शालेय मुलांसाठी सायन्स प्रॉजेक्ट/ आर्टस अँड क्राफ्ट इ.

Submitted by मी_आर्या on 12 February, 2013 - 05:23

नमस्कार,

सध्या शाळेत केजी पासुन मुलांच्या शाळेत आर्ट्स अँड क्राफ्ट एक्जिबिशन, सायन्स फेअर वै. होतात.
मुलांना शाळेतुनच विषय दिला असेल तर ठीक नाहीतर काय करावं हा विचार करतच वेळ जातो. आई वडीलही मुलांना त्यांचं अडेल तिथे मदत करतातच. इथे आपल्या मुलांच्या प्रॉजेक्ट्साठी काय काय बनवले/ ठेवले होते किंवा त्या साठी नव नविन आयडीयाज या गोष्टी शेअर करुयात.

सुरुवात करते माझ्यापासुन. मला कमित कमी खर्चात आणि अव्हेलेबल नॅचरल रिसोर्सेसमधे पण हुबेहुब आणि नॅचरल वाटाव्यात अशा वस्तु मुलाने बनवाव्यात असे वाटत होते. त्यामुळे मी त्याला तशाच आयडीया दिल्यात.

१) मुलगा के जी मधे होता तेव्हा त्यांना क्लेपासुन मिठाई बनवायला सांगितलं होतं.
मी मुलाला दिवाळीतला गिफ्ट येतो तसा हार्टशेप बॉक्स दिला . वेगवेगळ्या रंगाची क्ले घेउन त्याचे पेढे, गुलाबजाम,सोनपापडी, जिलबीचे आकार करायला सांगितले.
गुलाबजाम करतांना एकदम डार्क ब्राउन कलरची क्ले नव्हती म्हणुन डार्क पर्पल कलरची क्ले घेउन त्याला लांबुळका आकार करुन तो खरा खुरा वाटण्यासाठी चक्क साखरेत घोळण्याची आयडीया दिली. एवढा डिट्टो जमला होता, की टीचर्स आणि पॅरेन्ट्ससुद्धा उत्सुकतेने बघत होते. एक मिठाई तळलेल्या कुरड्यांच्या चुर्‍यात घोळली. तर पिवळ्या रंगाच्या क्लेचा चौकोनी तुकडा/ ठोकळा करायला सांगितला. मुलाला रेझर हातात धरता येणार नाही म्हणुन आम्हीच त्यावर बारीक बारीक चिरा दिल्या....हुबेहुब सोनपापडी दिसायला लागली.

२) १ली त असतांना मुलाला पुन्हा मातीची फळं बनवायला सांगितली होती. यावेळेस फळांच्याच आकाराची बनवायची आणि क्ले खुप लागेल म्हणुन काळी माती आणली. गाळुन घेउन ती भिजवली. तिची छान खर्याखुर्या आकाराची आंबा, पेरु, चिक्कु, पपई, सफरचंद, सिताफळ,केळी अशी फळ बनवली. थोडा वेळ वाळवायला ठेवली (खुप वाळली की तडे जातात). अर्धवट वाळलेली असतांनाच त्यांना त्या त्या फळाप्रमाणे कलर दिले. त्यांना देठाच्या जागी काडीने आधीच छिद्र करुन ठेवलं. दुसर्‍या दिवशी ऐन शाळेत जायच्या वेळेस बागेतली पेरुची, आंब्याची, सिताफळाची, चिक्कुची पानं तोडुन आणली आणी देठाच्या जागी खोचुन ठेवली.

३)मुलगा ४थीत असतांना ख्रिसमसच्या वेळेस जनरली सगळ्या मुलांना सांगतात तसच यांनाही ख्रिसमस ट्री, सांता इ. बनवायला सांगितलं होतं. आम्ही एक रिकाम्या खोक्याचं घर बनवलं, थर्माकोलचा ख्रिसमस ट्री, त्याला मधुन मधुन कापुस चिटकवलेला. घराच्या वर आणि आजुबाजुला भुरभुरलेला बर्फ दाखवण्यासाठी कापुसाचे अगदी छोटे छोटे गोळे करुन लावले. आणि मुख्य म्हणजे घराचा दरवाजा दाखवतांना आयडीया केली ती अशी की पिवळ्या रंगाचा जिलेटीन पेपर घेउन त्याला दाराच्या आकारात, त्या प्रपोर्शनमधे कापलं. त्यावर अधिक (+)या आकारातली पांढर्या पेपरची छोटीशी पट्टी चिटकवली. जिलेटीन पेपरमुळे काचेचं दार आणि पिवळ्या रंगाच्या जिलेटीनने आतुन बाहेर येणारा लाईटाचा पिवळा प्रकाश असा इफेक्ट आला. हे असं घर 'होम अलोन' मधे पाहिल्याचं आठवत होतं. Happy

४) ५वीत असतांना त्याला वर्गात ठेवण्यासाठी 'वृक्ष व त्यांचे उपयोग' यावर चार्ट बनवायचा होता. नुसतं रंगिबेरंगी स्केचपेनने लिहिण्यापेक्षा खरोखरची फळं,फळभाज्या, धान्य, मसाल्याचे पदार्थ, सुका मेवा, एवढच काय रबर, कागद,पेन्सील, कपाशी, इ. इ वापरायचं ठरलं.
चार्टवर फळ चिकटवणं अवघड होतं....कारण कागदाचं वजन वाढलं असत. एक छोटं सफरचंद घेउन ते बरोब्बर मधोमध अर्ध कापलं. कडा आणि कडेचा थोडा पांढरा भाग तसाच ठेउन ते पोखरुन काढलं. त्या अर्ध्या भागाच्या कडेवर फेव्हिकॉल लावुन तसच ते फळ चार्टला चिकटवुन टाकलं. लवंग, मिरे, दालचिनी छोटे छोटे असल्याने तसेच चिकटवले. तर ज्वारी, बाजरी, गहु , मका त्या त्या कणसाचं ड्रॉईंग काढुन त्यावर तसे दाणे चिटकवले(मक्याचे दाणे मोठे असल्याने ते ही उभे अर्धे केले, व मक्याच्या कणसाची वरुन असतात ती पाने त्या आकारात कापुन त्यातुन मक्याचे कणिस डोकवतांना दाखवले). कागदासाठी छोटी डायरी चिटकवली त्यावर अर्धे पेन्सिल, आणि छोटसं रबरही लावुन दिले. सुका मेवा...काजु, बदाम, पिस्ता ही अर्धे कापुन लावले. कपाशी साठी नुसता कापुस लावला तर तो वाईट दिसेल म्हणुन कपाशीचं बोंड बनवलं. त्यातही मसाला वेलचीचे टरफल घेउन ते इंग्रजी व्ही आकारात चिटकवुन त्याच्या पुढे कपाशीच्या बोंडाच्या आकारात कापुस चिटकवला.
टीचरला चार्ट भारी आवडलेला.

५) मुलगा ७वीत होता त्यावेळेस त्याला civics चा प्रॉजेक्ट करायला सांगितला होता.एक साधारण शहराकडे झुकणार्या गावाचं मॉडेल बनवायचं होतं. त्यात जुन्या कौलारु घरांबरोबरच सिमेंटची बिल्डींग, स्कुल, कॉलेज, बँक, रस्ते, रस्ते सुशोभीकरण, पोस्ट ऑफीस, पाण्याची टाकी, कॉलेज ग्राउंड, त्यावर स्विमिंग टँक हे सगळं बनवायचं ठरलं. एक मोठी जुनी वुडन फ्रेम उलटी करुन त्यात हे सगळे बसवायचं होतं.
साहित्याची जमवाजमव सुरु केली. 'सुरु'च्या झाडाची सुकलेली फळं (झाडांसाठी), आयड्रॉप्स/ इयरड्रॉप्सचे येतात तसे रिकामे खोके (घरासाठी),पुठ्ठ्याचा खोका घेउन त्याच्या कागदात एक झिग्जॅग आकाराची लेयर असते ती कौलारु/पत्र्याच्या घरांसाठी, गहु निवडतांना सापडतात ते ओंब्याच्या स्वरुपातले गहु(छोट्या झाडांसाठी) घेतले.
सर्वात आधी रस्ता बनवला. इंग्रजी एस आकाराचा नागमोडा रस्ता कागदाचा कापला. त्याला ग्रे रंग दिला.नंतर त्यावर ब्रशने डिंक लावुन वरुन माझ्याकडे होती ती नर्मदा रेती भुरभुरली. झाला मस्त डांबरी रोड तयार. रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी चौकात छान सर्कल काढले. सुरुच्या झाडाची वाळलेल्या फळांना हिरवा रंग देउन रस्त्याच्या साईडने चिटकवले.
सुदैवाने, त्याच सुमारास माझ्या वडीलांचे डोळ्याचे मोतीबिंदुचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे आय्ड्रॉप्सचे भरपुर बॉक्स मिळाले. तसच घरात झालेल्या फर्निचरच्या कामाने छोटे छोटे लाकडी ठोकळे घरांसाठी वापरले. त्यावर त्या पुठ्ठ्यातुन झिगझॅग आकाराची लेयर काढुन ते कौलांसारखे चिटकवुन त्याला तपकिरी रंग दिला. बॅंकेच्या आधुनिक इमारतीला निळ्या जिलेटीन पेपरचा फॉर्म्युला वापरायला सांगितला. म्हणजे बाहेरुन ती काचेची बिल्डींग वाटत होती.
शाळेला षटकोनाच्या तीन बाजुंसारखा आकार (/-\ असा) दिला. शाळेला कंपाउंड, कंपाउंडच्या बाजुने झाडं, अर्धगोलाकार गेट, गेटवर शाळेचे नाव, फाटक, शाळेच्या भिंतींवर फुले, आंबेडकरांचे फोटो. आणि शाळेच्या मुख्य ऑफीसच्या एंट्रीला झाडांचे सर्कल... हे सगळं बनवायला सांगितलं.
कॉलेजची बिल्डींग, त्यासमोर ग्राउंड. तिथे एका कोपर्यात थोडा उंचावर स्विमिंग टँक. स्विमिंग टँकसाठी एका छोट्या चौकोनी खोक्यावर आयताकार खाच केली. त्या खाचेत त्याच आकाराचा निळाशार पाण्याचा फोटो(एका मासिकातुन कापुन)लावला. वरुन आयताकार काच बसवली.
पाण्याची टाकी: याला जरा डोकं चालवावं लागलं. काळ्या मातीचे चार ठोकळे बनवले. ते ओले असतांनाच त्यांच्यात एकसारक्या आकाराच्या झाडुच्या काड्या खुपसुन बसवल्या व नंतर वाळायला ठेवले. ते आमच्या टाकीचे पिलर झाले. वरुन एक साधारण आकाराचा गोल प्लॅस्टीकचा डबा पालथा मारला. त्याला वरुन बदामी रंगाचा कागद चिटकवला. त्या झाडुच्या काड्या दिसु नयेत म्हणुन त्यांनाही बाहेरुन बदामी कागदाच्या पट्ट्या लावुन ते झाकुन टाकले. लहानपणी कार्यानुभवात कागद फोल्ड करुन फॅन करायचो. त्याची आठवण ठेवुन तसाच पण छोटासा जिना खालपासुन वरपर्यंत तयार केला व दिला तो ही चिकटवुन.
पोस्ट ऑफीससाठी कौलारु घर व त्याच्यापुढे एक छोटीशी दंडगोलाकार पुंगळी ठेवली(लाल रंग अर्थातच दिला होता)त्यावर मुलांची बड्डे कॅप बनवतो तशीच त्रिकोणी टोपी बनवुन ठेवली. झाली पोस्टाची पेटी तयार.

दुर्दैवाने, या एकाही मॉडेलचा फोटो काढलेला नाही. त्यामुळे Sad
पण मॉडेलची एक आयडीया यावी म्हणुन हे ड्रॉईंग टाकत आहे.
final

आमचे मॉडेल जजेस व स्कुल प्रिन्सिपॉलने अ‍ॅप्रिशियेट केले हे वेगळे सांगायला नकोच. Wink

धन्यवाद!
आपल्याकडेही अशा काही आयडीया असतील तर त्या इथे शेअर कराव्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या रविवारीच ट्रांस्पोर्टेशन मॉडेल प्रोजेक्ट म्हनुन मी आणि मुलान ट्रेन (ईंजिन + १ डबा) बनवला. रेफरन्स म्हनुन थॉमसच ईजिन वापरल. फोटो बिटो काढण्याइतपत चांगल झाल नव्हत. पण यावेळेस मी पोरालापण कामाला लावल हीच काय ती जमेची बाजु. नाहीतर माघच्या प्रोजेक्टला मी आणि बायको त्याचा प्रोजेक्ट करत होतो आणि हे खेळत होते.

<<नाहीतर माघच्या प्रोजेक्टला मी आणि बायको त्याचा प्रोजेक्ट करत होतो आणि हे खेळत होते.<< Lol
त्यांना सोडायचच नाही रे! आपण फक्त अडल्यावर मदत करायची.

माझा पोरगा ८वीत असतांना त्याला लाईट रिफ्रॅक्शन बेसवर सायन्स प्रॉजेक्ट दिला होता. आर्टीफिशियल इंद्रधनुष्य बनवलं होतं. काही केल्या इमेजच दिसत नव्हती. कारण तो भिंतीवर ब्लॅक पेपर लावुन प्रयत्न करत होता. खुप खटपट करावी लागली. मग त्याला व्हाईट पेपर वापरायचा सल्ला दिला.

त्यांना सोडायचच नाही रे! आपण फक्त अडल्यावर मदत करायची.
त्यानी तर त्याच्या ३-४ गाड्या भरल्या होत्या स्कुल बॅगमधे. हेच दाखवतो म्हणाला. त्यापेक्षा हे बर

तुमच्या काही काही आयडिया चोरणेबल (!!!) आहेत... वेळीच चोरल्या जातिलच माझ्या कडुन.

माझी लेक पण उत्साही आहे. आमचे काही उपत्द्व्याप....

४थीत असताना सायंस प्रॉजेक्ट्ला ज्वालामुखी तयार करायचा होता. मग क्लेचा माउंटन केला. आजुबाजुला जरा वातावरण निर्मिती साठी रखरखीत भाग दाखवला. त्या क्लेच्या डोंगरात आत खाच करुन एक एकदम लाबुळकी नळी बसवली. त्यात सोडा (लिक्वीड) भरला आर्ध्या पर्यंत त्यात लाल रंग मिसळला. ज्वाला मुखी ची माहिती एका चार्ट्वर तयार केली. जेंव्हा कोणी ज्वाला मुखी पहायला येत त्या वेळेस सोड्यात मीठ आणि लिंबाचं मिश्रण घातलं की तो फसफसुन वर यायचा आणि लाव्हा बाहेर आल्याचा इफेक्ट मिळायचा.--- याला खुप रीस्पॉन्स मिळाला

मागच्या वर्षी (५ वीत ) जॉग्रोफी ला आम्ही जंगल तयार केल होतं.... एका मोठ्या खोक्यात ब्राउन क्ले ने आधी जमीन तयार केली. क्ले चाच एक हील तयार केला. खालच्या बागेतुन खरं गवत आणुन ते बारीक कापुन ते झुडुपं म्हनुन त्या क्ले मधे खोवलं.. मस्त हिरवळ आणि ग्रीन पॅचेस तयार केले. मग खर्‍या झाडाचा इफेक्ट येण्या साठी झाडांचे कट आउट कापले ते त्या जमिनीवर खाच बनवुन आधी फिक्स केले. मग त्या वर फेविकॉल आणि रंगांच्या मदतीने खरी पाने मिनिएचर आकारात कापुन कॅनॉपी तयार केली. खोडा साठी रफ हँडमेड पेपर वापरला. मस्त झाडं तयार झाली. माकड, हरीण असे प्राण्यांचे कट आउट कापुन घेतले त्या वर प्राण्यांचे फोटो मधे कापुस भरुन माउंट केले. असे अनेक प्राणी दाखवले. झालं जंगल.... टिचर एकदम खुश ...

या वर्षी ( ६ वीत ) मागच्याच महिन्यात तिला मिनरल्स हा सब्जेक्ट होता. मग आम्ही सोन्याची खाण तयार केली. एका मोठ्थ्या खोक्यात खाणीचा देखावा तयार केला. खरी माती लावुन बेस केला. दोन कामगार व एका इंजिनीअर चे कट आउट्स लावले. सोने मिश्रीत माती ची ढेकळं तयार केली त्या करीता क्ले आणि सोनेरी चमकी, माझी जुनी सोनेरी आयशॅडो पावडर आणि रांगोळी वर आपण भुरभुरवतो ती चमकी ह्याचा वापर केला. आत दोन ट्रक दाखवले. एकात ही ढेकळं भरलेली दाखवली. दुसरा ड्रेजर होता. ( खेळणी वापरली). त्याच्याच कॉर्नर् ला एका मोटर व पेन्सील सेल च्या सहय्याने पुली तयार केली. पुलीच्या चाका साठी शिवण यंत्राची बॉबीन वापरली. त्याला एक शांपुच्या बाटलीचे झाकण बादली म्हणुन जोडले. आणि त्यातही सोन्याची(?) ढेकळं भरली. कोणी पहायला आले की मागे वायर जोडुन पुली वर खाली करुन दाखवायची. अशा तर्‍हेने खाणीचा वर्किंग मॉडेल तयात झाले. चार्ट साठी खनिजांची माहिती, त्यांचे उपयोग दाखवायला त्यां पासुन बनणार्‍या वस्तू जसे दागीने, भांडी, खिळा, इ. एका चार्ट्वर लावले सगळे मिनीएचर बनवले होते.... साधारण १३० रीमार्क मिळाले ... त्यातही लेकीच्या आवडत्या टिचर ने खुप छान रीमार्क दिला म्हणुन लेक फुलुन गेली होती.

ह्यातली बरीचशी आयडिया तीचीच फक्त पुली ची आयडिया मात्र आमच्या ड्रायव्हर काकांची ( ते इलेक्ट्रिशीयन पण आहेत)

मोकीमी...मस्त आयडीया आहेत. पुलीसाठी बॉबिन वापरणे हे बघितलं होतं आधीच.
ज्वालामुखीचा प्रॉजेक्ट आवडला.
<<खोडा साठी रफ हँडमेड पेपर वापरला<, हे पण भारी. मी निलगिरी वृक्षाची सालं आणुन ती कापुन लावायला दिली होती.

९वीत पोराने प्रदुषणावर प्रॉजेक्ट केला होता. तेव्हा एअर पोल्युशनसाठी फॅक्टरीजच्या चिमनीतुन धुर येतो हे दाखवायचं होतं. त्याला म्हटलं, परिक्षक येण्याच्या वेळेस एक पेटती अगरबत्ती दे सरकवुन फॅक्टरीमधे. Lol

भारी आयडिया आहेत. हे प्रोजेक्ट तुम्ही केलेत की मुलांनी केलेत ? Happy

आर्या, १-२-३ आकड्यांमध्ये एक रिकामी ओळ सोडणार का ? वाचायला सोपं पडेल. प्रोजेक्टचं नाव पण बोल्ड करा प्लीज.

शाळेत असताना केलेले एकमेव सायन्स प्रोजेक्ट म्हणजे लोहचुंबक व लोखंडाचा कीस यांचा प्रयोग. शुभ्र आणि पातळ कागदावर लोखंडाचा कीस ठेवून खालून लोहचुंबक फिरवले / ठेवले की वेगवेगळ्या सुंदर आकृती तयार होताना दिसतात. त्या कागदावर अगदी उठून दिसतात. आज गूगलल्यावर या बर्‍याच इमेजेस मिळाल्या ह्या प्रयोगाच्या.

याच प्रयोगाचा दुसरा भाऊ म्हणजे भेसळयुक्त रव्यातून चुंबकाच्या साहाय्याने लोहकणांची भेसळ दूर करणे. भेसळ कशी ओळखावी यावर दर वर्षी कोणीतरी प्रोजेक्ट करायचेच!

मुलाला रेझर हातात धरता येणार नाही म्हणुन आम्हीच त्यावर बारीक बारीक चिरा दिल्या....हुबेहुब सोनपापडी दिसायला लागली.
<<
याऐवजी कंगवा वापरता आला अस्ता का?

अर्या छान छान आयडीया ... धन्यवाद .. माझ्याकडुन देखील चोरल्या जाणार ,, लेकीसाठी हव्यात ..

लै भारी. आर्या, तुझ्या कल्पना मस्त मस्त आहेत. इथे खूप क्रियेटिव्ह आयडिया मिळणार यात शंका नाही. अत्यंत उपयोगी बाफ. धन्यवाद आर्या.

शाई संपलेल्या बॉलपेनच्या मेटल टोकातील बॉल टाचणीने काढून टाकणे. ते मेटल टोक फुंकुन खात्री करा की ते व्यवस्थित रिकामे आहे. हार्डवेअरच्या वा तत्सम दुकानातून एक ४-५ मी. लांबीची ट्यूब (रबरी/ प्लॅस्टिक) आणणे ज्यात ते मेटल टोक घट्ट बसू शकेल. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे साधारणतः ७-८ फुटावर एका बादलीत/ भांड्यात पाणी घालून ती ट्यूब बुडवणे. जमिनीवर दुसर्‍या एका कंटेनर मधे ते मेटल टोक सरळ बसवा - छोटेसे कारंजे चालू होईल..

मी शाळेत असताना (१९७०-७३) काही मित्रांबरोबर हा यशस्वी उद्योग केला होता.

fountain.JPG

लाकडी पॅडल बोट
लाकूड बाजारातून ९-१० इंची लांबीची, ४-५ इंच रुंदीची व अर्धा-पाउण इंच जाडीची साधी फळी आणणे. ती खाली दाखवल्याप्रमाणे (पुढे टोक व मागे दोन पाय) कापणे. ते जे पॅडल दाखवले आहे ते घरी करता येईल किंवा प्लॅस्टिकचे रेडिमेडही चालेल. एक भक्कम रबरबँड आणून त्या बोटीच्या पायात ते पॅडल अडकवणे व रबराला पीळ देणे - पीळ जसजसा सुटत जाईल तसतशी बोट पुढे जात राहील. छोट्या टबमधे ही बोट चालवता येते.

boat.jpg

लाकूड कापताना एवढी कलात्मकता नाही आली तरी चालेल कारण हे चित्र आंतरजालावरले आहे Wink Happy

मला असे प्रयोग करुन बघायची भारी हौस असायची. शाळेत असतांना, 'तुम्हीही करु शकाल' हे पुस्तक पुण्याहुन मागवलं होतं. त्यात बरेच सौरउर्जेवरचे प्रॉजेक्ट आहेत. अगदी पिकनिकला गेलो तर सौरउर्जेवरची चहाची किटली पासुन, सौर हिटर, सौर बल्ब आणि प्रोजेक्टर पण आहेत.
एकदा घरी बाबांच्या वहितुन पाहुन वायरलेस सायरन बनवला होता.( ही गोष्ट वेगळी की तो एकदाच वाजला आणि बंद पडला. :फिदी:)

बारावीत असतांना प्रॅक्टीकलची प्रॅक्टीस म्हणुन बेडकाचं डीसेक्शन करायचं होतं घरच्या घरी. तेव्हा एका नालीतुन एक पिवळा छोटा बेडुक घेतला. बाजुच्या दादाला मदतीला घेतलं होतच. त्या बेडकाच्या तोंडात तंबाखु कोंबली. त्याबरोबर चक्कर येउन तो बेशुद्ध झाला. नंतर एका घमेल्यात पाणी घेतले. एका लाकडी फळीवर त्या बेडकाला उताणा पाडुन त्याचे चारही पाय खिळ्याने ठोकले (:() आणि त्याचं डीसेक्शन करुन पाहिलं. पण लाकडी फळी पाण्यावर तरंगेल हे काही तेव्हा लक्षात आलं नव्हतं. असच गांडुळाचं आणि झुरळाचं पण करुन पाहिलं.

माझी तर घरी रॉकेट बनवायची इच्छा होती. Sad

मी आर्या मस्त धागा...... मुलांच्या शाळेत नवनवीन प्रोजेक्ट करावेच लागताहेत हल्ली. प्रत्येकाने थोडी थोडी माहिती टाकली तरी भरपूर उपयुक्त मटेरीयल गोळा होइल. Happy

हे हयावर्षीच्या इंग्रजीच्या प्रोजेक्टचे फोटो आहेत.

2012-10-012.jpg

हे गेल्या वर्षीचे...... कागदाच्या लगद्यापासून वस्तू

कृती : रात्री रद्दी कागद पाण्यात भिजत घालावेत. सकाळी त्यातील पाणी काढून हाताने चुरुन घ्यावेत. (शाळेततुन असे चुरायला सांगीतले होते पण कितीही केलं तरी ते मिश्रण निट होत नव्हतं म्हणून शेवटी मी ते मिक्सरला फिरवून घेतले ) तयार मिश्रणात थोडा फेव्हीकॉल मिसळून तो गोळा करवंटीत ( कासवाच्या पाठीचा आकार येण्यासाठी ) भरा. उरलेल्या गोळ्याची कासवाची मान बनवा. थोड सुकल्यावर करवंटीत भरलेला तो गोळा काढून त्याला मानेसाठी खाच पाडा. त्यात मान फेव्हीकॉलने चिटकवून टाका.त्याचवेळी त्याचे पाय व शेपूट तयार करा. नंतर कडक उन्हात वाळत ठेवा. पूर्ण सुकल्यावर त्याच्यावर टिश्यू पेपरचे तुकडे फेव्हीकॉल + पाण्याच्या मिश्रणाच्या मदतीने चिकटवा. हे वाळल्यावर वॉटर कलरने रंगवून घ्या. अश्या प्रकारे एक बाहूली पण तयार केली होती पण तिचा फोटो आता माझ्याकडे नाही आहे.

SNC00168-001.jpgSNC00169.jpgSNC00170-001.jpg

हे प्रत्येकाला कॅलेंडरचे एक पान तयार करायला सांगितले होते.

SNC00134.jpg

घरी डिसेक्शन साठी जुनी स्लीपर वापरावी, पट्टे नसलेली. त्यावर व्यवस्थीत माऊंट होतात प्राणी. झुरळ साबणाच्या पाण्यात टाकले की मरते, ते डिसेक्ट करता येते. अर्थवर्मचेही तेच.फ्रॉग्स पिथ केले जातात, ब्रेन हवा असेल तर मात्र फॉर्म्यालीनने झोपवावेत. (तंबाखू खाऊ घालणे हे नवे प्रकरण आहे माझ्यासाठी तरी)
***
ती लाकडी बोट आहे ना?
त्या शेपमधे जाड प्लॅस्टिकचा तुकडा (साधारण टूथपेस्टचा खोका असतो त्या पुठ्ठ्या इतका थिक) कापला, व पाठीच्या खाचेत कापराची वडी लावून पाण्यात सोडले, तर एक सेल्फ प्रॉपेलिंग बोट/मासा बनते. मात्र साईझ अंगठ्याच्या नखापेक्षा मोठी नसावी.
***

भन्नाट आयडीया आसेत. फोटो हवेच होते !

आम्हाला असे काही प्रोजेक्ट वगैरे नसायचे ( ऐतिहासिक काळ होता तो ) पण करवंटीला कापूस लावून केलेला इग्लू आठवतोय Happy

अवांतर - ज्ञान प्रबोधिनीच्या एका सरांच्या व्याख्यानात ऐकलेला एक प्रोजेक्ट

"तो त्याच्या रक्ताचा गूण आहे" अश्या अर्थाचे वाक्य ऐकून एक मुलगा शिक्षकांकडे गेला. त्याची शंका होती की माणसाचा रक्त गट आणि त्याचा स्वभाव ह्याचा काही संबंध असतो का?

शिक्षकांनी त्यालाच सर्वे करायला सांगितला. त्यासाठी त्याने एक Questionnaire तयार केली. वर्गमित्रांच्या मदतीने काही बदल केले. ती Questionnaire शिक्षकांना दाखवली. त्यांनीही काही बदल सुचवले. Final Questionnaire सधारणपणे २०० जणांकडून भरून घेतली. आणि त्यावर रिपोर्ट बनवला.

ह्या सर्वाचा निष्कर्श काय निघाला ह्यापेक्षा मुलांना कीती नवीन अनुभव मिळाले हे मला खूप महत्वाचे वाटले.
१) मूलाची शंका शिक्षकांनी झिडकारली नाही.
२) त्यासाठी लागणारी Questionnaire मूलाने मित्रांच्या मदतीने तयार केली.
३) Questionnaire भरून घेण्यासाठी २०० लोकांशी बोलला.
४) ह्यावर रिपोर्टही केला.

मस्त धागा!!
आर्या, सगळ्याच कल्पना छान आहेत.

या धाग्यावर प्रतिसादांमधेही नवनवीन कल्पना मिळत आहेत. घरच्या गणपतीच्या सजावटीसाठी आणि लेकीला शाळेसाठी उपयोगात येतील.

शशांक पुरंदरे, तुमची कल्पना घरी करून बघतो. प्रयत्न सफल झाले तर घरी कोणी नसताना झाडांना पाणि घालण्याचा प्रश्न सुटेल Wink

खुप मस्त धागा.
मला पण सध्या एक प्रोजेक्ट करायचाय. त्यासाठी ठोकळे हवेत पण थर्माकोलचे चालणार नाहीत. आणि ५० वगैरे हवेत त्यामुळे कार्ड्बोर्ड्चे करण थोडं अवघड वाटतय. काही आयडिया सुचवा ना प्लीज.

Pages