चंद्र दे आणून माझा

Submitted by -शाम on 31 January, 2013 - 08:13

हात जोडूनी नभाला घालतो मी साकडे
चंद्र दे आणून माझा खिन्न माझे झोपडे ||

अंगणी येऊन माझ्या मेघ कोणी थांबतो
ओळखीचा ना तरीही जीव हा भांबावतो
पापण्यांच्या उंबर्‍याशी आठवांची सर झडे ||

धीर देतो रोज वारा भोवती रेंगाळुनी
शब्द काही सांत्वनाचे बोलुनी जाते कुणी
कोण बघतो झाकलेल्या काळजावरचे तडे ||

का उगा लावू दिव्याची झुंज अंधारासवे
तेज माझ्या संचिताचे तेवढे मजला हवे
हे अभासी चांदण्याचे काय कामाचे सडे ||

..................................................शाम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

शामजी मला नेहमीच वाटत आलय की तुम्ही खूप छान गीतकार होवू शकाल तसा प्रयत्न केला आहेत का त्याबद्दल सांगा .......नसेल तर का नाहीत केला ते सांगा! Happy

कविता फुल्ल टू अप्रतीम !! तीट लावून ठेवावी अशी !!
खूप खूप आवडली

धन्यवाद दोस्तांनो!

मुग्धमानसी, मयुरी - विशेष आभार!

@ बागेश्री , शब्दच अर्थ देतो किंवा बिघड॑वतो... आपण अर्थ देणारा निवडावा असाच नेहमी माझा प्रयत्न असतो, म्हणून तो बदल.

@ वैभव, प्रयत्न खूप केलेत, पण काहीतरी कमी आहे गड्या, मी तिच कमी शोधण्यासाठी इथे येतो. आपल्या सदिच्छा मला नक्कीच प्रेरणादायी आहेत.. धन्यवाद!

@ काका, तुमच्या चालीपेक्षा तुमचा उत्साह स्तिमीत करणारा असतो. चालही छान जमलिये.. तालात अजून गोड वाटेल.

फारच छान!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

kharokarach, atishay utkat patalivarcha
kavya !! shabd nahit yachya palikade...

का उगा लावू दिव्याची झुंज अंधारासवे
तेज माझ्या संचिताचे तेवढे मजला हवे

या ओळीही विशेष आवडल्या!

सुंदर. काही काही रचना जमल्यावर स्वतःलाच आभाळा एवढे वाटते, तशातली ही एक अप्रतिम निर्मिती. एक एक ओळ पुनःपुन्हा साठवावी अशी उतरली आहे.

नितांतसुंदर काव्य ! केवळ अप्रतिम !!!
ही कविता वाचून मला नकळत भटसाहेबांची 'उजाडल्यावरी सख्या निघुनी जा घराकडे, अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पडे' ही कविता आठवली. दोन्ही कवितांचे आशय वेगळे असले तरीही त्यातील रिदम सारखाच वाटला.

खूप खूप आभारी आहे दोस्तांनो!!!
...................................

माझ्या खेड्यातिल काटे सन्मान एवढा करती
मी गुलाब विकणार्‍यांच्या गावात जायचो नाही .... शाम
..................................

Pages