विचक्षणोऽयं शान्तासूनु:

Submitted by चैतन्य दीक्षित on 12 February, 2013 - 13:19

केवळ 'संस्कृत भाषेविषयीचं प्रेम' ह्या कारणामुळे पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे काही माजी विद्यार्थी एकत्र येतात आणि ठरवतात की 'काही तरी करायचंच' ! मग एक कल्पना समोर येते की सगळ्यांनी मिळून फर्ग्युसन महाविद्यालयाद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या 'संस्कृत एकांकिका स्पर्धे'त भाग घ्यायचा. अर्थात्, स्पर्धा म्हणून नव्हे, तर केवळ आपल्यातलं संस्कृत 'जिवंत' रहावं म्हणून. ही कल्पना सगळ्यांनाच आवडते आणि स्पर्धेच्या आयोजकांकडूनही त्यांना संमती मिळते. मग काय, अशा संस्कृतवेड्या ७-८ जणांचा 'मनस्वी' नावाचा एक संघ तयार होतो.
२०१२ मधल्या स्पर्धेत 'चूक-भूल द्यावी घ्यावी' या नाटकाचं संस्कृत रूपांतरण करून नाटक प्रस्तुत केल्यानंतर ह्या वर्षीच्या स्पर्धेत अजून छान, वेगळं असं काही तरी आपण करू शकू हा आत्मविश्वास सगळ्याच 'मनस्वीं'च्या मनात होता. त्यामुळेच मराठीतल्या भाषिक विनोदांना संस्कृतात आणण्याचं अवघड काम करायचं ठरवून, श्रीनिवास भणगे लिखित 'शांतेचं कार्टं चालू आहे' या धमाल विनोदी नाटकाचं संस्कृत रूपांतरण 'मनस्वी'च्या सदस्यांनी केलं. काल (११ तारखेला) भरत नाट्य मंदिर इथे ही संस्कृत एकांकिका स्पर्धा झाली आणि तिथे 'मनस्वी' संघाने सादर केलेली 'विचक्षणोऽयं शान्तासूनु:' ही एकांकिका सगळ्यांच्याच कौतुकास पात्र ठरली.
मूळ मराठी नाटकाचं संस्कृतात भाषांतर (खरं तर रूपांतर) करण्याची अवघड जबाबदारी पेलली होती 'अमोघ प्रभुदेसाई' याने. पुणे विद्यापीठातून संस्कृत विषय घेऊन एम्. ए. केल्यानंतर अमोघ सध्या पी.एच्.डी करतोय. अमोघने केलेल्या नाटकाच्या भाषांतराचं एकांकिकेत रूपांतर आणि दिग्दर्शन करण्याची जबाबदारी प्रीतम जोशीने घेतली. प्रीतम सध्या सांगलीच्या पटवर्धन हायस्कूल इथे संस्कृत शिक्षक आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नाटकाच्या तालमीला सुरुवात झाली. तेव्हा प्रीतम शनिवार-रविवार सांगलीहून पुण्यास येत असे आणि सगळ्यांकडून तालीम करवून घेत असे. नाटकातली मुख्य भूमिका- अर्थात 'शाम्या' साकारला होता 'आनंद शुक्ल'ने. आनंद सध्या जर्मन लँग्वेज स्पेशालिस्ट म्हणून एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतोय. त्याच्या पत्नीने 'रेणुकाने' कजाग शांतेचं पात्र उत्तम वठवलं. मूळ नाटकातल्या सुधीर जोशींच्या भूमिकेत होता 'अधीश गबाले' तर 'दया करमरकर'च्या भूमिकेत होती अधीशची पत्नी 'प्रिया'. हे दोघेही संस्कृत भाषा न शिकलेले असे. अधीश 'सी.डब्लू.ए.' आहे आणि ९१.१ रेडिओ सिटीचा आर्. जे. ही आहे.
प्रिया जर्मन लँग्वेज अ‍ॅनालिस्ट आहे. या दोघांनीही खूप सफाईने नाटकातले संस्कृत संवाद म्हटले. या नाटकानंतर अधीशला संस्कृत-सम्भाषण शिकायची तीव्र इच्छा झाली आहे, हे 'मनस्वी' चं यशच म्हणावे लागेल. नाटकातल्या काकासाहेबांची भूमिका केली होती 'ओंकार जोशी'ने. ओंकार जोशी सध्या 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप' मिळवून पुणे विद्यापीठातून पी. एच्. डी. करतोय.
मूळ नाटकातली 'माया साने'ची भूमिका केली होती 'तेजस्विनी'ने. तेजस्विनीही 'सी.डब्लू.ए.' आहे आणि पूर्वी संस्कृत न शिकलेली आहे. तिनेही संस्कृतात सफाईदारपणे संवाद म्हटले.
नाटकातल्या मुख्य पात्रांव्यतिरिक्त बॅक-स्टेज सांभाळलं ते मेघा, मयूरी, नेहा, भाग्यश्री, अर्चना, स्वरमुग्धा यांनी.
संगीत- सुमीत यादवने सांभाळलं आणि प्रकाशयोजना सांभाळली मिहिर कुलकर्णीने.

मूळ नाटकातले संवाद संस्कृत भाषा न शिकलेल्यांनाही समजतील अशा प्रकारे संस्कृतात आणणं हे खरंच खूप कठिण काम. पण ते करताना काही मराठी इंग्रजी शब्द जसेच्या तसे ठेवण्यात आले होते. जसे की 'धिस इज मात्र टू मच हं' ह्या मूळ संवादातलं 'टू मच' हे संस्कृत संवादातही तसंच ठेवलं होतं. असं करण्यामागे 'कुठे तरी केवळ संस्कृत शब्दांचा हट्ट धरून आपणच संस्कृत भाषेला बांध घालतो आहोत का?' हा अनुवादकाचा विचार संस्कृत शिकणार्‍या आणि शिकवणार्‍या सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे असं मला वाटतं.

असो, एखाद्या वर्तमानपत्रातल्या बातमीप्रमाणे वाटेल असा हा लेख इथेच आटोपता घेतो. पण लेखनोद्देश इतकाच की संस्कृत-भाषा शिकणारे कमी नाहीत, संस्कृतभाषेच्या प्रसारासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करणारेही कमी नाहीत. तेव्हा संस्कृत-भाषा शिकायची इच्छा असेल तर 'आजकाल कोण शिकतोय संस्कृत?' अशी शंका कुनालाही येऊ नये.

मी ह्या वर्षीच 'मनस्वी'चा सदस्य झालो असल्याने, ह्या वर्षी फक्त 'फोटो काढणे' इतकीच जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा नाटकातल्या काही प्रसंगांचे फोटो खाली देतो आहे.
संस्कृत शिकू इच्छिणार्‍या किंवा संस्कृत नाटकात काम करण्याची इच्छा असणार्‍या किंवा नाटकाच्या तांत्रिक बाजू सांभाळण्यात रस असणार्‍या मायबोलीकरांचं 'मनस्वी'त स्वागतच आहे!

१) दया आणि शाम्या-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:

२) काकासाहेब-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:

३) व्यंकू-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:

४) शांता-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:

५) माया साने-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:

६) इन्स्पेक्टर आणि नाटकाचा अनुवादक- अमोघ प्रभुदेसाई.
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:

७) सर्व पात्रे-
From विचक्षणोऽयं शान्तासूनु:

८) मनस्वी संघ Happy

From विचक्षणोऽयं शान्तासूनु:

धन्यवादा: !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या दोन एकांकिकांचा आणखी एक प्रयोग २७ जुलै ला मुंबईतदेखील होणार आहे.

स्थळ- महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
वेळ- संध्याकाळी ५ वाजता

संस्कृत काहीही कळत नाही, तरीसुद्धा तुमचा हा प्रयोग खरोखरीच कौतुकास्पद आहे...

अभिनंदन आणि शुभेच्छा...

अधिक हा लेखही आवडला :- http://www.loksatta.com/sampadkiya-news/featured-article-on-sanskrit-lan...

विजय देशमुख,
लिंकबद्दल धन्यवाद.
तुम्ही दिलेला लेख लिहिलेले प्रसाद भिडे हे मुंबईच्या रुईया महाविद्यालयातर्फे सादर होणार्‍या एकांकिकेत महत्वाच्या भूमिकेत आहेत.

येत्या गुरुवारी ह्या नाटकाचा प्रयोग होणार आहे.
दिनांक- १६ जानेवारी २०१४
वेळ- रात्रौ ९:३० वाजता
ठिकाण- भरत नाट्यमंदिर, पुणे
तिकीट- ५०/-
तिकिट विक्री भरत नाट्य मंदिर इथे सुरू आहे.
सर्व संस्कृतप्रेमींना आग्रहाचं निमंत्रण.

धन्यवादा: !

-चैतन्य दीक्षित

फार छान.
ज्यांना भाषेविषयी प्रेम असते तेच समजू शकतील असे का करायचे ते.

ज्यांना समजते मराठी किंवा संस्कृत त्यांना या भाषेत किती छान लिखाण आहे ते कळेल. पण त्याला आवडच पाहिजे.

बाकी ती भाषा तळागाळापर्यंत पोचवणे, आपल्या मुलांना संस्कृत शिकायची बुद्धि व्हावी हे सगळे कुणास ठाऊक.

"ज्यांना समजते मराठी किंवा संस्कृत" त्यांना या भाषेत किती छान लिखाण आहे ते कळेल.
<<
इंग्रजीतून मराठीचे सुलभ ट्रान्स्लेशन Wink

ज्यांना समजते मराठी किंवा संस्कृत" त्यांना या भाषेत किती छान लिखाण आहे ते कळेल.
<<
इंग्रजीतून मराठीचे सुलभ ट्रान्स्लेशन डोळा मारा >>>>>>>>>>>

इब्लिस, दुर्दैवाने माझही बरेचदा असं होतय. याला काय उपाय करावा, कळत नाही. तरी बरं इंग्रजीचं वाचन यथातथाच आहे. Happy

नाटकासाठी शुभेच्छा.

Pages