माझा पहिला परदेश प्रवास : ११ (सेलामत दातांग ... !!!)

Submitted by ललिता-प्रीति on 15 October, 2008 - 00:14

सेलामत दातांग ... !!!

निघताना हुरहूर लागावी इतकं कोलंबोत राहिलोच नाही. थायलंडमध्ये खरं तर सर्वात जास्त मुक्काम होता. पण थायलंड सोडतानाही तसं काही वाटलं नाही ... एक तर पॅरासेलिंगच्या प्रभावातून मन अजून बाहेर आलं नव्हतं, शिवाय सिंगापूरची उत्सुकता होती. पण त्यादिवशी सिंगापूर सोडताना मात्र प्रथमच मनाला थोडीशी हुरहूर जाणवली. अजून २-३ दिवस तिथे रहायला सगळ्यांना आवडलं असतं. बॅंकॉकच्या रस्त्यांवरची गर्दी, खाद्यपदार्थांचे कसेतरीच, उग्र वास - काहीतरी होतं टीका करण्यासारखं ... पण या देशाने मात्र नावं ठेवायला जागाच सोडली नव्हती!! दोन दिवसांत मुख्य ठिकाणं पाहून झाली तरी इतर ठिकाणं पाहण्याच्या निमित्तानं अजून तिथला वाढीव मुक्काम चालला असता. शिवाय आपल्या सहलीचा अंतिम टप्पा आता जवळ आलाय हे सुध्दा आत कुठेतरी सतत जाणवत होतं.

तरी त्यातल्यात्यात काहीतरी नाविन्य शोधायचं म्हटलं तर होतंच - त्यादिवशी आम्ही मलेशियाला जाणार होतो पण ते विमानानं नाही, तर बसनंच. अकरा-साडेअकराला आवरून खाली आलो. सामान आधीच खाली त्या छोट्या सरकत्या पट्ट्याजवळ जमा झालेलं होतं. सरहद्द ओलांडायची असल्यामुळे त्यादिवशी आमची रोजची बस नव्हती. त्याऐवजी सिंगापूरच्या दोन सरकारी बसेस दिमतीला होत्या. 'सरकारी बसेस असल्यामुळे थोडं जमवून घ्या' असा सौ.शिंदेंचा सबुरीचा सल्ला होता. मनात म्हटलं - जास्तीतजास्त काय होईल? बसच्या खिडक्यांचे पडदे साधे असतील, सीट्स कमी गुबगुबीत असतील, ए.सी. वगैरे विशेष नसेल ....'सिंगापूरची सरकारी बस' ही काय चीज आहे ते सेंटोसाला पाहिलं होतं. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. आणि तसंच झालं - आपल्या आराम बसच्या पुन्हा एकदा तोंडात मारतील अश्या त्या दोन सरकारी बसेस आल्या. थोडं इकडे आणि थोडं तिकडे असं दोन्ही बसेसमध्ये सगळं सामान चढलं. तितक्यात, चेहेऱ्यावरून मराठी वाटणारे एक गृहस्थ शिंदे पतिपत्नींशी 'काय, कसं काय' करून पूर्वीची ओळख असल्यासारखे गप्पा मारत उभे असलेले दिसले. जरा आश्चर्य वाटलं. मग शिंदेंनी त्यांची ओळख करून दिली. आदल्या दिवशी आम्हाला मस्त पुणेरी, घरगुती जेवण पुरवणारे ते हेच - श्री. आपटे. आदल्या दिवशीचं जेवण कसं वाटलं हे विचारायला ते मुदाम आम्ही निघायच्यावेळी हॉटेलवर आले होते. मूळचे पुण्याचेच, पण गेली ८-१० वर्षं सिंगापूरमध्येच वास्तव्याला असलेले. त्यांचा तिथे तोच व्यवसाय आहे. साधं जेवण, सणासुदीचं जेवण, पूजेचं-मुंजीचं-होम हवनाचं साहित्य ते तिथे राहत असलेल्या भारतीय माणसांना पुरवतात. अगदी चौरंग, जानवी-जोड पासून भटजीपर्यंत सगळं. मनात आलं - एकतर यांनी एखादा भटजी नोकरीला ठेवला असेल किंवा स्वतःच भटजी बनून जात असतील ठिकठिकाणी! कारण चेहेऱ्यावरून पक्के 'ए'कारांत पुणेकर होते पण पक्के व्यावसायिकपण वाटत होते. सिंगापूरला येऊन हा व्यवसाय करावा हे त्यांच्या मनात आलं यातच सगळं आलं. तो त्यांचा व्यवसाय तिथे इतका जोरदार चालण्यामागे सुध्दा मानवी स्वभावधर्मच आहे. आपल्या मूळ घरापासून, गावापासून, प्रदेशापासून लांब राहणाऱ्या लोकांना आपले धार्मिक कुळाचार पाळण्याची जास्त गरज वाटते नेहेमीच. तसं करून ते त्या परमुलखात, वेगळ्या वातावरणात आपला भारतीयपणा, मराठीपणा जपण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण आपला भारतीयपणा, मराठीपणा जपतोय हे तिथल्या इतर लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात .......
तर, त्यादिवशीसुध्दा प्रवासात आम्हाला जेवणाचे डबे मिळणार होते ते त्यांच्याकडूनच. ८-१० दिवस एकाच चवीचं मसालेदार पंजाबी जेवण जेवल्यानंतर दोन दिवस ते घरगुती जेवण म्हणजे खरंच एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. तसंही, केवळ दोन दिवसांच्या वास्तव्यातच सिंगापूरने तरी दुसरं काय केलं होतं? निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या पध्दतीने आम्हाला सुखद आश्चर्याचे धक्केच तर दिले होते. 'जीवन में एक बार आना सिंगापूर ...' हे अगदी खरं होतं!!! फक्त, ती ओळ अजून थोडी सुधारावीशी वाटली - 'जीवन में किमान आठवडाभर आना सिंगापूर'!!!
दोन दिवस तिथे सूर्यदर्शन झालेलं नव्हतं पण निघायच्या दिवशी मात्र सिंगापूरचा सूर्य पण आला निरोप द्यायला. निघाल्यावर साधारण अर्ध्या तासाने सिंगापूरच्या सीमेजवळ उतरलो. आमच्याबरोबरच आमचं सामानपण खाली उतरवण्यात आलं. आपापलं सामान घेऊन इमिग्रेशनच्या ऑफ़िसमध्ये जायचं होतं. म्हणजे प्रक्रिया सगळी विमानतळासारखीच, प्रवास फक्त बसचा होता. सुदैवाने गर्दी वगैरे काही नव्हती. शिवाय 'चार तास आधी चेक-इन' ही भानगड नव्हती. आमच्या गृपपैकी एका काकूंचा 'मलेशिया व्हिसा' मिळाला नव्हता. ते काम होतं. पण सगळंच पटापट आणि थोडक्यात उरकलं. त्या ऑफ़िसमधून सगळे बाहेर आलो. आता पुढच्या प्रवासासाठी मलेशियाच्या दोन बसेस उभ्या होत्या. त्या बसेसही एखाद्या विमानाच्या 'बिझिनेस क्लास'च्या तोंडात मारतील अश्या होत्या - एकदम ऐसपैस आणि मस्त!! चला, म्हणजे आता पुढचा ४-६ तासांचा प्रवास एकदम आरामात होणार होता.

पुण्याहून मुंबईला जावं इतक्या सहजतेने आम्ही सिंगापूरहून मलेशियाला चाललो होतो. सिंगापूर, मलेशिया हे पूर्व आशियातले देश आहेत यापलिकडे त्यांच्या भौगोलिक स्थितीकडे आपण विशेष लक्ष देत नाही. नकाशा नीट बघितला तर लक्षात येतं की हे दोन्ही शेजारी देश आहेत. मध्ये एक खाडी आहे म्हणून नाहीतर त्यांचे भूभाग पण एकमेकांना जोडले गेले असते. खाडीवरचा एक-दीड कि.मी. लांबीचा पूल हा त्यांच्यातला एकमेव दुवा आहे. तो भलाथोरला पूल म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना होता पण त्याचं नाव मात्र अगदी साधं - नुसतं 'कॉज-वे'!!! बांधकाम सुरू असलेल्या आपल्या 'वरळी-वांद्रे सागरी मार्गा'चं मला कोण कौतुक, नाव पण किती छान, घसघशीत - वरळी-वांद्रे सागरी मार्ग! आणि हा पूल त्याच्या कितीतरी आधी बनलेला, तेव्हा कदाचित सामान्य माणसाला जास्त नवलाईचा वाटला असणार. त्याला एखादं भारदस्त नाव शोभून दिसलं असतं!! 'कॉज-वे' म्हणजे माझ्या डोळ्यासमोर एखादा अरुंद, अगदी पाण्याजवळून नेणारा रस्ता आला होता.
असा तो 'कॉज-वे' ओलांडून आता आम्ही अजून एका नव्या देशात प्रवेश केला होता. मलेशियात प्रवेश केल्यावर आणि 'क्वालालंपूर - १७० कि.मी.' अश्या प्रकारच्या पाट्या दिसायला लागल्यावर मात्र सकाळची ती हुरहूर केव्हा मागे पडली ते कळलंही नाही. इथे घड्याळांतली वेळ बदलायचा वगैरे प्रश्न नव्हता - साधारण एकाच रेखावृत्तावर दोन्ही देश आहेत. मग रस्त्यावरच्या पाट्या वाचायला सुरूवात केली. पाट्यांवरची लिपी इंग्रजी पण भाषा मलाय होती. पण ते जरा बरं वाटलं. अर्थ नाही कळला तरी निदान शब्द तरी कळत होते; अगदीच थायलंडसारखी निरक्षराची गत नव्हती. ज्या ठिकाणी त्या पाट्या असायच्या त्यावरून अर्थाचा साधारण अंदाज बांधता यायचा.रस्ता एकदम निर्मनुष्य होता. मध्येच एखाददुसरी गाडी दिसत होती. विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मैलोगणती पामच्या झाडांची लागवड होती. मलेशियात प्रवेश केल्याकेल्या लगेचच त्या देशाचं वैशिष्ट्य म्हणून असलेली एक गोष्ट पहायला मिळाली आणि सिंगापूरप्रमाणेच मी मलेशियाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडले. रस्त्याला लागून पामची झाडं, थोड्या दूरवरपण पामची झाडं आणि लांबवर दिसणाऱ्या उंच डोंगरांवर पण पामचीच झाडं!! ते बघायला फारच छान वाटत होतं - अगदी डोळ्यांचं पारणं फिटावं इतकं! काही वेळापूर्वी ती ऐसपैस बस पाहिल्यावर खरंतर मी एक मस्तपैकी झोप काढायचं ठरवलं होतं. पण त्या सुंदर पामच्या बागांनी माझी झोप कुठल्याकुठे पळवून लावली. तासाभरानंतर मुख्य रस्त्यावरून बस डावीकडे वळली. एके ठिकाणी १०-१५ मिनिटं थांबायचं होतं पाय मोकळे करायला. पामने मढलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याश्या हॉटेलपाशी उतरलो. तिथे नुकताच पाऊस पडून गेला होता. ढगाळ, दमट हवा होती. तिथल्या स्वच्छतागृहांवर 'lelaki' आणि 'wanita' अश्या पाट्या दिसल्या. लगेच लक्षात आलं की मलाय भाषेत 'पुरुष' आणि 'स्त्री' साठी अनुक्रमे 'lelaki' आणि 'wanita' हे शब्द आहेत. अर्थ कळल्यामुळे जाम आनंद झाला. पुढच्या दोन दिवसात मग मला तो नादच लागला - पाट्या वाचायच्या आणि त्याचा अर्थ काय असेल त्याचा अंदाज बांधत बसायचं. १५-२० मिनिटांत सगळे ’लेलाकी’ आणि ’वनिता’ पुन्हा बसमध्ये चढले आणि तिथून निघाले.
पुन्हा तासभर प्रवास आणि पुन्हा एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. आपापले डबे घेऊन तिथल्या रेस्तरॉंमध्ये शिरलो. आत शिरताक्षणी एक अत्यंत उग्र, कसातरीच वास नाकात शिरला. इतरवेळी अश्या वासाच्या ठिकाणी जेवणाची कल्पनाही सहन झाली नसती. पण त्या दिवशी नाईलाज होता. पामच्या झाडांप्रमाणेच या वासानेही पुढे दोन दिवस आमची पाठ सोडली नाही ... कारण तो वास पाम तेलाचाच होता!! इतक्या सुंदर झाडांच्या बियांपासून इतक्या घाणेरड्या वासाचं तेल निघतं?? अर्थात हा सवयीचा भाग होता. ज्या तेलाच्या वासाला मी नाकं मुरडत होते त्याच तेलात बनवलेले कसलेकसले पदार्थ तिथले लोक मिटक्या मारत खात होते. त्या लोकांच्या ताटांत आणि एकूणच तिथल्या काचेच्या कपाटांत जे-जे काही मांडून, टांगून, पसरून ठेवलेलं होतं ना ते शिसारी आणणारं होतं. नंतरच्या दोन दिवसांत मलाय पदार्थ चाखून पाहण्याची माझी इच्छा केव्हाच मेली होती. या सगळ्या पूर्व आशियाई राष्ट्रांत शाकाहारी माणसं फारच थोडी सापडतात आणि त्यांचा मांसाहार हा आपल्या कल्पनेपलिकडचा असतो. ते तसले पदार्थ तोंडात घालणं तर सोडाच, नुसते बघण्यासाठी पण मनाची बरीच तयारी करावी लागते.
आमचं जेवण चालू असतानाच तिथे एक मलाय कुटुंब आलं. त्यांतल्या ८-१० वर्षांच्या एका खट्याळ पोरानं आमच्या डब्यांत वाकून पाहिलं आणि जसं मी नाक मुरडलं होतं तसंच त्यानं आमच्या पुरी-भाजी, गुलाबजाम, दही-भात या जेवणाकडे बघून तोंड वाकडं केलं. तिथल्या तिथे फिट्टमफाट!! इतरही अनेक लोक आमच्या जेवणाकडे वळूनवळून पाहत होते. कदाचित मस्त, सुग्रास खेकड्याचं कालवण खाताना गोडेतेलाचा 'घाणेरडा वास' त्यांच्या नाकात शिरला असेल आणि त्यांच्या जेवणाची मजाच गेली असेल ...
दुसऱ्या बसमध्ये एक टूरिस्ट गाईड होती. तिने दिलेली प्राथमिक माहिती आमच्या सहप्रवाश्यांकडून कळली. मलाय भाषेत स्वागत करायचे असेल तर 'selamat datang' असं म्हणतात. ही अक्षरं तिथे हॉटेलमध्येही दिसली होती.
सकाळच्या प्रवासात मंडळींची एकएक डुलकी झालेली होती, आता जेवणंही झाली होती. तिथून निघाल्यावर मग बसमध्ये गाणी, गप्पा, जोक्स, नकला सुरू झाल्या. तो तास-दीड तास मजेत गेला.
संध्याकाळी क्वालालंपूर शहरात पोहोचलो. डावीकडच्या खिडकीतून लांबवर पेट्रोनास ट्विन टॉवर्स दिसले. मलेशियातली तेवढी एकच गोष्ट फक्त माहित होती, त्यामुळे सगळे 'बघू, बघू' करत डाव्या बाजूच्या खिडक्यांतून डोकावून पहायला लागले आणि एखादी नवलाईची गोष्ट सापडावी तसे खूष झाले. ते टॉवर्स पुढच्या दोन दिवसांत सतत दिसतच राहिले. जरा इकडे-तिकडे नजर वळवली की कुठेनाकुठेतरी दिसायचेच. पण त्या क्षणी ते माहिती नव्हतं. त्यामुळे आयुष्यातली ती जणू एक मोलाची संधी दवडण्याची कुणाची तयारी नव्हती.
त्यादिवशी आम्हाला क्वालालंपूरहून पुढे 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. 'गेंटींग हायलंड' - तिथलं एक प्रसिध्द थंड हवेचं ठिकाण - मलेशियाचं महाबळेश्वर!! क्वालालंपूर शहरात न शिरता बसने घाटरस्ता पकडला. जसजशी हवा गार-गार होत गेली, ढग-धुकं वाढायला लागलं, तसतसे ते पाम पांघरून बसलेले डोंगर अजूनच छान दिसायला लागले. वळणावळणाचा रस्ता पोटातल्या पाण्यात ढवळाढवळ करणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. माझं पाट्या वाचण्याचं काम सुरूच होतं. त्या रस्त्यावर सतत 'ikut kiri' अशी एक पाटी दिसत होती. २-३ दिवसांच्या संशोधना‍अंती त्याचा अर्थ 'Keep left' आहे असं लक्षात आलं. रंगरूप बदललं, देश-वेष बदलला तरी रहदारीच्या नियमांसारख्या काही गोष्टी लोकांच्या मनावर सतत बिंबवाव्याच लागतात. त्या बाबतीत जगभर एकवाक्यता दिसून येईल ... आणि त्या सतत बिंबवल्या जाणाऱ्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीतही!!
'गेंटींग हायलंड'च्या पायथ्यापाशी उतरलो तेव्हा दिवस पूर्णपणे बुडालेला होता. हवेत बोचरा गारवा होता. काहीजणांनी आपापले स्वेटर्स वगैरे बाहेर काढले. पुणेकरांचा गुलाबी थंडीबद्दलचा 'जाज्वल्य अभिमान' लगेच उफाळून आला. 'स्वेटर घातलेले सगळे मुंबईकर, न घातलेले सगळे पुणेकर' अशी थट्टा सुरू झाली. मुंबईकरांना नावं ठेवण्याची अशी नामी संधी पुणेकर थोडीच सोडणार होते ....
त्या पायथ्यापासून आम्हाला केबल कारने वर 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. ती आशिया खंडातली सर्वात मोठी केबल कार समजली जाते. गुडुप अंधारात, त्या एकमेव केबलच्या भरवश्यावर आमच्या निरनिराळ्या केबिन्सची वरात २००० मी. उंचीवरच्या त्या डोंगराच्या दिशेने निघाली. खाली उंचच्या उंच पर्जन्यवृक्षांचं निबिड अरण्य मिट्ट काळोखात एकदम भयाण वाटत होतं. 'Rain-forests of Malaysia ...' हे शब्द डिस्कवरीवरच्या कार्यक्रमांत अनेकदा ऐकले होते - तेच हे मलेशियातलं जगप्रसिध्द, घनदाट पर्जन्यवन. केबलला आधार देणाऱ्या मोठ्या खांबांजवळ तेवढा एखादा मिणमिणता दिवा असायचा. बाकी संपूर्ण अंधाराचं साम्राज्य होतं. अश्या ठिकाणी 'अचानक वीज गेली तर ...', 'काही बिघाड झाला तर ...' असल्या शंका हटकून मनात येतातच. केबिन्सच्या आतल्या बाजूला सुरक्षाविषयक सगळे नियम आणि सूचना लिहिलेल्या होत्या त्या आधी वाचून काढल्या. आदित्यला समजावून सांगितल्या. भीती अशी वाटत नव्हती पण नाही म्हटलं तरी अंधाराचा मनावर थोडा परिणाम झालेलाच होता. पण त्याबरोबरच हा प्रवास दिवसाउजेडी करायला तितकीच मजा येईल हे ही कळत होतं.
निसर्गावर मात करणं माणसाला कदापि शक्य नाही हे अश्या वेळेला पटतं. घनदाट जंगलातून उंच डोंगरावर सहजगत्या पोचण्यासाठी एक अत्याधुनिक वाहतुकीचं साधन उपलब्ध करणं म्हणजे कौशल्याचं काम होतं हे खरंच! माणसाच्या मेंदूला तिथे दाद ही दिलीच पाहिजे. पण म्हणून केवळ त्या बुध्दीच्या जोरावर निसर्गावर कुरघोडी करायचा कुणी आव आणत असेल तर निसर्ग त्याला अश्या ठिकाणी बरोब्बर त्याची जागा दाखवून देतो. शारीरिक इजा पोहोचू नये म्हणून खबरदारीचे अनेक उपाय योजता येतात पण त्या जीवघेण्या शांततेत, काळोखात बुडलेल्या दाट जंगलात हे पण कळून चुकतं की माणूस हा त्या सर्वशक्तिमान निसर्गाच्या दृष्टीने इतर किडा-मुंग्यांसारखाच!!
त्या अर्ध्या तासात मध्ये काही काळ तर असा होता की मागचं दिसेनासं झालं होतं आणि पुढची लोकवस्तीची चिन्हं दिसायला अजून वेळ होता. त्या अंधाराच्या साम्राज्याच्या दोन्ही टोकांना मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे हे सांगूनही कुणाला पटलं नसतं. थोड्या वेळानंतर वर लांबवर दिवे लुकलुकायला लागले. ३०-३५ मिनिटं ती तशी लटकत मार्गक्रमणा केल्यावर आम्ही उतरलो.
एखाद्या पर्यटनस्थळी जशी संध्याकाळच्या वेळी माणसांची गजबज, दिव्यांची रोषणाई वगैरे असते तशीच तिथे होती. हॉटेलच्या खोल्या ताब्यात घेतल्या, सामान टाकलं आणि जेवणासाठी पुन्हा बाहेर एकत्र जमलो. जेवणाचं ठिकाण तिथून थोडं लांब होतं. म्हणजे त्याच परिसरात होतं पण चालत जायला १५-२० मि. लागायची. आणि ते चालत जाणं म्हणजे सुध्दा प्रत्यक्ष चालणं कमी आणि सरकत्या जिन्यांवरून वर-खाली करणं जास्त होतं. त्या रिसॉर्टचे जमिनीखाली आणि वर मिळून जवळजवळ १२-१५ मजले होते. जेवणाचं ठिकाण सातव्या मजल्यावर होतं. आता तो सातवा मजला म्हणजे सुध्दा एकूणातला सातवा की जमिनीवरचा सातवा की जमिनीखालचा सातवा हे शेवटपर्यंत कळलं नाही. पण जवळजवळ ६-७ सरकत्या जिन्यांवरून सरकून (वर की खाली ते ही आता आठवत नाहीये!!) गेल्यावर आम्ही त्या जेवायच्या ठिकाणी पोहोचायचो. माझी तर दरवेळी त्या सरकत्या जिन्यांची मोजदाद चुकायची. पु.लं.च्या 'वाऱ्यावरची वरात' मध्ये कसा तो 'गरूडछाप तपकीर'वाला पु.लं.ना सांगतो - 'दोन डोंगर चढायचे, दोन उतरायचे - पायथ्याशी गावडेवाडी' तसंच काहीसं होतं तिथे - ४-६ सरकते जिने चढायचे, ७-८ उतरायचे, पायथ्याशी जेवण!! काय गंमत आहे ना ... कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करताना पु.लं.ची आठवण हमखास येतेच. त्यांची कुठली ना कुठली तरी शाब्दिक कोटी, कुठला ना कुठला तरी विनोद त्या प्रसंगात चपखल बसतोच. मलेशिया हा जेव्हा अजून मलेशिया झालेला नव्हता तेव्हाचाही - पु.लं.च्या 'पूर्वरंग'तून माहिती होताच की!! म्हणजे मलाय देश आणि पु.ल. ही जोडी अगदीच विजोड नव्हती ...

रात्री १० च्या सुमाराला हॉटेलवर परतलो. घरातून निघाल्यापासून प्रथमच जरा सुखद थंडी अनुभवायला मिळत होती. ट्रीपला जायचं ठरल्यावर ती ठिकाणं थंड हवेची नाहीत म्हणून आदित्य सुरूवातीला थोडा खजील झाला होता. तो त्या थंडीमुळे जरा खूष झाला. त्याला आता दुसऱ्या दिवसाची उत्सुकता लागून राहिली होती कारण तिथला दुसरा दिवस हा त्याच्या वयाच्या मुलांच्या खास आकर्षणाचा असणार होता.
चार भिंतींतल्या सुरक्षित अंधारात सगळे झोपेच्या अधीन झाले. हा अंधार आणि काही तासांपूर्वीचा तो जंगलातला भयाण अंधार - दोन्हीत किती फरक होता .... !!!

गुलमोहर: 

छानच लिहलय. शैली ओघवती आहे. निरीक्षण आणि त्यावरील टिप्पणी भावली.
छान सफर घडवताय. पुढच्या भागाची वाट बघतेय.

आपल्या मूळ घरापासून, गावापासून, प्रदेशापासून लांब राहणाऱ्या लोकांना आपले धार्मिक कुळाचार पाळण्याची जास्त गरज वाटते नेहेमीच. तसं करून ते त्या परमुलखात, वेगळ्या वातावरणात आपला भारतीयपणा, मराठीपणा जपण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण आपला भारतीयपणा, मराठीपणा जपतोय हे तिथल्या इतर लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात .......
>>>>>>>> १००% अनुमोदन. ही तर्‍हा भारताबाहेरील जवळपास सर्वच अनिवासी भारतीयांमध्ये आहे