नमस्कार बाबा...

Submitted by चिखलु on 4 February, 2013 - 17:00

नमस्कार बाबा,

वाढ-दिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा...

लहान असताना एकदा काका, तुम्ही आणि मी कुठेतरी चाललो होतो, काका त्यांच्या इस्टेट विषयी सांगत होते, त्यांनी तुम्हाला विचारलं की तुमची काय इस्टेट आहे? तुम्ही माझ्याकडे पाहून म्हणाले "हीच इस्टेट आहे आमची" अजूनही जेव्हा जेव्हा मी काहीतरी चांगले करतो, तेव्हा मला तुमचे हे वाक्य आठवते आणि तुमच्या विषयी आदर वाटतो.

तुम्ही मला कधीही अभ्यास कर असे म्हणाला नाही, कधी कधी म्हणायचा, "तू जर अभ्यास केला तर तुला चांगली नोकरी मिळेल, तुझे करिअर होईल" पण कधीही कसलीही सक्ती नाही. साध्या साध्या गोष्टीतून तुम्ही मला शिकवलं, बाबा मला तुमच्याविषयी खूप आदर वाटतो.

माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला जे रुपये गिफ्ट म्हणून देत किंवा तुम्हाला मिळणारे बक्षीस तुम्ही आम्हाला वाटून देत त्याची किंमत खूप जास्त आहे माझ्यासाठी. भलेही आज मी खूप कमवत असेल पण तुम्ही माझ्यासाठी जे प्रेमाने करता ते मला जास्त महत्वाचे वाटते.

२६ जानेवारी नंतर मी तुम्हाला फोन केला तुमचा आवाज खालावला होता, तुम्हाला बरे नव्हते वाटत, तो पूर्ण दिवस मला अतिशय वाईट गेला. मला वाईट वाटते की तुमची काळजी घ्यायला मी तुमच्याजवळ नाहीये.
अशात एकदा फोनवर तुम्ही मला चिखल्या म्हणाला, मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले.

काळ किती पटकन बदलतो. २०१०-११ ला भयानक त्रास झाला, किती समर्थपणे तुम्ही सगळ्या गोष्टी सावरल्या. माझी खूप चिडचिड व्हायची पण तुम्ही एकदम शांत, सगळच किती व्यवस्थित निभावून नेलं तुम्ही. म्हणून तुमचा आधार वाटतो.

दीड वर्षापूर्वी जहांगीर मधून तुम्हाला घरी घेवून चाललो होतो, तुमच्या डोळ्यात इंजेक्शन दिले होते म्हणून तुमचे डोळे बंद, तुमचा हात हातात घेवून रस्ता पार केला, डोळ्यात पाणी आलं अचानक, बाबा तुम्हीच तर माझा हात हातात घेवून चालायला शिकवलं मला, कधी मला तुमचा हात हातात घेवून अशा पद्धतीने रस्ता पार करावा लागेल असं स्वप्नातही वाटले नाही मला...

आज बाकीच्या लोकांच्या नजरेत मी स्वतःच्या पायावर उभा असेल, पण मला अजूनही तुमचा आधार वाटतो, आणि तो आयुष्यभर राहील.

असो, काळजी घ्या आणि मजेत रहा.

पुनश्च शुभेच्छा!

तुमचाच

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages