणीही जपून ठेवतात तशीच मीही अशी पुस्तके जपून सांभाळली आहेत. यामुळेच त्यांच्या प्रत्यक्ष स्पर्शाचे - सहवासाचे मोल माझ्यालेखी अधिक आहे.

आयुष्याची संध्याकाळ होईल तेव्हा एकच मागणे आहे. खोलीत चारही बाजूंनी छतापर्यंत उंच जाणारी कपाटे असावीत. वाटले ते पुस्तक काढून घेण्याइतके गात्रांमध्ये बळ असावे. वाचन करण्याजोगी दृष्टी शाबूत असावी
<<

मिलाओ हाथ! Happy
असं म्हणतात की एखादी क्रिया करताना जितकी ज्ञानेंद्रियं वापरली जातील तितका प्रभाव जास्त आणि दीर्घकाल टिकणारा असतो. पुस्तक हाताळणं हा एक असाच organic अनुभव वाटतो. त्या कागदाचा रंग, पोत, पुस्तकाची बांधणी, त्याचा एक वास - या सगळ्याशिवाय वाचन अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं. Happy
(शिवाय ई-बुकात पानंफुलं ठेवता येत नाहीत हा एक काव्यात्म अन्यायच. Happy )

तरीही सद्ध्याच्या धकाधकीत ऑडिओ बुक्स हा एक पर्याय फार आवडलेला आहे. 'क्राईम अँड पनिशमेन्ट'सारखी बाडं मी ऐकल्यामुळेच संपवू शकले.
मराठी पुस्तकांची अजून निघालेली माहिती नाहीत. (उद्योजक - प्लीज पे अटेन्शन! Happy )
पण इथे इंग्रजी पुस्तकांची फार सुंदर श्रवणीय - काहीशी नाट्यमय वाचनं करतात. तुम्हाला इन्टरेस्ट असेल तर ऑडिबल.कॉम इथे बघा. Happy

मस्त लेख... मलाही असचं वाट्त..फक्त मायबोली वरचे लेखच फक्त ऑनलाईन वाचते मी पर्याय नाही म्हणुन Happy
बाकी पुस्तक हातात असलं की त्याचा तो वेगळाच वास..अधाशांसारख वाचन मला जास्ती आवड्त..
लायब्ररेरीयन हा आजही ड्रीम जॉब आहे माझा.. खुप पुस्तके,वेळ नि नो डिस्टर्ब Happy

<< एक तंत्र म्हणून मी इंटर नेटच्या अगदी कह्यात गेलेला माणूस आहे.पण खरे सांगायचे तर मला अशा ई - बुक्सचे वाचन फारसे भावत नाही.>>

तुमच्या-माझ्यासह अनेकान्ची हीच अवस्था आहे !अमेय२८०८०७ |जी .....................

मस्त. खूप सुरेख लिहिले आहे.

पुस्तकांच्या बाबतीत तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःशी गायला पाहिजे असा हा राग आहे. >>> प्रचंड आवडलं Happy

नै पटलं.
इथे मी जी अ‍ॅक्शन करतो आहे पुस्तकाचे पान उलटण्याची,
c002.jpg
ती अ‍ॅक्चुअली ही आहे :
c001.jpg

फीलच हवा तर कागदाचा नवाकोरा, जुनाट कुबट इ. वास हवा तसा येण्याची सोय असणारे पण स्मार्ट फोन लवकरच बाजारात येतीलही.

पण मला हवं तिथे, हवं तेव्हा, अक्खी २॥-३ हजार पुस्तकांची लायब्ररी, तीही जड जंबल मेडिकल पुस्तके, व इतर खिशात घेऊन फिरता येणे, शब्द अडला तर तात्काळ डिक्शनरी तिथेच बोटाखाली मिळणे, डोळे जडावले तर पुस्तकालच, "बाबा रे, तू स्वतःला वाचून मला ऐकीव, अन अर्ध्या तासात शांत बस" हे सांगण्याची सोय असणे,

अन मुख्य म्हणजे रात्री 'क्काय लाव्लंय मेलं वाचन? तो लाईट बंद करा आधी. सकाळी मला उठावं लागतं, स्वतः पडता घोरत.' इ. प्रेमळ वाक्ये ऐकावी लागत नाहीत. सेल्फ इल्युमिनेटेड टॅबवर गुपचुप कुणाला डीस्टर्ब न करता वाचता येतं, - हे कित्तीबी नॉस्टॅल्जिकली डेड ट्री फॉर्म्याट पुस्तकांबद्दल प्रेमाने उगळलं, तरी ईबुक्स उजवे, हेच सिद्ध करतं.

ई-पुस्तक किडा : e-Bliss

आवडले.

मला स्वतःला e-books फारशी आवडत नाहित पण हा शेवटी सवयीचा/conditioning चा भाग आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

लेख पटो न पटो, आवडला. शेवटी व्यक्त केलेल्या भावना पोहोचल्या.

अंड्याला स्वताला वाचनाची आवड फारशी नाही तशी,

कागदी पुस्तके हल्ली दिसतात कुठे, दिसली तरी सांभाळणे नकोच वाटते.

कम्प्युटरवर तरी किती वाचणार, डोळ्यांना त्रास करत. मायबोलीवर देखील मी पटकन एक झाडी मारतो, नजरेला पडेल ते वाचतो, धडाधड रिप्लाय पेस्टतो आणि गुल्ल..

बस अन ट्रेनमध्ये मोबाईलवर वाचणार्‍यांकडे किंवा मोबाईल गेम्स खेळणार्‍यांकडे पाहून असे वाटते की या बिचार्‍यांना इतर फारसे छंद नसावेत म्हणून त्या छोट्याश्या स्क्रीनमध्ये डोळे खुपसून बसलेत. मित्रांशी गप्पा मारण्यातली मजा घालवली आहे या प्रकाराने..

ट्रेनमध्ये लॅपटोप उघडणार्‍यांना सांगावेसे वाटते की बस रे बाबा ऑफिसमध्येही त्याच्यावरच काम करून आला आहेस, स्वताला नाही तर त्या तांत्रिक जीवाला तरी विश्रांती दे.

सरतेशेवटी मनात विचार येतो, कोणी असा जोडीदार भेटावा जो रोजचे वृत्तपत्र देखील मला मोठ्याने वाचून दाखवील आणि मी आरामात चहाचा घोट घेत जे जे कानावर पडेल त्यातच समाधान मानेल.

असामी +१
आपण पुस्तकं हाताळत मोठे झालो त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध कधीही जास्त जवळकीचे, महत्वाचे वाटणार. इ-बुक्स वाचत मोठ्या झालेल्या पिढीसाठी ते ॠणानुबंध कदाचित वेगळ्या गोष्टींमधे सामावले असतील.
मी स्वतः कितीही या लेखातल्या भावनेशी सहमत असले तरी किमान व्यावसायिक पातळीवर मला इ-बुक्सची अपरिहार्यता जाणवते. एका छोट्याश्या एक्स्टर्नल हार्डड्राईव्ह मधे माझ्या कडे जितकी पुस्तकं/लेख आहेत ते कागदी स्वरूपात करायचे म्हणलं तर एक आख्खी कॉलेजची डिपार्टमेन्टल लायब्ररी होईल. त्यामुळे इब्लिसना अगदी हजारो मोदक...

किंडल विशलिस्टवर आहे सध्या Happy

बस अन ट्रेनमध्ये मोबाईलवर वाचणार्‍यांकडे किंवा मोबाईल गेम्स खेळणार्‍यांकडे पाहून असे वाटते की या बिचार्‍यांना इतर फारसे छंद नसावेत म्हणून त्या छोट्याश्या स्क्रीनमध्ये डोळे खुपसून बसलेत. मित्रांशी गप्पा मारण्यातली मजा घालवली आहे या प्रकाराने..
<<
अंडेराव,
रोजच्या कम्यूटमधला कंटाळवाणा तोच तो प्रवास सुसह्य करण्यासाठी ईबुकांआधी कागदी बुकं होतीच की. गेलाबाजार वर्तमान पत्रे, मासिके तर होतीच होती.
दर रोज अडिच तास जाताना अन अडीच तास येताना मित्र सोबत असले तरी रोज रोज गप्पा काय मारणार हो त्यांच्याशी? तेवढाच वेळ सत्कारणी लागतो वाचन केल्याने.

अजून एक ऑथेंटिक मेडिकल माहिती Wink तिथे खुपसल्याने डोळे खराब होत नाहीत.

पुस्तकांच्या बाबतीत तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःशी गायला पाहिजे असा हा राग आहे. घेतलेल्या प्रत्येक पुस्तकाशी काही आठवणी निगडीत आहेत. माझ्यासाठी ही पुस्तके वेगवेगळ्या टप्प्यांवर उमटलेल्या आयुष्यखुणाच आहेत. काही फाटली - तुटली आहेत पण मुले जशी तुटकी खेळणीही जपून ठेवतात तशीच मीही अशी पुस्तके जपून सांभाळली आहेत. यामुळेच त्यांच्या प्रत्यक्ष स्पर्शाचे - सहवासाचे मोल माझ्यालेखी अधिक आहे.

आयुष्याची संध्याकाळ होईल तेव्हा एकच मागणे आहे. खोलीत चारही बाजूंनी छतापर्यंत उंच जाणारी कपाटे असावीत. वाटले ते पुस्तक काढून घेण्याइतके गात्रांमध्ये बळ असावे. वाचन करण्याजोगी दृष्टी शाबूत असावी>>>>>> आमेन! Happy

पुस्तक हाताळणं हा एक असाच organic अनुभव वाटतो. त्या कागदाचा रंग, पोत, पुस्तकाची बांधणी, त्याचा एक वास - या सगळ्याशिवाय वाचन अपूर्ण राहिल्यासारखं वाटतं.>>> ++१११११

आयुष्याची संध्याकाळ होईल तेव्हा एकच मागणे आहे. खोलीत चारही बाजूंनी छतापर्यंत उंच जाणारी कपाटे असावीत. वाटले ते पुस्तक काढून घेण्याइतके गात्रांमध्ये बळ असावे. वाचन करण्याजोगी दृष्टी शाबूत असावी आणि जेव्हा निरोपाची वेळ येईल तेव्हा आयुष्यभर साथ दिलेल्या जिवाभावाच्या माणसांप्रमाणेच माझ्या जिवाभावाची पुस्तकेही माझ्या अवती भवती, माझ्या मनात रुजलेली असावीत. >>> +१००००००००

ईबुक्स काळाची गरज आहेत हे मान्य! पण त्यांना या हाताळता येण्याजोग्या पुस्तकांची सर नाही. याच न्यायाने मला आधीसारखे फोटोज सुद्धा प्रिंट करून घ्यायला आवडतात. अल्बम्सची मजा वेगळीच असते असं मला वाटतं.

खुप छान लिहीलतं अगदी मनातलं.......... Happy

आयुष्याची संध्याकाळ होईल तेव्हा एकच मागणे आहे. खोलीत चारही बाजूंनी छतापर्यंत उंच जाणारी कपाटे असावीत. वाटले ते पुस्तक काढून घेण्याइतके गात्रांमध्ये बळ असावे. वाचन करण्याजोगी दृष्टी शाबूत असावी आणि जेव्हा निरोपाची वेळ येईल तेव्हा आयुष्यभर साथ दिलेल्या जिवाभावाच्या माणसांप्रमाणेच माझ्या जिवाभावाची पुस्तकेही माझ्या अवती भवती, माझ्या मनात रुजलेली असावीत. माझी खात्री आहे.....पुस्तकातून मला भेटलेले अनेक लेखक 'तथास्तु' म्हणून आशीर्वादच देत असतील. निर्व्याज 'देण्या'व्यतिरिक्त पुस्तकांना आणि पर्यायाने त्यांच्या लेखकांना दुसरे काय करता येते?<<<<<<<<<< +१००००००००००००

छान लिहिलं आहे.
मला ही सुरूवातीला इ बुक्सशी जुळवून घेणं थोड अवघड गेलं पण सेल्फ इल्युमिनेशन असल्यामुळे रात्री कितीही वाजेपर्यंत वाचले तरी लाईट चालू ठेवावे लागत नाही, विमानात / प्रवासात जाडजूड पुस्तके नेऊन वजन बाळगन्यापेक्षा आय पॅड बाळगने (एकाच वेळी य पुस्तकांसोबत) सोपे आहे. अन कुठूनही डाउनलोड एका क्षणात. नो कम्युट, नो वेटिंग वगैरे वगैरे. पण तरीही घरी मात्र प्रत्यक्ष पुस्तकच हाताळायला आवडतं.

अनेक इ बुक्स मोफत असतात. अ‍ॅमेझॉन. कॉम वर जाऊन किंडल फ्रि बुक्स असे टाईप करा. हजारोनी पुस्तक ( बहुतेक सर्व क्लासिक ) मिळतील. आयपॅड असेल तरीही किंडल अ‍ॅप मधून वाचले की झाले. आय बुक्स मध्येही फ्री आहेत.

शेवटचा पॅरा खूप आवडला.... खरेच हीच एक इच्छा हेच एक मागणे आहे की आयुष्याच्या शेवटापर्यंत सारी ईंद्रिये इतपत शाबूत राहोत की छंद जोपासता यावेत..

बाकी मला वाचनाचा फार कंटाळा, वाचन असे फारसे होतच नाही.. त्यामुळे कुठे अन कसे वाचावे हा प्रश्नच पडत नाही..

लेख मस्त लिहीलाय..

कॉलेजमध्ये हॉस्टेलच्या खर्चात काटकसर करुन, पैसे जमवुन भरपुर पुस्तके घेतली कारण हेच की कधीतरी घरात एखादी खोलीत फक्त पुस्तकांची कपाटं असावीत आणि निवांतपणे काहीही वाचण्यासाठी वेळ असावा हे स्वप्न!
पण आता माझे मत इब्लिस आणि वरदासारखेच.. ई-बुक्संना पर्याय नाही. आता सवयीने आवडायलाही लागलीयेत. किंडल घेतल्यावर मी त्याच्या प्रेमात पडले.. डोळ्यांना त्रास होत नाही, हवं ते पुस्तक अमेझॉनवरुन १ मि. हातात मिळतं, वाटेल तेवढी पुस्तके सोबत घेउन फिरता येतात. पण मला सेल्फ इल्युमिनेटेड स्क्रीनवर जास्त वेळ वाचायला आवडत नाही सो माझी पसंती ब्लॅक न व्हाईट इंक डिस्प्ले वाल्या किंडललाच.

एकच प्रॉब्लेम आहे की हवी तेवढी मराठी पुस्तके वाचायला मिळत नाहीत. Sad

<<<<<<<<<<<<<<हे कित्तीबी नॉस्टॅल्जिकली डेड ट्री फॉर्म्याट पुस्तकांबद्दल प्रेमाने उगळलं, तरी ईबुक्स उजवे, हेच सिद्ध करतं. ई-पुस्तक किडा : e-Bliss

पटलं !!!

बाय द वे ई-पुस्तकांच्या जगात कोपीराइट कसे अबाधित राहते हे जाणून घ्यायला आवडेल.

संपूर्ण फास्टर फ़ेणेचा संच आपल्या कपाटात असावा ही त्यावेळी जागृत झालेली इच्छा हल्ली पाच सहा वर्षांपूर्वी पूर्ण झाली त्यावेळी मला जग जिंकल्याचा आनंद झाला होता. >>>>>>>
+१०० अगदी माझ्यामनातालं!

बाय द वे ई-पुस्तकांच्या जगात कोपीराइट कसे अबाधित राहते हे जाणून घ्यायला आवडेल.
<<

ईबुक्स मुले कॉपीराईटचा प्रचण्ड मोठ्या प्रमाणावर भंग होतो ही गैरसमजूत आहे, असे मला वाटते. तुम्ही विकत घेतलेले पुस्तक तुमच्या ४ मित्रांना वाचयास उसने दिले, किंवा लायब्ररीतून 'भाड्याने' आणलेत, तर प्रताधिकार कायद्याचा भंग होत नाही काय? फूटपाथवरून वा रद्दीच्या दुकानातून सेकंड थर्ड हँड विकत घेतलेल्या पुस्तकांचे काय? तिथे कॉपीराईट टिकवला जातो का?

अ‍ॅमेझॉन इ. साईट्स वरून विकत घेतलेल्या पुस्तकांस 'डीआरएम' उर्फ डिजिटल राईट्स मेडिया असे प्रकरण असते. ते तोडल्याशिवाय (क्रॅक केल्याशिवाय) पुस्तक आपल्या मित्रास 'उसने देता' येत नाही. कागदावर छापलेले पुस्तक उसने देणे सोप्पे असते. (ईबुक उसने देताना मूळ प्रत आपल्याजवळच रहाते. मित्राने परत न दिल्याने गमावलेल्या पुस्तकांचे दु:ख ज्याने अनुभवले, त्याला यातील फायदा समजेल Wink )

जितक्या प्रमाणात डीआरेम क्रॅक करून इ-पुस्तके 'वाटली' जातात, त्यापेक्षा कित्येक जास्त मोठ्या प्रमाणात फूटपाथवर मिळणारी 'डुप्लिकेट' पुस्तके कॉपीराईट कायद्याचा भंग करतात. अनेक मेडिकल स्टुडंट्स किमान आमच्या काळी तरी हजारो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपीज वापरीत असत, कारण केवळ नाईलाज.

***

प्रोजेक्ट गटेनबर्ग इथे आपल्याला प्रताधिकारमुक्त, म्हणजे ज्यांचा कॉपीराईट 'एक्स्पायर' झालेला आहे अशी पुस्तके मिळतील. तिथे सुमारे ४२ हजार पुस्तके आहेत, शिवाय १ लाख इतर पुस्तके अ‍ॅफिलिएट साईट्स मिळून उपलब्ध आहेत.

इब्लिस, तुमच्याशी सहमत.
पण त्याचबरोबर इंटरनेटवर जर 'योग्य' शेअरिंग साईट्स माहित असतील तर अक्षरशः कुठलंही पुस्तक प्रताधिकाराचा भंग करून डाऊनलोड करता येतं हेही तितकंच खरं आहे Happy प्रश्न वाचकांच्या मानसिकतेचा आहे

ईबुक्स मुले कॉपीराईटचा प्रचण्ड मोठ्या प्रमाणावर भंग होतो ही गैरसमजूत आहे,>>>>
धन्यवाद इब्लिस

सुंदर लेख आहे.
मीच माझ्याशी बोलत आहे असे वाटले..

मस्त लिहिली आहे. खुप सुंदर आठवणी आहेत या पुस्तकांच्या माझ्या.
मात्र मला इ-बुक्स आवडतात. मी अजुन आयपॅड सोडुन इतर डिव्हाईसवर इ-बुक्स वाचली नाहीत, त्यामुळे माहीत नाही पण आयपॅडवरचा अनुभव सुरेखच. पान उलटण्याचा फिल मस्तच. बुक मार्क करता येतात, ओळी हायलाईट करुन ठेवता येतात, डिक्शनरी तेथल्या तेथ उपलब्ध असते, पानांचा रंग हवा तसा बदलता येतो, फाँट साईज बदलता येतो, हवी तितकी पुस्तके सोबत ठेवता येतात. स्वतःचे लेखनाचेही अगदी सहज इ-पब करता येते, पब्लिशही अगदी सहज करता येते. (मला आयबुकचेच माहित आहे फक्त.) असे अनेक फायदे आहेतच.
उगाच स्वतःचा सग्रह वाढवायच्या नादात आपण कितीतरी पुस्तके अगदी जपुन ठेवतो जी कुणाच्याच उपयोगाला येत नाहीत, जागा अडते, साफसफाईची काम वाढते, कुणाला द्यायचे म्हटले तर मन करत नाही. आणि इतरही तोटे आहेत.
अर्थात इ-बुक्सच्या नावाखाली अनेक साईटस् पिडीएफ देतात ते अजिबात आवडत नाही.

Pages