'मोमो' मिआ

Submitted by अमेय२८०८०७ on 11 February, 2013 - 10:27

दहा एक वर्षापूर्वींची गोष्ट. नुकतेच लग्न झाले होते, मधुचंद्राचे स्वप्निल दिवस (लवकर) संपले आणि 'हि'ला घेऊन नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच दिल्लीत आलो. हळूहळू संसाराची घडी बसू लागली. पत्नी स्वयंपाकाच्या बाबतीत संजीव कपूरची 'कुंभके मेलेमे बिछडी हुई' जुडवा बहीण ठरल्याने सहकार्‍यांसाठी आमचे नवे घर म्हणजे हक्काने येऊन खायला प्यायला मागायचे आवडते ठिकाण बनले. कधीकधी त्याचा त्रासही व्हायचा पण भारतभरातून नोकरीसाठी आलेले ते सहकारी घरच्या जेवणासाठी तरसत असल्याने आणि याची भरपाई आम्हाला उत्तमोत्तम रेस्टॉरंट अथवा सिनेमा वगैरेला नेऊन करत असल्याने त्रास वाटेनासा झाला.
अशात एके दिवशी सिक्किमचा थेंदुप नामग्याल घरी आला. येताना त्याने बांबूचे एक मोठे त्रिस्तरी भांडे बरोबर आणले होते. प्रथमदर्शनी ते एखाद्या हौशी जादूगाराचे इक्विपमेंट, एखाद्या मॅड्कॅप शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेतील उपकरण अथवा गेलाबाजार जुन्या बाजारातून आणलेले एखादे 'अ‍ॅन्टिक पीस' वाटत होते. आमची उत्सुकता जास्त न ताणता त्याने लवकरच खुलासा केला, " आज मोमो बनायेंगे, ये स्टीमर है ". मी आधी मोमो खाल्ले होते पण मला तो प्रकार फारसा आवडला नव्हता. पण नामग्याल नाटकीपणाने झुकुन म्हणाला , '' अमेय आजतक तुमने इमिटेशन मोमो खाये होंगे, ये सिक्किमके एक जानेमाने 'शेफ' की खास पेशकश सिर्फ आपके लिये". बिचार्‍याच्या उत्साहावर विरजण कशाला घाला म्हणून आम्ही त्याला किचनमधे घेऊन गेलो. पुढच्या तासाभरात त्याने किचनमधे प्रचंड धुडगूस घातला, बरीच भांडी खराब केली पण शेवटी जे काही खायला घातले त्यामुळे त्याचे (शहाजहान प्रमाणे) हात कापून घ्यावेसे वाटले. तसे मोमो खाणे ही आता गरज बनल्याने पत्नीकडे ती सिक्किमची टेक्नॉलॉजी ट्रांस्फर करून घेतली.

त्या वर्ल्ड फेमस इन सिक्किम मोमोंची कृती येनप्रमाणे :-

साहित्य :
दळदार मटण खिमा २५० ग्रॅम (मी कोल्हापूरचा असल्याने तिथले मटण आणि खिमा सर्वोत्कृष्ट असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, आपण आपल्या खाटकाचे नाव भक्तिभावाने घ्यावे) ,
तीन मध्यम कांदे - अतिशय बारीक चिरून
दोन हिरव्या मिरच्या - बिया काढून बारीक चिरून, जास्त तिखट नकोत
थोडी कोथिंबीर बारीक चिरून
आले लसूण पेस्ट दोन - तीन चमचे, मीठ चवीनुसार
खिम्यामधे बाकी सर्व घटक चांगले मिक्स करावेत.

आवरणासाठी :

दीड वाटी मैदा, हलके मीठ घालून पाण्याबरोबर घट्ट मळून घ्यावा. त्याच्या अर्ध्या पेढ्याएवढ्या छोट्या गोळ्या कराव्यात

असेम्ब्ली : (इन्जिनियरिंगचे शिक्षण माझ्या रक्तात कसे भिनले आहे पहा!)

मैद्याच्या गोळ्या पातळ लाटून घ्याव्यात (६-७ सेमी व्यास असावा). प्रत्येक लाटीवर एक-दीड चमचा खिम्याचे मिश्रण घालावे. लाटी बोजड होता नये आणि खाणार्‍याला खिमा शोधायची वेळ येऊ नये इतपत मिश्रणाच्या मात्रेचा समतोल साधावा.

यापुढील टप्पा अत्यंत महत्त्वाचा. लाटी फुटू न देता करंजीसारखी बंद करायची आहे. उस्ताद लोक या लाटीवर नाजूक घड्याही घालू शकतात, नवशिक्यांनी साधी घडी घालून हळूहळू पुढची यत्ता गाठावी.

स्टीमर असल्यास त्यात पाणी घालावे आणि वाफ येऊ द्यावी. पाणी एकदा उकळले की मोमो ठेवावेत. दहा बारा मिनिटे तगडी वाफ द्यावी. वरचे मैद्याचे आवरण पारदर्शक झाले की साधारण खिमा शिजतो असे समजावे.

स्टीमर नसल्यास (माझ्या चतुर अर्धांगीप्रमाणे) एका पातेल्यावर अ‍ॅल्युमिनम फॉईल लावावी. तिला काट्याने थोडी छिद्रे पाडावीत. या फॉईल लावलेल्या पातेल्यावर चाळण ठेवावी. चाळणीत मोमो ठेवून वर घट्ट बसणारे झाकण ठेवावे.झकास घरगुती स्टीमर तयार होतो. पातेल्यात अ‍ॅल्युमिनम फॉईल लावायच्या आधी पाणी घालण्यास विसरू नये (मी एकदा विसरलो होतो). पातेलं जळण्याची आणि बायकोकडून पुढचे सहा महिने टोमणे ऐकून घ्यायची दाट शक्यता असते (स्वानुभव!)

असे शिजलेले मोमो न मोडता स्टीमर मधून काढून घ्यावेत. आवरण न मोडणे महत्त्वाचे कारण मोमोचा तुकडा मोडला की खिम्याला सुटलेले चवदार पाणी सूपसारखे बाहेर येते जे अत्यंत चविष्ट असते. ते आधीच गळून गेले तर मोमो कोरडे वाटतात.

असे हे मोमो लाल मिरच्या - लसूण यांच्या ओल्या चटणी आणि एखाद्या हॉट अँड स्वीट सॉससोबत खाताना पंचेद्रिये सुखावून जातील यात शंका नाही.

momos.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोमो मस्तच दिसतायत... Happy

जरा उशीरा वाचला लेख नाहीतर आत्ता संध्याकाळीच जाऊन खाऊन आले असते ना!

मस्त दिसताहेत मोमोज. मोमो आमच्या घरी एकदम आवडता पदार्थ आहे. इथे बाजारात सहजासहजी, रस्तोरस्ती मिळतात म्हणून अजुन कधी घरी करुन बघितले नाहीत.

रेसिपी आणि लिहिण्याची स्टाईल दोन्ही आवडली.

Pages