तुझं-माझं इतकं सख्य का? कुणास ठाऊक...
तू यायलाच हवस... मी ज्या ज्या वास्तूत रहायला म्हणून गेले त्या त्या वास्तूला तुझा स्पर्श हवा... तू येऊन आपल्या डोळ्यांनी सगळं बघायला हवंस... हा माझा हट्ट आहे. होय. आहेच मुळी.
कळतंय मला... हा चक्क वेडेपणाच. माझं अती-शहाणं मन ह्याला वेडेपणाच म्हणतं. शहाणं मन समजूत घालतं स्वत:ची.
पण वेड्या मनाचं काय करू?
मला ह्या घरात येऊन तब्बल पाच वर्षं झाली तरी अजून आली नव्हतीस हे मला कितीदा टोचलं म्हणून सांगू? का नाही आलीयेस अजून? कुठे अडकलीस? की... माझं काही चुकतय?... की ही वास्तूच तुला येण्यासारखी नाही?... तसही मी काय करीत होत्ये म्हणून आधीच्या घरांतून तू वावरलीस?
एक ना दोन... ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत.
मला आठवतं, आईकडे... आमच्या घरी तू खूप मोकळी असायचीस. कोकणातल्या अंगण, परसू, शिवारातली, तू...
मुंबईत असूनही आमच्या घराला केव्हढंतरी अंगण-परस होतं. माड, आंबा-फणस, पेरू, जांभळण, शेवगा, केळ, चिकू... इतकच काय पण भाजीचा वाफा, फुलझाडं ह्यानं हासरं होतं आमचं अंगण. बाबांच्या बाबांनाच किती आवड... स्वत: खपायचेच अन माळीही होताच.
मला आठवतं... तू यायची असलीस की, घरचेच काय पण अंगण-परसामधली ती हिरवी मनंही पालवून उठायची. सकाळचा पहिला चहा झाला की पुढे बाबांचे बाबा काठी टेकत अन ते दाखवतायत ते अन अजून बरच काही आपल्या बारिक नजरेनं टिपत त्यांच्यामागे तू...
मग तुझी म्हणून खास फेरी असायचीच. प्रत्येक थोरल्या वृक्षाची, धाकल्या झाडा-झुडपाची, लेकुरवाळ्या केळीची, झालंच तर पेरोबा, चिकुल्या, शेवगा... आणि, कोपर्यातल्या धुमारल्या वेलीची... पहिलच हिरवं गोंदण लेऊन लाजणार्या कुण्या ठेंगणी-ठुसकीची... अगदी सगळ्या सगळ्यांची जातीनं विचारपूस करीत तुझी स्वत:ची म्हणून एक निवांत फेरी असायची. मग संध्याकाळी आईला, तुझ्या लेकीला सोबत घेऊन कुठे आळं नीट कर, कुणावरची जुनी कात झटक, कुणाला आधार दे.. असं करीत दोघी रमायच्यात.
अजूनही अगदी असुया वाटते मला तुझ्या-तिच्यातल्या त्या हिरव्या नाळबंधाची. मला मुळीच तुझ्यासारखी-आईसारखी झाडांची आतून माया नाही... लावलेलं झाड अगदी कर्तव्य म्हणून मरु-झुरू देणार नाही, मी. पण धावधावून त्यांचं दुखलं-खुपलं बघणं, गदगदून येऊन खोडा-पानावरून हात फिरवणं, त्यांच्याशी बोलणं... शक्यच नाही. तो वसा तुझ्या लेकीनच आयुष्यभर पाळला. उतली नाही मातली नाही.. तू दिला वसा जीवापाड संभाळला... पण तो वसा माझ्या ओटीत आला नाही हे ही तितकच खरं.
वसा घ्यायला ओटही तितकीच घटमुट हवी.
मी तबला वाजवायला लागल्यावर किती नाराज झाली होतीस तू. मुलीची जात... असं स्वच्छ, जुनंच पण मोकळ्या मनाचं समीकरण होतं तुझं. तेव्हा दुखावलेल्या, चिडलेल्या मला, तुझ्यातली नात नाकारणारी आज्जीच दिसत राहिली...
खूप मोठ्ठी झाल्यावर कधीतरी पाणी वळलं असणार... आपसुकच. कधीतरी तुझ्या अनुभवविश्वातली बावरलेली स्त्री, धास्तावलेल्या, नातीच्या काळजीनं खंतावलेल्या आज्जीपर्यंत मी पोचले... अन ती पटलीही. मोठं होणं असंच असतं गं... आपल्याच नकळत.
अगदी स्वच्छ आठवतं मला... त्याच माझ्या घुसमटल्या काळात एकदा खूप आजारले मी. आठवडा झाला तरी आली नव्हतीस तू.
एका संध्याकाळी तापाच्या ग्लानीत कधीतरी डोक्यावरून फिरलेला तुझा सुरकुतला हात अजून आठवतो मला... "... काय म्हणता गो पोर... माका आधी सांगू नय?"... असं तू म्हणताना तुझ्या हललेल्या स्वरानं माझ्या मिटल्या डोळ्यांच्या कडेनं सोडलेला ठाव...
मी अगदी बरी होऊन हिंडू-फिरू लागेपर्यंत तू हलली नव्हतीस माझ्या बाजूची.
तेव्हाच... तेव्हाच माझ्या पंचेंद्रियांनी कणाकणानं क्षणाक्षणातून तुला अगदी रेखून घेतलय माझ्या असण्यावर.
माझ्या अंगावरलं पांघरूण नीट करताना.. तुझ्या पदराची हलकी झुळुक...
येताजाता माझ्या डोक्यावरून, केसांवरून तुझा हात फिरताना तुझ्या हातातल्या दोनच बांगड्यांची माझ्या अगदी कानाशी किणकिण. तुझा सुरकुतलेला गोरापान हात माझ्या गालाखाली घेऊन मी घेतलेला दुपारच्या झोपेचा चुटका... तुझं अवघडून तिथ्थे तस्सं बसून रहाणं...
रोज संध्याकाळी मला उंबर्यात उभं करून तू मालवणीत पुटपुटत माझी काढून टाकलेली दृष्ट... त्यावेळी माझ्या क्लान्त अवस्थेत ते सगळं वैतागवाणं वाटलेलं. आता जाणवतय... जगातल्या सगळ्या कल्याणकारी शक्ती तेव्हा तुझ्या रुपात माझी अलाबला घेत होत्या.
तू कालवून आणलेला साधा पीठी-भात, मला सोसणार नाही म्हणून लोणचं द्यायला आई नाकबूल असताना, आपल्या ताटातल्या कालवलेल्या भाताचं माझ्या जीभेवर तू ठेवलेलं रसभरलं बोट....
तू पान खायचीस त्याचा कडवट, गोडुस वास...., तू सकाळी आंघोळ झाल्यावर एकदाच काय त्या चेहर्याला, मानेला लावलेल्या टाल्कमपावडरचा वास... तू स्वयंपाकघरात घातलेल्या फोडण्या, किंवा बागेतून फिरून येताना पदरातून आणलेला चाफा, मोगरा, जाई... किंवा दुर्वा, तुळशीच्या मंजिर्या, ह्या सगळ्याचा एक संमिश्र... खास तुझाच म्हणून गंध...
आज्जी, तू कशी अन किती माझ्यात भिनलीयेस... काय सांगू? आत्ता, ह्या क्षणी डोळे मिटले तर तू अज्जाच समोर उभी रहातेस...
पण अशी.. मी बोलवून, आठवून नकोयस तू यायला...
माझ्या घरांमधून माझ्या ध्यानी-मनी नसताना तू आपणहून आलीयेस. तुझा म्हणून तो गंध, दोनच बांगड्यांची किणकिण, पदराची झुळुक असं काहीतरी जाणवलय... मी वळून बघतच नाही. तूच आहेस ह्याची मला खात्रीच असते. कौतुकानं माझी घरातली लगबग बघत असशील. माझा वावर, माझी धावपळ, माझा गोंधळ, तुला सुखवत असेल... तुझी ओलावली दिठी माझ्या पाठीवरून उबदार हातासारखी फिरते. तू आहेस.... तू बघतेयस... मग ओल्या पापण्या फडफडावीत... मान हलवीत मी मनापासून घरातलं करीत... आवरीत रहाते. माझ्या नकळत येतेस तशीच हलक्या पावलांनी जातेसही...
ह्या घरात तू आलीच नव्हतीस हा सल किती टुपला म्हणून सांगू. मध्यंतरी खूप आजारी पडले. अगदी दोन-दोन दिवस उठवलही नाही.
एका करकरीत संध्याकाळी सगळ्या जगाची मरगळ घेऊन कुरवंडुन पडून राहिले होत्ये... दाराकडे पाठ करून. नवर्याचा, मुलाचा स्वयंपाकघरातला वावर मनाला पराण्या टोचत राहिला. टक्क डोळ्यांनी खिडकीबाहेरच्या आपल्यातच मग्न जगाकडे बघत राहिले....
आणि जाणवलं... तू आलीस.... खोलीच्या दारात उभी आहेस... तुझा गंध जाणवला, तुझ्या पदराची झुळुक, बांगड्यांची किणकिण... अगदी जवळून आल्यासारखी...
म्हणतेयस, ’काय झाला गो पोराक?... इतक्या आजारला... माका आधी सांगू नय?’.....
माझ्या डोळ्याच्या कडांमधून तुझ्या ओल्या स्वरांनी कधीच ठाव सोडला होता...
कधी नव्हे ते वेडं मन अतिशहाणं झालं अन न राहवून मी वळून बघितलं...
....
तू आली होतीस ना?...
आज्जी, आलीसच तू शेवटी.
समाप्त
खूप आवडलं.
खूप आवडलं.
दाद नेहमीप्रमाणेच खुप छान..
दाद नेहमीप्रमाणेच खुप छान..
दाद....किती प्रत्ययकारी
दाद....किती प्रत्ययकारी लिहिलय...डोळ्यात पाणी आलं...
खूप सुंदर लिहीलय.
खूप सुंदर लिहीलय.
परत एकदा तुझ्या आवाजात
परत एकदा तुझ्या आवाजात 'वाचल'. आत पर्यन्त भिडलं!
काय लिहीलंस दाद! आज्जीची
काय लिहीलंस दाद! आज्जीची आठवण आली माझ्या पण!
रडू आल ना मला... आजीची आठवण,
रडू आल ना मला... आजीची आठवण, आणि ती नसल्याचा सल...
खूप भावनिक, अप्रतिम... खूप सुंदर लिहील आहात .
सुरेखच !
सुरेखच !
दाद, नेहेमीप्रमाणे मस्त!
दाद, नेहेमीप्रमाणे मस्त!
माझी आई अजुनही साड्याच नेसते.
माझी आई अजुनही साड्याच नेसते. तिच्या काॅटनच्या साड्यांची गोधडी माझ्या मुली अजुनही हट्टाने वापरतात. तर माझ्या सात वर्षाच्या मुलीला काळजी आहे की तिची आई म्हणजे मी साड्या नेसत नसल्याने तिच्या मुलींना गोधड्या कश्या मिळतील?
दाद, सुंदर लिहील आहेस. रच्याकना, तुझी नातवंड पण खुप लकी असणार आहेत.
कसं ग असं आतून लिहिता येतं
कसं ग असं आतून लिहिता येतं तुला. फार फार आवडलं. >>+१
छान लिहले आहे
छान लिहले आहे
Pages