'रसम'म क्रिटिकल कंडिशनम

Submitted by अमेय२८०८०७ on 13 February, 2013 - 13:23

काय पूर्वजन्माचे धागे असतील सांगता येत नाही पण 'रसम' या प्रकारावर जे प्रथमदर्शनी प्रेम बसले ते कायमचे टिकून राहिले आहे. खरेतर ओळख जरा उशीराचीच. कॉलेजात असताना एक हरी नावाचा तमिळ मित्र वर्गात आला. जवळच रहात असल्याने अभ्यासासाठी त्याच्या घरी जाणे येणे सुरू झाले. त्याच्याघरी एका मडके सदृश भांड्यात हा पदार्थ भरून ठेवलेला असे. इतका आवडला की मी त्यांच्या खाण्याच्या वेळापर्यंत मुद्दाम रेंगाळू लागलो. लग्न झाल्यावर आणखी एका दाक्षिणात्य सहकार्‍याकडून मुद्दाम शिकून घेतली. आता आठवड्याभरात एकदातरी रसम खाल्ले नाही तर 'क्रिटिकल कंडिशनम' होण्याची वेळ येते. त्या रसमची ही रेसिपी.

साहित्यः

(अ)

तूरडाळीचे शिजवल्यावरचे पाणी ४ वाट्या
चिंचेचा कोळ २ छोटे चमचे (अति आंबट होणार नाही याची काळजी घ्यावी. माफक चिंचेची चव लागावी)
हिंग, हळद पाव चमचा
कढीलिंब ७-८ पाने (डहाळ्या नव्हे)
कोथिंबीर ५० ग्रॅम बारीक चिरून
३ मोठे टोमॅटो, उकडून, साली काढून, मॅश करून घ्या.
एक मध्यम तिखट हिरवी मिरची
मीठ चवीनुसार

(ब)

दीड चमचा जिरे, ७-८ लसूण पाकळ्या, ५-६ मिरी दाणे, अर्धा ईंच आले यांची बारीक पेस्ट करून घ्या

(क) फोडणीसाठी

एक चमचा उडीद डाळ, २ मेथी दाणे, दोन लाल मिरच्या

कृती:

(अ) व (ब) मधले सर्व पदार्थ एकत्र करा व वीस मिनिटे उकळा. पाहिजे तेवढे आणखी पाणी घाला. पाण्याचा अंदाज महत्त्वाचा नाहीतर अगदीच चव जायची. आणखी एक उकळी आली की बेसिक रसम तयार झाले.

उकळून एकजीव झाल्यावर फोडणीसाहित्य वापरून तेलाची चरचरीत फोडणी करा, वरून रसम मधे घाला.

असे रसम आणखी थोडी कोथिंबीर घालून सजवता येईल. गरम गरम खा शिवाय मुरल्यावर दुसर्‍या दिवशीही छान लागते.

ता.क. या रसममधे बाजारी मसाला घालण्याची आवश्यकता नाही तरीही आवडीसाठी एखादा मोठा चमचा घातल्यास चालेल. माफकच आंबटपणा आणायचा आहे, नाहीतर चव बिघडते. मिरी, मिरच्या यांचा तिखटपणाही अति असू नये यानुसार मात्रा ठरवावी.

हिंग, कढीलिंब फोडणीत घालू नयेत, एरवी फोडणीसाठीच जन्म पावलेले हे जिन्नस रसममध्ये मात्र पाण्यात उकळूनच चांगले लागतात.

दाक्षिणात्य लोक चिंचे ऐवजी लिंबाचा रस, ताक, डाळीच्या ऐवजी नॉन वेज स्टॉक वगैरे विविधता आणतात पण मला वरचाच प्रकार आवडतो

पहिला भात सांबार बरोबर, दुसरा रसमशी आणि मागचा भात रसम + दही /ताक याबरोबर खाण्याची पद्धत आहे.

a2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे रेसिपी Happy
रसम एकदाच माझ्या कन्नड वहिनीच्या हातचं खाल्लं आहे. सुंदर झालं होतं पण मी एकंदरितच भात, सार ह्या प्रकारांची फॅन नसल्याने केलं गेलं नाहीये.

फक्त पाणी वेगळं ठेवून डाळ कशी शिजवायची ? कुकरमध्ये शिजवलेल्या वरणात डाळ खाली आणि पाणी वर असं कधीच होत नाही. मिळून येते डाळ.
तसंच त्या नुसत्या वेगळ्या काढलेल्या डाळीचं काय करायचं ? ( सत्त्व बरचसं पाण्यात जाईल ना ? )
त्याच डाळीचे वडे आणि बरोबर रसम अशी काहीतरी शक्कल लढवता येईल का ?

मस्त आहे रस्सम! मी नेहमी एमटीआर मसाला वापरून करते. आता असं करून बघेन.

अगो, वरणात खूप जास्त पाणी घालून ब्लेंड करते मी. .

रसमचा शोध धर्मशाळेत /देवळांच्या ओवऱ्यांत झाला .कप्पालिश्वर ते कन्याकुमारी देवदर्शन करत पायी फिरणारे भाविक तमिळनाडशिवाय कुठे असणार ?रसमचे माहेर इथेच .

भातावर चवीसाठी काय हा प्रश्न सुटला .तांदूळ ,चिंच आणि रसम पोडि (तूरडाळ भाजून दळलेली +मिरी +हिंग +हळद )सहज नेता येते आणि झटपट रसम भात करता येते .टोमेटो आणि मिरच्या नंतर (पोतृगिजांमुळे)आल्या .रसम पोडित सर्दीची औषधे आहेत हे ओळखलेच असेल .
आता लग्नकार्यातल्या जेवणात मानाचे स्थान पटकावलेल्या रसमसाठी खास वेगळा आचारी बोलवावा लागतो आणि पायसमवाल्यापेक्षा जास्ती भाव खातो .
रसमम आख्यानम रोम्ब नल्लारिक्याम .

खुप सही रेसिपी..
हिंग, कढीलिंब फोडणीत घालू नयेत, एरवी फोडणीसाठीच जन्म पावलेले हे जिन्नस रसममध्ये मात्र पाण्यात उकळूनच चांगले लागतात.+++ खोखो:

खरंच तोम्पासू. परवा इथे पुण्यात साउथ इंडीज मध्ये रसम पुरी खाल्ली पाणी पुरी प्रमाणे! लाजवाब!! पुर्यांमध्ये लवंग दालचिनी आणि मिरपूड होती अगदी चिमुटभर आणि टेस्ट ट्यूब चा स्टँड असतो तश्या प्रकारे ५ प्रकारची रसम होती. पुरीत घालून एन्जॉय!! अमेय तुमच्यासाठी अगदी मस्ट ट्राय डिश आहे ही.

झंपी आणि दक्षिणा, मला प्रचंड सर्दी झाली आहे आणि ती बाहेर पडत नाहीए.. खरच खूप वर्षांनी हा एवढा त्रास भोगत्येय मी.. ना व्यायाम जमतोय ना नीट जेवण.. तुम्ही एवढं सांगताय की सर्दीवर औषध आहे म्हणून आता रस्सम उकळत्येय.. उद्या काय रिझल्ट दिसतो ते सांगतेच.. सर्दी नाही पळाली तर एकतर माझी रेसिपी चुकली नाहीतर मी प्यायला चुकले.. Sad

'पेपर रसम' ची पेस्ट मिळते 'मंबलम अय्यर' या कंपनीची. पाणी उकळायचं आणि त्याप्रमाणात ही पेस्ट घालायची. अप्रतिम चव, सर्दीवर हमखास उपाय. पेस्ट उकळत्या पाण्यात घातली की पूर्ण घरात घमघमाट सुटतो. ही पेस्ट पुण्यात शनिपाराजवळ च्या दुकानात मिळाली होती.

गायू: हे रसम पाणीपुरी केंद्र कुठे आहे पुण्यात नेमकं?

संपदा अपर्णा, साउथ इंडीज पुण्यात शिवाजीनगर ला आहे. युनिव्हर्सिटी ला जाताना पुणे सेन्ट्रल लागतं त्याच्या शेजारी लिट्ल इटली आहे. त्याच बिल्डींग मध्ये आहे. ही पहा लिंक http://www.zomato.com/pune/southindies-shivaji-nagar/menu#tabtop

गायु भरपूर धन्यवाद.:स्मित: मी आणी नवरा दोघेही रस्सम-भाताचे चहाते. आता साऊथ इन्डिजला नक्कीच जाऊ.

Pages