सिंधूसंस्कृती आणि महाराष्ट्रातल्या आद्य वसाहती

Submitted by वरदा on 3 February, 2013 - 09:00

(मध्यंतरी मुंबईतल्या पुरातत्वदिनानिमित्त माझ्याकडून एक छोटास्सा लेख संबंधित व्यक्तींनी मागवून घेतला होता. काही कारणांमुळे प्रसिद्ध होऊ शकला नाही असं त्यांनी कळवलं होतं. आज अचानक आठवलं म्हणून इथे टाकतेय. शब्दमर्यादा असल्याने संक्षिप्तात लिहिला होता. वेळ मिळाला की अपडेट करेन Happy )

सिंधूसंस्कृती म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने येतात ती आताच्या पाकिस्तानमधे उदयाला आलेली आखीवरेखीव नियोजनबद्ध शहरं आणि भरभराटीचा व्यापार. पण त्यावेळी भारताच्या इतर प्रदेशांमधे, विशेषतः महाराष्ट्रात, काय परिस्थिती होती? इथल्या लोकसमूहांची जीवनशैली कशी होती? सिंधूसंस्कृतीचे आणि त्यांचे काही आपसात संबंध होते का? एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडलेले असतात. त्यातल्याच काही प्रश्नांचा थोडक्यात घेतलेला हा मागोवा...

सुमारे दहा लाख चौरस किलोमीटर पसरलेल्या नागरी सिंधू संस्कृतीच्या सीमा पाकिस्तान-इराणच्या सीमेपासून ते गुजरातपर्यंत विस्तारलेल्या होत्या. आजच्या भारतासारखीच जशी अवाढव्य शहरं होती तशीच छोटी खेडेगावं, वाड्या-वस्त्या पण होत्या. शहरी व्यापार्‍यांपासून भटक्या मेंढपाळापर्यंत सगळ्या प्रकारचे लोक या भूभागात परस्परसान्निध्यात रहात होते. सिंधूसंस्कृतीच्या नागरी कालखंडात (इ.स.पू. २६०० - २०००) भारतीय उपखंडाच्या बहुतेक सर्व प्रदेशांमधील लोकसमूह भटक्या शिकारी जीवनाकडून स्थायी शेतकरी जीवनाकडे वाटचाल करत होते असं दिसतं. यातल्या शेजारपाजारच्या लोकसमूहांशी सिंधूसंस्कृतीचे देवाणघेवाणीचे संबंध होते याचे पुरातात्त्विक पुरावेही उपलब्ध आहेत.

दख्खनचं पठार मात्र या सांस्कृतिक देवाणीघेवाणीच्या मुख्य धारेपासून थोडंसं दूर होतं. महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख दख्खनच्या पठारावर रहाणार्‍या मानवसमूहाला झाली असं दिसतं. सर्वात प्रथम तापीच्या खोर्‍यात, खानदेशात या वसाहती उदयाला आल्या असं दिसतं. सुरुवातीची गावं हंगामी होती, जितकी शेतीवर तितकीच शिकार आणि पशुपालनावर अवलंबून होती. अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले. आजवर महाराष्ट्रात अशी सुमारे दीडशेच्यावर स्थळं उजेडात आली आहेत. या लोकसमूहांना अजून लोहतंत्रज्ञान अवगत झालेलं नव्हतं. फक्त तांबं आणि दगड यांचा वापर ते करत असत म्हणून त्यांना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं म्हणलं जातं.
सुरुवातीच्या या हंगामी गावांमधली लोकं गोल खड्डा करून त्यावर झोपडी बांधून रहात असत. त्यांची मातीची भांडी फारशी पक्की भाजलेली नसत. लाल रंगावर काळ्या-तपकिरी रंगाची नक्षी किंवा काळ्या रंगावर लाल नक्षी काढलेली असे. यात विविध प्राणी, पक्षी, शस्त्रास्त्रं अशी चित्रसंपदा आढळते. मात्र सुमारे इ.स.पू १८०० च्या आसपास या वसाहतींमधे सांस्कृतिक बदल झालेले दिसायला लागतात. परत एकदा गुजरातमधल्या वसाहती याला कारणीभूत होत्या.
सुमारे इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्‍हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली, लेखनकला विस्मृतीत जायला लागली आणि सगळा समाज परत एकदा ग्रामीण संस्कृतीकडे परतला. गुजरातेतल्या सिंधू संस्कृतीच्या वसाहतीही याला अपवाद नव्हत्या. तिथे आधीपासूनच असलेल्या स्थायी शेतकरी वसाहती आता पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे अर्धभटक्या पशुपालक झाल्या आणि चराऊ कुरणांच्या शोधात सोनगढच्या खिंडीतून खानदेशाकडे येऊ लागल्या. आणि त्यांच्याशी असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून, त्यांच्या इथे झालेल्या स्थलांतरातून सिंधूसंस्कृतीच्या जीवनशैलीचा प्रभाव खानदेश आणि प्रवरेच्या खोर्‍यात असलेल्या लोकसमूहांवर झालेला दिसतो.
आजवर सुमारे २५ उत्तर सिंधू संस्कृतीच्या वसाहतींची नोंदणी तापीच्या खोर्‍यात झाली असली तरी त्यांच्या जीवनशैलीबद्दल विस्ताराने जाणून घेता आलं ते प्रवरेच्या खोर्‍यातील दायमाबादच्या उत्खननामुळे. दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या या सर्वात मोठ्या वसाहतीत असं दिसून आलं की नागरीकरण लयाला गेलं असलं, तरी इतक्या शतकांनंतरही घरबांधणीच्या भूमितीत बदल झाला नव्हता. आता भाजक्या मातीच्या विटा नव्हत्या, तर कच्ची भेंडं वापरून घरं बनवली जात होती. पण विटांचा आकार मात्र अजूनही ४:२:१ अशाच मापात होता. भिंती अजूनही अचूक काटकोनात उभारल्या जात होत्या. आणि मृतांची दफनंही आधीच्या पद्धतीने खड्डा खणून केली जात होती. पूर्वीच्या सुंदर नक्षी असलेल्या मातीच्या मडक्यांऐवजी आता फार उत्तमरीतीने भाजलेली, सिंधूसंकृतीच्या नागरी कालखंडातल्या मडक्यांशी साधर्म्य सांगणारी काळ्या रंगाची भौमितिक नक्षी काढलेली लाल रंगाची मडकी वापरली जाऊ लागली. अर्थात उपजीविकेच्या पद्धतीत मात्र फरक पडला नाही. आधीप्रमाणेच पशुपालन, शेती आणि शिकार यावर त्यांचं जीवन अवलंबून होतं. यांचेही गुजरात-राजस्थान-माळवा येथील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींशी देवाणघेवाणीचे संबंध होते.
तसंच या उत्खननात सिंधूसंस्कृतीची लिपी कोरलेल्या दोन वर्तुळाकार मातीच्या मुद्रा आणि चार खापराचे तुकडे मिळाले. ही लिपी अजूनही वाचता न आल्याने त्यावर काय लिहिलंय ते जरी अज्ञात असलं तरी हा नागरी संस्कृतीचा वारसा इतक्या शतकांनंतर इतक्या दूरवरच्या प्रदेशात जपला गेल्याचं महत्व कमी होत नाही.
यात सगळ्यात सनसनाटी, लक्ष वेधून घेणारा शोध ठरला तो म्हणजे या पांढरीच्या टेकाडावर एका शेतकर्‍याला मिळालेल्या चार ब्रॉन्झच्या मूर्ती. दोन बैलांचा रथ हाकणारा माणूस, गेंडा, म्हैस आणि हत्ती. विशेष म्हणजे या सगळ्यांना खाली चाकं आहेत. अभ्यासकांच्या मते ही खेळणी नसून यांचा संबंध धार्मिक श्रद्धा समजुतींशी असणार व कदाचित मिरवणुकीसारख्या कुठल्या विधीत यांचा वापर होत असण्याची शक्यता असावी. जरी या मूर्तींच्या कालनिर्णयाविषयी वाद आहेत, तरीही बहुसंख्य अभ्यासकांच्या मते या उत्तर सिंधू संस्कृतीशी संबंधितच आहेत.
गुजरातेतून आलेले हे सांस्कृतिक प्रभाव इथल्या लोकसमूहाच्या जीवनशैलीत मिसळून गेले. जरी नंतरच्या ताम्रपाषाणयुगीन कालखंडात ही घरबांधणी, लिपी लोप पावलेली दिसते तरी त्यांचे कर्ते इथल्या लोकसमूहात एकरूप होऊन गेले असणार.
मराठी असणं, दख्खनी असणं म्हणजे काय यावर भरपूर उहापोह करता येईल. पण एखादी प्रादेशिक अस्मिता जेव्हा निर्माण होते तेव्हा ती कितीही स्वतंत्र असली तरी तिच्या आसपासच्या संस्कृतींपेक्षा, प्रादेशिकतेपेक्षा वेगळी, अलिप्त राहू शकत नाही याचं भान आपल्याला राखलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत गेल्या चार-साडेचार हजार वर्षांत अनेक लोकसमूह, त्यांचे सांस्कृतिक प्रभाव आले, इथल्या मातीत मिसळले, रुजले आणि संस्कृतीची नदी वाहती राहिली. आज त्या सगळ्यांची स्मृती राहिलीच आहे असं नाही, त्यांचे वेगवेगळे रंग सांगता येणार नाहीत असे मिसळून गेलेत. पण यात सुदूर वायव्य भारतातल्या नागरी सिंधू संस्कृतीचाही एक प्रवाह कधी काळी येऊन मिळालाय, कुठेतरी एकाच धाग्याने हे पश्चिम आणि वायव्य भारतातले प्रदेश जोडले गेले होते इतकं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं तरी खूप आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते>>>> वरदा , human genome प्रोजेक्टनुसार एक लाख वर्षांपुर्वी आफ्रिकेतुन माणुस भारतीय उपखंडात आला .तुम्ही ७ ते ८ लाखाचं गणित कुठुन मांडलत?

इस्कटून लिवा जी.

**

फणसा, एक आधी पण आलेला मानवी स्ट्रेन आहे. ऑलमोस्ट गोंडवना च्या काळातला.. मग एक भला मोठा ज्वालामुखी आलेला. (माझी तोकडि/तोडकी माहिती)

हरप्पा व मोहेंजादारो ते दख्खन पठारचा "सिंधू संस्कृती" चा प्रवास आणि स्थिरता, प्रगती आणि प्रसार....या मुद्द्यांना धरून हा लेखनप्रपंच असल्याचे दिसत्ये. जर क्रमशः असेल तर या विषयात गम्य आणि रुची असणार्‍यांच्या दृष्टीने हे लेखन सुखद वाचनाचा आनंद निर्माण करून देईल हे नि:संशय.

लेखिका वरदा यानी सिंधू संस्कृतीच्या र्‍हासाची कारणे देताना वर असे म्हटले आहे, "...इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्‍हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली,..." ~ यातील कारणे मान्य होण्यासारखी आहेतच पण प्रमुख कारण होते 'आर्यांचे' झालेले सिंधू संस्कृतीवरील विनाशक असे आक्रमण...त्याचा उल्लेख लेखात होणे गरजेचे आहे. आर्य {तसेच त्यांच्या आगेमागे येत राहिलेल्या हूण, शक, यवन अशा टोळ्यानीही} टोळ्यांचे भारतातील - खरे तर हिंदुस्थानातील म्हणायला हवे - आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते अन् त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे बहराला आलेली सिंधू संस्कृती हळुहळू लयाला जाऊ लागली.

अर्थात इतिहास संशोधक असेही मानतात की, आर्यानी 'सिंधू संस्कृतीचा नाश केला असे म्हणण्याऐवजी त्यानी हरप्पा व मोहेंजोदारो ही नगरे नष्ट केली...'. तरीही या दोन नगरांमध्ये वसलेली संस्कृती [जी विशेषकरून कृषिप्रधानच होती] त्या अगोदरच बाहेर दूरवर पसरली होती....उदा. दख्खन पठाराचा वर लेखात उल्लेख आलेला आहेच....त्यामुळे आर्यांच्या आक्रमणानंतरही सिंधू संस्कृती तग धरून राहिल्याच्या खुणा होत्याच.

असो... लेखमाला चालू राहिल्यास अजूनही विस्ताराने चर्चा करता येईल असे वाटते.

अशोक पाटील

[अवांतर : लेखात एके ठिकाणी ... "सुरुवातीच्या या हंगामी गावांमधली लोकं गोल खड्डा करून त्यावर झोपडी बांधून रहात असत...." असे म्हटले गेले आहे. यातील 'गोल खड्डा' ऐवजी 'एक वर्तुळ' चे योजन योग्य वाटेल. 'खड्ड्या' ला विशिष्ट अशा खोलीचा संकेत आहे. त्या संस्कृतीतील लोक कुटुंबाच्या आकारानुसार जमिनीवर आवश्यक त्या मापाचे वर्तुळ आखत आणि त्यावर झोपडी बांधत. अर्थात त्या वर्तुळाला दगडविटांची आकृतीबंध जोड दिली की किमान सहा इंच खड्डा भासत असे हे मान्य....पण मूळ खड्डा संबोधनाची व्याख्या त्या वर्तुळाला लावणे योग्य ठरणार नाही.]

आर्य {तसेच त्यांच्या आगेमागे येत राहिलेल्या हूण, शक, यवन अशा टोळ्यानीही} टोळ्यांचे भारतातील - खरे तर हिंदुस्थानातील म्हणायला हवे - आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते अन् त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे बहराला आलेली सिंधू संस्कृती हळुहळू लयाला जाऊ लागली.

स्फोटक विधान

'आर्यांचे आक्रमण' ही कल्पना अग्राह्य आहे हे अनेक संशोधनांमधून सिध्द झाले आहे.

'आर्यांचे सिंधूसंस्कृतीवर आक्रमण' ही तर कवी कल्पना आहे. माझ्या माहीतीप्रमाणे पुरातत्वज्ञ मॉर्टिमर व्हीलर याने प्रथम हराप्पा येथे सापड्लेले सांगाडे हे 'पुरंदर इंद्राने 'नगरे' फोडून तेथील लोकांना मारले' ह्या ऋग्वेदीय कल्पनेचे पुरातत्वीय वास्तव मानले. हे अर्थातच चूक होते कारण सर्व सांगाडे वेगवेगळ्या कालखण्डामधील होते.
सिंधूसंस्कृती व ऋग्वेद्/आर्य यांचा संबंध व अ-संबंध लावणारे विविध पुरावे समोर येत असतात व विश्लेषणे होत असतात. तरीही आर्यांचे आक्रमण ही मुळात भाषिक साम्यावरून केलेली कल्पना आहे व सिंधूसंस्कृतीची लिपी अजून आपण वाचु शकत नाही. त्यामुळे तोपर्यंत निर्णायक पुरावा तयार होउ शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
'आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते' अशा प्रकारचे उल्लेख म्हणूनच योग्य नाहीत असे मला वाटते.
अशोक यांनी त्यांच्या मुद्द्यासाठी कुठल्या पुस्तकाचा/ ग्रंथाचा आधार घेतला आहे हे कळले तर बरे होईल.

मनीषा आणि अशोक आर्यांचे आक्रमण झाले की नाही यावर परस्पर विरोधी पुरावे दरवेळी संशोधक मांडतच रहातात. वीट येईपर्यंत हे मायबोलीवर आणि इतरत्रही चघळले गेलेले चर्हाट आहे.
आमच्या मेडिकल जर्नलांतून जशी एकाड एक इश्यू बरोबर गुड फॅट बॅड फॅट या बद्दल संशोधकांची परस्पर विरोधी मते वाचायला मिळतात तशी पुरातत्वशास्त्राच्या जर्नलांतून आर्यन इन्वेजन थेअरीविषयी. Happy
तुम्ही एका साईडने दहा रेफरंस द्याल तर दुसरा दुसर्या साईडने वीस देईल.
मला वरदा हा विषय कसा विस्तृत करून मांड्ते हे वाचायची उत्सुकता आहे.

वरदा, उत्तम लेख. (अजून विस्ताराने लिही बघू)

मला वरदा हा विषय कसा विस्तृत करून मांड्ते हे वाचायची उत्सुकता आहे.>> +१.

सुमारे इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्‍हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली, लेखनकला विस्मृतीत जायला लागली आणि सगळा समाज परत एकदा ग्रामीण संस्कृतीकडे परतला.>>> याबद्दल विस्ताराने सांगशील का? हे असं "विकासाकडून भकासाकडे" चाक उलटं फिरू शकतं का? हा असा एवढा मोठा बदल होऊन यायला साधारण किती काळ जावा लागला असेल?

पण प्रमुख कारण होते 'आर्यांचे' झालेले सिंधू संस्कृतीवरील विनाशक असे आक्रमण...त्याचा उल्लेख लेखात होणे गरजेचे आहे. आर्य {तसेच त्यांच्या आगेमागे येत राहिलेल्या हूण, शक, यवन अशा टोळ्यानीही} टोळ्यांचे भारतातील - खरे तर हिंदुस्थानातील म्हणायला हवे - आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते अन् त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे बहराला आलेली सिंधू संस्कृती हळुहळू लयाला जाऊ लागली.>>>>>>अनुमोदन,अशोक पाटील अगदी योग्य मत.
लेखिकेने जाणूनबुजून उल्लेख टाळला आहे हे स्पष्ट आहे.आर्यांचे आक्रमण हा विषय दाबण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी नेहमीच करत असतात, इथे माबोवरचे अनेकजण लॉजिकल चर्चा करायची अपेक्षा ठेवतात ,मात्र आर्यवादाच्या चर्चेला सोइस्कर बगल देतात.परखड मुद्दा मांडल्याबद्दल पाटीलसरांचे आभार.

<'आर्यांचे सिंधूसंस्कृतीवर आक्रमण' ही तर कवी कल्पना आहे.>>
लोकमान्य टीळकांनी त्यांच्या आर्टीक्ट होम इन वेदाज या ग्रंथात अग्निपुजक आर्य थेअरीला दुजोरा दिला आहे, टीळक कवी होते काय? Proud

@अशोक -
१. <<हरप्पा व मोहेंजादारो ते दख्खन पठारचा "सिंधू संस्कृती" चा प्रवास आणि स्थिरता, प्रगती आणि प्रसार....या मुद्द्यांना धरून हा लेखनप्रपंच असल्याचे दिसत्ये.>> लेखाचा मुद्दा वेगळा आहे - सुदूर सिंधू संस्कृतीशी दख्खनच्या पठाराचा, इथल्या वसाहतींचा काही संबंध होता का हा आहे. यात दख्खनचं पठार व इथल्या आद्य वसाहती सिंधू नागरी संस्कृतीच्या परिघाबाहेर होत्या हे अनुस्यूतच आहे. शिवाय सिंधू संस्कृतीची स्थिरता, प्रगती हेही मुद्दे याच्यात अंतर्भूत नाहीत
२.आर्यांचे सिंधूसंस्कृतीवरील आक्रमण हा आता पुरातत्वासाठी जवळपास मृत झालेला सिद्धांत आहे. आर्य या शब्दाचा अर्थ अभ्यासक आर्य भाषा बोलणारे असा लावतात. आता विशिष्ट भाषिक लोक वेगळे असे पुरातत्वीय पुराव्यात ओळखू येणं पुराभिलेख नसले तर जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे आर्यांचं स्थलांतर (आक्रमण नव्हे) हा पुरातत्वीय मार्गाने वेध न घेता येणारा प्रश्न आहे. हा हिस्टॉरिकल लिन्ग्विस्टिक्सच्या अखत्यारीतला प्रश्न आहे हे समस्त व्यावसायिक पुरातत्वीयांनी मान्य केलेलं आहे. (वरती मनीषाने सुद्धा वेगळ्या शब्दांत हेच लिहिले आहे) मुळातच इतक्या शेकडो ठिकाणी उत्खनन झाल्यानंतरही कुठेही युद्धाचा पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे पुरातत्व सिंधूसंस्कृतीच्या र्‍हासासाठी कुठलंच युद्धजन्य कारण ग्राह्य धरणार नाही.अनेको दशके चाललेल्या पुरातत्वीय पुरावे, पुरापर्यावरणीय पुरावे, मेसोपोटेमियातील तत्कालीन घडामोडी अशा आणि इतर विविध विश्लेषण-संशोधनाने सिंधू संस्कृतीच्या नागरीकरणाचा र्‍हास कसा झाला यावर पुरातत्वीयांनी केलेल्या भाष्याचं सार म्हणजे 'पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली,....'

यात माझे शब्द नीट वाचलेत तर लक्षात येईल की मी कुठेही सिंधू संस्कृतीचा विनाश झाला असं म्हणत नाहीये तर नागरीकरणाचा र्‍हास झाला असं म्हणलं आहे. या ग्रामीण झालेल्याअ उत्तर सिंधू काळातल्या विविध प्रादेशिक संस्कृतींमधूनच लोहयुग आणी नंतर आद्य ऐतिहासिक काळ उदयाला आला. मानवी वसाहतींच्या इतिहासरेषेमधे इथे कुठेही खंड पडलेला दिसत नाही

मुळात सुमारे इ.स.पू १५०० च्या आसपास आर्यभाषिक लोकसमूहांचं अस्तित्व भारतीय उपखंडात जाणवायला लागतं. ते इथलेच का बाहेरून आले, आधी कुठे होते हे पुरातत्व सांगू शकत नाही. पण भाषिक पुरावे वायव्य सीमेच्या पल्याड निर्देश करतात हे आम्ही बहुतांशी पुरातत्वज्ञ मान्य करून पुढचे विश्लेषण करतो.

३. <<या दोन नगरांमध्ये वसलेली संस्कृती [जी विशेषकरून कृषिप्रधानच होती] त्या अगोदरच बाहेर दूरवर पसरली होती....उदा. दख्खन पठाराचा...>> सिंधू कृषिप्रधान संस्कृती नव्हती तर अतिशय कॉम्प्लेक्स अशी नागरी अर्थव्यवस्था होती आणि त्यात अंतर्गत व लांबपल्ल्याचा व्यापार, विविध प्रकारच्या कारागिरी वस्तूंचे उत्पादन, शेती, पशुपालन, इ. सर्व मार्गांचा समावेश होता. त्याचबरोबर उरलेल्या भारतीय उपखंडात त्याकाळी ज्या ग्रामीण संस्कृती उदयाला आल्या त्यात सिंधू संस्कृतीचा कुठलाही वाटा नव्हता. या घडामोडी स्वतंत्र पातळीवर झाल्या. दख्खनचे पठार त्यातीलच एक.

४. शक, हूण, यवन, यांचे कालखंड आणि वरील लेखातील कालखंडात काही हजार वर्षांचं अंतर आहे. शक, हूण, यवन हेही एकमेकांना समकालीन नव्हेत. यातील हूणांनी स्वार्‍या केल्या पण शक स्थलांतर करत करत मध्य आशियातून भारतीय उपखंडात आले. इथलेच होऊन गेले. उगाचच त्यांना निर्घृण वगैरे म्हणण्यात अर्थ नाही. यवन म्हणजे साधारणपणे ग्रीक, इंडो ग्रीक. यांनीही कधी आक्रमणं केली नाहीत..

५. मी जेव्हा गोल खड्डा करून रहात होते असं लिहिलं तेव्हा मी pit dwelling चं भाषांतर केलं आहे. आणि जमिनीत खड्डा करणं हेच इथे अभिप्रेत आहे. गोल घरं पण मिळाली आहेत पण ती आणि ही खड्डेवाली घरं वेगळी. अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्राचा आदिम इतिहास या माझ्या मायबोलीवरच्याच लेखातील प्रकाशचित्र कृपया बघा

@येऊकामी -
ह्युमन जेनोम प्रोजेक्ट अजून चालू आहे आणि त्यांचे भारताविषयीचे निष्कर्ष पुरातत्वीयांनी केलेल्या शास्त्रीय कालमापनाशी जुळत नाहीत. लाख वर्षांपूर्वी काही जेनोम्स भारतात आले असतील पण पूर्ण मानवी समूहच फक्त एक लाख वर्षांपूर्वीचा आहे हे इतक्या विविध दशकं आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शास्त्रज्ञगटांनी केलेल्या अनेको पुरातत्वीय स्थळांच्या कालमापनाशी विसंगत आहे.

अशोक पाटील नेहेमीच अत्यंत प्रामाणिकपणे प्रतिसाद देतात त्यामुळे त्यांना मी आवर्जून उत्तरं दिली. पण येऊकामी या आयडीला आर्य-हिंदुत्व या विषयावर काड्या करून बाफ पेटवायची इच्छा दिसतेय, तेव्हा त्यांनी या विषयासाठी नवा बाफ उघडावा. माझ्या बाफचा विषय दोन दूरवरच्या संस्कृतींचा परस्परसंबंध हा आणि हाच आहे. कृपया आर्य वाद दुसरीकडे खेळा.

बाकी सर्वांना धन्यवाद. फार नाही तरी थोडाफार तपशील या लेखात निश्चितच टाकेन, पण जरा दम धरा Happy

सविस्तर लिखाण येऊद्यात. विनंती आहे की, (कार्यबाहुल्यामुळे क्रमशः आले तरी चालेल पण) तपशीलवार, तळटीपांसह, (वरच्या प्रतिसादात लिहिले आहे तसे) फोड करून, नीट्पणे विषय उलगडवऊन लिहा. अशा विषयांवरचे असे अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळणे ही माझ्यासारख्या (या विषयाचा अभ्यास नसलेल्या) वाचकांसाठी पर्वणीच ठरेल.

भरपूर दम धरायला तयार आहे Happy

वरदा, मस्त माहिती.
(मला पूर्वीचाच प्रश्न पुन्हा पडला. मृतांच्या दहनाची सुरूवात कशी आणि कधी झाली? त्याचा संबंध धर्माशी कसा जोडला गेला?)

@वरदा
हे माझे पोस्ट....
आर्यांचे आक्रमण हा विषय दाबण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी नेहमीच करत असतात, इथे माबोवरचे अनेकजण लॉजिकल चर्चा करायची अपेक्षा ठेवतात ,मात्र आर्यवादाच्या चर्चेला सोइस्कर बगल देतात.

हे तुमचे पोस्ट...
कृपया आर्य वाद दुसरीकडे खेळा.

तुम्हीच माझा मुद्दा सिद्ध केलात. धन्यवाद.

@अशोक पाटील, या लेखावर आपले ज्ञान आणि वेळ खर्च करु नका. प्रचारकी थाटाचा लेख आहे. यथावकाश चर्चा हिंदू सावरकर सोनेरी पाने इ इ विषयांकडे सरकणारच आहे व कणाहिन विकारवंत इथे पिंका टाकायला येतीलच. फक्त वा वा छान अशी भाटगिरी करुन विषय सोडून द्या. आर्य थेअरी इथे मांडु नका ,इथले स्त्री आयडीपण इरसाल आहेत .तुम्हाला काँग्रजी ठरवायला वेळ लावणार नाहीत.

वरदा + १०००

आर्य अनार्य ते कधी आले त्यानी काय केले हा मुद्दा इथे गैर्लागू आहे. सिंधू संस्कृतीच्या ह्रासासाठी कोणतेही बाहेरचे आक्रमण जबाबदार आहे ह्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तेंव्हा आर्यांचे आक्रमण वा मायग्रेशन हा मुद्दा कृपया इथे आणु नये.

येऊकामी ... वरदा ही पेश्याने पुरातत्व अभ्यासते. पुरावा जर असे सांगत असता की सिंधू संस्कृतीच्या ह्रासासाठी बाहेरचे आक्रमक जबाबदार होते व ते आक्रमक अर्य असल्याच्व्हे पुरावे आहेत तर ते लिहिणे तिने टाळले नसते. काय घडले कसे घडले व कधी घडले ह्याचे चित्र उलगडण्याचे तिचे काम आहे. सत्य शोधन करताना राजकारण करणे हे नाही. तेंव्हा तिला हिंदुत्वादी वगैरे नाव ठेवण्याचे कहीही कारण नाही.

वरदा माझा प्रष्ण असा आहे की नागरीकरण लयास गेले असे मानले तर इतिहास काळात जी नगर रचना दिसते अगदी अत्ताअता पर्यंत गावातून देखील जी घरांची बांधणी वा नगर रचना दिसते त्यात सिंधू संस्कृतिच्या नगर रचनेचे ठसे दिसतातच...

तसेच देवळांच्या (विशेषतः) दक्षीणे कडिल देवळांच्या रचनेत पुष्करणी, कुंभ हा थे ग्रेट बाथ चा वशंज दिसतोच जर नागरीकरण लोप पावले असे म्हटले तर हे नंतरचे ठसे कसे? ह्याचे काय एक्स्प्लेनेशन?

सुंदर लेख, अभ्यासू प्रतिसादही. स्फोटकता इतिहासाच्या पानोपानी लपलेली असतेच,मोकळी चर्चा महत्वाची.अधिक वाचायची उत्सुकता वाटत आहे.

>>>>> असं "विकासाकडून भकासाकडे" चाक उलटं फिरू शकतं का? हा असा एवढा मोठा बदल होऊन यायला साधारण किती काळ जावा लागला असेल? <<<<<
भूकंप/पूर/ज्वालामुखी/वादळ्-चक्रिवादळ्/भूमिस्खलन (खचणे) वगैरे नैसर्गिक आपत्तीन्मधे फार फार तिन मिनिटे ते तिन तास.
अवर्षण वा अतिवृष्टी याचेमुळे दुष्काळ, पर्यावरणीय परिस्थितित बदल अन तपमानातील अनाकलनीय बदल, तसेच कारणाने (रोगराई/अपघात/युद्धे इत्यादी) जननमृत्युदरातील तफावत वगैरे दीर्घकालीक कारणान्मुळे तिन महिने ते तिन वर्षे.
अन मानवनिर्मित आपत्ती गृहित धरायच्या तर मुम्बैसारख्या शहराला फार फार तर तिन दिवस!