नमस्कार बाबा,
वाढ-दिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा...
लहान असताना एकदा काका, तुम्ही आणि मी कुठेतरी चाललो होतो, काका त्यांच्या इस्टेट विषयी सांगत होते, त्यांनी तुम्हाला विचारलं की तुमची काय इस्टेट आहे? तुम्ही माझ्याकडे पाहून म्हणाले "हीच इस्टेट आहे आमची" अजूनही जेव्हा जेव्हा मी काहीतरी चांगले करतो, तेव्हा मला तुमचे हे वाक्य आठवते आणि तुमच्या विषयी आदर वाटतो.
तुम्ही मला कधीही अभ्यास कर असे म्हणाला नाही, कधी कधी म्हणायचा, "तू जर अभ्यास केला तर तुला चांगली नोकरी मिळेल, तुझे करिअर होईल" पण कधीही कसलीही सक्ती नाही. साध्या साध्या गोष्टीतून तुम्ही मला शिकवलं, बाबा मला तुमच्याविषयी खूप आदर वाटतो.
माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला जे रुपये गिफ्ट म्हणून देत किंवा तुम्हाला मिळणारे बक्षीस तुम्ही आम्हाला वाटून देत त्याची किंमत खूप जास्त आहे माझ्यासाठी. भलेही आज मी खूप कमवत असेल पण तुम्ही माझ्यासाठी जे प्रेमाने करता ते मला जास्त महत्वाचे वाटते.
२६ जानेवारी नंतर मी तुम्हाला फोन केला तुमचा आवाज खालावला होता, तुम्हाला बरे नव्हते वाटत, तो पूर्ण दिवस मला अतिशय वाईट गेला. मला वाईट वाटते की तुमची काळजी घ्यायला मी तुमच्याजवळ नाहीये.
अशात एकदा फोनवर तुम्ही मला चिखल्या म्हणाला, मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटले.
काळ किती पटकन बदलतो. २०१०-११ ला भयानक त्रास झाला, किती समर्थपणे तुम्ही सगळ्या गोष्टी सावरल्या. माझी खूप चिडचिड व्हायची पण तुम्ही एकदम शांत, सगळच किती व्यवस्थित निभावून नेलं तुम्ही. म्हणून तुमचा आधार वाटतो.
दीड वर्षापूर्वी जहांगीर मधून तुम्हाला घरी घेवून चाललो होतो, तुमच्या डोळ्यात इंजेक्शन दिले होते म्हणून तुमचे डोळे बंद, तुमचा हात हातात घेवून रस्ता पार केला, डोळ्यात पाणी आलं अचानक, बाबा तुम्हीच तर माझा हात हातात घेवून चालायला शिकवलं मला, कधी मला तुमचा हात हातात घेवून अशा पद्धतीने रस्ता पार करावा लागेल असं स्वप्नातही वाटले नाही मला...
आज बाकीच्या लोकांच्या नजरेत मी स्वतःच्या पायावर उभा असेल, पण मला अजूनही तुमचा आधार वाटतो, आणि तो आयुष्यभर राहील.
असो, काळजी घ्या आणि मजेत रहा.
पुनश्च शुभेच्छा!
तुमचाच
सुंदर लिहिले आहे. इथे
सुंदर लिहिले आहे. इथे लिहल्याबद्दल धन्यवाद.
साध्या सरळ भावना...
साध्या सरळ भावना... पोहोचल्याच... तुझ्या बाबांना आमच्याकडूनही शुभेच्छा.. आणि अजय म्हणालेत तसं शेअर केल्याबद्दल धन्यवाद...
शैलेश, माहिती नव्हतं लिहीतोस ते... कीप इट अप...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते शेवटच्या काही अक्षरांवर टिंब देऊन टाक.. वाचताना अडायला होणार नाही...
छान लिहीले आहे. तुझ्या
छान लिहीले आहे. तुझ्या बाबांना शुभेच्छा!
छान, मनातलं, आतलं लेखन.
छान, मनातलं, आतलं लेखन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स मित्रांनो, बागेश्री:
धन्स मित्रांनो,
बागेश्री: दुरुस्त्या केल्या, धन्स
छान लिहिलं आहेस
छान लिहिलं आहेस
सुंदर लिहिले आहे.
सुंदर लिहिले आहे.
सुंदर ... हृदयस्पर्शी
सुंदर ... हृदयस्पर्शी ....
बाबांना शिरसाष्टांग नमस्कार ....
चिखलू फारच सुंदर लिहिले आहेस
चिखलू फारच सुंदर लिहिले आहेस रे ......!अगदी मनाला भावणारे शब्द आहेत तुझे.........! तुझ्या बाबांना आमच्यासार्वांकडून हार्दिक शुभेच्छा ..............
चिखल्या किती सुंदर लिहिलं
चिखल्या किती सुंदर लिहिलं आहेस रे आणि किती मोजक्या साध्या शब्दात..
काळजी घे बाबांची.शुभेच्छा.
माझ्या बाबांबद्द्ल असं लिहायला जमेल की नाही कोण जाणे मला.. ते असेच खूप स्पेशल होते. माझ्यासाठी सर्व काही.
चिखल्या, मोजक्या शब्दात छान
चिखल्या,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोजक्या शब्दात छान लिहिलयं!
छान लिहिले आहे. ती. बाबांना
छान लिहिले आहे.
ती. बाबांना नमस्कार आणि शुभेच्छा !
आज बाकीच्या लोकांच्या नजरेत
आज बाकीच्या लोकांच्या नजरेत मी स्वतःच्या पायावर उभा असेल, पण मला अजूनही तुमचा आधार वाटतो, आणि तो आयुष्यभर राहील.
>>>>>>>> अगदी अगदी.
छानच लिहिलय.
मनातलं लिहीलत. भावस्पर्शी.
मनातलं लिहीलत. भावस्पर्शी. डोळे नकळत पाणावले. तुमच्या बाबांना नमस्कार आणी शुभेच्छा.
मनाला भिडणारे लेखन ! थोडक्यात
मनाला भिडणारे लेखन ! थोडक्यात निभावले तरी छानच !
वडिलांना शुभेच्छा !
आतुन आलेलं लिहिलय! डोळ्यात
आतुन आलेलं लिहिलय! डोळ्यात पाणी आलं चटकन!
छोट्या छोट्या गोष्टीतुन तुमचं बाबांबद्दलचं प्रेम व्यक्त होतय!! हे प्रेम आयुष्यभर असच राहु द्या!
तुमच्या बाबांना नमस्कार!
साधं पण सुंदर लिहिलयं.
साधं पण सुंदर लिहिलयं. तुमच्या बाबांना नमस्कार आणि शुभेच्छा.
सर्वांना धन्स.
सर्वांना धन्स.
तुमच्या बाबांना वाढदिवसाच्या
तुमच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मलाही आजही बाबांचा आधार हा लागतोच. कोणी कबूल करो ना करो, सर्वांनाच लागतो. कित्येक बाततीत त्यांची मदत ही लागतेच.
गरज असते ती या नात्यात कधी अहंकाराला शिरकाव करू न देण्याची.
साधं पण सुंदर लिहिलयं.
साधं पण सुंदर लिहिलयं.
एकदम भिडले.. मला आजही बाबांना
एकदम भिडले.. मला आजही बाबांना रोज फोन करुन आवाज ऐकल्याशिवाय चैन नसतो. मुलगी आणी बाबांची एक वेगळीच गट्टी असते आनि ती माझी ही आहे.
तुमच्या बाबांना शुभेछा..:)
छान लिहीलंय ! तुमच्या बाबांना
छान लिहीलंय ! तुमच्या बाबांना शुभेच्छा !
फार सुंदर! नकळत पाणी आले
फार सुंदर! नकळत पाणी आले डोळ्यातून.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
किती आतून लिहिलंय... वाचताना
किती आतून लिहिलंय... वाचताना भरून आलं
मस्त !! लगेच फोन लावला
मस्त !! लगेच फोन लावला बाबांना ( सकाळपासून ३ वेळा केला असला तरी )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी साधं, सोपं... भरून आलं
अगदी साधं, सोपं... भरून आलं वाचताना.
आज माझे वडील जाऊन जवळजवळ एक दशक झालंय. पण बाबांची आठवण ठायी ठायी येते... काही नाती, काही माणसं विलक्षण असतात. असो. यापुढे काही लिहिणं शक्य नाही.
तुमच्या बाबांना नमस्कार आणि शुभेच्छा.
मस्त लिहिलं आहेस चिखल्या.
मस्त लिहिलं आहेस चिखल्या. तुझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांनी वाचला की नाही हा लेख? वाढदिवसाची फारच छान भेट आहे की ही तुझ्यातर्फे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्स सर्वांना! त्यांनी वाचला
धन्स सर्वांना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांनी वाचला की नाही हा लेख?
>>> हा लेख आणि प्रतिक्रियाही वाचल्या त्यांनी. त्यांच्यासाठी हे सगळच नवीन होते.
प्रतिक्रिया वाचुन तर खुप आनंद वाटला त्यांना आणि म्हणुन मलाही.
हा लेख आणि प्रतिक्रियाही
हा लेख आणि प्रतिक्रियाही वाचल्या त्यांनी. त्यांच्यासाठी हे सगळच नवीन होते.
प्रतिक्रिया वाचुन तर खुप आनंद वाटला त्यांना आणि म्हणुन मलाही.
>>>>>>>>>>>>>>>>>>>
मग तर झ्याकच की...
बाबांना ही जन्मदिवसाची आगळीवेगळी भेटच झाली की राव..
बाबा वाचतच आहेत तर त्यांनाच थेट शुभेच्छा देतो
नमस्कार बाबा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अन मॅनी मॅनी हॅपी रीटर्नस ऑफ द डे
मलाही आपला मुलगाच समजा अन चिखलूदादा बरोबर माझ्यासाठीही मुलगी शोधायला घेतली तरी हरकत नाही. किमान आशिर्वाद तरी असाच काहीसा द्या.
चिखलूदादा,
तुला जसे तुझे वडील इस्टेट म्हणाले तसेच माझे बापू एकदा फोनवर माझा मुलगा दागिना आहे असे बोलताना मी गपचूप ऐकले होते. त्यावेळी मला जे वाटले त्यावरून तुझ्या भावना मी समजू शकतो नक्कीच. आई तर दिवसातना दहा वेळा बोलतच असते पण वडीलांनी असे अभिमानाने सांगणे म्हणजे भई व्वाह.. मला अश्यावेळी दिलवाले दुल्हनिया मधील अनुपम खेर आठवतो जो अमरीश पुरी ला शेवटच्या प्रसंगात बोलतो, "बस चौधरी साब बस... मेरा बेटा मेरा गुरूर है.. और मेरे गुरूर को मत ललकारना.." तेव्हाच ठरवले की आपण जगात फेल गेलो तरी चालेल, वडीलांसाठी त्यांचा अभिमान वाटावा असाच मुलगा बनून राहायचे.. थांबतो आता इथेच, नाहीतर अंड्या उगाच सेंटीमेंटल होऊन रडायचा.. बाबांना पुन्हा एकदा शुभेच्छा..!!
बाबांची गोष्ट आवडली
बाबांची गोष्ट आवडली
Pages