अंत कहाणी (कबीर)

Submitted by -शाम on 15 February, 2013 - 06:01

"बैरी पिया बडा बेदर्दी.." शाहरुखच्या देवदासमधलं अप्रतिम गीत. एक एक शब्द प्रेयसीची प्रियकराबाबतची लडीवाळ तक्रार मांडणारा.पण काव्यात शब्दांचे अर्थ तंतोतंत तेच असतात असं नाही.उपमा,उत्प्रेक्षा,रूपके,प्रतिमा, यांचे वेगळे अर्थही मिसळलेले असतात. तसेच काव्यनिर्मात्याच्या भूमिकेवरही बरेच अवलंबून असते. "बैरी पिया बडा बेदर्दी.." हेच एखाद्या संतकवीने लिहून ठेवले असते तर?
"कवीने परमेश्वराला प्रियकर संबोधले असून त्याला आपली वंचना माहित असूनही तो आपल्याशी निष्ठुरतेने वागत आहे." असा काहीसा रसास्वाद जाणकारांनी केला असता. सांगण्याचा उद्देश हा की,कवितेत शब्द जरी कवी गुंफत असला तरी अर्थ मात्र आस्वादकाच्या मनोभूमिकेवर, काव्यानुभूतीवर, आणि रसिकतेवर अवलंबून असतो.

काल-परवा मा.बो.कर गझलकार श्री.समीर चव्हाण यांच्या लेखाच्या निमित्ताने कबीरमहाराजांची एक रचना वाचनात आली आणि या रचनेच्या अनाकलनियतेने झपाटल्यासारखे झाले.जमेल तशी माहिती मिळवून या रचनेचा भावार्थ आणि शब्दानुवाद माझ्या अल्पमतीनुसार आपणासमोर माडंण्याचा हा छोटासा प्रयत्न......

खरेतर कबिरांच्या वाड:मयाला अशाप्रकारे हात घालण्याची माझी पात्रताही नाही आणि क्षमताही, ही जाणीव आहेच.....

थरहर कम्पै बाला जीउ || ना जानउ किआ करसी पीउ ॥

रैनि गई मत दिनु भी जाइ ॥ भंवर गए बग बैठे आइ ||

काचै करवै रहै न पानी ॥ हंसु चलिआ काइआ कुमलानी ॥

कुआर कनिआ जैसे करत सीगारा ॥ किउ रलिया मानी बाझु भतारा ||

काग उडावत भुजा पिरानी ॥ कहे कबीर इह कथा सिरानी ॥..... कबीर
.............................................................................................................................................

आयुष्याच्या या वळणावर मी अशा संभ्रमात आहे की, माझा प्रियकर आता मला आपल्या जवळ ठेवील की दूर लोटणार आहे? माझ्या बाबत आता तो काय निर्णय घेईल याची मला अजिबातच कल्पना नाही आणि केवळ त्या भीतीने माझा जीव थरथर कापत आहे.माझ्या असंख्य रात्री, तारुण्याची उधळण करीत मी ज्याच्यावर ओवाळून टाकल्या तो आता येणाऱ्या दिवसांमधे मला सोडून तर जाणार नाही ना? कारण ज्या काळ्याभोर संभारावर तो जीव टाकायचा ते केस आता पांढरे होऊन माझ्या खांद्यावर रुळत आहेत. काय त्याला आता माझं हे रूपही आवडेल? ज्या प्रमाणे कच्च्या घागरीतून हळूहळू पाणी पाझरून जातं आणि घागर कोरडी होते. तसा तारुण्याचा पक्षी उडून गेल्यावर हा देह कोमेजून जात आहे. पण मग काय त्याची प्रीतसुद्धा याच प्रमाणे हळूहळू कमी होईल?
मी माझ्या परीने खूप प्रयत्न अजूनही करेन. त्याच्यासाठी अगदी एखाद्या नवयौवने सारखा साजशृंगार मी या वयातही करेन.पण माझ्या पतीचं मन जिंकण्यासाठी कोणत्या युक्त्या, क्लुप्त्या, किंवा नखरे करावेत, जे मला आता जमतील? ते काही कळत नाही.म्हातारपणाची चाहूल घेऊन आलेला कावळा कितीही हाकलला तरी फक्त माझे हातच दुखून येतील तो काही जाणार नाही किंवा भविष्य काही बदलणार नाही आणि हेच या जीवनाचं अंतिम सत्य आहे.
.................................................................................................................................................

काय कबीरासारखा संतकवी वरील आशय घेऊन या कवितेतून प्रस्तुत झाला असेल? की, त्याला पुढील अर्थ अभिप्रेत असेल?

..................की, जीवन अशा अवस्थेला आहे की, अगदीच निष्पाप, निर्विकार बालका सारखा असणारा हा जीव, भयकंपित होऊन थरथरत आहे.त्याला आता हेही माहित नाही की याचा मालक असणारा परमेश्वर याचे पुढे काय करणार आहे. थोडक्यात प्राण कोणत्याही क्षणी मला सोडून जाईल या भीतीने तो शहारला आहे.
कबीरांनी 'मत' हा शब्द वेगवेगळ्या दोह्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने मांडला आहे. साधारण मत म्हणजे मत्त. बुद्धी, नकार, मती अशा विविध अर्थछटा त्यांनी वापरल्या आहेत. इथे असे असावे की,जशी रात्र कुणाला न विचारता निघून जाते तसाच दिवसही न विचारता जातो. किंवा त्यातल्या कुणालाही थांबवणे आपल्या हातात नसते. ते ठरल्याप्रमाणे येणारे आणि जाणारे आहेत.काही गोष्टी या निसर्ग नियमाने जेंव्हा व्हायच्या तेंव्हा होतातच. काळेभोर टपोरे भुंगे उडून गेले की त्याच जागी काही खायला मिळेल म्हणून बगळे येऊन बसतात.
रात्री नंतर दिवस किंवा प्रकाशानंतर काळोख आणि काळोख नंतर प्रकाश हे जसे चक्र आहे तसेच जन्म आणि मरण हेही.जसे कच्च्या घटामध्ये पाणी कायम साचून रहात नाही ते हळूहळू पाझरून संपून जाते. तसेच या जीवनरूपी घटात असणारं आत्मारूपी पाणी एकदिवस संपणार आहेच आहे.आणि मग हा निर्मळ प्राणपक्षी उडून गेल्यावर हे शरीर निचेत पडून राहील. हे शरीर भलेही एखाद्या कुमारीकेसारखं नटवता, सजवता येईल. हा सगळा साजशृंगार आपल्या हातात असला तरी,परमेश्वराला, या जिवाच्या मालकाला, त्याचं मन बदलायला लावण्यासाठी आणि आत्मा परत मिळवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी कुठला शृंगार कामी पडणार आहे?
'काळ' रुपाने टपून बसलेल्या धूर्त कावळ्याला आपण कितीही हाकलले तरी आपले प्रयत्न व्यर्थ जाणारे आहेत ज्याचा केवळ आपल्याला त्रासाच होईल फायदा काही होणार नाही.अशा प्रकारे मृत्यू हेच अंतिम सत्य आहे असे तर कबीरजी म्हणत नसावेत?

मृत्यूवर असणाऱ्या विधात्याच्या अधिकाराविषयी तसेच मृत्युपासून वाचण्याचे कोणतेही साधन आपल्याकडे नाही आणि म्हणूनच जे आहे ते सगळे ईश्वराच्या हातात आहे.

अशा प्रकारचे मुख्यविचारही या कवितेतून येत आहेत.

अधिक समजण्यासाठी हा शब्दानुवाद .......

निर्विकार प्राणांची थरथर
न कळे काय करे प्राणेश्वर ||

रातसरे अनुदिनही तैसे
भृंग उडू जाता बक बैसे ||

कच्च्या कुंभी ठरे न पाणी
हंस उडे तनु केविलवाणी ||

करी कुमारीसम शृंगारा
परि कैसे रिझवू भर्तारा ||

करी वेदना काक उडवुनी
म्हणे कबीर ही अंत कहाणी ||

शेवटी "तरी न्यून ते पुरते...असं म्हणून थांबतो.

...............................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुरेख लिहिले आहेस शाम....

कबीराला या रचनेतून काय सांगायचे आहे याचा किती सखोल विचार केला आहेस तू...

तुझी रचना पाहून कबीरही मान डोलावतील.

दंडवत घ्यावा शामराव..

विवेचन खूप आवडलं,शाम, अगदी गुंतून जाऊन लिहिलंत म्हणून खोल पोचतंय,पद्यानुवादही एक स्वतंत्र रचना म्हणून सुंदर आहेच,पण त्याच सर्व अर्थच्छटा आणण्यासाठी पद्यानुवादावर अजून विचार करावा लागेल कारण मूळ रचनाच सोपे अर्थबंध न मांडता अंतर्मनाच्या अंतकाळच्या विस्कळितपणाइतकी अवघड आहे.
दिवसेंदिवस छान लिहिताय..पु.ले.शु.

क्या बात है! खूप सुंदर!
आणखीही असेच काही वाचायला आवडेल.