स्प्लेंडिड क्वांग चौ - भाग ५ (अंतिम)

Submitted by वर्षू. on 12 February, 2013 - 00:38

http://www.maayboli.com/node/40890 - भाग १

http://www.maayboli.com/node/40893 -भाग २

http://www.maayboli.com/node/40896 - भाग ३

http://www.maayboli.com/node/40953 -भाग ४

चीनी माणसाशी ओळख झाली रे झाली कि त्याच्याकडून दोन प्रश्न आपल्याकडे फेकले जातात.पहिला हा,'व्हॉट इज युअर चायनीज नेम ?" आपण या प्रश्नाचे नकारात्मक पण नम्र उत्तर द्यायची तयारी करत असताना लगेच दुसरा प्रश्न ही आपल्यावर लगेच आदळतो,' व्हॉट स्पोर्ट यू प्ले?' तू कोणता खेळ खेळतेस ?' दोन्ही प्रश्नांची आपल्याकडे नकारात्मकच उत्तरे असल्यामुळे आपण अवघडल्यासारखे गप्प राहतो.मग चीनी माणूस आपल्याकडे निरखून (नेमकं काय ?) पाहात,मनातल्यामनात काय ते उमजून,समजूतदारपणे गप्प बसतो.पण कोणी कोणी आगाऊपणे कानउघाडणीदेखील करतात,' तुम्ही लोकं काही खेळत नाही( खेळ म्हणजे त्यांच्या लेखी एक्सरसाइजसुद्धा असते बरं!)
तुम्ही उशिरा जेवता,लगेच झोपता, म्हणून तर तुम्ही सर्व्......"मग त्याला म्हणावेसे वाटते,' वो छोडो,ये ना सोचो...."
चीनमधे खरोखरच शारीरिक हेल्थ ला प्रचंड मह्त्त्व आहे. रोज सकाळी रिटायर झालेले स्त्री पुरुष तायची ,हातात पंखे घेऊन तालावर सामूहिक नृत्य वगैरे करत असतात. तर संध्याकाळी नियमाने बागेत फिरायला जाणे, कसरती करणे हा तर यांचा आवडता उद्योग आहे.
इथे प्रत्येक एरियात मोठाल्या सार्वजनिक बागा आहेत. रस्त्यांवरून सहज चालता चालता वाटलं तर खुशाल या बागांमधे शिरावं, फेरफटका मारावा, मोकळ्या हवेत कसरती कराव्या, दमायला झालं तर तिथेच एखाद्या दगडी बाकावर आराम करावा.. या बगिच्यांची एक अजून खासियत आहे. इथे भरपूर संख्येत निरनिराळ्या प्रकारच्या व्यायामांकरता इक्विपमेंट्स, लावलेले आहेत.कुणीही यावं, या सर्व सवलतींचा नि:शुल्क लाभ घ्यावा..
घराजवळ असलेल्या या गार्डन ला जायचा रस्ता ही क्वांग चौ च्या इतर रस्त्यांप्रमाणे इतका सुबक आणी रेखीव आणी स्वच्छ आहे कि त्याची एक झलक दाखविण्याचा मोह आवरता आला नाहीये मला..

रुंद, सहा पदरी रस्त्यांवरच्या डिवायडर्स मधे, रस्त्याच्या वळणावरच्या मोकळ्या ट्रँगल मधे फुलचफुलं लावून रुक्ष रस्त्यालाही सुंदर कलरफुल बनवून टाकलेलं आहे

रस्त्याला लागून असलेला १३ फुटी फुटपाथ वर सायकलिस्ट्स करता वेगळी लेन आहेच.. पायी चालणार्‍याला ऊन,पावसाचा त्रास जाणवू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा घनदाट आणी मोठाले वृक्ष लावलेले आहेत. इथे फुटपाथवर वेंडर्स अजिबात दिसत नाहीत.

हे आमच्या घराजवळच असलेलं एक गार्डन..

रोज संध्याकाळी पाण्याचा टँकर येऊन इथल्या झाडांना व्यवस्थित पाणी देऊन जातो. माळीबुवा आपापली नेमलेली कामे निमूटपणे करत असतात. मजा म्हंजे ही गार्डन्स नेहमीच टापटीप आणी रेखीव दिसतात.

वॉकिंग एरिया सोडून पुढे आलात कि दोन्ही बाजूला शंभरापेक्षा जास्त, परमनंटली फिक्स केलेली टेबल टेनिस ची टेबलं दिसतील. टेबलावर पितळी ,भक्कम नेट फिक्स करून टाकलेली असते. फक्त आपली बॅट आणी बॉल घेऊन या..

हाताच्या सगळ्या पॉईंट्स ना दाब मिळून रक्तप्रवाह सुरळित होण्याकरता लावलेल्या या फिरत्या चकत्या वृद्ध लोकांना विशेष प्रिय आहेत..

From Guangzhou

हे लहान पिल्लू, हम भी कुछ कम नही ' च्या तालावर आपणच कसरत करत होतं

स्टेपर्स च्या .. कडेने एक ५०,६० माजोंग टेबले फिक्स केलेली आहेत. हा चीनी लोकांचा हा अत्यंत आवडीचा बैठा खेळ.

विविध इक्विपमेंट्स


कंबरेला धक्का न लावता साईड ट्विस्टिंग करण्यासाठी हे साधन फार उपयोगी आहे. ही एक्सरसाईज करत असलेल्या या हसतमुख आजोबांनी फोटो काढायला परवानगी दिली..

ग्राऊंड च्या दुसर्‍या भागात मधे जाळी लावून ,पलीकडे मुलांकरता बास्केट बॉल, फुटबॉल खेळण्याची सोय केलेली आहे.

आपल्या नागरिकांच्या आरोग्याकरता सरकार जितके जागरूक आहे , इकडली जनता देखील तितक्याच काटेकोरपणे घालून दिलेल्या नियमांचे पालन करत असते. आजपर्यन्त मी तरी कुठलंच तुटकं फुटकं , बिघडलेलं इक्विपमेंट इथे पाहिले नाही आणी लोकंही कधी ही जागा मिस यूज करताना पाहिले नाहीत.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

जळुन जळुन खाक झाले आहे मी.....

खरच ग ताई... आपल्या कडे हे असं होइल हे मी माझ्या वाइल्डेस्ट इमॅजिनेशन मधेही इमॅजिन करु शकत नाही. अशक्य प्रकार आहेत. परत वैविध्य पण... खरच खुप मस्त... तिसर्‍या जगातली एक पॉवरफुल शक्ती म्हणुन चीन वेगाने पुढे सरकतो आहे... पण त्यांचा सिव्हीक सेन्स आपल्या पेक्षा खुपच जागरुक आहे...

ही अशी तुलना करणे वाईट.... पण काय करु मनात कळ येतेच.... आपल्या इथे ही मशिन्स लावण्यात आधी भ्रष्टाचार झाला असता आणि तरी लावली गेली असती तरी ३-४ दिवसात गायब झाली असती... मुळात राष्ट्र बांधणी हा विचारच आपल्या मनात नाही... नुसता राजकारण्यांना दोष देउन हा प्रश्न सुटणार नाही... मुळात आपण किती जागरुक आहोत हे महत्वाचे...

आज मी एका बांधकाम कंपनीत काम करते. आम्ही क्लब हाउस बांधतो व आमच्या फ्लॅट ओनर्स ना माफक दरात अनेक खेळांच्या सेवा पुरवतो ( माफक म्हणजे एका वेळच्या पोहोण्या साठी ३ रुपये, एका तासाच्या बॅटमिंटन, टेनीस किंवा स्क्वॅश साठी एका माणसाला ५ रुपये इ.इ. कोचिंग हवे असेल तर महिना ३०० रुपये कोणताही खेळ ) तरीही मागच्या वर्षीच्या सर्व्हे मधे एकुण १००० ओनर्स मधुन एकुण नियमित येणारे फक्त २५० लोक मिळाले. त्यात ही पोहायला येणारी मुले जास्त आहेत. ( नियमीत म्हणजे महिन्यातुन नीदान १० वेळा)

याचाच अर्थ आपण नोकरी-व्यवसाय व रोजची गरजेची अंग मेहेनत ह्यांचा ताळ मेळ घालु शकत नाहियोत....

( रच्याकने मी माझ्या परीने हा ताळ मेळ गेले दोन महिने सांभाळला आहे आणि पुढेही करत रहाणार आहे... रिझल्ट्स मिळत आहेत)

हे सगळे अवांतर आहे....

मी मागच्याच भागात फर्माइश करणार होतो एखाद्या जाड्या, तरुण चिनी माणसाचा फोटु द्या म्हणुन. Happy
बाकी फोटॉ छानच. त्यातुन दिसणारं चीन आवडलं.
तुमच्या कडुन चीनची बरीच माहिती कळते. Happy

' व्हॉट स्पोर्ट यू प्ले?' तू कोणता खेळ खेळतेस ?' >>>>>>>>>>>>>> हा प्रश्न खूप आवडला वर्षू !
इतकी व्यायामाची साधनं, पार्कस, सहजी उपलब्ध अस्तील तर आपोआपच इच्छा होत असेल व्यायामाची!
ब्येष्ट फुटू!..........वर्षू कधी येऊ तिकडे?

आपल्या इथे ही मशिन्स लावण्यात आधी भ्रष्टाचार झाला असता आणि तरी लावली गेली असती तरी ३-४ दिवसात गायब झाली असती>>>>>>>>>>>मोकीमी तुला +१००
अगं साधं आमच्या नगर औरंगाबाद रोडवर रोड डिवायडरवर समोरच्याला रात्री डोळ्यावर लाइट येऊ नयेत म्हणून प्लॅस्टिक/अ‍ॅक्रिलिकचे पसरट खांब लावलेत तेही लोकांनी मुळापासून कापून नेले आहेत. या करंटेपणाला काय म्हणावे?

ओ हो हो हो - ही सर्व व्यायामाची, खेळाची साधने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि फुकट उपलब्ध आहेत हे पाहून फारच आश्चर्य वाटले.
ही सर्व माहिती दिल्याबद्दल वर्षू तुला मनापासून धन्स ....

मोकिमीला अनुमोदन ....

@ झकासराव.. Lol विशफुल थिंकिंग!!!!!
आता जरा वेगळ्या दृष्टीने पाहीन म्हणते Wink

मानुषी.. मार्च्-मे-जून्-जुलै-ऑगस्ट्-सप्टेंबर्-नोवेंबर (सुरुवातीचा आठवडा) या महिन्यांत कधीही ये.. Happy
अ‍ॅक्रॅलिक खांब ही चोरले?? आई ग्ग!!! Angry Sad

मोकिमी.. अवांतर असलं तरी आवडलं बर्का!!! Happy बक्कप!!!

अशी व्यायामाची आवड मला वॉशिन्गटन डीसीतही दिसली. एनीटाईम इज् एक्सरसाइज/जॉइन्ग टाईम. दिवसा रात्री कोणत्याही वेळी पळणारे लोक पाहिले.
तिथेही अशीच मोठी ग्राउन्ड्स खेळाडूंनी गजबजलेली पाहिली.
सगळ्यात छान वाटलेली गोष्ट: योगाचे लागलेले वेड: काखेत पुंगळी(योगा मॅटची) आणि खांद्यावर झोळी घेतलेले फ़िरंगी हे योगा क्लासला निघालेले हेही मोठ्या प्रमाणात दिसले.
ओक्के वर्षू ........मार्च ते सप्टे.....२०१४ नक्की हं!

खरच सही आहे.
आपल्याकडे कधी होणार असं देव जाणे. आणि झालं तरी ते मोडुन तोडुन भंगारात विकणारे दारुडे-चोर कमी नाहियेत.

वर्षू....

माणसाने थक्क व्हायचे तरी किती वेळा ? याच प्रश्नाची बाहुली माझ्या नजरेसमोर नाचत आहे..... 'सिव्हिक सेन्स अ‍ॅण्ड रीस्पॉन्सिबिलीटी' चे इतके चांगले आणि तितकेच देखणे उदाहरण ! सिम्पली वंडरफुल. त्या पदपथावर 'व्हेन्डर्स' नाहीत हा किती सुजाणपणाचा निर्णय असू शकतो हे आपल्याकडील स्थिती पाहिल्यावर चटदिशी लक्षात येते.

मोहन की मीरा लिहितात...."नुसता राजकारण्यांना दोष देउन हा प्रश्न सुटणार नाही... मुळात आपण किती जागरुक आहोत हे महत्वाचे...." ~ तंतोतंत पटले. आपल्या लोकशाहीने उठसूट कुणाही गण्यागंप्याला देशाच्या परिस्थितीबाबत थेट मनमोहन सिंग यांना शिव्या घालण्याची मुभा करून ठेवली आहे, त्याचा फायदा घेतला जातो.... पण त्याचवेळी 'आपण अशाबाबतीत किती जागरुक आहोत...' याची मीमांसा कितीजण करत असतील ?

आमच्या कोल्हापूरातील रंकाळा तलाव परिसरात फिरायला जाताना मी एकदा दोन व्यक्तींना भाजलेली कणसे खात खात गप्पा मारीत जाताना पाहिले. खाल्लेले कणीस त्यानी पदपथावरच टाकले.....[बाजूला गटार दिसत असूनही]... ते पाहून मी "अहो भाऊ, निदान ती कणसे गटाराततरी टाकायची.... येणार्‍याजाणार्‍यांना तुम्ही अशी टाकलेली घाण पाहून काय वाटत असेल...?" यावर दिलगिरी तर दूरच, उलट त्यातील एक बंडा मलाच विचारतो, "काय झालं त्यात.... मुन्शिपाल्टीनं लई नोकर लावल्यात की ती कणसं काडायला....तुमी का तरास करून घेताय ?"

काय बोलणार अशा प्रवृतीबद्दल.

ह्या अशा आठवणी मनी असतानाच चीनची अशी देखणी सफर घडवून आणल्याबद्दल वर्षू नील यांचे शतशः आभार.

अशोक पाटील

अशोकमामा..

आपल्याला आला तसा अनुभव मला ठाई ठाई येतो. मनाला सुया टोचतात... आजुबाजुचे हसतात... मग वाटतं आपण खरच मुर्ख आहोत का ?

वर्षु ताई माफ कर हा बाफ चा विषय नाही ... तरीही खेचला गेला...

वर्षुताई, तुला लवकरच क्वांग चौ ची बँड अ‍ॅम्बॅसॅडर बनवणार आहेत. इतकी छान छान माहिती आणि सुरेख प्रचि टाकतीयेस ना! ...... आणि तुला तुझ्या शहराबद्दल किती सार्थ अभिमान आहे ते ही प्रत्येकवेळी जाणवतं. Happy

मध्यंतरी वर्तमानपत्रात बातमी आली होती की रेड स्विंग प्रोजेक्टांतर्गत आपल्याकडेही तीन ठिकाणी लाल झोपाळे लावले. काही दिवसांतच दोन ठिकाणचे झोपाळे गायब. जोवर मानसिकता बदलत नाही तोवर कोणत्याही बाबतीतला, कोणत्याही पातळीवरचा पुढचा टप्पा गाठणं कठीण असतं.

मोकीमी आणि अशोक यांना अनुमोदन. अमेरीकेत फिरताना तिथली पब्लिक टॉयलेट्स वापरताना दरवेळी न चुकता मनात तुलना येतेच आणि अगदी चिडचिड होते. भारतात स्वच्छतागृह ही एक गरजेची नसून चैनीची गोष्ट आहे असा पवित्रा दिसतो. पब्लिक टॉयलेटस सोडाच पण कोणत्याही रेस्टॉरंटमधली, कार्यालयातली स्वच्छतागृह इतकी गलिच्छ असतात की वैतागच येतो.

अशोकजी, माफ करा हं. पण गटारातही कचरा टाकू नये. गटार हे सांडपाण्याकरता असतं. त्यात कचरा टाकला तर पाणी वाहून जाण्यास अटकाव होईल. कचरा कचरापेटीतच गेला पाहिजे आणि ती कचरापेटी नियमीत रिकामी केली पाहिजे.

मस्तच कल्पना.... किती स्व्च्छा आनी निटनेटका आहे हा पार्क. विचार करतोय आपल्या कडे असा एखादा पार्क असता तर लोकांनी कित्ती वाट लावली असती त्या पार्कची???

... सॉरी हां.. इथे हे फोटो टाकून आपल्याकडील वस्तुस्थितीशी तुलना करण्याचा माझाही उद्देश नाहीच्चे... पण जागरूक नागरिकाच्या मनात त्यांच्या रोजच्या अनुभवांमुळे तुलना करावीशी वाटणं हेही साहजिकच आहे,कॅन अंडरस्टँड, अशोक., मामी,मोकिमी,शागं ,मार्को पोलो..

वर्षू..... तुम्ही दिलेल्या अप्रतिम फोटोज् मुळे आपल्याकडील वस्तुस्थितीची आठवण होणे नैसर्गिकच आहे. त्यात तुम्ही 'सॉरी' म्हणणे अजिबात गरजेचे नाही. तुलना होणे, करणे हा एक मानवी स्वभावाचा पैलूच असतो.... त्यात गैरही काही नाहीच म्हणा. 'चीनमध्ये असे होऊ शकते तर आमच्याकडे का होत नाही...' अशी विचारधारा आपसूकच वाचणार्‍यांच्या मनी रुंजी घालू लागते....त्यातीलच यातील काही प्रतिसाद.

@ मोहन की मीरा.... "... आजुबाजुचे हसतात....." ~ ही एक वैतागवाडी जमात आपल्याला समाजात ठायीठायी भेटते. विशेष म्हणजे असे फिदीफिदी हसणारे सुशिक्षितही असतात याचेच जास्त वाईट वाटते.

@ मामी.... "...पण गटारातही कचरा टाकू नये. गटार हे सांडपाण्याकरता असतं. ..." ~ देअर यू आर. पटले. खरं सांगायचं झाल्यास पदपथावर 'मी कचरा खातो' असा बोर्ड दाखविणार्‍या 'भक्षक टोपल्या' होत्याही.... पण त्या दोघांच्या कृतीने माझ्या मनी दाटलेला संताप व्यक्त करताना शेजारी दिसत असलेले गटार त्याना दाखविले. अर्थात आता पटले की गटारात कणसे टाका असे सुचविणेही एकप्रकार गलती होतीच. सॉरी !!

[वर्षू....तुमच्या चित्रांतील "नागरी" सुंदरतेच्या अनुषंगानेच हा धागा थोडासा बाजूला होत आहे, याचा विचार व्हावा.... भरकटलेला मात्र नाही.]

अशोक पाटील

एवढ्या उत्साहाने वेगवेगळे व्यायाम करणारी मंडळी बघून छान वाटले.

पुलंनी म्हणल्याप्रमाणे "कोणाच्या वैयक्तीक सम्रुद्धीचा हेवा वाटत नाही पण अश्या सर्वजनीक सम्रुद्धीचा वाटतो"

वर्षूताई.. हा भाग पाहून तरी खूप खूप वाटले आपल्याकडे असे पाहिजे होते वा का होत नाही.. ती टेटे खेळाची टेबल्स बघून तरी हळहळलो.. नि मोकीमी वा बाकीचे म्हणताहेत तेच खरे.. अशा मोफत सवलती दिल्या तरी ते उद्या जागेवर असेल की नाही याची खात्री नाही.. ती टेटे च्या टेबलाभोवतीच्या झाडांवर पक्षी नाही का बसत ?? किती ती स्वच्छ दिसताहेत... इथे बगिच्यांमधील बाकडयांचा पण रंग पालटलेला दिसतो .. Proud

ह्या माहितीपुर्ण भागाबद्दल पण धन्यवाद Happy

तिसर्‍या जगातली एक पॉवरफुल शक्ती म्हणुन चीन वेगाने पुढे सरकतो आहे... पण त्यांचा सिव्हीक सेन्स आपल्या पेक्षा खुपच जागरुक आहे>>> अहो गेले फक्त २०० वर्ष चीन थोडा मागे पडला होता. त्याच्या आधी ४००० वर्षा पासुन तो "पहिल्या जगात" होता. आणि कायम प्रथम क्रमांकावर होता.

थक्क झाले हे सगळं पाहुन आणि चिनी सरकारची जागरुकता पाहुन.
<<चीनमधे खरोखरच शारीरिक हेल्थ ला प्रचंड मह्त्त्व आहे. रोज सकाळी रिटायर झालेले स्त्री पुरुष तायची ,हातात पंखे घेऊन तालावर सामूहिक नृत्य वगैरे करत असतात. तर संध्याकाळी नियमाने बागेत फिरायला जाणे, कसरती करणे हा तर यांचा आवडता उद्योग आहे.<< सही. Happy

किती स्वच्छ पार्क आणि पार्कात किंवा रोडवर अजिबात गर्दी कशी नाही ती!!
इकडे तर अशी साधनं ठेवली असती तर गर्दी, रेटारेटी, भांडणं. Sad
वयस्कर माणसांचे हाल तर विचारु नका.

सर्वांना धन्स..

@ मी_आर्या.. अगं सध्या इथे चायनीज नववर्षाच्या सुट्ट्या सुरु आहेत म्हणून ट्रॅफिक कमी आहे..
आणी पार्क चं म्हणशील ना तर कधीच गर्दी नसते याला कारण असे पार्क प्रत्येक एरियात बनवलेले आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक एक दीड किलोमीटर अंतरावर..त्यामुळे त्या त्या एरियाचे लोकं आपापल्या भागातल्या पार्कमधे जातात. Happy

@ यो .. खरंच इथे पार्क्स मधे,झाडांवर पक्षी नाहीत.. कोणत्याही प्रकारच्या चिमण्याही मला दिसल्या नाहीत या बारा वर्षांत.. बर्डपार्क व्यतिरिक्त!!!
याला कारण जरा वेगळं आहे.. माओ ने जेंव्हा चीन मधे सांस्कृतिक क्रांती घडवली , त्या काळात चीनी जनते करता पुरेसं धान्य त्यांच्याकडे नव्हतं. शेतात उगवणारे धान्य पक्ष्यांनी खाऊन टाकू नये म्हणून माओ ने शेतकर्‍यांना जितक्या चिमण्या दिसतील त्यांना मारून टाकण्याचा कडक हुकुम दिला होता. इतकेच नव्हे तर जो शेतकरी जास्तीतजास्त चिमण्या मारेल त्याला चांगलं इनाम ही देण्यात येत असे.

Pages