हल्ली

Submitted by UlhasBhide on 3 February, 2013 - 10:45

प्रस्तावना :
अकस्मात का अस्मादिक ही चुकले गल्ली Wink
फार वाढले भरकटण्याचे प्रकार हल्ली Proud
-----------------------------------------------------------------
झालो हुषार हल्ली

कुण्या काळचा बुद्दू झालो हुषार हल्ली
“मीच बरोबर” ठाम सांगतो त्रिवार हल्ली

मी चिंचेच्या झाडासम तरि प्रस्थापित मी
नवोदितांच्या ठायी ठरलो ‘चिनार’ हल्ली

जरी पाडतो सुमार कविता रोज तरीही
कुणी न म्हणती तरी तयांना टुकार हल्ली

कोण सांगतो ? ’जमिनी’वरती गझल लिहावी
स्वच्छंदी मी, करे अंबरी विहार हल्ली

’उल्हास’ ’भिडे’ने साध्य होत ना कधीच काही
मुजोर वर्तन जगन्मान्य हा प्रकार हल्ली
----------------------------------------------------------------

विषाद वाटे दुर्मिळ झाली अस्सल बीजे
तणानेच भरलेले दिसते शिवार हल्ली

पाल चुकचुके मनी अशी का प्रतारणेची
ताजमहाला ! डळमळती का मिनार हल्ली

नुरली हिम्मत, पोकळ धमक्यांना घाबरतो
उगा भासती बोथट शस्त्रे दुधार हल्ली

गद्यप्रस्तुती प्रघात रुजला काव्यामध्ये
वृत्तबद्ध लिहिण्याला म्हणती सुमार हल्ली

सांभाळू मी कशास नखरे अलामतीचे
माझ्या मागे ही(S S S) रदिफांची कतार हल्ली

‘आई-बाबा’ इतिहासाची विदीर्ण पाने
घेइ मराठी शब्दसंपदा उधार हल्ली

भारतमाते शाप तुला हा काय मिळाला !
विचार रुजण्याआधी रुजतो विखार हल्ली

.... उल्हास भिडे (३-२-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एलओसी च्या वर चिमटे काढत तर एलओसीच्या या बाजूला विषादाने मांडलेले, पण कुठेतरी आत्मपरीक्षण करायला लावणारे लिहीलंय. आणि कुठेही राग येत नाही हे विशेष, कारण लिखाणातला प्रामाणिकपणा, कळकळ, तळमळ थेटच पोहोचतेय. सा. दंडवत आपल्याला.

उल्हास काका, जबरी गझल..
इतकी यमकं जुळवायला किती वेळ लागला? Uhoh
मला एक अख्खा जन्म सुद्धा पुरला नसता.. असो...

काही शेर नक्कीच चांगले आलेत... चिमटे काढायच्या नादात थोडी भरकटलीये.

कुण्या काळचा बुद्दू झालो हुषार हल्ली
“मीच बरोबर” ठाम सांगतो त्रिवार हल्ली

विषाद वाटे दुर्मिळ झाली अस्सल बीजे
तणानेच भरलेले दिसते शिवार हल्ली

आई-बाबा’ इतिहासाची विदीर्ण पाने
घेइ मराठी शब्दसंपदा उधार हल्ली

भारतमाते शाप तुला हा काय मिळाला !
विचार रुजण्याआधी रुजतो विखार हल्ली

सुंदरच!

ज्जे ब्बात..

काही टपल्या लागतील अशाच बसल्यात...
अनेक शेर आवडलेत... इतके दिवस गज़ल नियम अभ्यासून मग पोस्ट केलेली ही गज़ल खरेच छान झालीये.
परंतू काही शेरांबाबात शामशी सहमत..

शुभेच्छा काका Happy

मस्त !

हेच मुद्दे आक्रमकता कमी करून अजून चपखल करता आले असते असे वाटले.

असो, आपण आता बिनदिक्कतपणे गझल लिहायला सुरूवात केलेली आहे ह्याचा अधिक आनंद झाला. प्रतिसादही द्यायला लागा आता.

शुभेच्छा!

भारतमाते शाप तुला हा काय मिळाला !
विचार रुजण्याआधी रुजतो विखार हल्ली

खुपच सुंदर.

वर सगळे कौतुक करताहेत तर रसभंग करायचा नाहीये मला, पण "उल्हास भिडे"च्या मध्ये मात्रांची गडबड वाटते आहे...

बाकी टारगेटेड टपल्यांचा कंटाळा आला आता... असो.

सर्वांना धन्यवाद.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
“आपण आता बिनदिक्कतपणे गझल लिहायला सुरूवात केलेली आहे ह्याचा अधिक आनंद झाला. प्रतिसादही द्यायला लागा आता.” >>> धन्यवाद विजय. पूर्वीसारखे खाजगीत प्रतिसाद न देता आता इथेच द्यायला सुरवात करणार आहे.
पहिला प्रतिसाद बेफींच्या नवीन गझलेवर द्यायची इच्छा होती. असो ..... आता सुरवात केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
नचिकेत(आनंदयात्री),

प्रांजळ, स्पष्ट अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुझे प्रतिसाद (निदान माझ्याबाबतीत तरी) व्यक्तिसापेक्ष नसून प्रस्तुतीसापेक्ष असतात हे मला फार आवडते. अशाच प्रतिसादांची (किंबहुना अभिप्रायांची) अपेक्षा.
कारण असे अभिप्राय सुधारणेचा मार्ग प्रशस्त करतात. (हिन्दी स्टाइल वाक्य .... ;))

“वर सगळे कौतुक करताहेत तर रसभंग करायचा नाहीये मला, पण "उल्हास भिडे"च्या मध्ये मात्रांची गडबड वाटते आहे..”>>> बरोबर आहे तुझं १ मात्रा अधिक झाली आहे, हे लक्षात आलं नव्हतं.

“बाकी टारगेटेड टपल्यांचा कंटाळा आला आता... असो.” >>>
हे विधान, कदाचित कंटाळा आल्याने शेवटपर्यंत वाचली नसावी असा समज/गैरसमज होण्यास वाव देणारं वाटलं.
असो.... तुझ्यासारख्या जाणकाराने माझ्या लेखनावर क्लिक करून ते पान उघडणे इतकेही माझ्यासारख्या नवख्यासाठी खूप आहे.

“बाकी टारगेटेड टपल्यांचा कंटाळा आला आता... असो.” >>>
हे विधान, कदाचित कंटाळा आल्याने शेवटपर्यंत वाचली नसावी असा समज/गैरसमज होण्यास वाव देणारं वाटलं.
असो.... तुझ्यासारख्या जाणकाराने माझ्या लेखनावर क्लिक करून ते पान उघडणे इतकेही माझ्यासारख्या नवख्यासाठी खूप आहे.
>>>

कंटाळ्याची व्याप्ती टारगेटेड टपल्यांपुरतीच होती. मी ही रचना पूर्ण वाचली. उर्वरित रचनेबद्दल लिहिलं नाही, कारण मला फार आवडली नाही. गैरसमज नसावा. (हल्ली हल्ली माझी चांगले शेर/गझल याची व्याख्याच बदलत चालली आहे असं वाटतंय. हे चूक की बरोबर कळत नाही. असो). उल्हासकाकांनी (जोर देऊन वाचा) गझल लिहीली आहे, हे नजरेतून सुटलं, त्याबद्दल क्षमस्व!

माझ्या मागे ही(S S S) रदिफांची कतार हल्ली
>> यात sss चं प्रयोजन कळलं नाही मला.

हल्ली हल्ली माझी चांगले शेर/गझल याची व्याख्याच बदलत चालली आहे असं वाटतंय. हे चूक की बरोबर कळत नाही. असो<<< Lol

तुझ्यासारख्या जाणकाराने माझ्या लेखनावर क्लिक करून ते पान उघडणे इतकेही माझ्यासारख्या नवख्यासाठी खूप आहे.
>> अशा माझ्याबद्दलच्या भारदस्त शब्दांनी भरलेल्या वाक्यांनी हुरळून जाण्यापेक्षा भीतीच वाटते कधीकधी. जाणकार व्हायला अजून खूप साधना आणि प्रयत्न बाकी आहेत एवढंच सांगतो स्वतःला..
आशीर्वाद असू द्यात... Happy

धन्यवाद.

पहिला प्रतिसाद बेफींच्या नवीन गझलेवर द्यायची इच्छा होती. असो ..... आता सुरवात केली आहे.<<<

माझी नवीन गझल कधी येणार ते मला माहीत नाही. Happy पण त्यासाठी थांबू नका Happy

विषाद वाटे दुर्मिळ झाली अस्सल बीजे
तणानेच भरलेले दिसते शिवार हल्ली

भारतमाते शाप तुला हा काय मिळाला !
विचार रुजण्याआधी रुजतो विखार हल्ली<<<

छान शेर आहेत. इतर शेरांमधील वृत्त हाताळणी ओके आहे, एक्सेप्ट 'उल्हास भिडे'!

शुभेच्छा!

तुझे प्रतिसाद (निदान माझ्याबाबतीत तरी) व्यक्तिसापेक्ष नसून प्रस्तुतीसापेक्ष असतात हे मला फार आवडते.>>>>>

>>>>(निदान माझ्याबाबतीत तरी) <<<<<< Lol

क्या बात है , भिडे सर !

म क स वर वाचली होती आधी . आता त्यात आणखी काही अप्रतिम शेर टाकून पुनः उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद .

नवीन शेर खूपच आवडले .

सर्वांना धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रमोदजी,
चाल लावल्याबद्दल आभारी आहे. याबाबत वैयक्तिक रीत्या चर्चा लवकरच करेन.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
आनंदयात्री,
"उल्हासकाकांनी (जोर देऊन वाचा) गझल लिहीली आहे, हे नजरेतून सुटलं, त्याबद्दल क्षमस्व! " >>> जोर देऊन वाचलं ….. Proud

माझ्या मागे ही(S S S) रदिफांची कतार हल्ली
>> यात sss चं प्रयोजन कळलं नाही मला. >>> ’ही’ हा शब्द कतार कडे निर्देश करणारा किंवा भरतीचा वाटू नये म्हणून कंसात अवग्रह चिन्हे दर्शविली; ज्यायोगे ’लांबलचक’ हा भाव प्रदर्शित करता यावा.

"तू नहीं तो और सही" किंवा "५६ पोरी माझ्या मागे आहेत, तुला कशाला इतका भाव देऊ" असा
ऍटिट्युड वाला खयाल मनात स्फुरला होता. अलामत आणि रदीफ या (स्त्रीलिंगी) प्रतिमा घेऊन
शेर लिहिला. (गझलेतले विशिष्ट शब्द (टर्मिनॉलॉजी) प्रतिमा म्हणून वापरायच्या मोहात मी गझल शिकायला लागल्यापासून पडलो आहे. याअधीही असा प्रयत्न केला होता.
http://www.maayboli.com/node/33726 तो थोडासा सफल झाला होता पण यावेळी फसलाही असेल.... मी साशंक आहे….. Happy

ज्यायोगे ’लांबलचक’ हा भाव प्रदर्शित करता यावा.>>>

उकाका, आपुलकीच्या भावनेतून सांगत आहे.

भाव प्रदर्शित करायला शब्द पुरेसे असतात असे वाटते. चांगला वाचक कुठलाही लेखनप्रकार त्यातल्या भावांसहीत वाचतो. अशी चिन्हे टाकण्याची काहीच गरज नसावी असे वाटते.

विशेषतः कविता ह्या सगळ्या गोष्टींनी असुंदर दिसते, अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

मस्त मस्त Happy
विखार हल्ली........क्या बात है !१

कुण्या काळचा बुद्दू झालो हुषार हल्ली
“मीच बरोबर” ठाम सांगतो त्रिवार हल्ली
.
विषाद वाटे दुर्मिळ झाली अस्सल बीजे
तणानेच भरलेले दिसते शिवार हल्ली
.
आई-बाबा’ इतिहासाची विदीर्ण पाने
घेइ मराठी शब्दसंपदा उधार हल्ली
.
भारतमाते शाप तुला हा काय मिळाला !
विचार रुजण्याआधी रुजतो विखार हल्ली

बढिया उल्हासजी.

अकस्मात का अस्मादिक ही चुकले गल्ली
फार वाढले भरकटण्याचे प्रकार हल्ली

हा फारच आवडला. भिडे साहाब भिडे रहो. पुलेशू. Happy