पंधराशे हॅरिसन- शोध

Submitted by सीमंतिनी on 10 February, 2013 - 22:47

शोध

‘गरज ही शोधाची जननी असते’ अस सगळ जग म्हणते, पण आमच्या घरी मात्र ‘जननी ही शोधांची गरज आहे’ हा समज दृढ आहे. वस्तू अगदी नेमक्या वेळी हरवण्यात पटाईत आहेत आणि मला हाक मारण्यात सगळ्यांचे गळे सराईत आहेत. राज, माझा मुलगा, सध्या हायस्कूल मध्ये आहे. घराला व्यवस्थित एक त्याची बेडरूम असताना ही वर छोट्या अॅट्टीकमध्ये त्याने बेडरूम हलवली. त्याला बेडरूम हलवायची परवानगी देताना मी दहा वेळा राघवनला, माझ्या नवऱ्याला, सुनावलं असेल - “जर तो त्याची खोली स्वच्छ करणार असेल, व्यवस्थित ठेवणार असेल, तरच परवानगी दे. नाहीतर शिंगरू मेल हेलपाट्याने अशी माझी अवस्था व्हायची.” पण शिंगरू आणि हेलपाटा ह्या दोन्ही संज्ञा ‘लॉस्ट इन ट्रान्सलेशन’ झाल्याने माझ मरण काही चुकल नाही. आता आता मी सुद्धा कंटाळा करते वर जाऊन त्याची खोली साफ करायचा. पण मग वस्तू जास्तच हरवू लागतात. बर ह्याची कोणती वस्तू हरवली आहे हे समजण्यात आधी माझी १० ते १५ मिनिटे जात. कुठल्यातरी पोस्ट-इट वर लिहिलेले पास वर्ड, कधी कुठली तरी विशिष्ट कीटक नाहीतर फुटबॉल सारखी दिसणारी थंब ड्राईव्ह, कधी वही, कधी एखादा लकी पेन आणि हल्ली हल्ली “मॉम, गिव्ह मी अ कॉल” म्हणजे हरवलेला सेल फोन ... एकदा वस्तू समजली कि ती शोधताना अजून १० मिनिटे. पण अनंतकाळची माता असणाऱ्या आईच्या २५ मिनिटांची कधी कोणी किंमत करत का? नीना म्हणजे, माझ्या मुलीच्या वस्तू, तिच्या खोलीबाहेर सापडत हा तसा नवीन आणि गंभीर प्रश्न होता. पण राजच्या वस्तू त्याच्याच खोलीत सापडत नसत हा एक जुना चिघळलेला प्रश्न होता.
ह्या विकेंडला राघवनला माझी दया आली, म्हणाला “व्हॅक्युम आणि लॉन्ड्री म्हणजे फार काही नाही, मी आवरतो त्याची खोली.” १५ मिनिटात घाबरा-घुबरा होत तो खाली आला आणि माझ्या डोळ्यासमोर मासिक नाचवत तो म्हणाला “हे बघ काय सापडलं मला.” घरात काही बाही मासिके वाचेल इतका माझा राज टेक्नो बॅकवर्ड नाहीये. पण मासिकावर हा असा, असला बनियान मधला माणूस …. बापरे! बोलणे सोपे आहे “जसे असेल माझे मूल तसे अक्सेप्ट करीन” पण प्रत्यक्षात जमेल मला? माझा गोंधळलेला चेहरा पाहून किंचाळत राघवन म्हणाला “अग, ते तसलं नाही, हे टॅटूचे मासिक आहे - ‘टॅटूइंक’ म्हणून " टॅटू म्हंटल की मला आमची नेवाशाची रखमा आठवली. तिचा गोन्दावलेला हात जेव्हा भांड्यांवरून फिरत असे तेव्हा भांडे कसे लख्ख होत असे. तिच्यासारखे हनुवटीवर मलाही गोन्दावयाचे होते. पण आजीने ‘आपल्यात नाही गोन्दावत' म्हणत मारलेली चापट आजही लक्षात आहे. मी काय मत देणार होते टॅटूबद्दल. काहीतरी म्हणायचं म्हणून मी म्हणाले “अरे, आपल्यात ना Sही गोन्दावत”. आमची डिग्री सर्टीफिकेटं ट्रोफ्या ठेवलेल्या त्याच्याकडे बघत राघवन परत कळवळून म्हणाला “अग, तेच तर, ‘आपल्यात’ ना Sही गोन्दावत. आता शाळेतून ट्रबल्ड किड म्हणून फोन आल्यावरच जागी होणार आहेस का!!??” मग अचानक माझ्या डोळ्यासमोर रियो, फास्ट फ्युरीयस गाड्या आणि ती धिप्पाड गोंदवलेली माणसे डोळ्यासमोर आली. आता मी कळवळून विचारले “पण बाकी काही नाही न सापडले?” “नाही पण ते रोबोटिक्स ऑलिम्पियाडच्या नावाखाली नक्की काय चालू आहे जरा नीट चौकशी कर.” म्हणत राघवन गेला. मी झीशानच्या आईला फोन लावला. ती इंजिनीयर होती आणि झीशान- राजच्या टीमला गाईड करायची. तिच्याकडून पण वावगे काही ऐकले नाही. स्ट्रेट ‘ए’ मिळवणारा हा मुलगा अशा काही नादाला लागेल वाटत नाही. आता, सरळ त्यालाच विचारावे ??!!
मी नीनाच्या खोलीत गेले. सहज वाटेल असे भासवत मी तिला अडून अडून राज शाळेत कोणाबरोबर असतो विचारू लागले. दोन - तीन प्रश्नात ती घाबरी-घुबरी होऊ लागली तेव्हा मी तिला ठेवणीच्या आवाजात विचारल आणि अचानक ती रडायलाच लागली. आता मला काही समजेनासे झाले. रडे थांबवत नीना सांगू लागली ४ महिन्यापूर्वी तिच्या लेक्रोस टीम मधल्या सगळ्या मुलीनी टॅटू लावला होता. नीनाला ही हवा होता. अर्थात १८ वर्षाखालील असल्याने नीनाला टॅटूसाठी आमची संमती लागणार होती, आणि तिला पूर्ण खात्री होती की आई-बाबा तिला नाही म्हणतील. म्हणून नीनाने (वय वर्षे १३) राजला (वय वर्षे १७) विचारले होते - माझा पॅरेंट म्हणून येशील? आणि राजला तिचा पॅरेंट म्हणून जायला काही SSही प्रोब्लेम नव्हता. पण टॅटू चांगला का वाईट हे वाचून ठरवल्याशिवाय तो तिच्यासाठी सही करणार नव्हता! एक क्षण माझा रागाचा पारा चढलाच - अस पॅरेंट म्हणून बतावणी करणे इल-लीगल आहे आणि चूक आहे. पण त्याच क्षणी सतत “हे मॉम” करणारा ममाज बॉय माझा राज आता त्याच्या बाबा सारखा सुटवंगपणे Informed decisions घेतोय हे लक्षात आले. आणि नकळत एक वेदना काळजात उमटली, लेबरपेन पेक्षा ही ती जास्त पेनफूल होती...
हल्ली हल्ली राजच्या वस्तू शोधून द्यायला मी कुरकुर करीत नाही. राघवनला वाटतय मी राजवर व्यवस्थित लक्ष ठेवतीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy

msta...

मस्त च गं...हे कसं सुटलं होतं वाचयचं ..दुसरा भाग वाचला त्यच्या प्रतिक्रिया वाचून हा भाग शोधत आले ....
अगदी मस्त चाललय ..
आरती, राघवन, राज, नीना...

Pages