अस्तित्व

Submitted by ashishcrane on 29 January, 2013 - 11:06

अस्तित्व

साथ. नेहमीच हवी हवी वाटणारी. ऊब देणारी, सांभाळणारी, जगण्याला 'जगणं' म्हणायला भाग पडणारी. साथ प्रत्येकाला हवी असते. अगदी स्मशानापर्यंत. श्रीला ही साथ मिळाली होती मिनूची. त्यांची लवस्टोरी तशी एकदम साधी होती. मैत्रिणीची मैत्रीण 'मिनू' श्रीला आवडायला लागली. नजरानजर व्हायची. हवे ते मोबाईल नंबर कसे मिळवायचे हे मुलांना बरोबर कळते. श्रीने नंबर मिळवला. ओळख झाली. बोलणं वाढलं. सवय झाली. एकमेकांशिवाय राहणं कठीण झालं. मनातल्या विचारांना दोघांनी मिळून 'प्रेम' असे नाव देऊन टाकलं.दोन वर्षाच्या नात्याला घरच्यांनी परवानगी दिली आणि लग्नाची तारीखही ठरवली. परवाच साखरपुडा झाला होता दोघांचा.

"मिनू, भेटायचं आहे मला तुला आज.भेटशील? रोजच्याच जागेवर. बीचवर. दुपारी भेटू. येशील ना?"
"चालेल. येईन मी वेळेवर.ठेवू?"
"ना... असं कसं डायरेक्ट ठेवू? एकदा बोल ना. ते ते I love u"
"हट. मी नाही. आई आहे इथे. ऐकेल. तिलाच सांगू ते का बोलायला? हेहेहेहे. चावट कुठला. चल ठेव फोन. येईन मी दुपारी."
दुपारची वेळ. मिनू आणि श्री चौपाटीवर दगडावर बसले होते.
"आज इतक्या पुढे का बसलास श्री? पाणी खोल असेल इथे."
"अगं,इथे कुणाचा गोंगाट नाहीये. शांत आहे. फक्त तुझाच आवाज ऐकता येईल मला. जो मला ऐकायचा होता." मिनू छोटंसं लाजली.
"भीती वाटू लागली का मरणाची मिनू?"
"हम्म. भीती वाटतेच आहे. हवं ते मिळत असेल ना तर आयुष्य हवं हवं वाटू लागतं. मरण कधी येऊच नये असं वाटतं आणि आलंच तर हव्या त्या सगळ्या गोष्ट मनभरून उपभोगल्या असलेल्या पाहिजेत असंही वाटतं. श्री आपलं लग्न होतंय. खरंच नाही वाटतंय. मी खूप खुश आहे. बोल ना तू का शांत बसलायस?"
"मीही खूप खुश आहे. पण, खूप खुश असलो ना की काय, कसं, किती आणि कुठवर बोलायचं ते कळत नाही. तसं झालंय माझं. शांत बसून सगळं feel करतोय मी. सुखाची जाणीव कधीकधी दोन क्षण एकट्यानेच अनुभवावीशी वाटते. सुखाला घट्ट मिठी मारून डोळे मिटून घ्यावेसे वाटतं. मिनू, सुख साठवायला पण काहीतरी भांडं हवं होतं ना? सगळं सुख साठवून ठेवलं असतं."
"सुख साठवायला भांडं असतं की...आठवणींचं"
श्री मिनुच्या डोळ्यांत बघत होता. चेहऱ्यावर छोटीस हसणं होतं. श्रीने मिनुच्या खांद्यावर हात ठेवून तिला स्वत:च्या जवळ खेचले. मिनूने श्रीच्या खांद्यावर डोकं टेकवले. श्रीने न राहवून मिनुला मिठीत घेतले. दोन मिनिटं... शांत सुखाचे.
"मिनू, सुख कधी मोजताच येत नाही ना? खूप मोठं असतं ते. कधीकधी हातात मावत नसतं पण, त्याच वेळी अजून हवं वाटत असतं. आता या क्षणी मी आनंद दाखवायला काय करू नि काय नको करू असं झालंय मला"
"श्री...i love u. माझं तुझ्यावर खूप खूप खूप खूऊऊऊउप प्रेम आहे."
"मिनू थांब मी काहीतरी आणलंय. थांब हा दाखवतो. हे बघ बाळाचे 'पिक,पिक' आवाजावाले बूट."
"नालायक कारट्या हलकट बावळट. नको ना छळूस असा. मारेन हा मी". मिनू श्रीला हलके हलके फटके मारून लाजत बोलली आणि तिने स्वत:चा चेहरा ओंझळीत लपवला.
हाताने चेहऱ्यावरचा हात काढून श्री बोलला, "आपल्या पहिल्या रात्री ही अशीच लाजशील का?"
"जा ना. मी नाही बोलणार जा."
"रुसणं म्हणजे सौंदर्याचा दागिना. परी वाटतेस अशी रुसलीस की. परी फक्त माझ्या एकट्याची".
"श्री आपलं मस्त टुमदार घर हवं. फक्त आपल्या दोघांचं. तू ऑफिसला जाशील. जाताना मी दारावरून तुला बाय करेन. मग तू माझ्या डोक्यावर ओठ टेकवशील. मी म्हणेन की, जा आता ऑफिसला उशीर होईल तुला. तू म्हणशील की, मला आज जाऊच वाट नाहीयेय. तुझ्या कुशीत शिरून घरीच रहावसं वाटतंय. मी म्हणेन की, चल हट चावट कुठला. मग तू जाशील. मी घरी संध्याकाळ होण्याची वाट पाहीन. संध्याकाळी दाराशी उभी राहीन. तूही येशील घरी घाईघाईने. आल्यावर घर कसं एकदम उजळून निघेल. सगळं कसं मस्त मस्त असेल ना?"
"हम्म. मिनू आपल्याला दोन मुलं हवी हा. मी त्यांना खूप मस्तीखोर बनवेन. मग मी घरी आलो की, आपली चिऊ बोबड्या शब्दात मला सांगेल, 'अले बाबा,आज आजी नि मी फिलायला गेलेलो.मश्त मश्त"
"आजी? श्री म्हणजे आपण लग्नानंतर तुझ्या आईवडिलांसोबत रहायचेय का? मी तुला आधीच सांगितले होते की आपले वेगळे घर हवे."
"मिनू, ते फक्त माझे आईवडील नाही राहिलेत आता. ते आता तुझेही आईवडील होणार आहेत. मी तुला या आधीही सांगिलेले आहे आणि आजही सांगतो. मी वेगळे राहणार नाही. ज्यांनी मला वाढवले त्यांना त्यांच्या म्हातारपणी असे एकटे सोडणे मला पटत नाही आणि पटणारही नाही. माझ्याशिवाय त्यांना कोणीही नाही."
"मग माझ्याही आईवडिलांना माझ्याशिवाय कोणीही नाहीयेय. मी का म्हणून माझे घर सोडून तुझ्यासोबत यायचे?"
"तू मुलगी आहेस मिनू. आपली मुलगी लग्न करून परक्याच्या घरी नांदायला जाणार आहे याची जाणीव आधीच असते आईवडिलांना. मी मुलगी आणि मुलगा यांच्यात तुलना करत नाहीयेय. पण काही गोष्टी आहे तश्याच्या तश्या स्वीकाराव्याच लागतात. विरोध करणं सगळीकडेच कामाला येत नाही. मी असे म्हणत नाही की, तू तुझ्या आईवडिलांची काळजी करणे सोडून दे. मीही घेईन त्यांची काळजी. मदत करेन त्यांना"
"मदत फक्त पैश्यांचीच असते का रे? मानसिक आधार पण हवा असतो माणसाला. वेळ काही सांगून येत नाही. उद्या काही कमी जास्त झाले तर कोण असेल त्यांना मदत करायला?"
"पटतंय मला तुझं. पण तूही मला समजून घे. तू तुझ्या आईवडिलांना सोडून येणार आहेस म्हणून मीही माझ्या आईवडिलांना सोडून वेगळे रहावे हे योग्य आहे का? तुझ्या त्यागाची मी अशी परतफेड करावी हे पटते का तुला मिनू?"
"काय रे श्री तू पण? शी बाई. श्री मला एक सांग, आपल्याला त्या घरात थोडी तरी प्रायवसी मिळणार आहे का रे? नाही म्हटले तरी एका पिढीचा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. आपले निर्णय त्यांना सहसा कधी पटतच नाहीत. खूप मोठ्या घराच्या अपेक्षा नाहीयेत माझ्या श्री. पण, स्वत:चे छोटेसे का होईना घर हवे होते मला. तुझे आईवडील नकोच असे नाही म्हणत मी. मी त्यांचीही काळजी घेईन. पण..."
"मिनू, समजू शकतो मी तुला. राजाराणीचा संसार मलाही हवाय. तुझ्यासोबतचा एकांत मलाही हवा आहे पण, जबाबदारी टाळून मिळालेल्या सुखाच्या मागे एक जखम असते. ही जखम कधी ना कधी उघडी पडतेच. आपलं मन नेहमी आपल्याला या जखमेची एकांतात आठवण करून देतं. गुन्हेगार झाल्यासारखं वाटू लागतं.
मिनू मला माहितीय की, तुला राग येत असेल माझा. पण..."
पुढचे शब्द श्री पूर्ण करूच शकला नाही. मिनूचे डोळे भरलेले होते. श्री अजून काही समजावु शकत नव्हता. दोन क्षण शांत गेले. शांतता...भयाणच वाटते जेव्हा समोर बोलकी व्यक्ती शांत बसलेली असते.
त्या दोघांनाही भान आले ते आजूबाजूने ओरडणाऱ्या कुठल्या तरी आवाजावरून.
"मरायचंय रे दोघांना? पाणी बघा आजूबाजूला. बुडाल मराल."
दोघांनीही आजूबाजूला पाहिले. बोलताबोलता बसलेला दगड सर्व बाजूंनी पाण्याने आधी वेढला गेला हे त्यांना कळलेच नव्हते. दोघेही घाबरले पण, श्रीने मिनुचा हात धरला तसा तिला थोडा धीर आला.हात धरून दोघेही पाण्यात उतरले. पाणी अंदाजापेक्षा जास्त खोल होते. अंदाज बहुतेक चुकण्यासाठीच जन्माला येतात. पाण्याला जोर जास्त होता. लांबून मस्त वाटणाऱ्या लाटा जीवघेण्या झाल्या होत्या.श्री मिनुचा हात पकडून एक एक पाऊल पुढे टाकत होता.जोर लावत होता.
"श्री मला भीती वाटतेय"
"नको घाबरू मिनू."
पाण्याने पकड नकळत सैल झाली. मिनू मागे राहिली. पुढे जाता श्रीच्या मधेच ते लक्षात आले. मागे पाहिले तर मिनू तिथेच मागे पाण्यातून पुढे येण्याचा प्रयत्न करत होती. श्री पुन्हा मागे फिरला.घाबरलेल्या मिनूच्या जवळ आला. हात घट्ट पकडून पुढे येऊ चालू लागला.
"आई ग्ग्ग्ग्ग्ग" चालता चालता खडकाचा एक मोठासा भाग श्रीच्या पायावर पडला होता. श्रीच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. हातातला हात सुटत होता.

मिनुचे डोळे उघडले ते हॉस्पिटल मध्येच. बीचवरच्या लोकांनी त्या दोघांना पाण्याबाहेर काढले इतकेच तिला तिथे उभे असलेल्या लोकांकडून कळले. पहिली तिला आठवण आली ती श्रीची.
"श्री कुठे आहे?"
"श्री म्हणजे तो तुझ्या सोबत होता तो पोरगा का? तो ऑपरेशन थिएटरमध्ये आहे." ऑपरेशन थिएटरचे नाव ऐकताच मिनू घाबरली.
"please, मला त्याच्याकडे घेऊन चला. please."
तिथे पोचेपर्यंत तिच्या मनात कोणकोणते विचार येऊन गेले. ऑपरेशन थिएटर जसजसे जवळ येत होते तसतशी भीती पसरत होती. श्वास वाढत होता. पायांतली शक्ती नाहीशी होत होती. धीर खचत होता. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा खोलताना अंगाला घाम फुटला. आत हॉस्पिटलच्या बेडवर श्री शांत झोपला होता. चेहरा प्रसन्न दिसत होता. त्याला पाहून मिनुच्या जीवात जीव आला. पाणावलेल्या डोळ्याने ती त्याच्या डोक्याजवळ येऊन बसली. प्रेमाने त्याच्या केसांतून हात फिरवू लागली. श्रीला जाग आली.
"श्री कसं वाटतंय आता? I am sorry श्री. माझ्यामुळे हे झाले. माझ्यासाठी तू परत आला नसतास तर हे सगळे..."
तिला हुंदका फुटला. मध्ये नर्स आली आणि गोळ्या देऊन म्हणाली,
"पेशंटशी जास्त बोलू नका. आराम करू दे त्यांना. ह्या गोळ्या द्या त्यांना."
"श्री तू आराम कर. मीही घरी फोन करून सांगते. घरचे सगळे काळजी करत असतील. पाण्यात भिजून मोबाईल पण बंद पडलेत दोघांचे."
"थांब न मिनू. बस थोडा वेळ माझ्याजवळ. बोल माझ्याशी."
"हम्म. श्री एक सांगू? तू पुढे निघून गेलेलास ना तेव्हा, दोन क्षण सगळं संपले असे वाटले होते. मरण दिसू लागले होते. क्षणात डोळ्यासमोर ती सगळी स्वप्न येऊन गेली. पण तू परत आलास न तेव्हा खूप बरं वाटलं. 'कुणीतरी आहे आपलं ज्याला आपल्या असण्या नसण्याने फरक पडतो' ही भावना नेहमीच सुख देते. मस्त वाटलं तेव्हा. दोन क्षण मरण विसरायला झाले होते."
श्री शांतच होता.
"तू का शांत बसलायस? काय झालं?"
"विचार करतोय.खरं सांगू मिनू? तुला ऐकून वाईट वाटेल पण...."
"हो सांग. नक्की सांग."
"मिनू, बुडताना एका क्षणी तू आठवलीसच नाही मला तू. आयुष्याच्या एखाद्या कठीण क्षणी शरीर मनाची साथ सोडून देते. कारण, 'अस्तित्व' या शब्दाची व्याख्या शरीरासाठी आणि मनासाठी निरनिराळी असते. शरीराच्या 'अस्तित्व' व्याख्येत 'श्वास' हाच एक उद्देश असतो. पण, मनाच्या अस्तित्वात मान-अपमान,आपल्यांची साथ,स्वप्न,इच्छा यांचं अढळ स्थान असतं. मृत्युच्या दारावर मनाची मते चंचल होतात. रूप बदलतात. मतांचे पाय परिस्थितीच्या शेवाळावरून सहज घसरतात. मिनू, समोर मरण दिसतं ना, तेव्हा 'प्रेम' शब्द खोटा वाटू लागतो. आताचा श्वास जसा हवा असतो, तसा पुढच्या क्षणीही श्वास घ्यायचा असतो. क्षणासाठी का होईना पुढचा श्वास हेच एक ध्येय असतं."
मिनू फक्त ऐकत होती.
"मिनू म्हणूनच वाटतं की, एका माणसाने दुसऱ्या माणसावर एक ठराविक हद्दीपर्यंत विश्वास ठेवावा. कारण समोरच्या व्यक्तीचे निर्णय शेवटच्या क्षणी अस्तित्वाच्या भांडणामुळे बदलले तरी त्याला दोष देण्याचा हक्क नसतो. 'त्याच्या जागी आपण असतो तर आपले निर्णय बदललेच नसते याची शाश्वती आपण देऊ शकतो का?' हा प्रश्न स्वत:ला विचारावा. उत्तर मिळायला जितका उशीर लागेल ना तितकं महत्व असतं स्वत:च्या श्वासाला."
मिनुला ते ऐकून वाईट वाटत होते. पण सगळे पटतही होते.
"मिनू, स्वत:च्या अस्तित्वाच्या हट्टात समोरच्याला अडकवणे म्हणजे समोरच्याच्या श्वासावर अन्याय असतो. ज्याच्या त्याच्या श्वासावर ज्याचा त्याचाच हक्क असतो. मी परत आलो म्हणून तू मला मोठं मानू नकोस. माझी तितकी लायकी नाहीयेय. खरंतर मी परत आलो तेव्हा मला 'माझ्या पुढच्या आयुष्यात तूही मला माझ्यासोबत हवी होतीस' म्हणून आलो होतो. स्वत:चे मरण एकच क्षण विसरलो होतो.पायावर काहीतरी पडले, अंधारी आली डोळ्यासमोर तेव्हा माझंच मन मलाच प्रश्न विचारू लागले की, का आलास तू परत? श्वास हवाय आम्हाला.अक्कल नाहीयेय का तुला? I am sorry पण... रागावू नको मिनू"
"रागवत नाहीयेय रे. तू बोललास ते पटतंय मला. तू म्हणालास ना की, समोरच्याच्या जागी स्वत:ला ठेवले की समोरचा चुकीचा वागला असे कधी वाटतच नाही. मीही तेच केले. असो, तू आता जास्त बोलू नकोस. गोळ्या घे आणि आराम कर. उठतोयस ना थोडा? गोल्या देते मी."
मिनूने श्रीच्या मानेमागे हात ठेऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला.पण श्रीला फार त्रास होता. त्याला उठताना प्रचंड वेदना होत होत्या.
"मिनू, माझा पाय खूप दुखतोय. प्रचंड त्रास होतोय. सहन नाही होतंय."
"थांब हा. हळू जरा. घाई नको करूस. सावकाश जरा. थांब मी चादर बाजूला करते. मग हळू हळू उठ".
श्री कळवळत होता. मिनूने त्याच्या पायावरची चादर बाजूला केली.
"श्री..." मिनू जोरात किंचाळली.
"मिनू...." श्रीही जोरात किंचाळला.
दगडाखाली चेंदामेंदा झालेला श्रीच्या उजवा पायाच्या गुडघ्यापासूनचा खालचा भाग ऑपरेशन करून काढण्यात आला होता. श्री जोरजोरात किंचाळत होता. मिनू मात्र स्तब्ध झाली होती.एका मूर्तीसारखी.पाणावलेल्या डोळ्यांची मूर्ती. तिच्या डोळ्यासमोर तेव्हा तेच स्वप्नातले टुमदार घर आले. तेच टुमदार घर आणि टुमदार घरातले ते दोघेच.
अपंग झालेला श्री आणि त्याच्या बाजूला उभी ती...एकटीच.
त्याच्या घरात ना श्रीची आई होती ना श्रीचे वडील.
फक्त तेच दोघे.
राणी आणि राणीचा पांगळा राजा.
आता प्रश्न उभे होते. अजूनही मिनू श्रीशी लग्न करण्यासाठी आनंदाने तयार होईल का? तयार झालीच तर त्यामागे 'आपल्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला म्हणून त्याची परतफेड करणं' हे कारण असेल का? तिने हे स्वीकारलेच तरी श्रीला त्याचे मन कधी माफ करेल का? मिनूने श्रीला स्वीकारले तर, आताही त्याला त्या दोघांचा वेगळा संसार असावा असे वाटेल का? की आता आपण श्रीच्या आई वडिलांसोबतच एकत्र कुटुंबात रहावे असे तिला वाटेल?
गरज वेळेनुसार बदलत असते.

--आशिष राणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर आशिष.
निवडक दहात...................!
अगदी वास्तवाशी तंतोतंत समान असलेले प्रश्न.
My Fav.
"" गरज वेळेनुसार बदलत असते." "

छान आहे , वास्तववादी.

अस्तित्व' या शब्दाची व्याख्या शरीरासाठी आणि मनासाठी निरनिराळी असते.
शरीराच्या 'अस्तित्व' व्याख्येत 'श्वास' हाच एक उद्देश असतो.
पण मनाच्या अस्तित्वात मान-अपमान,आपल्यांची साथ,स्वप्न,इच्छा यांचं अढळ स्थान असतं.>>>>>
हे आणि

समोर मरण दिसतं ना, तेव्हा 'प्रेम' शब्द खोटा वाटू लागतो.आताचा श्वास जसा हवा असतो,तसा पुढच्या क्षणी हि श्वास घ्यायचा असतो.
क्षणासाठी का होईना पुढचा श्वास हेच एक ध्येय असतं.">>>>>>>> पटल , कधी असा विचारच नाही केला जात. पण वाचल्यावर खर वाटत.

"साथ...
नेहमीच हवी हवी वाटणारी.....
ऊब देणारी...सांभाळणारी...जगण्याला 'जगणं' म्हणायला भाग पडणारी....
साथ प्रत्येकाला हवी असते...अगदी स्मशानापर्यंत..."

लई भारी.......

कथेतील विचारांशी सहमत असहमत यामध्ये पडायचे नाहिये, कारण ते देखील वेळेनुसार बदलतात.
मात्र छानच लिहिलेय.. आवडले.. Happy