|| सम्राज्ञी ||

Submitted by kaywattelte on 29 January, 2013 - 00:58

तर, २२ जणांचा एक ग्रुप गुरुवारी संध्याकाळी मुंबईहून निघाला.....नागझिराला जाण्यासाठी...Twine Outdoors नावाच्या एका ग्रुपने organize केलेली ही एक टूर.
त्या बाविसात सात ते पन्नाशीपर्यंत सगळे वयोगट होते. त्यातले साधारण डझनभर CA लोक..! आणि एकमेकांना ओळखणारा असा साधारण १०-१२ जणांचा ग्रुप.
सगळे अर्थातच मुंबईकर, अंधेरी आणि पार्ल्यातले. प्रत्येकाकडे एखादा कॅमेरा आणि काहीजणांकडे दुर्बीण.
बरचसे Wildlife, Photography आणि Birding वाले (म्हणजे साध्या पोपटाला Rose Ringed Parakeet म्हणून चकीत करणारे).
आम्ही (बायको आणि मी) दोघेच पुण्याहून. माझी बायकोसुद्धा Birding वाली.
राहिलो मी... " 'माझा आवडता पक्षी' निबंधातला कावळा आणि बटण दाबले की निघतो तो फोटो" एव्हढीच काय ती पक्ष्यांशी आणि कॅमेराशी आमची ओळख...!
तर अशा या टूरला आम्ही निघालो. बसने. पुणे - नागपूर बस.... १४ तासांचा प्रवास....!

नागझिरा अभयारण्य भंडारा जिल्ह्यात (हो महाराष्ट्रातच) आहे. मुख्य आकर्षण अर्थातच वाघ.
शुक्रवारी सकाळी आम्ही नागपूरला पोहोचलो. मुंबईचा ग्रुप अजून ट्रेन मधेच होता. ते लोक येईपर्यंत संत्र्यावर बसलेल्या माश्या मारणे हेच काम होतं.. साधारण तीन तासांनी मुंबईकर अवतरले. सकाळी बेफाट थंडी होती. एकदम बाविस लोकांचा ग्रुप बघून मला अजून थंडी वाजायला लागली. काय करणार माणसांची allergy...!!
एवढ्या ग्रुप बरोबर 3 दिवस काढायचे (त्यात मुंबईकर..!) म्हणजे खूपंच होतं. आणि त्यातही फाल्गुन मास म्हणजे बावीसातले चार-पाच जण बायकोचे मित्र होते...!
माणसांच्या, ग्रुपच्या आणि बायकोच्या मित्रांच्या पित्ताने फारच खाज सुटायला लागली. (वैसे बाघ कभी झुंड में नही रेहता ना...! )..असो..

नंतर जरा ओळखी-पाळखीची औपचारिकता झाल्यावर आम्ही पुढे निघालो. नागझिरा नागपूरपासून साधारण १२० किमी वर आहे.
एका मिनी बस मधून आम्ही निघालो.
मी बायकोव्यतिरिक्त तसा कोणालाही फारसा ओळखत नसल्याने मागच्या सीटवर बसून मोबाईलवर बोटं फिरवत उगाच काहीतरी कामात असल्याचं दाखवत होतो. तसं, या मोबाईलने मला असंख्य वेळा अशा "situations" मधून वाचवले आहे. खरंच, धन्य आहे ही Mobile Technology.

बरं, Twine Outdoors ही लोकेश तारदाळकर, विद्यानंद (विदा) जोशी (मित्रवर्य) आणि अर्चिस सहस्त्रबुद्धे या तिघांनी सुरु केलेली एक व्यावसाईक पण सुंदर कल्पना आहे.
खरं, Twine Outdoors म्हटल्यावर "बाहेरच गुंता" ..किंवा "ये तो बडा Twine है..!" वगैरे असा काही अर्थ असावा,
असा पाणचट विचार मनात आला होता.. पण या लेखासाठी मी तो गिळला. पण नंतर त्यांनीच Twine Outdoors मागचा अर्थ सांगितला. छान वाटलं.
Twine म्हणजे गुंता. मित्रांचा गुंता. (T.W.I.N.E. also stands for "Together, World Is Not Enough....")

Twineफोटो -- विद्यानंद जोशी, लोकेश तारदाळकर आणि अर्चिस सहस्त्रबुद्धे

हे लोकं Wildlife Enthusiast आहेत, Wildlife tours / Corporate tours arrange करतात. त्यांच्या "package" मध्ये खाणं, पिणं (पाणी), प्रवास, सफारी आणि गाईड फी सगळं असतं. म्हणजे उगाचच्या खाचाखोचा नाहीत.

तर, आम्ही एकूण चौविसजण बसमधून नागझिराला जात होतो. २-३ तासांचा प्रवास होता... अता प्रवासात काय करणार..?
भेंड्या......! आली का पंचाईत..? पुन्हा allergy...!

अर्चिस सहस्त्रबुद्धे (Twiner) या "अशक्य" माणसाने भेन्ड्यांना सुरुवात केली. (पार्ल्यातले लोकं कुठल्याही शब्दाच्या मागे "अशक्य" जोडू शकतात..).
अर्चिसएव्हढा बोलणारा माणूस मी आजतागायत बघितला नाहीये. म्हणजे एखाद्याने किती बोलावे? आणि किती विनोद करावेत? अर्चिस कमरे खालचे.... कमरे वरचे कुठलेही विनोद दिवसभर सहज (स्वत: तयार करून) सांगू शकतो. खरं सांगतो, बोलून बोलून याचा खालचा जबडा जागचा निसटला आहे...!
त्यात, त्याला कुठलाही शब्द अजिबात वर्ज्य नाही... काय असेल ते बिनधास्त.. सकाळचे विधी म्हणजे त्याच्यासाठी मेजवानीच... (म्हणजे ते शब्द हो)!
असंच बोलता बोलता त्याला सुचलेलं हे एक वाक्य...! वेगवेगळ्या शब्दांवर जोर देऊन (दाब टाकून Happy ) बघा... म्हणजे कळेल...!

"बघा मागून... मी देईन..."

भेंड्या हा "अशक्य" प्रकार सुरु झाला. मी मात्र अजूनही मोबाईलवर बोटं फिरवत बसलो होतो. भेंड्या खेळताना लोकांना एका सेकंदात एका अक्षरावरून गाणी कशी सुचतात हेच मला कळत नाही.
तशी Emergency साठी मी २-३ (न, स वाली) गाणी आठवून ठेवली होती.
आणि हो, "आपल्या मैत्रिणीचा घो किती मंद आहे?" वगैरे असे लोकांना वाटू नये म्हणूनच उगाचच गाण्यात टाळ्या वाजवणे आणि प्रत्येक गाण्याची (फक्त) येणारी पहिली ओळ म्हणणे वगैरे "मिसळण्याचे" वायफळ प्रयत्न मी करत होतो...
तेव्हढ्यात कोणीतरी मित्रवर्य म्हणाले.. "काय जावई...गाणी का नाही म्हणत?"
रागाला स्माईलमध्ये बदलायला शिकतोय हो मी अजून...!
तेवढ्यात मागून कोणतरी ओरडले... "अरे..अरे.. तो बघा Blue Jay..(म्हणजे निळकंठ पक्षी).....!"
आणि उरलेली २३ जणं तो Blue Jay बघू लागली.. तारांवर बसून विधी उरकणाऱ्या Blue Jay चे मी शतश: आभार मानले...!

असो.. तर अशा या "ट्रीप" वातावरणात आम्ही नागझिराच्या गेटवर पोहोचलो. वाघांच्या जवळ पोहोचलो.

आमची राहायची सोय? नागझिरा अभयारण्याच्या मध्यात !!!
गेटमधून आत शिरलो आणि दाट जंगल चालू झाले. गेटपासून सुमारे २० मिनिटाच्या प्रवासानंतर अभयारण्यातलं सरकारचं Resort येतं.
जंगलात थोडं आत गेल्यावर टूर मधला पहिला वेगळा प्राणी दिसला......घुबड!!
त्या घुबडाला बघून सगळे खुश झाले.. आम्हाला फक्त "अपशकुनी घुबड" वगैरे एव्हढेच माहिती.
"अभयारण्यात शिरल्या शिरल्या घुबड दिसणे हा चांगला संकेत आहे...!" कोणतरी म्हणालं...
"असेल बा कुणास ठाऊक....?" (मी आपला मनातल्या मनात...!)
त्यानंतर जंगलात कसे वागावे यावर तिघा ट्वाईन्यांनी काही Tips दिल्या.
"भडक कपडे घालू नका.. प्राणी घाबरतात.." मित्रवर्य विदा म्हणाला..
"कोणताही प्राणी दिसला तर Over Excite होऊ नका.. ओरडू नका..." इति लोकेश..
"जंगलात अजिबात बडबड करू नका... एकदम शांत...... उगाच आरडा ओरडा करू नका.......
एकदा आम्ही ताडोबाला गेलो होतो तेव्हा......xxxx zzz xxxx....."
नंतरची १३ मिनिटं, सहस्त्रबुद्धे, हे असे अगदी समजावून सांगत होते....!!!

दुपारचे साधारण अडीच वाजले होते. आम्ही "Resort" मध्ये पोहोचलो. तिथेच आजूबाजूला १५-२० हरणं अगदी बिनधास्त फिरत होती...! घुबड-बिबडं.. दाट झाडी वगैरे ठीक आहेत.. ती काय मला नवीन नव्हती.. पण गाई म्हशी चरताना दिसतात तशी हरणे दिसल्यावर मात्र आपण खरंच अभयारण्यात आलोय याची जाणीव होत होती. खूप छान वाटलं.

Spotted Deersफोटो -- तलावाकाठची हरणं

हे Resort म्हणजे तुफानच होतं. जंगलाच्या मध्यात... प्रचंड मोठी झाडे... समोर एक भला मोठा तलाव.... आजूबाजूला चरणारी हरणे... मातीचा रस्ता...अप्रतीम...!

जंगलाच्या मध्यात Electricity असण्याचा काही प्रश्नच नाही.. त्यामुळे कंदील... मोबाईलला रेंज नाही.. त्यामुळे Office ची कटकट नाही...
Completely disconnected...! मस्त वाटत होतं.

Lake Nearbyफोटो -- Resort समोरचा तलाव

मग आम्ही रूमकडे गेलो.. पण तिथे चित्र फारंच वेगळे होतं. रुम्सची अवस्था अत्यंत बिकट होती....
काही दारांना कड्याच नव्हत्या तर काही दारांना, वाघ सहज आत चालत येईल एव्हढे मोठे भगदाड होते....आणि आमच्या रूमचं छत उडालं होतं ..!
सरकारला लाखो शिव्या वहात शेवटी आम्ही तयार झालो.. पहिल्या सफारीला...!

सफारी म्हणजे जीप सफारी.
Driver आणि Guide, पूर्णत: उघड्या जिप्सी मधून जंगलात साधारण अडीच ते तीन तास आपल्याला फिरवतात..त्याला सफारी म्हणतात.
(जंगल सफारी म्हणजे नक्की काय भानगड असतं हे मला आधी माहित नव्हतं....!) येत्या ३ दिवसात आमच्या अशा ४ सफारी होणार होत्या.
सगळेजण तयार होऊन दुपारी साधारण साडेतीनला आमची पहिली सफारी सुरु झाली. एकूण चार जीप मध्ये आम्ही २४ जण होतो.
कितीही झालं तरी, "पहिल्यांदा वाघ बघायचा तो बायको बरोबरच" असं, का कोण जाणे मी ठरवलं होतं. त्यामुळे बायको असलेल्या जीपमध्ये मी पटकन उडी मारली.

गाडी सुरु झाली. हरणांच्या कळपाच्या मध्यातून आमची गाडी निघाली. जरा पुढे गेल्यावर आम्हाला सांभरंही दिसली. मजा यायला लागली होती.

Sambar DeerSambar Deer2फोटो -- सांभर

जंगलामध्येही गाड्यांचे रूट असतात. चारही जीप वेगवेगळ्या रूटला गेल्या. आमच्या जीप मध्ये बायको, तिच्या दोन मैत्रिणी, दोन मित्रवर्य (गानू आणि कात्रे)आणि मी होतो. दाट जंगलातून, मातीच्या रस्त्यावरून आम्ही पुढे जात होतो.
आमचे गाईड रूपचन्द्जी आणि ड्रायव्हर राकेश आम्हाला माहिती सांगू लागले.
"१५3 sq.km. च्या परिसरात बघा एकूण १२ वाघ आहेत. त्यातले दोन बच्चे आहेत. ते बच्चसुद्धा वाघिणी एव्हढे झालेत पण अजून ते तिच्याबरोबरच राहतात. तसा कधी कधी किल (शिकार) पण करतात... साधारण १९ बिबटे आहेत. ते सोडून अस्वले, गौर (रानगवे), जंगली कुत्रे, नीलगाई, जंगली डुक्कर, चितळ, भेकर (Barking Deer) आहेत."
मी लहानपणापासून इकडेच रहात आलो आहे. माझं गांव जंगलाच्या बाहेरच आहे.."..... रूपचन्द्जी (गाईड).

Way to Infinityफोटो -- नागझिर्‍यातली वाट

"थांबा थांबा"... अचानक मित्रवर्य गानू ओरडले...

"मला कोणतरी दिसलंय.. गाडी जरा मागे घ्या..."
गाडीतली सगळी जणं, घुबडासारखी (अर्र.. Indian Scops Owl सारखी) इकडे तिकडे बघू लागली. मी फारच उत्सुकतेने झाडीत काही हालचाल होतेय का ते बघू लागलो... गाडी मागे गेली...
चार-पाच मिनिटं दुर्बिण, कॅमेरे, चश्मे, दगड, धोंडे डोळ्याला लावून झाल्यावर गानू म्हणाले..
"हा काही नाही..काही नाही.. जाऊदे.. Rose Ringed Parakeet (मिरच्या खाणारा पोपट हो..) आहे.. पोपट झाला...आपला...!"
आता काय म्हणायचं याला..? कोणतरी दिसलंय म्हटल्यावर आमच्यासारख्या नवख्याला वाघ... तो नाहीतर बिबट्या तरी.... पण छे....गानू शेठ तर आपले झाडाच्या टोकावर बघतायत... असो... मी आणि कात्रेने (दुसरे मित्रवर्य) फक्त एकमेकांकडे बघितलं... पक्षी बघण्यातला कात्र्यांचा इंटरेस्ट आपल्याशी मिळता जुळता आहे, हे कळायला काही फारसा वेळ लागला नाही...

Parakeetफोटो -- हाच तो Parakeet

गाडी पुढे सरकू लागली... दहा पंधरा मिनिटे नुसती झाडे बघितल्यावर, बायको अचानक ओरडली... "थांबा... काहीतरी दिसलंय... Drongo आहे.. Racket Tailed Drongo...."
(Drongo म्हणजे कोतवाल). तर, Drongo पक्षी आपल्याला कुठेही दिसतो.. अगदी घराच्या समोरही.. पण हा Racket Tailed Drongo अप्रतिम प्रकार आहे..तो सहसा दिसत नाही. या चकचकीत काळ्या कोतवालाच्या शेपटीला खाली अजून २ शेपट्या असतात...

Racket Tailed Drongoफोटो -- Racket Tailed Drongo

गाडी पुढे निघाली.... त्यानंतर बराच वेळ "बिना प्राण्याचे" फिरल्यावर मी इकडे तिकडे बघणे बंद केलं...
गानुंचे "थांबा थांबा..कोणतरी दिसलंय...." चालूच होतं.
"आम्हाला बुवा पक्ष्यांमध्ये interest आहे... " गानू म्हणाले....
"व्वा...व्वा...काय छन्द जोपासला आहे तुम्ही...?" अशा प्रकारचे हावभाव करून मी गप्प बसलो...

तेव्हढ्यात आम्ही "गौर गल्लीला" पोहोचलो... हो, नागझिरातल्या प्रत्येक रूटला नावं आहेत.. गौर गल्ली, लिंकिंग रोड(!), टायगर ट्रेल रोड.. etc.
वाघ काय, तर तसा कुठलाच मांसाहारी प्राणी न दिसल्याने जरा हताश झालो होतो..
आणि बघतोय तर काय समोर रानगवे उभे....!
नागझिरातल्या प्रत्येक रूटवर पाण्याच्या टाक्या सरकारने बांधल्या आहेत. प्राणी तिथे रोज पाणी प्यायला येतात.. हे रानगवेसुधा शांतपणे पाणी पीत होते.
आम्हाला बघून ते जरा सावध झाले, पण तसे आरामातच होते. एकामागून एक मातेरी रंगाचे रानगवे येत होते.

Gaurफोटो - Proud (बायकोने काढलेला फोटो)

होता होता, सगळ्यात शेवट, एक प्रचंड काळा रानगवा, डौलदार चालीत हजर झाला...तो नक्कीच "Alpha Male" होता. त्याला बघून असले नसलेले सगळे रानगवे चूपचाप बाजूला झाले. तो अतिप्रचंड होता. आमची जीप त्याने सहज उलटवली असती.
पण, खरं सांगू? जंगलातल्या प्राण्यांना आपल्यामध्ये काहीही रस नसतो. फक्त माणूस दूर कसा राहील एव्हढंच ते बघत असतात.

Alpha Maleफोटो -- The ALPHA male...
दिवसातून ७-८ तास तरी हा नक्कीच जीमला जात असावा..!

रानगव्यांना बघून एवढा आनंद होईल असे कधी वाटले नव्हते...! खरंच... मस्त मजा आली..
आम्ही पुढे निघालो...सूर्यास्त जवळ आला होता.. म्हणजेच सफारी संपायची वेळ आली होती. वाघ काही दिसला नव्हता..
जरा पुढे गेल्यावर रूपचन्द्जी एकदम राकेशला म्हणाले...."गाडी थांबव..."
तो बघा White Eyed Buzzard.... खरच रुबाबदार होता तो... सुंदर.. आमच्यासमोर घेतलेली त्याची झेप बघण्यासारखी होती...

White Eyed Buzzardफोटो -- White Eyed Buzzard

संध्याकाळ झाली होती. आमची पहिली सफारी संपली होती. वाघ काही दिसला नव्हता. जरा निराशा झाली, पण अजून ३ सफारी बाकी होत्या. दुसरी सफारी शनिवारी पहाटे ६ ला चालू होणार होती.

थंडी वाजायला लागली होती. सगळ्या जीप पोहोचल्यावर एक झकास चहा मारल्यावर बरं वाटलं. "Resort" च्या आजूबाजूला काळ्या तोंडाचे बरेच वांदर फिरत होते. त्यांना कोणाचीही भीती नव्हती.
आमच्या रूम्सच्या समोर एक मस्त गोलाकार मोकळी जागा होती.... सगळे २४ जण कोंडाळं करून तिथे बसलो....
एव्हाना अंधार पडला होता. थंडी कडाडली होती.
येताना, "जंगलात शेकोटी करता येणार नाही.. रूल आहे तसा..." असे शेकोटी पेटवूनच बसलेल्या "कर्मचाऱ्याने" आम्हाला सांगितले..
धन्य ते सरकार...!!!
त्यामुळे आमच्या मध्यात फक्त एक मेणबत्ती...! जेवायला अजून बराच वेळ होता.....
जंगलाच्या मध्यात पुन्हा एकदा गाणी सुरु झाली. खरं तर काळ्याकुट्ट जंगलाच्या त्या धुंद शांतीत गाणी गाऊन आम्ही तसे विघ्नच आणत होतो. पण बाकी काही करूच शकत नव्हतो. जेवणही आले नव्हते आणि एव्हढ्यात झोपणेही शक्य नव्हते. तो एक तास आणि काही मिनिटे कशीबशी काढल्यावर जेवण आले. "Resort" ची अवस्था बघता जेवण खरंच फार चांगले होते.

अत्तापर्यंत अक्षरश: गां.फा. थंडी सुरु झाली होती. अमावस्या होती, आकाशात होते नव्हते ते सगळे तारे दिसत होते. एखादा साधा Telescope जरी असता तरी सहज दोन-तीन तास निघाले असते..
मग शेवटी.."कालचा बसचा प्रवास", "उद्या लवकर उठायचे आहे" वगैरे अशी कारणे देत मी आपल्या रूम मध्ये सटकलो.

विदा आणि लोकेश हे दोघे Twiners माझे रूममेट होते. लोकेश हा "प्रकार" चुकूनच बोलतो. त्याला प्राणी आणि पक्षी हेच सगळे काही आहे.
जंगलात, घुबडासारखे मोठे डोळे करून तो फिरत असतो. तो अप्रतिम फोटो काढतो. त्याचा DSLR घेऊन तो भटकत असतो.
दुपारी, पहिल्या सफारीच्या आधी, माझ्या मेमरी कार्ड ने मला दगा दिला.
लोकेशनेच मला त्याचे मेमरी कार्ड दिले.... खरंच, मला दाद द्यावीशी वाटली Twiners ची.
First Aid box पासून ते कॅमेर्‍याच्या कार्डपर्यंत सगळं काही आणलं होतं त्यांनी.

"रूममध्ये साप येतील आरामात.." उडालेल्या छताकडे बघून मी म्हणालो..
"ह्या.. साप आले तर काही Tension नाही. मला साप पकडता येतो...!!!".... लोकेश म्हणाला
मी पुढे काही बोललोच नाही Happy

एव्हढ्यात रूम्सच्या मागे कोणीतरी ओरडण्याचा प्रचंड आवाज ऐकू येऊ लागला. मला काही कळेना.
"जबरदस्त calling चालू आहे.." लोकेश म्हणाला...
Calling म्हणजे... हरणं, सांभरं जेव्हा कुठल्या मांसाहारी प्राण्याला बघतात तेव्हा एका वेगळ्याच आवाजात ओरडून आजूबाजूच्या प्राण्यांना सावध करतात. Generally वांदर झाडावर बसून calling सुरु करतात. हरणं, सांभरं जेव्हा डोळ्यांना "कोणी" दिसतं तेव्हा calling करतात. सांभराचं कॉलिंग म्हणजे हमखास कोणी मोठा शिकारी आसपास आहे असे समजावे..
एव्हाना रुमच्या मागेच हरणांचे calling सुरु होते. म्हणजे नक्कीच कोणीतरी जवळ होते. आम्ही चार भिंतींमध्ये बसलेले होतो पण तरीही भीतीदायक उत्सुकता पणाला पोहोचली होती.... प्रचंड काळोख होता. त्यात आमच्याकडे फालतू बॅटऱ्या होत्या. बाहेर जाणं मूर्खपणाचं होतं.
अजून थोडावेळ calling चालूच होतं. पण हळू हळू calling चा आवाज लांब जात होता. "तो" प्राणी लांब गेला होता.

पहाटे पाच वाजता विदाचा गजर वाजू लागला. लगेच जाग आली. सफारी सहाची होती.
थंडीमुळे "फाटली" होती.. खरं सांगायचं तर "थंडीमुळे फाटणे" हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. नागझीरातल्या थंडीमुळे सगळं काही "शिवलं" गेलं होतं...!
हाड्न हाड कडा कडा वाजत होतं...! गरम पाणी वगैरे असल्या चैनीच्या वस्तू ९०० किलोमीटर लांब होत्या.

सकाळी सहा वाजता पुन्हा एकदा बायकोच्या जिप्सी मध्ये मी उडी मारली. यावेळी आमच्या जीप मध्ये अर्चिस होता..! गाडी आणि बडबड सुरु झाली. हरणे आजूबाजूला चरतच होती. गाडीतल्या सगळ्यांना आत्तापर्यंत काही ना काही "स्पॉट" झालं होतं. मीच फक्त अजून रिकामा होतो.
Spotting म्हणजे त्या दाट जंगलामध्ये "कोणतरी" दिसणे..
माझी Spotting ची पद्धत जरा वेगळी होती.. पुढे असलेली जीप थांबली असेल आणि त्यातले सगळे लोक जिकडे पाहत असतील तिथे "कोणतरी " आहे असे समजावे ....!! झाले Spotting....!!

तर सकाळच्या त्या थंडीत गुरफटून आम्ही पुढे पुढे जात होतो.. बराच वेळ नुसते इकडे तिकडे भटकल्यावर आम्ही एका चढावर पोहोचलो.. तिथली हरणे अस्वस्थ होती. Calling चालू होते. जरा पुढे गेल्यावर "प्रचंड calling" सुरु झाले. त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला उतार होता आणि उजव्या बाजूला चढ. सगळी हरणे एकाच ठिकाणी बघून कोकलत होती. नक्कीच त्यांना कोणीतरी मोठा प्राणी दिसत होता. ती आमच्यापेक्षा जास्त उंचीवर होती आणि अजून वर बघत होती. आम्ही सगळे आता वाघ नक्कीच दिसणार या विश्वासाने डोळे वटारून तिकडे बघू लागलो. रुपचन्द्जी गाईड आणि राकेश ड्रायव्हर एकमेकाशी जवळपास भांडू लागले. रुपचन्द्जी म्हणत होते आपण पुढे जाऊ राकेश म्हणत होता नाही आपण इथेच थांबू..... आम्ही मात्र अजूनही पिवळ्या काळ्या पट्ट्या शोधात होतो.. शेवटी रुपचन्द्जीच्या म्हणण्या प्रमाणे गाडी पुढे गेली. साधारण पन्नासेक मीटर पुढे गेल्यावर calling बंद झाले. आमचा rose ringed parakeet झाला होता. रुपचन्द्जी आणि राकेशचा खूप राग आला होता..

"काही नाही बिबळ्याचे calling होते वाघाचे नव्हते.." रुपचन्द्जी म्हणाले.
माझी खरंच सटकली होती...
"अरे बिबळ्या तर बिबळ्या... चायला इकडे कावळे आणि पोपट सोडून कोणी दिसत नाहिये..."... मी मनातल्या मनात धुमसत होतो.
खरं तर जंगलात वाघापेक्षा बिबळ्या दिसणे जास्त अवघड असतं. शेवटी कोणीच न दिसल्याने रुपचन्द्जींच्या नावाचं कॉलिंग करत आम्ही पुढे निघालो..

पुन्हा बिनवाघाचे फिरता फिरता गानू ओरडले.. "मला कोणतरी दिसलंय.."
अत्तापर्यंत आम्हाला सवय झाली होती. गानू ओरडले की वरती बघायचे.
कुठल्यातरी कोपऱ्यात एक Common Flameback Woodpecker (सुतार पक्षी) बसला होता. लाकडाला छेदण्यासाठी मजबूत लांब चोच, पिवळट, मातेरी रंगाचे पंख आणि डोक्यावर सुंदर लाल तुरा. हा पक्षी तसा सगळीकडे दिसतो पण कधीही दिसला तरी बघत राहावा असा वाटतो. थोडावेळ सुतार पक्ष्याला बघितल्यावर पुन्हा एकदा आम्ही "लिंकिंग रोड" ला वळलो.
थोडेसेच पुढे गेल्यावर रुपचन्दजी एकदम म्हणाले..."थांब थांब... तो बघा Changeable hawk eagle. त्याने kill केला आहे ".
रस्त्याच्या बाजूच्या फांदीवरच एक मोठ्ठा गरुड बसला होता. त्याच्या पायात त्याने एक पोपट पकडला होता. त्याच्या त्या बाकदार चोचीने तो त्या पोपटाला फाडत होता. अक्षरश: "नोच नोच के खा राहा था".

www.youtube.com/watch?v=hj79lvefwKI

Video: वरच्या लिंकवर, नोच नोच के खाता हुआ Changeable hawk eagle बघा

Crested Serpent Eagleफोटो -- नंतर दिसलेला रुबाबदार Crested Serpent Eagle

खरंच काय डौल होता त्या गरुडाचा. प्रचंड आकार, डोक्यावर एक शानदार तुरा आणि डोळ्यात "killer instincts". अगदी "Made for the kill".
गानू अगदी आ वासून त्याला बघत होते. पक्ष्यांवर खरं प्रेम करणारी माणसं असतात ना? गानू हे त्यातलेच एक आहेत..

मी विचार करत होतो, आपल्या गावात, माखजनला, आपण आत्तापर्यंत असे किती प्रकार चुकवले आहेत? जिकडे बघावे तिकडे वेगवेगळे पक्षी असतात. अगदी बारक्याश्या चिमणीपासून त्या प्रचंड गरुडापर्यंत. त्यांना enjoy करण्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात. त्यांना बघण्यात मिळणारा आनंद खरंच वेगळा असतो. त्यांच्यावर प्रेम केल्यावर तो कळतो. हे व्यसन खरे वेगळेच आहे.
मुंबईत राहणारे हे लोकं पक्षी बघण्यासाठी पैसे घालून अभयारण्यात येतात आणि आपल्याला मात्र गावातल्या घरासमोरचे पक्षी दिसत नाहीत..!

जिप्सी मधून आम्ही पुढे निघालो... तिथे आम्हाला Black-hooded Oriole (काळ्या डोक्याचा हळद्या) दिसला. हा कॉमन पक्षी आहे पण फार सुंदर रंगसंगती आहे.

Black Hooded Orioleफोटो -- Black-hooded Oriole

जाता जाता बरेच Plum headed parakeet (लाल डोक्याचा पोपट) एका झाडावर बसलेले दिसले. यांना बघितल्यावर का कोण जाणे एकदम प्रसन्न वाटले.

Plum Headed Parakeetफोटो -- Plum headed parakeet and Law of nature... डोक्यावर बस(व)लेली ती स्त्री....!

या सफरीतही वाघ काही दिसला नाही... नुसता हूल मात्र देऊन गेला होता. परत रूम्स वर गेल्यावर आम्ही शेजारच्या तलावावर गेलो. तिथेही वांदर, हरणं आणि वेगवेगळे पक्षी भरलेले होते.

www.youtube.com/watch?v=Qh9MdiBVNqA

Video: वरच्या लिंकवर Pied Kingfisher बघा

हा हा म्हणता तिसरी सफारी संध्याकाळी सुरु झाली. या सफारीत पहिला तासभर हरीण आणि सांभर सोडून कोणीही दिसले नाही.
रुपचन्द्जी आणि राकेश यांच्यावर अत्तापर्यंत सगळे वैतागले होते.

"अर्र.. तिथे दरीत कोणतरी आहे रे.. गाडी थांबव..." रुपचन्द्जी
"कोण नाही तिकडे.." राकेश..
"हा मला तिकडे काही हालचाल दिसून राहिली.. म्हणून बघू लागलोय न बे..." रुपचन्द्जी
अशा बाचाबाचीत साधारण दोन मिनिटे गेल्यावर..
"ह्यात... सांभर आहे.. " रुपचन्द्जी म्हणाले...
आता मात्र आमचा रागाचा पारा चढला होता... मागून काहीतरी comments सुरु झाल्या.
त्या दिवशी या रूपचन्दाने असे चार वेळा थांबवले होते.. चारपैकी दोनदा सांभर आणि एकदा दगड आणि एकदा लाकूड दिसले होते...!

नंतर दोनदा आम्हाला दोन दुचाकी आणि एक सायकलवालाही जंगलात फिरताना दिसला. अगदी गावातल्या कुठल्यातरी रस्त्यावरून जात आहोत असे वाटत होते. ते सगळे "कर्मचारी" किंवा शेजारचे गावकरी होते.
अख्खी संध्याकाळ डोळे फाडून, किलोभर धूळ डोळ्यात घालून काहीही दिसले नव्हते. म्हणजे अगदी रानडुक्करही नाही.
सफारी संपायची वेळ झाली तेव्हा दोन ST च्या बसेस शाळेची ट्रीप घेऊन आम्हाला पास झाल्यावर आम्ही वाघाचा विचार सोडला...
सफारी संपली होती... कोणत्याच जीपला वाघाची शेपटीही दिसली नव्हती.
मला या सफारीसाठी, वाघ बघण्यासाठी दिलेले पैसे दिसू लागले. राग राग येत होता अगदी...
सगळेजण आपापल्या गाईडला शिव्या घालत होते.
कॉलिंग-बिलिंग हे प्रकार अगदी झूट असतात..... पोट बिघडल्यावर ही साली हरणं केकटायला लागतात, असं वाटू लागलं होतं.

परत एकदा गां.फा. थंडीत आम्ही एका मेणबत्तीच्या भोवती कोंडाळे करून बसलो. २४ मधली काही मंडळी दिवसभराच्या थकव्याने रूममधेच आराम करत होती. अर्चिस सहस्त्रबुद्धे पुन्हा सुरु झाले. परत एकदा प्रत्येकाचे सविस्तर ओळखसत्र चालू झाले. प्रत्येकजण आपापल्याबद्दल सांगू लागला. त्यात, सहस्त्राबुद्ध्यांचे त्या १०-१२ लोकांच्या ग्रुपमधल्या मुलींना चिडवण्याचे काम चालू झाले... त्या ग्रुपमध्येच जमलेली किंवा जमू घातलेली सुते विचलित होत होती... असो...
होता होता परत गाणी सुरु झाली.. अशक्य सहस्त्रबुद्धेनी गाणे सुरु केले...

काय सुंदर आवाज आहे त्याचा... खरंच, अप्रतीम...!
आणि हा अर्चिस सहस्त्रबुद्धे एका मोठ्या MNC मध्ये manager आहे...!! मी चाट पडलो.. काय काय करावे एकाच माणसाने??
पुढे एकेकाने गळा साफ केल्यावर, बायकोने "तो गाणे चांगले म्हणतो" वगैरे असे जगाला सांगून, लग्न झाल्यावर मी तिला म्हणायला लावलेल्या गाण्याचा बदला काढला होता. पण त्यामुळे एक चांगले झाले... माझे गाणे झाल्यावर सगळ्यांची गाणी ऐकायची आणि म्हणायची इच्छा संपली. गाणी बजावणी बंद झाली...!

माझं गाणं ऐकूनच की काय कोण जाणे पण शेजारची हरणे परत बोंब मारायला लागली.
होता होता फारच जोरात कॉलिंग सुरु झाले...
त्यात आमच्याकडे असलेल्या मरतुकड्या टॉर्चमुळे काही दिसत नव्हते. अता, आमच्या अगदी समोर कॉलिंग सुरु झाले होते. मजा येत होती..
एवढ्यात बाजूला बसलेल्या गानुनी एक चांगली टॉर्च माझ्या रुमच्या दाराजवळ मारली.
बघतो तो काय.. एक झुबकेदार शेपटीचे, कुत्र्याच्या आकाराचे जनावर उभे...!!
"Wild Dogs" गानू हळूच मला म्हणाले...
अंगावर काटा उभा राहिला होता. आम्ही दोघं-तिघं त्या दिशेने पुढे गेलो... पण जरा भीत भीतच.
तिथे कोणीच नव्हतं.. सगळीकडे बॅटरी मारुन झाली... पण कसलाही मागमूस नव्हता. टॉर्च आणि लोकांच्या आवाजामुळे ते जनावर पळाले होते...
तेव्हढ्यात रूमवर आराम करत बसलेले एक "काका" माझ्याजवळ आले... त्यांनी विचारले... "काय झाले?"
"अहो, अत्ता इथे Wild Dogs येऊन गेले. म्हणूनच जोरदार कॉलिंग चालू होते हरणांचे...".... अगदी उत्साहाने मी त्यांना सांगितले...
थोड्या वेळाने विदा येऊन आम्हा दोघांना म्हणाला... "अरे.. Wild Dogs आलेले हे कोणाला सांगू नका... Especially त्या काकांना... त्यांची अक्षरशः फा.ट.ली. आहे..."
काय बोलावे काही कळेचना... नकोत्या वेळी, नकोत्या व्यक्तीला, नकोती गोष्ट सांगायची सवय कधी मोडणारे असे वाटत नाही... त्यामुळे फारसा विचार न करता मी इतर लोकांना Wild Dogs बद्दल सांगू लागलो..!!! ते काका मात्र त्या रात्री जेवायलाही बाहेर पडले नाहीत...
By the way, जेवताना या Twiners नी एकदम झकास surprise दिलं... ताटात चक्क गुळाची पोळी...!!!!
जंगलाच्या मध्यात जेवताना गुळाची पोळी हाणायला मिळणं म्हणजे काय सुख होतं ते तुम्हाला कसं सांगू??
Twine Outdoors हा तसा नवीन ग्रुप आहे, यांच्यात "प्रोफेशनल रूक्षपणा" अजूनतरी आला नाहिये... अगदी घरातल्या लोकांसारखे... किंवा मित्रासारखे हे लोक बोलतात आणि वागतात... तो कॉर्पोरेट रूक्षपणा यांच्यात कधी न यावा हीच एक इच्छा...!

बाजूला गुळाची पोळी ओरपणार्‍या एकाला सहस्त्रबुद्धे म्हणत होते...
"घे घे... अजून घे... काय हवं ते मागून घे.... पण मात्र, पुढून खा..बरं का...??"

रात्री रूमवर गप्पांना ऊत आला.. लोकेश आणि विदा त्यांच्या ट्रीप्स मधले अनुभव सांगत होते.
मित्रवर्य विदा प्रत्येक गोष्ट समजाऊन सांगायच्या सुरात बोलतो. म्हणजे त्याने चुकून कधी शिव्या घातल्याच, तर त्याही तो अगदी समजवून सांगेल... !!
त्याच्या तीस टक्के वाक्यांची सुरवात... "अरे बघ ना..." ने होते आणि बाकीची वाक्यं "अरे वेडा आहेस का....काय म्हणजे....." ने सुरू होतात. CA असूनही गोड बोलणं तो जमवतो...!
एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेणे आणि ती पार पाडणे त्याला एकंदरीत आवडते. तोही bird expert आहे.

Twine outdoors वाल्यांची जी तयारी होती ती माझ्यामते विदानेच केली असावी.
त्यांचा ग्रुप complete वाटतो.. विदा तयारी करतो.. सहस्त्रबुद्धे बडबड करतात (५०० रुपयांची गोष्ट बडबड करून २०० रुपयांत मिळवणारी व्यक्ती लागतेच..) आणि लोकेश जगातले साधारण सगळे प्राणी-पक्षी ओळखतो....
अर्थात मी या सगळ्यां मंडळींना फारसा ओळखत नाही... पण तरिही.....!

पुन्हा एकदा सकाळ झाली.... ही शेवटची सफारी होती.. वाघ बघायची शेवटची संधी...! परत एकदा रूपचंदजी आणि राकेशबरोबर आम्ही जीपमधे बसलो. लोकेशने त्याचे एक "लकी" फडके डोक्याला गुंडाळले.. पहिल्या सफारींमध्ये वाघ दिसला नाही की शेवटच्या सफारीसाठी त्याने ते राखून ठेवलेले असते...
आज आमच्या जीप मध्ये ग्रुपमधला अभिषेक होता. Twine त्रिकूटांतला मात्र कोणी आज बरोबर जीपमध्ये नव्हता.
जीप सुरू झाली. बाहेर पडताच साधारण पन्नासएक हरणांचा कळप दिसला. मस्त नझारा होता... पण हरणं बघून खरंच कंटाळा आला होता..
Resort च्या जवळपास असणार्‍या एका पाणाच्या टाकीवर जाऊन "कोणी" दिसतंय का ते बघायला गाडी वळली.. आमच्या मागून दुसरी जीपही आली. अपेक्षेप्रमाणे पाण्याच्या टाकीजवळ कोणीही नव्हते. पुन्हा एकदा राकेश आणि रूपचंदजींच भांडण सुरू झालं. एक म्हणत होता सरळ जाऊ.. दुसरा म्हणत होता मागे फिरू...

म्हणता म्हणता राकेशने गाडी उलटी वळवली ... पुन्हा एकदा आम्ही रोजच्या रस्त्यावरून जाऊ लागलो... रस्ता सरळ होता... समोर जरासा चढाव होता.. एकदम शांतता होती... कॉलिंग वगैरे प्रकार चालू नव्हते...आमची गाडी रस्त्यच्या मधोमध होती.
सूर्य ऊगवला होता... पण नागझिराच्या जंगलात अजूनही प्रकाश अंधुकच होता...
पुढे एक मिनिटही झालं नसेल... तेव्हढ्यात रूपचंदजी अचानक ओरडले...

"हा घ्या तुमचा वाघ....!!!"

सरळ रस्त्याच्या त्या टोकाला एक वाघ आमच्या दिशेने चालत होता...
"वाघीण आहे ती...तिचेच दोन बच्चे आहेत.. आता हल्ला करू नका शांत रहा...." रूपचंदजी म्हणाले...

ती एकदम शांतचित्ताने चालत येत होती...
तिला बघून मनातले सगळे विचार एकदम बंद झाले, थंडी गायब झाली आणि बडबड बंद झाली..
तिला बघून जगाचा विसर पडला होता.. राणीच ती... तिचा रूतबा काय वर्णावा?

ती सरळ पुढे येतच होती. सगळ्यांचे कॅमेरे बंदूकीसारखे चालू झाले...
मी बिथरल्यासारखा माझा कॅमेरा सेट करायची धडपड करू लागलो...
बायको म्हणाली... "कॅमेरा राहूदे...डोळे भरून बघुन घे..."

मी एकदम शांत झालो... डोळे वाघिणीवर खिळले आणि कॅमेराही आपोआप चालू झाला...

खरंच, डोळ्याने वाघ बघण्यात जी मजा आहे ती काही औरच...!

प्रत्येक क्षणाला तिच्या डोळ्यातले भाव बदलत होते..

जंगलाच्या सम्राज्ञीचा रूबाब पण दोन बछड्यांच्या आईची काळजी, माणसांवर धुमसणारा राग पण तशीच माणसाच्या यंत्रांची भीती, आमच्यावर तुच्छतेने टाकलेला एक कटाक्ष पण दुसरीकडे सावजावरची तीक्ष्ण नजर.

ती जशी जशी जवळ येत होती... तशी तशी ती अजूनही मोहक दिसत होती..
राणीच्या थाटात ती पुढे येतच होती. अजिबात भीती वाटत नव्हती..
तिचं सौंदर्य.. तिची चाल बघतच रहावी असे वाटत होते...
ती जवळ आली होती.. साधारण १५-२० फूटांवर....
नंतर साधारण १५-२० मिनिटं ती रस्त्यावरून फिरत होती. तिच्या मागून आम्ही फिरत होतो. आजू बाजूची सांभरं आणि हरणं केकाटत होती. ती त्यांच्यावर रागाने एखादा कटाक्ष टाकत होती.... आम्हाला डोळे भरून दर्शन दिल्यावर ती जंगलात गायब झाली..
तिने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं होतं... तिचं सौंदर्य अवर्णनीय होतं..

www.youtube.com/watch?v=8QNf4R-9JPE

Video: || सम्राद्नी || वरील लिंकवर तिच्या डोळ्यातले आणि चेहर्‍यावरचे भाव बघा दिसतायत का?

Samradniफोटो -- Her Majesty

रूपचंदजी आणि राकेश अता देवदूतासारखे वाटत होते. गानूंच्या डोळ्यातून आनंदाने अक्षरशः पाणी आले होते.
बायको आणि मी फक्त एकमेकांकडे बघत होतो... समाधानाने हसत होतो.

"तरी मी सांगत होतो. आपण मागे फिरूया... म्हणून बघायला मिळाली..." रूपचंदजी सुरू झाले..
"तुम्ही कुठे? मीच म्हणालो मागे फिरूया.."... राकेश...
"काय बे.. मीच बोल्लो होतो... अन् आजपर्यंत असं कधीच झालं नाही की मी पहिल्याच सफारीत वाघ दाखवला नाही.... यावेळी तीन सफारी झाल्या तरी वाघ दिसून नव्हता राहिला... पण दिसला बघ आता..."...रूपचंदजी

कालपर्यंत वैतागवाणी वाटणारी यांची भांडणं आज गोड वाटत होती.
"या वाघिणीचं नांव काय ठेवलयंत?" मी विचारलं..
"तसं काही नांव नाही ठेवलेलं... पणं गौर गल्ली मध्ये जास्त दिसून रहाते ना ही... त्यामुळे हिचं नांव आपण "गौरी" ठेऊ...आजपासून आम्ही हिला गौरी म्हणू..." रूपचंदजी म्हणाले.

"व्वा... गौरी... मस्त नांव आहे... तुमच्या सगळ्या गाईडना सांगा..." मी...

(मला नंतर कळले की या वघिणीला A-mark असेही म्हणतात.)

Guideफोटो -- रूपचंदजी आणि राकेश

पुढे साधारण दोन तास जीपमध्ये फक्त गौरीच घर करून बसली होती... त्यांनतर आम्ही बरेच पक्षी बघितले... परत Resort वर परत जाता जाता काल रात्री दिसलेले जंगली कुत्रेही दिसले..

www.youtube.com/watch?v=B1YGxl8gau8

Video: वरच्या लिंकवर जंगली कुत्रे, हरणं आणि पक्षी बघा

वाटेत दिसलेल्या पक्षांची नांवं अता मलाही येत होती. "पैसे भरून हे लोक प्राणी बघायला एव्हढ्या लांब कशाला जातात...? Zoo मध्ये १० रूपयात एकाच ठिकाणी सगळे प्राणी दिसतात..." वगैरे असली टिंगल करणारा मी मलाच बदलल्यासारखा वाटत होतो.

वाघिणीच्या एका दर्शनाने या जंगलप्रेमी लोकांबद्दलच्या माझ्या संकल्पनाही बदलल्या होत्या. Zoo मधले प्राणी आणि जंगलातले प्राणी यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे...
खरं सांगतो, अगदी नाट्यमयरित्या, ३ वेळा हूल देऊन, अगदी शेवटच्या सफारीत दिसलेली ती वाघीण मी तरी कधी विसरणं शक्य नाही...
नागझिराल्या मातीवर कॅटवॉक करताना ऊमटलेली गौरीची पावलं... ऊन्हाच्या कवडस्यांमधे चमकणारी तिची कांती., फोटोंच्या क्लिक्समुळे टवकारलेले कान आणि चुकून पडलेल्या एखाद्या फ्लॅशमुळे रागाने वटारलेले डोळे आणि मागून मागून फिरणार्‍या तीन-चार गाड्यांमुळे अस्वस्थ झालेली "ती" अजूनही जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर आहे..अगदी प्रत्येक क्षण डोक्यात कोरला गेला आहे... तो अनुभव शब्दांत सांगणं अशक्य आहे..

================================================================
या सफरीला आता एक वर्ष झाले! त्यानंतर माझी एक भिगवण Birding Tour आणि तीन जंगल सफरीही झाल्या..

काही दिवसांपुर्वीच Twine Outdoors ने पुण्यातही शाखा सुरू केली आणि मलाच त्याचा Organiser बनवले आहे !!

Twine Outdoors च्या Wildlife Tours येत्या एप्रिल, मे आणि जूनमध्ये होणार आहेत.

Twine Schedule

जर कुणाला ही मजा अनुभवायची असेल (मुंबई, पुणे किंवा अजुनही कुठून) तर जरूर कळवा.
फोन:
सहस्त्रबुद्धे : ९८९२१७२४६७
कपिल (मी) : ९४२१६२०९६५

email: madarchis[at]gmail[dot]com, kapilranade1[at]gmail[dot]com

किंवा फेसबूकवर "Like" करा: http://www.facebook.com/TwineOutdoors

नोटः मला आलेला मस्त अनुभव सांगायचा होताच, पण नवीनच सुरू केलेल्या आमच्या पुणे शाखेची थोडीशी (तेसुद्धा शेवटी) जाहिरात करणेही जरूरीचे होते.
कुणाला याबाबत तक्रार नसावी अशी आशा...!
================================================================

बाय द वे, फोटो आणि व्हिडिओ बघताना काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या ब्लॉगवर (खाली दिलेल्या लिंकवर) हे पोस्ट वाचा:
http://kaywattelte.blogspot.in/2012/03/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलं आहे.
इतकी वर्षे कसं काय दिसले नाही देव जाणे!

शेवट भारी आहे एकदम Happy

नाही फार आवडलं. अशा माणसांबरोबर जाणं, राहणं आणि फिरणं म्हणजे अवघडच आहे.
रुपचंदजी आणि राकेश यांच्याबद्दल फार सुमार लिहीलं आहे. रुपचंदजी बाप माणूस आहे. मी खूप फिरलो आहे त्यांच्याबरोबर. वासावरुन या माणसानं मला तीन वेळा वाघ शोधून दाखवले आहेत. रुपचंदजीनं सांगितलं म्हणजे प्रमाण.
दोन किलोमीटरवर वाघानं केलेली हलकीशी गुरगुर आठ माणसांमधून या माणसानं अचूक ऐकली. अंदाजा-अंदाजानं जाऊन वाघ दाखवणारा आणि फुकट श्रेय लुटणारा हा माणूस नाही.

अस्वल अंगावर आलं तरी हा माणूस हिमतीनं उभा राहिलेला मी पाहिलाय. कधीतरी मी लिहीन माझ्या त्यांच्याबरोबरच्या आठवणी. अफाट आहेत.

नवीन Submitted by अरिष्टनेमि on 21 October, 2020 - 14:24 >> केनेथ एंडरसनच्या गोष्टीत एक्झाक्टली असाच एक माणूस होता, बायरा की काय त्याचे नाव. तो ही असाच खोल जंगलात वाढलेला.... वासावरून माग काढत अविश्वसनीय रित्या लपलेले वाघ शोधून काढतो.
केनेथ त्याच्याबरोबर एकदा शिकारीला गेला असतांना एक ममा बेअर असेच त्यांच्यावर हल्ला करते ज्यात बायरा स्वतः जखमी होतो पण केनेथ चे प्राण वाचवतो.

केवढे साधर्म्य आहे रूपचंदजी आणि बायराच्या आयुष्यात, पुनर्जन्मच जणू.

नाही फार आवडलं. अशा माणसांबरोबर जाणं, राहणं आणि फिरणं म्हणजे अवघडच आहे
+100

खरेतर मलापण इतक्या बडबड करणार्‍या लोकांबरोबर जंगलात फ़िरायला नाही नावडणार. त्यातही ती बडबड माहितीपूर्ण असेल तर एक वेळ ठीक. पण "मागून घे पुढून खा" प्रकारची असेल तर बिग नो नो! Uhoh
जंगल हे अनुभवायचं असतं. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ऋतूंमधे जंगल प्रत्येक वेळी नव्याने काही दाखवून देतं. नुसत्या वाघाच्या सायटिन्ग साठी गेलात तर बरयाचदा निराशा पदरी येऊ शकते. मान्य आहे की वाघ जंगलाचा राजा पण त्याचं राज्य पण फार फार सुंदर असतं. (अर्थात हे माझे वैयक्तिक मत.)

<<वासावरुन या माणसानं मला तीन वेळा वाघ शोधून दाखवले आहेत>>
अतिअवान्तर : आमच्या ऑफिस मधे आहे एक नवीनच लागलेला मुलगा. मूळचा गडचिरोलीतील एका लहान खेड्यातला. त्याचाही वासाचा सेन्स जबरदस्त आहे. आणि जंगलकथान्चा खजिनाच आहे. तो एकदा म्हणाला की "मॅडम, आम्हा जंगलात रहाण्यारा लोकांना नुसते डोळ्यांवर अवलंबून राहून चालत नाही, डोळ्यांबरोबरच नाक, कान आणि आतला आवाज (intuition) यांचा योग्य वापर करता आला तरंच जंगल सुरक्षित आहे".

Pages