तुझा हिरो खोटा आहे राम...(प्रेमाची गोष्ट)

Submitted by श्यामली on 2 February, 2013 - 03:25

चित्रपटाच्या संवादांच लेखन चालू आहे, सोनलला संवाद लिहून पूर्ण कर म्हणून आग्रह करणारा राम या दोघांकडे आळीपाळीने बघणारी रागिणी. चित्रपटाच्या शेवटाकडे जाणारा सिन शेवट अनेकवेळा समजावून सांगून थकलेला राम वैतागतो तेव्हा सोनलच्या तोंडातून बाहेर पडलेलं वाक्य, "तुझा हिरो खोटा आहे, राम".

अनयुज्वल शेवट दाखवणारा चित्रपट.

हे अगदी साधं सोपं असतं आपण त्याला काँप्लिकेटेड करून ठेवत असतो.
नाती संपली तरी प्रेम असतच
आपला हात धरून चालणारं कोणितरी हवं असतं

प्रमोशनल संवादात साधारण कल्पना येऊन जाते, आणि म्हणूनच पहावा वाटतो

दाक्षिणात्य चित्रपटांच भाषांतर करणारा लेखक असणारा. आपल्या बायकोवर मनापासून प्रेम करणारा, तडजोड होईल, जमेल पुन्हा आपलं हा विश्वास बाळगणारा,नात्यांवर विश्वास असणारा, आणि रागिणीची वाट पाहणारा राम.

राम आणि उदयोन्मुख अभिनेत्री रागिणी एकाच क्षेत्रातले, म्हणून दोघ लग्न करतात पण जमत नाही आणि घटस्फोटाच्या वाटेवर आहेत. राम कळवळून कॉन्सिलिंगसाठी बोलवत असतो. त्याला नातं टिकवायचच असतं तर रागिणीला मात्र बंधन नकोच असतं तीचा साफ नकार.

सोनल, दुस-यांदा या वाटेवर चालणारी वैतागलेली. "माणसानी एकतर लग्न कराव नाहितर आनंदी रहावं",
"मी आनंदी राहायचं ठरवल आहे" असं म्हणणारी.

स्वराज, आणि मीरा हे रामचा मित्र, आणि सोनलची मैत्रिण.
स्वराज रामला आणि मीरा सोनलला चांगलेच ओळखणारे. दोघांनाही या दोघांची काळजी.

सोनलचा रामच्या आयुष्यात प्रवेश, दोघांच कामाच्या दरम्यान जमलेलं मस्त ट्युनिंग; ओघानच एकमेकांना मिस करणं आणि प्रेमात पडल्याचा साक्षात्कार होणं. नेहमीचाच गोंधळ, प्रेमात पडलेलं बावचळलेपण, अरे हे मला वाटतय पण समोरच्याला पण वाटतय का हे असचं?

मीराला आणि स्वाराजला पक्की खात्री. सोनलपण हे सहज स्विकारते पण राम....त्याला जड जातं तो रागिणीसाठी थांबलेला आहे, असं त्यानी ठरवलेलच असतं आणि तो तिथे अडकतो.

शेवट सांगत नाहीये, तुम्ही बघाच.

अतूल कुलकर्णी सारखे अभिनेते अजून का नाहीत हा प्रश्न पुन्हा पडला.
सुलेखाचा सहज वावर, अ‍ॅटिट्युड आवडला
सागरिकाची सोनल आवडली. सुरवातीला जरा उच्चार खटकतात पण तरी आवडलीच.
राजवाडेंचा स्वराज, आणि मीरा वेलणकरची मीरा त्यांच्या त्यांच्या जागेवर एकदम फिट्ट.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चित्रपटासाठी मिराह एंटरटेनमेंटनी लिरिक्स लॉन्च ही कल्पना राबवली. ही कल्पना अतूल कुलकर्णींची, यासाठी त्यांच आणि मिराहच जोरदार अभिनंदन.

मला तरी भयंकर आवडला, तुम्हाला साध सरळ सोपं काही बघायला आवडत असेल तर तुम्हीही बघाच.

साधी सोपी प्रेमाची गोष्ट

कदाचित प्रिमिअरला प्रेमाची गोष्टच्या टिम बरोबर पाहिल्यामुळे जरा जास्तच आवडला असावा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, श्यामली तू पण review लिहिला! छान लिहिलंय.
रसप ने एकदम वेगळं लिहिलंय. म्हणजे आता पहायचा का नाही हे कसं ठरवायचं?

वा! मस्त पॉझिटिव्ह रीव्ह्यू. बरं वाटलं.

चित्रपट बघायचा आहेच. सुलेखा मालिकांमधे काम करताना आवडतेच, तिला चित्रपटात बघण्याची इच्छा आहे. अतुल कुलकर्णीलाही रोमँटिक रोलमधे बघायचं आहे.

श्यामली, तूही लिहिलं आहेस की राम-रागिणी घटस्फोटाच्या वाटेवर आहेत, मटाच्या रिव्ह्यूतही तसंच लिहिलंय. रसप यांनी मात्र राम-रागिणी << लग्नाच्या दोन वर्षांनंतर विभक्त होतात.>> असं का लिहिलंय ते कळलं नाही.

रसप यांनी मात्र राम-रागिणी << लग्नाच्या दोन वर्षांनंतर विभक्त होतात.>> असं का लिहिलंय ते कळलं नाही. >>
विभक्त होतात, म्हणजे वेगळे होतात.. जे ते झालेले असतातच. फक्त घटस्फोट मिळायचा बाकी असतो. फक्त ऑन पेपर, पण नातं संपलेलंच असतं.

चैत्राली, मी लिहिलय की, साधं काही बघायला आवडत असेल तर नक्की बघा. मसाला नाही, आयटम साँग्स नाहीत, उगाच म्हणून केलेली कॉमेडी नाही. मग काय आहे तर त्यासाठीच बघायचा Happy

मंजू, प्रोसेसमधे आहे डिव्होर्स . सिटी प्राईडला तरी झाला नव्हता औरंगाबादला पोचेतो झाला असावा असं लिहिणार होते पण रसप नी उत्तर देऊन टाकलं आधीच Proud

चित्रपट ठिकठाक आहे, काही भाग चांगले जमलेत उदा. मॉल मधला सिन , रोहीणी हट्टंगडी आणि अतुल कुलकर्णी यांचे सिन्स. काही भाग अती बोअर ,खास म्हणजे "तुझा हिरो खोटा आहे" वाला सीन. मुळात अतुल कुलकर्णी त्याची प्रेम चौकोनाची गोष्ट इतर गोष्टींपेक्षा वेगळी वेगळी म्हणुन घोळत बसतो त्यात वेगळेपण असे काही नसल्याने तो सिन भिडत्च नाही.
ते सतिश राजवाडेचे पात्र म्हणते तेच या चित्रपटा बाबत खरे " तुम्ही साधि सरळ गोष्ट नुसतिच कॉम्पेक्स करुन ठेवता"

नक्की बघणार..... पुन्हा शोचे टायमिंगची बोंब आहेच.... पण मॅनेज करावंच लागेल कारण दुसर्‍या आठवड्यात बर्‍याच ठिकाणहून उतरणार हा पण Sad

श्यामली थोडक्यात सगळी कथाच मांडलीत की हो..... आता फक्त शेवट आणि दिग्दर्शन, अभिनय या पॉइंट ऑफ व्ह्य्युनेच बघावा लागणार Sad

रसप Uhoh

भुंग्याला सिनेमा बघताना झोपच येईल हे कशावरून? तुम्हाला सिनेमा आवडला नाही म्हणजे इतरांनाही आवडू नये असा नियम आहे का?
सिनेमा पाहून झाल्यावर तुम्हाला अनुमोदन द्यायचं की श्यामलीला अनुमोदन द्यायचं हे भुंग्यालाच ठरवू दे की.

यंदा 'पिफ'ला जरा मजा झाली. अनेक पत्रकार होते रोज. 'हा अमुक सिनेमा किती संथ', 'त्या तमुक सिनेम्यात तर काहीच घडत नाही' असं रोज ऐकू येत होतं. मला तर हे सिनेमे आवडत होते. आपण जे सिनेमे बघतो त्यापेक्षा किती वेगळे! छायालेखन, अभिनय, दिग्दर्शन सगळ्यांत केवढंतरी वैविध्य होतं. पण मग या पत्रकारांना ते सगळं का दिसत नाही, हा प्रश्न पडला.

समर नखातेसर थेटराच्या लॉबीत विद्यार्थ्यांशी कायम गप्पा मारत असतात. त्यांना विचारलं. ते म्हणाले, "अर्रे, झालंय काय, आपल्याला चमच्याने भरवून घ्यायची सवय लागली आहे. मनोरंजन वेगळ्या प्रकारचं असू शकतं, हे आपण कधीच विसरलो. सिनेम्यात फक्त सुरुवात, मध्य, शेवट आणि वेगवान कथा, एवढंच नसतं. कितीतरी अनेक पैलू असतात. ते समजून घ्यायला वेळ कुणाकडे आहे?"

नंतर 'अराफ'बद्दल मकरंद साठ्यांशी बोलत होतो, तेव्हा त्यांना विचारलं, "सर, चित्रपट कसा बघावा, यावर लिहाल का?"
ते म्हणाले, "मी? अरे, मी नाटक लिहितो, पण म्हणून सिनेम्यावर लिहिता येईलच असं नाही. आणि सिनेमा इतक्या वेगवेगळ्या अंगांनी बघायचा असतो, की आपण सिनेमा बघायला शिकलो, आपल्याला एखादा सिनेमा पूर्ण कळला, असं कधीच म्हणता येत नाही. तसं कोणी म्हणूही नाही. सिनेमा बघणं सोपं नसतं."
तेवढ्यात तिथे सतीश आळेकर आले. ते म्हणाले, "ज्या चित्रपटात लेखकाला, दिग्दर्शकाला काही सांगायचंय, ते समजून घ्यायला निदान दोनतीनदा तरी तो चित्रपट बघितला पाहिजे. किंवा एकदा बघून निदान त्यावर विचार तरी करायला हवा. 'अराफ' मी पहिल्यांदा बघितला तेव्हा मला कळलं की आपण गटांगळ्या खातोय. मी तीनचारदा बघितला तेव्हा कुठे वाटलं की आता जरा हातपाय मारता येतायेत. आपण चित्रपट या माध्यमाला फार गृहित धरतो. पण हे फक्त चित्रपटांच्याच बाबतीत कशाला? जबाबदारी घेऊन बघणं, लिहिणं सगळंच दुर्मीळ झालं आहे".

**

श्यामली,
हे तुझ्यासाठी नाही. एकंदरीतच चित्रपटांबद्दल अजिबात गांभीर्यानं जे लिहिलं जात नाही, त्याबद्दल लिहिलं. Happy
तू लिहिलं छान आहेस, मात्र कथा थोडी कमी लिहिली असतीस, तरी चाललं असतं. Happy

सिनेमा कसा बघावा !!!!!

अरे ज्याचा त्याचा चॉइस असु दे ना !!! आपण एखाद्याचे विचार नाही ठरवु शकत... We can’t govern somebody else’s thoughts.... सोडुन द्यायचं... सगळेच सारखा विचार करायला लागलो तर मशीनं होतिल.... माणसं आहोतना!!! मग मांडुयात की वेग वेगळे विचार... समजला नाही / आवडला नाही.... नको ना आवडु दे....

सिनेमा आवडला नाही म्हणुन तो कळलाच नाही म्हणणे चुकीचे आहे... आणि सिनेमा आवडला म्हणुन तो खुप कळला म्हणणे हे ही चुकीचे आहे.... सिनेमा अनेक फॅक्टर्स मुळे आवडतो किंवा नाही आवडत.... माझा नवरा एरवी एक नंबरचा इंटुक आहे.. वाचन वगैरे एकदम भारदस्त वगैरे.... पण सिनेमे बघताना तो एकदम हलके फुलके, अ‍ॅक्शन, नाहीतर मग इंग्लीश क्लासिक्स बघतो.... हे बीटवीन द लाइन्स वगैरे त्याच्या बस की बात नही.... त्याचं उदाहरण का ? तर इतर जीवनात एकदम रीझर्व्ह, इंटुक, भारदस्त असलेला माणुस, सिनेमाच्या बाबतीत एकदम वेगळा चॉइस ठेवतो.... त्या उलट आमच्या ऑफिस मधला एक ऑफिसर... तो सिनेमांचा निस्सीम चहाता आहे... अगदी फिल्म फेस्टीव्हल ला जाण्या पासुन ते त्या वरील चर्चा अटेंड करण्या पर्यंत तो त्यात गुंतलेला आहे... तो अगदी उदाहरणं देवुन उत्तम रसग्रहण करतो... पण बाकी बघाल तर एकदम साधा माणूस.... रंगबीरंगी कपडे, हवे ते मॅचिंग, कामात ढीग भर चूका, नॉर्मल माणुस... पण सिनेमाचा चॉइस एकदम भारदस्त..... व्यक्ती तितक्या प्रकृती.....

त्या मुळे सिनेमा फक्त दोनच प्रकारचा असतो, आवडता आणि नावडता..... काही काही सिनेमे पाहिले तर आपल्या जगात काहीही फरक पडत नाही... त्या उलट काही काही सिनेमे नसते तर काही तरी कमी निश्चीत राहीली असती.... प्रत्येकाचं भाव विश्व वेगळं..... कोणाला काय तर कोणाला काय...... काहीही आवडु शकतं....

चिनुक्स- चित्रपटात अनेक पैलु असतात हे मान्य पण त्याचा एकसंध परिणाम नको साधायला? ढोबळ विचार करायचा झाला तर ज्या ज्या गोष्टींसाठी बक्षिसांच्या कॅटेगरीज जगभर असतात त्या त्या पैलूंचा विचार व्हावा म्हणजे कथा, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन, कॉस्चुम्स, फोटोग्राफी, संवाद ,कास्टींग इ.
यातल्या कोणत्याही डिपर्ट्मेंट्मधे कच्चे दुवे राहिले तर लोक नाव ठेवणारच. अर्थात फक्त धोपटायचे म्हणुन धोप्टायचे असे करु नये पण अ‍ॅव्हरेज चित्रपटाला नुसतेच नावजुही नये. प्रेमाची गोष्ट्मधे असे अनेक कच्चे दुवे आहेत आणि काही चांगल्या बाजु ही आहेत . खुप अपेक्षेने गेलो तर मात्र निराशाच हाती येते.

मोहन की मीरा, छान पोस्ट.. Happy

माझ्या मते, सिनेमाबद्दल वाचणारे, सिनेमापेक्षा, त्याच्या वर्णनामधल्या रंजकतेला अधिक प्राधान्य देऊन वाचतात.
आणि पॉझिटिव्हपेक्षा टर उडवणारे/टिप्पणी करणारे/ विनोदी अंगाने जाणार्‍या लिखाणाला अधिक वाचक लाभत असल्यामुळे तशाच प्रकारचे लिहिण्याकडे लेखकाचा कल वाढतो...

सिनेमातील काय बघावे हे ज्याचे त्याने ठरवावे हे जरी खरे असले तरी, माझ्यामते 'अमुक एका सिनेमातील काय बघावे' हेही लेखकाने आवर्जून लिहायला हवे... अगदी थेट नाही तरी नकळत सिनेमा बघण्याची स्वतःला लाभलेली 'दृष्टी' वाचकाशीही शेअर करायला हरकत नसावी, असं मनापासून वाटतं.

मो की मी...... उत्तम पोस्ट...!!!

यात्रीचेही मुद्दे योग्य आहेत.

शिवाय सगळ्यांनीच आपण एखादी गोष्ट न पटल्यावर जितक्या हिरिरीने लिहितो तितकेच जेंव्हा एखादं चांगलं लिहिलं जातं तेंव्हाही तितक्याच मोकळेपणाने चांगल्याला चांगलं म्हणायला हरकत नाही.

वाईट किंवा सुमार (पुन्हा हे व्यक्तीसापेक्ष) लेखनावर मतप्रदर्शन करणारे तितक्याच निष्ठेने चांगल्याला चांगले म्हणताना दिसत नाहीत Sad (पुन्हा हे व्यतीसापेक्षच की चांगले त्यांच्या चांगल्याच्या कसोटीवर उतरत नसावे Happy )

चित्रपट म्हणजे पुस्तक नाही. जे एकदाच विकत घ्यावं लागतं... ती कविताही नाही, की नाही कळली तर कळेपर्यंत वाचायला पैसे लागत नाहीत. लोक प्रत्येक शोसाठी वेगळे पैसे मोजून तिकीट काढत असतात ना ? मग जर एकदा पाहून सिनेमा कळत/ पटत/ झेपत नसेल तर त्यांना कळे/ पटे/ झेपेपर्यंत त्यांनी तिकिटं काढायची की काय ?
आपलं तर स्पष्ट मत आहे... चित्रपट एकदा पाहूनच टोटल लागायला पाहिजे. न लागल्यास, बघणाऱ्याला तो कळला नाही, असे म्हणण्यापेक्षा बनवणाऱ्याला तो झेपला नाही, असे म्हणायला हवे.

चिनूक्स, तू जे सिनेमाबद्दल लिहिले आहे ते पूर्ण मान्य आहे. पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की "या पद्धतीने सिनेमा बघण्यासाठी तो त्या तोडीचा असावा लागतो."

मुळात जर दिग्दर्शक त्याला काय दिसायला हवंय यापेक्षा प्रेक्षकांना काय दाखवायचे आहे याबद्दल पूर्णपणे स्पष्ट असेल तर(च) प्रेक्षक त्या कलाकृतीचा योग्य तो आस्वाद घेऊ शकतात. सिनेमा बघणं हे शिकवायची गरज नसते. त्यावर उपाय एकच: सिनेमा पाहणे. सगळ्याच धाटणीचे. सिनेमा बघता बघताच दृष्टी डेव्हलप होऊन जाते. मग ती दृष्टी नक्की कशी असावी हा त्या व्यक्तीचा निर्णय. कुणाला मसाला चित्रपट आवडतील, कुणाला संथ लयीत जाणारे तर कुणाला अ‍ॅक्शन. कुणाला चित्रपट कसे आवडतात यावरून त्या व्यक्तीच्या बौद्धिक पातळीवर शंका घेण्यात आली की ते फार हास्यास्पद वाटतं. (तशा एक दोन पोस्ट्स हल्लीच वाचल्या.)

मुळात सिनेमा बघणं हे "जबाबदारीचं" काम तेव्हा जेव्हा दिग्दर्शकाला ते अपेक्षित असतं. व्यावसायिक सिनेमा हा सर्वसाधारण प्रेक्षकांच्या दृष्टीनेच बनलेला असतो. तो त्याच दृष्टीने बघावा. त्याचे मापदंड अराफ अथवा तत्सम सिनेमांना लावावेत का? असा मला पडलेला प्रश्न आहे. खरंतर अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या सिनेमांची तुलना करूच नये असे माझे मत.

मी वर उल्लेखलेला प्रेमाची गोष्ट पाहिला नाही, त्यामुळे त्याबद्दल काहीच बोलत नाही.

एखादा चित्रपट बघण आणि त्यावर लिहिणं यावर चर्चा सुरु झाली आहे ती वाचते आहे.

मी या आधी चित्रपटाच परिक्षण असलं काही लिहिलेल नाहिये. हे ही परिक्षण आहे असं म्हणणार नाही. फक्त मला आवडला सिनेमा आणि त्यातली हे एवढी साधीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायची होती एवढाच हेतू होता.
पण त्यामुळे चित्रपटाबद्दल लिहितानाचे कंगोरे लक्षात येत आहेत.

मीरा , नचिकेत, नंदिनी पोस्टस आवडल्या,
चिन्मय, ह्म्म!! पिफ मधल्या सिनेमांबद्दल तर मला खरच चर्चेची गरज आहे. पण एकुणात पटलच.

रसप, हो , सिनेमा कविता नसते असं कसं म्हणू शकतोस? कवितेत आणि सिनेमात तसं फारच कमी अंतर असतं असं मला वाटत . (मारधाड, मसाला सिनेमे क्षमस्व)

वरच्या काही प्रतिक्रियांमधून माझा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला. Happy

मोहन की मीरा,

माझ्या पोस्टीत मी पत्रकारांचा उल्लेख केलाय, आणि उरलेला सर्व मजकूर हा त्याच संदर्भात आहे. त्यामुळे तुमच्या पोस्टीतला बराचसा मजकूर हा माझ्या पोस्टीच्या दृष्टीनं मला उपयोगी वाटत नाही.

'पिफ' किंवा 'मामि'सारख्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात पत्रकारांना, समीक्षकांना, चित्रपटांबद्दल लिहिणार्‍यांना फुकट प्रवेश दिला जातो. त्यांनी महोत्सवातल्या चित्रपटांबद्दल लिहावं अशी अपेक्षा असते. आता यासंदर्भात माझी पत्रकारांकडून अपेक्षा अशी की त्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी नीट पार पाडावी. 'पिफ'ची सुरुवात यंदा एका इस्रायली चित्रपटानं झाली. हल्लीच्या इस्रायलमध्ये राहणार्‍या एका वृद्ध दांपत्याची ही गोष्ट. नवर्‍याला इस्रायलनं 'वेलफेअर स्टेट' होणं, आणि लोकांना ऐदी बनवणं मान्य नाही. बायकोलाही हे मान्य नाही, पण नवर्‍याच्या हेकेखोरपणामुळे आलेलं दारिद्र्यही तिला नकोसं आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे. आता हा चित्रपट बघताना कदाचित मराठी प्रेक्षकाला 'संध्याछाया'शी असलेलं साम्य जाणवू शकतं. पण म्हणून हा चित्रपट म्हणजे केवळ एका वृद्ध दांपत्याची शोकांतिका आहे का? त्याला इतर काहीच कंगोरे नाहीत का? आणि चित्रपटाबद्दल लिहिताना हे कंगोरे तुमच्या परीक्षणात यायला नकोत का?

चित्रपटाचं परीक्षण लिहिणार्‍यांनी चित्रपटाच्या सर्व अंगांबद्दल विचारपूर्वक लिहावं, ही माझी अपेक्षा असते. त्या चित्रपटातलं कथानक, त्यामागचे सामाजिक, राजकीय संदर्भ, त्या दिग्दर्शक-पटकथाकाराची भूमिका, आणि इतर तांत्रिक अंगं यांचा चित्रपट बघताना विचार व्हायलाच हवा, कारण हे परीक्षण वाचून प्रेक्षक-वाचक त्यांचं मत बनवत असतात. जेव्हा तुमच्या लिखाणातून अशी मतं तयार होण्याची शक्यता असते, तेव्हा सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या मताकडे संशयानं बघता आलं पाहिजे. बघितला अणि आवडला, बघितला पण नाही आवडला, अशी मतं व्यक्त करण्यात काहीच अयोग्य नाही. पण जर आपल्या लेखनामुळे इतर किमान काहीशे व्यक्तींची मतं तयार होणार असतील, तर तो चित्रपट का आवडला, आणि का आवडला नाही, हे सांगता यायला हवं.

चित्रपट पाहिल्यावर तो आवडणं, न आवडणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. तेव्हाची मनःस्थिती, तो चित्रपट कोणाबरोबर बघितला, कुठे बघितला, कधी बघितला अशा अनेक गोष्टी चित्रपट आवडणं किंवा न आवडणं ठरवतात. वैयक्तिक आवडनिवडही महत्त्वाची असते. ही आवडनिवडही पुन्हा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. लोकांची मतं तयार करताना याचा विचार व्हायला हवा. हे केवळ चित्रपटाबद्दलच नाही, तर प्रत्येक कलाकृतीबद्दल. कविता, कथा, कादंबरी, चित्र, संगीत हे सगळंच यात येतं. पहिलेछूट बघून / ऐकून 'समजलं' हा उत्तम कलाकृतीचा निकष असू शकत नाही. काही चित्रं वर्षानुवर्षं कोड्यात टाकतात. एकच संगीत ऐकून प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती येऊ शकते. 'पिपांत मेल्या..'चे अर्थ लावण्यात पुस्तकं लिहिली जातात. मग अशा कलाकृती या उत्तम नाहीत? जर आपल्याला विचार करायला लावणार्‍या कविता चालतात, चित्रं चालतात, मग चित्रपट का चालू नयेत? आणि अशा चित्रपटांमागचा अर्थ चित्रपटाबद्दल लिहिण्याची जबाबदारी घेतलेल्यानं समजवून घेण्याचा प्रयत्न का करू नये? हा अर्थ कळला नसल्यास, किंवा तो दिग्दर्शकाच्या, पटकथाकाराच्या चुकीमुळं पोचत नसल्यास त्या चुका योग्य त्या कारणमीमांसेद्वारे वाचकांपर्यंत का पोहोचू नयेत?

गेल्या काही वर्षांत चित्रपटमहोत्स्वत, कलाप्रदर्शनं, संगीतमहोत्सव यांचं चांगलं समीक्षण, वाचकांना या कलाप्रकारांबद्दल ज्ञान देणं, हे खूप कमी झालं आहे, याचं अतिशय दु:ख वाटतं.

Pages