परत फिरा रे !

Submitted by दिनेश. on 13 February, 2013 - 08:20

एक होती.... चिऊ.
एक होता... काऊ.
चिऊचं घर होतं... मेणाचं.
काऊचं घर होतं... शेणाचं.
एकदा काय झालं... मोठ्ठा पाऊस आला
कावळ्याचं घर.. वाहून गेलं.
मग कावळा गेला... चिमणीकडे.
आणि म्हणाला, " चिऊताई, चिऊताई दार उघड."
चिऊताई म्हणाली, " थांब मी माझ्या बाळाला, अंघोळ घालते."

मग तीट लावते... घास भरवते....

माझ्या पिढीतली बहुतेक लोक, हि कथा ऐकूनच वाढली. खरं तर आईने प्रत्येक वाक्याचा अर्धा भाग
म्हणायचा आणि बाळाने ते पूर्ण करायचे, अशीच हि कथा रंगायची. माझ्या आईच्या कथेत दोन वाक्ये
जास्तीची असायची. तिच्या कथेतली चिऊ म्हणायची. " पावसा, पावसा जोरात पड. आणि कावळ्याचं
घर वाहून ने." तर काऊ म्हणायचा, " उन्हा, उन्हा कडक पड आणि चिमणीचे घर कढवून दे."

ना कावळ्याचं घर होतं शेणाचं ना चिमणीच घर होतं मेणाचं. आणि ते आम्हाला येताजाता दिसतंच होतं.
पण तरी कथेत ते तसंच असायचं आणि आम्ही पण आमच्यापेक्षा लहान बाळांना, तसेच शिकवायचो.

पण महत्वाचे म्हणजे, येताजाता चिऊ काऊ आम्हाला दिसत होते. कावळे अजूनही दिसतात, चिमण्या
मात्र शहरातून गायब चक्क लोकली एक्स्टिंक्ट झाल्या !

मी १९७४ पर्यंत मुंबईचे उपनगर असलेल्या मालाड मधे वाढलो. खरं तर उपनगर म्हणायचे कारण लोकल
ट्रेन होती, एरवी मालाड त्या काळात शांतच होते. बस, रिक्षा नव्हत्या. चक्क टांगे होते. १९७४ लाच पहिली
बेस्ट बस, मालाड पूर्वेला आली.

सध्या जिथे पिरामल हॉस्पिटल आहे तिथे चक्क आमराई होती. अहमदाबाद रोड च्या पुढे, कुरार नावाचे
छोटेसे गाव होते आणि या बाजूला देखील मोकळे मैदान होते. उत्कर्ष मंदिर च्या मागेही तळेच होते.
आम्ही रहात होतो तो भाग, दक्षिणेच्या टोकाला टँक लेन म्हणूनच ओळखला जायचा आणि तिथेही
तळेच होते. एवढे सांगायचे कारण हे कि तरीही मालाडमधे पक्ष्यांचे मोजकेच प्रकार दिसत.

सध्या मुंबईत कोकिळा, शिंपी, सनबर्ड, पोपट, बुलबुल, मुनिया ( आता तर लांडोरही ) दिसतात तसे पुर्वी नव्हते. उंचावर घारी दिसायच्या. ( आम्ही घार कोंबडी नावाचा एक खेळ खेळायचो.), कबुतरेही मोजकीच दिसायची, साळुंक्या थोड्या दिसायच्या. ( ज्या दिवशी पेपर असेल, त्या दिवशी साळुंक्यांच्या जोड्या दिसणे, अत्यावश्यक असायचे.) पण सर्वसंचार असायचा तो कावळ्या चिमण्यांचाच. आमराई असूनही, कोकिळा कधी दिसायच्या वा ऐकूही यायच्या नाहीत.

यापैकी कावळे जरा अंतर राखून असायचे. आमच्या बिल्डींगमागे जांभळाचे झाड होते. त्यावर कावळ्याचे
घरटे असायचे. आणि आमच्या बिल्डींगमधल्या एक मामी, कावळ्याचे अंडे वापरुन काजळ करायच्या.
त्यासाठी एका मुलाला घरट्यातून अंडे काढायला लावायच्या. त्या मुलावर कावळ्याचा राग असे, आणि
त्याच्या डोक्यावर कायम एक कावळा असे. ( तो मी नव्हेच.)

पण चिमण्यांचे तसे नव्हते. आम्ही त्यांना आणि त्या आम्हाला अजिबात घाबरत नसत. म्हणजे लोकमान्यांच्या खांद्यावर बसत तशा काही त्या आमच्या खांद्यावर बसत नसत, पण घरात एका हद्दीपर्यंत
त्या टुणटूण उड्या मारत येत. हि हद्द, त्यांची त्यांनीच ठरवली होती.

त्या काळात दरवाजे बंद ठेवायची पद्धत नव्हती. आई आतल्या किचनमधे असली आणि बाहेर हालचाल नसली तर त्या दरवाज्यातून ३/४ फूट आत येत. तेवढ्यात आई बाहेर आली तर बाहेरच्या बाहेर पसार होत आणि
बाहेरून कुणी आले तर किचनच्या खिडकीतून.

पण तरी आजूबाजूला त्यांचा वावर असेच. त्याकाळी रेशनवरच्याच नाही तर बाहेरून आणलेल्या ( तांदूळ
चोरून आणावा लागे. वसई नाहीतर ट्राँबेहून ) तांदळातही अळ्यांचे कोष असायचेच. त्यांनी तांदळात
जाळी करुन आठ दहा दाणे एकत्र जोडलेले असायचे. ( तांदळाला मात्र आरपार भोक पाडलेले नसायचे,
कारण त्या अक्षता ना ! ) तर अश्या जाळ्या फेकल्या कि क्षणार्धात चिमणी तो टिपायची.
चण्याची डाळ निवडताना, सालवाली डाळ पण अशीच तिच्यासाठी फेकली जायची.

वाटाणा किंवा पावट्याच्या शेंगा सोलताना, दोन चार शेंगात अळ्या सापडायच्याच. त्यादेखील चिमण्या
आनंदाने उचलून नेत. पण तरीही घरी वाळत घातलेल्या तांदळावर वा डाळीवर डल्ला मारल्याचे
दिसायचे नाही. गच्चीत वाळत घातलेल्या पापड / सांडग्यांवर पण त्या येत नसत. ( त्यावर कावळ्यांचा डोळा असे.)

त्यावेळी घरात लहानसे बाथरुम असायचे. ( मोरी ). तिथे कपडे धुवायची वा भांडी घासायची पद्धत नव्हती.
मोलकरणी त्यासाठी सार्वजनिक नळ वापरत. आमच्या बिल्डींगजवळ विहिर होती. तिथे धुणीभांडी
चालत. त्यासाठी खरकटी भांडी नेली, कि त्यावरची शितं खायला चिमण्या जमत. (क्वचित एखादी साळुंकी
त्यात इंटरेस्ट घेई.) आणि त्याला कुणाचीच हरकत नसे.

तसेच त्याकाळी घरांच्या खिडक्यांना व दरवाज्यांना व्हेंटीलेटर्स असत. ती नेहमीच किमान अर्धवट तरी
उघडीच असत. आतल्या बाजूने खुपदा देवदेवतांच्या तसबिरी असत. तर ती या चिमण्यांची घरटे करायची
हक्काची जागा होती. सगळ्यांची नजर चुकवून त्या ते घरटे बांधत असत. एखाद्या रात्री जर घरात
चिवचिव ऐकू आली तर चिमणीने घरटे केलेय, असे समजत असे.

पण घरटे काढायचा विचारही कुणी करत नसे. मोलकरणीदेखील ते काम करत नसत. पाखराचे घरटे मोडले
तर आपल्याला त्रास होतो, अशी ठाम समजूत होती.
चिमणीचे अगदी बारके पिल्लू ( आकाराने ) क्वचितच दिसे, त्या बहुदा पूर्ण वाढ झाल्याशिवाय पिल्लाला
घरट्याबाहेर येऊ देत नसाव्यात. क्वचित कधीतरी घरट्यातून अंडे खाली पडे किंवा अगदी लहान, पिसे न
आलेले लालसर रंगाचे पिल्लू पडलेले असे. ते बहुदा मेलेलेच असे.
ते उचलून बाहेर टाकले, कि कावळ्याची त्यावर झडप पडायचीच. पण एरवी कावळे क्वचितच चिमणीच्या
मागे लागलेले दिसत. कधीकधी बाकीच्या चिमण्याच एखादीला चोच मारून मारून हैराण करत असत.
अशावेळी कधी कधी ती पाठीवर पडून गयावया करताना दिसे.

मुद्दाम बघत बसावे लागायचे नाही पण ( अभ्यास करताना ) खिडकीबाहेर नजर गेली कि त्यांचे काहीना काही
चाललेले दिसायचे. भिंतीवर बसायला वाव नसल्याने, भिंतीवरचा कोळी त्यांना पकडता येत नसे पण तोच
तर धाग्याला अधांतरी लटकत असेल, तर मात्र तो त्या मटकवायच्याच. पुढे असेही बघितले, कि ते धागे
त्या घरट्यासाठी न्यायच्या.

त्यांना अंघोळ करायला मनापासून आवडायचे. अंघोळ पण दोन प्रकारची. एक असायची मातीची आणि
दुसरी असायची पाण्याची. आमचे गोटी / विटी दांडू खेळताना खोदलेले छोटेसे खड्डे हे त्यांच्या पण
आवडीचे. पण स्वतःभोवती गोल गोल फिरत त्या, ते खड्डे मोठे करुन ठेवायच्या.
विहिरीभोवती पाणी असायचेच, ते त्यांचे हक्काचे बाथरुम होते. अगदी टिचभर पाण्यातही, टेचात अंघोळ
चालायची.

मुलांच्या जगात एवढे मानाचे स्थान असलेल्या या चिमण्या, कवितेत न येत्या तरच नवल. दीपका मंडिले तूला, सोनियाचे ताट.. या आमच्या शाळेतल्या कवितेत तर बाळासाठी त्या घास घेऊन आल्याच होत्या आणि
इंदिरा संतांच्या, बाळ उतरे अंगणी मधेही बाळाच्या हातून खाऊ खायला येत होत्या.

दहा बाई चिमण्या, भारी चिवचिव
दहातनं एक गेली, नऊ उरल्या..
नऊ बाई चिमण्या, भारी चिवचिव
नवातनं एक गेली, आठ उरल्या

हे माझे दुसरीच्या वर्गातले, बडबडगीत मला अजून आठवतेय. त्या काळात "चिमणी पाखरं" असा एक चित्रपट
( बहुतेक बेबी शकुंतला चा) बघितल्याचे आठवतेय. गावाला गेलो कि हमखास बघाव्या लागणार्‍या, प्रपंच मधेही, श्रीकांत मोघेचे, चिमणीचे गाणे होते असे आठवतेय.

चिं. वि. जोशी यांचे चिमणराव, पुस्तकातून आधीच माहित होते. दिलिप प्रभावळकरांनी साकारलेला चिमणराव
पण त्याच काळात दूरदर्शनवर आला. दिवाळीच्या फ़टाक्यात पण चिडीया नावाचा एक फ़टाका असे. एक छोटी
गोल डबी आणि बाहेर वात असे. ती पेटवल्यावर सूं सूं असा आवाज करत ती वर जात असे. * पुढे त्यावर
बंदी आली.

आम्ही मुले एकमेकांचे उष्टे खात नसू पण चिमणीच्या दाताने तोडलेल्या वस्तू, उष्ट्या मानल्या जात नसत.
चिमणीच्या दाताने तोडायचे म्हणजे ती वस्तू शर्टाच्या आतमधे ठेवून, मग दाताने तोडायची. कच्चा पेरु,
चिंच, तीळाचा लाडू हे प्रकार असेच तोडत असू आम्ही. गवतातल्या एका प्रकारालाही आम्ही चिमणीचे पोहे
म्हणत असू.

कधी कधी अगदी पहाटेच चिमण्या जाग्या होऊन कलकलाट करायच्या. त्यावेळी तो प्रकार कळायचा नाही,
पुढे असे वाचले कि अमावस्येच्या पहाटे, पहाट चांदणी उगवली, कि त्या सकाळ झाली असे समजून फसायच्या. त्याला चिमणचेटकं असा शब्दही आहे.

तो काळ आराधना चित्रपटाच्या आधीचा. विविध भारतीवर, रफिचीच गाणी जास्त लागायची.
त्यातली काही खास मजेदार गाणी, आता फारशी ऐकू येत नाहीत. लाल छडी मैदान खडी, मेरे भैंस को डंडा क्यू मारा, हम काले है तो क्या हुआ या बरोबरच, चूं चूं करती आयी चिडीया हे पण असायचेच. हे गाणे लागलेय आणि खरंच उड्या मारत चिमणी घरात आलीय, हे आठवणीत अनेक वेळा आहे.

जहाँ डाल डाल पर सोने कि चिडीया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा... यातली सोन्याची चिमणी मात्र
आम्हाला ( आणि आमच्या भारतालाही ) अनोळखी होती. तसेच सोने कि चिडीया मधलीही नूतन काही
चिमणी वाटायची नाही. आम्हाला फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी... निदान गोष्टीतून तरी माहीत होती.

पण अगदी त्या अजाण वयातही, विषण्ण करणारा अनुभव, लताच्या " या चिमण्यांनो, परत फिरा रे" हे
गाणे ऐकताना यायचा. त्यातले तिन्हीसांजा जाहल्या / वाटा अंधारल्या / चिंता मज लागल्या या ओळींवर
लताने जी कारागिरी केलीय, ती त्यावेळी हमखास डोळ्यात पाणी आणायची.
कामगार सभेत हे गाणे लागलेय, आईने हाका मारल्यात म्हणून मी खेळ सोडून घरात आलोय, हातपाय धुताना गृहपाठाची आठवण झालीय... अशाच आठवणी आहेत, या गाण्याशी निगडीत. अजूनही हे गाणे असेच छळते.

आता मात्र खरेच या चिमण्यांनो परत फिरा रे.. असे म्हणायची वेळ आलीय. हिंदीतल्या "चिडीया घर" मधे
त्या बघायची वेळ न येवो, निदान माझ्या नातीला घास भरवताना, चिऊताई दिसो, असे वाटत राहते.

त्यामानाने मी भाग्यवान आहे. आता अंगोलातही भरपूर चिमण्या आहेत. अगदी हे लिहितानाही, ऑफिसच्या
काचेतल्या प्रतिबिंबाशी तिचा रोजचा झगडा सुरु आहेच.

ऑकलंडमधे पण खुप दिसतात. आपल्या चिमण्यांपेक्षा त्या जरा आकाराने मोठ्या असतात. तिथल्या एखाद्या
रम्य हॉटॅलमधे निवांत काही खात पित बसलो तर बिनदिक्कत आपल्या टेबलावर येतात. आणि कुणी
उठून गेला कि त्याच्या प्लेट्स साफ करायची जबाबदारी आपल्यावरच आहे, असे त्या समजतात.
तिथे त्यांच्याकडे कौतूकानेच बघतात. माझ्या लेकीच्या बोक्याला मात्र त्या आवडत नाहीत. आठवड्याभरात
दोन चार चिमण्यांची शिकार तो करतोच.

नैरोबीला तर आणखीनच मजा असायची या चिमण्यांची. आमच्या ऑफिसच्या जवळ, पुत्रंजीवीचे मोठे झाड
होते. आपल्याकडच्यापेक्षा तिथली हि झाडे खुपच मोठी असतात आणि पर्णसंभार दाट असतो.
तर हे झाड म्हणजे तिथल्या चिमण्यांचा रात्रीचा निवारा होता. संध्याकाळी ऑफिसच्या बाहेर मी थांबलेलो
असलो कि रोज एक विलक्षण दृष्य दिसे. गावभर उनाडक्या करुन चिमण्या तिथे परतत. पण त्या परतण्यात
एक शिस्त असे. गटागटाने त्या येत. एका गटात २०/२५ चिमण्या असत. त्या आमच्या ऑफिसच्या
कुंपणावर जरावेळ टेकत. तेवढ्यातल्या तेवढ्यात एकमेकांची खोड पण काढली जात असे. मग एक-दोन-तीन
म्हणाल्यासारख्या सगळ्या एका क्षणी उडून त्या झाडात गडप होत. अर्ध्या मिनिटात दुसरा गट येत असे.
एका दिवशी मी असे ४२ गट मोजले. दुसर्‍या बाजूने देखील असे गट येत असावेत.

त्या झाडाखाली त्यानंतर अशक्य कलकलाट चाले. तो आवाज एवढा मोठा असे कि, खाली उभे राहून बोलणे
अशक्य व्हावे. आमचा प्रॉडक्शन मॅनेजर, अजय कधी कधी माझ्या सोबत असे. त्याला सहज विचारले, कि
काय बोलत असतील त्या ? त्यावर त्याने, माझी पुढची १०/१५ मिनिटे एवढी करमणून केली कि हसून हसून
माझ्या डोळ्यात पाणी आले.

लो दिनेसभाय, या जो चकली छे ने, एम के छे कि आज तो हू, पार्कलॅंड मा गयी हती ने तो त्यारे बहु हँडसम चकला जोया. तो हू पण ब्यूटीफूल छू पण .. आ जो बिजी थी ना मारे साथे.... वगैरे ( पुढचे फक्त प्रौढांसाठी आहे Happy )

पण आपल्याला वाटते तेवढे या चिमण्यांचे जग साधेसुधे नाही. डॉ. अटेंबरांच्या लाईफ ऑफ बर्डस मधे दाखवल्याप्रमाणे त्यांच्यात बरेच सामाजिक स्तर असतात. ( ते त्यांना प्रायव्हेट, कर्नल, सार्जंट अशी नावे देतात.) कुणी कुणासमोर यायचे / वावरायचे याचे कडक नियम असतात. ते पाळावेच लागतात. त्यांच्यात्यांच्यात जुंपते ती बहुदा या मानापमानामुळेच. कुणी कुणाचा वंश वाढवायचा, याबाबत पण नियम असतात.

पण सध्या तरी त्यांचा आपल्याकडून भयंकर अपमान झाल्यासारख्या त्या रुसल्यात. कुणी म्हणतं मोबाईलच्या टॉवर्समूळे तर कुणी म्हणतं, वाडा संस्कृती लयाला गेली म्हणून... पण तरीही म्हणावेसे वाटतेच..

परत फिरा रे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, नेहमी प्रमाणे सुंदर माहितीपूर्ण लेख. बालपणाची आठवण झाली. Happy

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही>>>>>>>>>.हे गाण येईल तसं, आम्ही माझ्या भाचीला उठवताना म्हणायचो. Happy

चिमणी चिमणी वारा घाल
कावळ्या कावळ्या पाणी दे>>>>>>>>हे पाटी वाळवताना नेहमीच असे. Happy

कुणी म्हणतं मोबाईलच्या टॉवर्समूळे तर कुणी म्हणतं, वाडा संस्कृती लयाला गेली म्हणून>>>>>>>>>>>गेल्या आठवड्यात आमच्या परिसरात एक पक्षीतज्ञ आले होते. त्याना हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी एंटिना, टॉवरमुळेच चिमण्या गायब झाल्यात असे सांगितले.

हा!!!कितीवेळा वाचला हा लेख, सर्व प्रतिसादांसकट..आता बरं वाटलं Happy

दिनेश दा.. मनातून ,डोक्यात्,डोक्यातून बोटात्,बोटातून टपटप पडणारे शब्द पटपट वाचत मात्र येत नव्हते..मंतरल्यासारखं प्रत्येक वाक्य वाचताना, मन भूतकाळात जाऊन तिथेच रंगत होतं.
चिमणीच्या दाताने खाणं , चिमणी चं ते चाहूल लागताच भुर्र्र्र्र्र्र्र्कन उडून जाणं.. सगळं सगळं डोळ्यासमोरून हलेचना.. तिच्या पंखांचा आवाज ही किती भरून राहिलाय आपल्या कानांत..
मजा म्हणजे हा लेख वाचून प्रत्येक वाचकाच्या मनात चिमणीविषयी वाटणारी आपुलकीची भावना उफाळून वर येऊन त्यांच्या प्रतिसादांतून ओतप्रोत होऊन वाहू लागली..
मामी , जिप्सी ,साती च्या कविता, अशोक. चा प्रतिसाद खासच!! Happy

आमच्या भागात भरपूर कावळे ,पोपट आणि थोड्या चिमण्याही आहेत.तलावाजवळ घर आहे.अगदी थोड्या वेळेपुरती ,वेगवेगळ्या जागी भरणारी कावळ्यांची कलकलाटाची तरीही काहीशी शिस्तबद्ध सभा मी आवडीने पहाते.चिमण्यांचा मधुर कलरव,संध्याकाळी गावठी पोपटांची दणदणीत शीळ दररोज ऐकु येते.कधीतरी मैना दिसतात्.कोकिळ ही साद घालतात.इतकं छान वाटतं.पण म.प्र.मधे असताना [मोठ्या शहरात व खेडेगावात देखील]मात्र एकही चिमणी दिसली नाही."सोनचिरेय्या"शब्द फक्त पुस्तकीच आहे.चिडिया पुस्तकातल्या चित्रातच दाखवावी अशी परिस्थिती आहे.

आपलं अवघं बालपण व्यापून टाकणारी चिमणी.. किती साधीशी गोष्ट पण हातातून निसटून गेल्यासारखी वाटतेय.
पण सगळ्यांचे प्रतिसाद वाचून वाटलं, खरंच येईल ती परत. यावेच तिने.

केवढं सुंदर लिहिलं आहे, दिनेशदा! खूप आवडलं!
परवाच घरसमोरच्या गच्चीत २ चिऊताया आल्या आणि इतकं छान वाटलं ना! असं वाटलं त्यांना सांगावं की येत जा अशाच.. घर कसं गजबजल्यासारखं वाटतं...

एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. लहानपणी पुण्यात अगदी पेठेत सुद्धा अमाप चिमण्या दिसत. आता गायब. Sad

इथे कलकत्त्यात मात्र अजूनही आमच्या घरात बाहेरच्या व्हरांड्यात चिमण्यांचं घरटं आहे कित्येक वर्षं. गेल्या वर्षी गायब होत्या. परत दिसायला लागल्यात. त्यांचं आमचं सहजीवन सुखात चालू असतं. कधी त्यांची पिल्लं खाली पडली तर कलकलाट करून आमचं लक्ष वेधून घेतात मग आम्ही अल्लाद वरती उचलून ठेवतो. ठेवेपर्यंत शेजारी ग्रिलवर बसून चिवचिवाट करून देखरेख करतात. इमारतीच्या मागच्या बाजूला जमिनीखालची पाण्याची टाकी सकाळी काही मिनिटं जरी ओव्हरफ्लो झाली तरी तिथे मनमुराद आंघोळ करायला चिमण्या आणि साळुंक्या, क्वचित बुलबुलही येतात. अनेक वेळा साळुंक्यांना पण व्हरांड्यात वरती घरटं करायचं असतं तेव्हा या भांडकुदळ चिमण्या त्यांना अजिबात थारा मिळू देत नाहीत. सगळ्यात मजा म्हणजे आमच्या घरातल्या कुठल्याही मांजरानेही कधी या चिमण्यांना इजा केलेली नाही.. सगळे गुण्यागोविंदाने नांदतायत.
परवा एक शोभेचं घरटं आणलंय ते खिडकीच्या ग्रिलला टांगून ठेवलंय. कधीतरी कुणी चिऊताई किंवा छोटा पक्षी तिथे घर करेल अशी अपेक्षा आहे. Happy

लेखाचे शीर्षक वाचुन वाटले परदेशातल्या चिमण्यांना घातलेली साद आहे.
नंतर कळलं खर्या खुर्या चिमण्यांनाच परत बोलावताहेत.
सुंदर लिहिलय. आवडलं. Happy

सुंदर लेख आणि ससुंदर प्रतिसाद. मन भरून आले. चिमण्यावरील विविध लेख, विशेषतः ग्रेस यांचा आठवला.

आमच्या घरातील चिमण्या मांजरामुळे गेल्या. National geographic चे अलिकडचे estimate - मांजरे वर्षाला ५० कोटी पक्षी मारतात.

छान लेख. मध्यंतरी दैनिक सकाळ या पुणे या शहरातील आघाडीच्या वर्तमानपत्रात (असेच म्हणतात) चिमण्या कुठे गेल्या म्हणून एक पत्र प्रसिद्ध झाले. मग वाचकांच्या पत्रव्यवहारात चिमण्या हाच एक विषय अनेक दिवस होता. पुढे लेख आले, नंतर फटाक्यांची लड संपल्यावरही एखादी फुसकांडी उडते तशी दोन चार पत्रे आली आणि सगळंच शांत झालं. पुढे चिमण्यांचं काय झालं कोण जाणे.

शीर्षक वाचून माबोवरून उडालेल्या, उडवलेल्या चिमण्यांना आवाहन असावं या भीतीने आधी पाहीलंच नव्हतं.

सुंदर..... एकदम ओघवतं लिहिलं आहे.

पुण्यात मामाच्या वाडयात स्वयंपाकघरामागे एक झाड होते. सकाळ संध्याकाळ चिमण्यांचा कलकलाट असे. आजी म्हणे, "नीट ऐक, त्या क्रुष्ण .. क्रुष्ण म्हणतात." खरेच आजीने सांगितल्यावर मलाही तसेच वाटायचे.

... तुमचा लेख वाचून सगळेच आठवले... क्रुष्ण.. क्रुष्ण.. चिमण्या आणि आजीसुद्धा....

सध्या घरी जो बाजरीचा खाऊ चिमण्यांसाठी ठेवते तो खायला मात्र निदान १२-१५ चिमण्या दिवसभर येतात. आतासुद्धा चिवचिवाट चालू आहे.

अतिशय सुरेख लेख ! कबुतरे कमी करण्याचा आणि चिमण्यांना परत आणायचा काहीतरी उपाय हवाच आहे.
(अगदीच अवांतर - एक कविता रेडिओवर ऐकली होती .
एक होती चिमणी. एक होता कावळा.
चिमणीचं घर सत्याचं; कावळ्याचं घर स्वप्नांचं.
वास्तवाचा एक दिवस धुवांधार पाऊस पडला.
कावळ्याचं घर वाहून गेलं.
कावळा गेला चिमणीकडे. भावनाविवश होउन काही बोलला.
पण चिमणीचं दार उघडलं नाही.
गोष्ट अखेर तीच घडली !)

खूप आवडला लेख दिनेशदा, मार्मिक निरिक्षणे..
""( तांदळाला मात्र आरपार भोक पाडलेले नसायचे,
कारण त्या अक्षता ना ! ) '' हे मस्तच

या भवान्या आता वांद्र्यात परतल्यात म्हणून आनंद झालाय आम्हा सर्वांना इथल्या.
रच्याकने, 'गॅलरी फार्मिंग'मधली इवलुशी रोपे अन कळ्या या बाया फस्त करतात तो मात्र त्रास आहे.काही निरुपद्रवी इलाज आहे का ??

खूपच सुरेख लेख! दिनेश, सहज नोंदवल्या सारख्या अनेक निरीक्षणांबद्दल खरोखरच कौतुक. सत्तरीच्या दशकातल्या मालाडच वर्णन वाचून गंमत वाटली.

खूप सुंदर लेख! आणि सार्‍यांचे प्रतिसादही!

आपलं अवघं बालपण व्यापून टाकणारी चिमणी.. किती साधीशी गोष्ट पण हातातून निसटून गेल्यासारखी वाटतेय.>> Sad

भारती, जाळी लावावी लागेल किंवा मांजर पाळावी लागेल.
श्रीकांत इंगळहाळीकरांनी असा अनुभव नोंदवलाय, कि पक्षी त्यांच्या गरजेपुरतेच खातात, उगाच नाश करत नाहीत.

मी चिमण्यांच्या सामाजिक स्तरांबद्दल लिहिले होते, त्याचा संदर्भ इथे आहे. http://en.wikipedia.org/wiki/The_Life_of_Birds

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून, खुप छान वाटले.

दिनेशदा :
लेख खुप आवडला आणि शिर्षक सुध्दा अतिशय समर्पक दिल॑य (परत फिरा रे ). सुरवातीला लेख वाचताना अलगद भुतकाळात गेल्यासारख॑ वाटल॑. तस॑ मी सुद्धा चिमण्या आणि इतर पक्षा॑च्या सानिद्ध्यात बालपण घालवल॑य; मला चा॑गल॑ आठवत॑ की लहाणपणी गावाकडील अ॑गणात असणार्‍या कडूलि॑बाच्या झाडावर पोपटा॑च॑ जोडप॑ अ॑डी घालायच॑ आणि आम्ही त्या॑ची पिल्ले मोठी होताना पहायचो. खर॑च या सगळ्या॑पासून आपण फार ला॑ब चाललोय. लेख वाचून लहानपणीच्या आठवणी॑च॑ पुनश्च स्मरण झाल॑ आणि नकळत आपण काही गोष्टी॑पासून कीती दुरावलोय याची जाणीव झाली. दिनेशदा पुन्हा एकदा मी आपला खुप - खुप आभारी आहे.

Pages