बालक पालक आणि मी

Submitted by तुमचा अभिषेक on 28 January, 2013 - 10:38

बाप हे दोन प्रकारचे असतात...!!

एक बाप तो असतो जो घरी यायची वेळ होताच मुले त्याच्या धाकाने खेळमस्ती दंगागाणी बंद करून अभ्यासाचे पुस्तक उघडून बसतात.
तर एक बाप तो असतो जो घरात शिरताक्षणीच त्याची मुले आनंदाने नाचत बागडत येऊन त्याला बिलगतात.

शेवटी आपले स्वत:लाच ठरवायचे असते की आपल्याला यातला कोणता बाप बनायचे आहे....!!

.............मी एका तत्ववेत्याचा आव आणत, सहा घरची पोरे सांभाळली आहेत अश्या आविर्भावात बायकोला प्रवचन देत होतो. मात्र तिला माझी ही बकबक नाही तर माझ्या तोंडून माझे लहाणपणीचे किस्से ऐकायचे होते. चूक माझीच होती. सिनेमाचा हॅंगओवर डोक्यात असा काही चढला होता की त्या नादात नको नको ते बोलून गेलो होतो. "बालक पालक" उर्फ "बीपी" या त्याच्या लघुनामालाच साजेश्या विषयावरचा चित्रपट पाहून जेव्हा घरी परतत होतो तेव्हा "कसा वाटला सिनेमा?" या अपेक्षित प्रश्नावर मी नेमके तिला अनपेक्षित उत्तर दिले होते.

"काय सांगू... नॉस्टॅल्जिक की काय म्हणतात तसा झालो ग अगदी.... अगदी म्हणजे सिनेमात दाखवलेले सारे सारे लहाणपणी आम्हीही केले आहे. म्हणजे ते वीसीआर आणून सिनेमा बघण्यापासून खिडकीच्या बाहेर उभे राहून................................" अई ग्ग..! जीभ चावायला किंचित उशीरच झाला, अन आता हे सविस्तर ऐकल्याशिवाय ती माझा पिच्छा सोडणार नव्हती हे मला ठाऊक होते. खरे तर आज ते सारे आठवायचा, कोणाशी तरी शेअर करायचा मूड होताच.. अन संधीही.. पण तरीही.. फक्त मित्र असते तर कट्टा जमवलाही असता आठवणींचा. ऐकण्याची उत्सुकता तिलाही होती, सांगण्याची मलाही होती. पण बरोबरची मुलगी बायको असून ही फक्त एक स्त्री असल्याने बोलायला नेमके शब्द सापडत नव्हते. नुकतेच पाहून आलेल्या चित्रपटात दोन मुले आणि मुली एकत्र बसून प्रौढांसाठीचे सिनेमे पाहताना दाखवले होते. ते देखील त्या काळात. त्या मानाने आज मुले मुली एकमेकांमध्ये मिसळताना तितकासा बुजरेपणा दाखवत नाहीत. तरीही या विषयावर असे उघड उघड बोलणे... आजही... आताही... तेव्हाही...

मुलांशी या विषयावर खुलून बोला असा जो काही विचार या चित्रपटात मांडण्यात आला होता त्यातील फोलपणा म्हणा किंवा त्याच्या मर्यादा म्हणा, तात्काळ जाणवल्या.

हल्ली शाळांमध्ये लैंगिक शिक्षण हवे की नाही याच्या चर्चा झडतात तेव्हा हसायला येते. ते तुम्ही शिकवा किंवा नका शिकवू, मात्र प्रत्येक मुलगा एका ठराविक वयात कुठून ना कुठून तरी हे शिक्षण मिळवतोच आणि यात त्याचे गुरू असतात ते त्याच्याच किंवा त्याच्यापेक्षा किंचित मोठ्या वयाची मुले. मी देखील याच गुरुकुलात हे ज्ञान मिळवले. माझ्या ज्ञानात नक्की कोणत्या वयात कशी कशी भर पडत गेली हे आता नक्की आठवत नाही, मात्र बालपण चाळीतल्या खुल्या वातावरणात गेले असल्याने या विषयात वर्गातल्या इतर मुलांपेक्षा मी नेहमीच एक इयत्ता पुढे होतो. पण सुरुवात माझीही सर्वांसारखीच झाली. कुतूहल अन त्यातून भोळ्याभाबड्या मनाला पडणारे बावळट प्रश्न. प्रत्येकाला पडलाच असावा असा हमखास प्रश्न - या जगात आपण कसे आणि कुठून आलो? सरळ भाषेत सांगायचे झाल्यास मुलाचा जन्म कुठून आणि कसा होतो?

कौन बनेगा करोडपतीमध्ये शेवटचा प्रश्न एक करोडचा असतो पण इथे मात्र पडलेला हा पहिलाच प्रश्न करोडो रुपये किंमतीचा होता. याचे उत्तर काय सापडते यावर पुढच्या प्रश्नांचा प्रवास अन ज्ञानार्जनाची दिशा ठरणार होती. प्रश्नकर्त्याच्या वयोगटानुसार या प्रश्नाची दोन ठरलेली हिट उत्तरे. त्यातील पहिले उत्तर मलाही मिळाले. देवबाप्पा आला अन माझ्या राजाला खिडकीत ठेऊन गेला. काही जणांकडे देवबाप्पाच्या जागी परी येते तर कोणाकडे चंदामामा, कोणाला पाळण्यात तर कोणाला आईच्या कुशीत ठेवले जाते. पण लवकरच मला जाण आली की असे काही चमत्कार घडत नसतात तेव्हा दिले जाणारे दुसरे अन साधे सोपे उत्तर मिळाले.... आईच्या पोटातून...!!

तोपर्यंत माझ्या चार इयत्ता शिकून झाल्या होत्या. मोठ्यांची कोणतीही गोष्ट नुसती ऐकायची नाही तर तर्काच्या कसोटीवर पडताळून पाहायची हे समजले होते. पण आजूबाजूला दिसणार्‍या पोटूशी बायकांना पाहता या उत्तरावर अविश्वास दाखवणे शक्य नव्हते, किंवा त्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नव्हतो म्हणा आणि म्हणूनच एका ठराविक वयापर्यंत मी अन सोबतीला माझे सारे बालमित्रमंडळ याच समजूतीत होतो की आपण सारे नरसिंह पोटातून प्रकट झालोत.

मात्र वाढत्या वयाबरोबर आपल्या कोणाच्याही आईच्या पोटाला टाके का नाहीत हा प्रश्न आम्हाला छळू लागला आणि अजूनही हा प्रश्न अनुत्तरीतच असल्याची जाणीव झाली.

इतरवेळी हा प्रश्न आम्ही मनातच ठेवला असता पण आता आम्ही इतपत मोठे झालो होतो की चाळीतील आमच्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांनी आम्हाला ज्ञान वाटायला सुरुवात केली होती. ही सुरुवात नेहमी अश्लील विनोदांपासून व्हायची. विनोद समजण्यासाठी म्हणून त्यातील काही शब्दांचा आणि संकल्पनांचा अर्थ समजून घेणे गरजेचे असायचे, त्यामुळे विनोद कळण्यासाठी म्हणून ते अर्थ व्यवस्थित समजून घेतलेच जायचे किंवा काही वेळेस त्या नेमक्या अर्थामुळे विनोद घडत असल्याने तो शब्द समजायला सोपा पडायचा आणि त्याचा अर्थ डोक्यात फिट बसायचा. उदाहरण द्यायचे झालेच तर निरोध या शब्दाचा अर्थ देखील मला तो नेमके कशाला विरोध करतो अश्या आशयाचा एका विनोदावरूनच समजला होता. ते देखील त्याचा आकार रंग रूप काहीही माहीत नसताना...

असो, तर आम्हा सार्‍या बाळगोपाळांना स्वताच्या उत्पत्तीबद्दल पडलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला जाणकार मंडळी देखील टाळाटाळ करत होते, जे साहजिकच होते म्हणा. पण याचमुळे आमची उत्सुकता आणखी चाळवली जात होती. प्रत्येकाने आपापल्या परीने उत्तर शोधायला सुरुवात केली होती. अश्यातच एके दिवशी आमच्यातल्या एकाने डिस्कवरी चॅनेलवर (जे तेव्हा नवीनच उघडले होते) कोणा सस्तन प्राण्याचा जन्म कसा होतो याची फिल्म पाहिली आणि............................ युरेका युरेका..!

तो कितीही पोटतिडकीने आम्हाला पटवून देत असला तरीही आमच्यातील कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. ठेवणार तरी कसे. सारे आकलनापलीकडचे अन अतर्क्य वाटावे असेच होते. पुन्हा मोर्चा मोठ्या दादा लोकांकडे वळवला, पण त्यांनी पुन्हा हसून विषय टाळून नेला. शेवटी मीच वैतागून त्या मुलाला म्हणालो, "तुझाच जन्म झाला असेल तसा, आम्ही मात्र पोटातूनच आलो आहोत......."
एक, दोन, तीन, दे धबाक...............................
त्यानंतर त्याने मारलेला गुद्दा अन मी कळवळून धरलेले पोट माझ्या अजूनही लक्षात आहे.

पण दुसर्‍या दिवशी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फिरणारे ही आम्ही दोघेच होतो. कारण अजून आम्हाला बर्‍याच प्रश्नांची उकल एकत्र मिळूनच शोधायची होती. शिकायचे वय होते ते आणि जो लिंबू या शिक्षणात कच्चा राहायचा त्याची हेटाळणी काही "खास" शब्दात व्हायची. त्या वयातही, जेव्हा पुरुषार्थ म्हणजे नक्की काय हे उमजले नव्हते तेव्हा ही आपल्याला असे काही समजले जाणे आम्हाला पुरुषार्थाचा अपमान वाटायचा. स्वताला सिद्ध करण्यासाठीच म्हणून मग एखाद्या मोठ्याला पकडून ज्ञानकोषात भर टाकली जायची. यातूनच मग एके दिवशी मुलगा होण्यासाठी आवश्यक स्त्री-पुरुष संबंधाबद्दल समजले. त्या आधी कधी असा विचारही केला नव्हता. स्त्रीपुरुष लग्नानंतर केवळ सहवासात येणे पुरेसे असते याच समजावर जगत होतो. मात्र नवरा बायकोच का? इतर कोणी आले तर असे का घडत नाही या प्रश्नाला आम्ही पुन्हा निरुत्तर होत होतो. म्हणून यावेळी जे समजले ते पुन्हा कल्पनेपलीकडले वाटत असले तरी अविश्वास दाखवला नाही. पण जे काही ऐकले ते आपल्याला जमेल का याचे टेंशन मात्र आले होते.

दिस गेले, वर्षे सरली. एव्हाना आम्ही धुंद हैदोस सारखी पिवळी पुस्तके वाचायच्या वयात पोहोचलो होतो. ही पुस्तके घरी बाळगण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे शाळेतच एका जागी लपवली जायची आणि पिरीअड चालू असताना बाकांखालून वर्गभर पसरायची. इथून तिथून सारी कथानके एकाच शेवटाला जाणार हे माहीत असूनही प्रत्येक कथेत नावीन्य जाणवायचे आणि उत्सुकता निर्माण व्हायची. उत्सुकता चरणसीमेला पोहोचली असताना आपण वर्गात आहोत, समोर शिक्षक आहेत याचाही विसर पडायचा. याचा परीणाम शेवटी व्हायचा तोच झाला. एक जण पकडला गेला. मात्र पुस्तक बाईंच्या हातात लागू नये म्हणून त्याने पटकन भिरकावून दिले. ते झेलायला चार हात पुढे आले अन या हातातून त्या हातात पास होत हवेत विरल्यासारखे वर्गात कुठेतरी गायब झाले. बाईंना ते काय असावे याची कल्पना आली होती. शिक्षा सार्‍या वर्गाला झाली. तसेही काही सन्माननीय अपवाद वगळता सारेच कमीजास्त प्रमाणात यात सामील होते. यानंतर मात्र पुन्हा वर्गात ती पुस्तके आणली गेली नाहीत.

जे पुस्तकांत वाचले गेले होते ते आता आजूबाजुच्या जगात ही घडते का हे आता नजर शोधू लागली होती. एखाद्या नवदांपत्याकडे पाहिल्यावर आता हे दिवसरात्र असेच काही तरी करत असणार असे चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे. तेव्हा परीक्षेच्या काळात किंवा सुटीच्या दिवसांत रात्री अभ्यासासाठी म्हणून आम्ही चाळीतल्या कॉमन पॅसेजमध्ये जमायचो. पहाटेचे तीन-चार वाजेपर्यंत आमची ही स्टडी नाईट चालायची. सोबतीला गप्पांचे विषय त्या वयाला साजेशेच असायचे आणि आता यात आणखी एका विषयाची भर पडली होती. एखाद्या नवीनच लग्न झालेल्या जोडप्याच्या घरातला दिवा मावळला की आम्ही एकमेकांना इशार्‍याने खुणवायचो, नक्कीच आता यांचे सुरू झाले असणार. आमच्यातीलच एखादा मग धिटाई दाखवून त्या घराच्या दाराखिडकीपाशी रेंगाळून आतल्या आवाजांचा काही अंदाज येतो का या प्रयत्नात असायचा. माझी स्वताची कधी अशी हिंमत झाली नाही, पण कोणी येत तर नाही ना याकडे पाळत ठेवून, पहारेदाराची भुमिका निभावत मी देखील त्यांना सामील व्हायचो. आतमधून अपेक्षित आवाज ऐकू आले की आम्ही फार मोठे स्कॅंडल उघडकीला आणलेय किंवा एखाद्या भानगडीचाच पर्दाफाश केला आहे असा आनंद व्हायचा. दुसर्‍या दिवशी इतरांना आदल्या रात्रीचे धाडस स्वताच्या मनाची भर घालून, आंबटमसाला लाऊन सांगण्याची जी मजा होती त्याखातरच खरे तर हे सारे केले जायचे.

माझी दहावी झाली. मी कॉलेजात प्रवेश केला. पण अजून मी एकही निळी चित्रफीत पाहिली नव्हती. माझ्या वयाची आजूबाजुची मुले पाहता आणि माझ्या आजवरच्या इमेजनुसार खरे तर ही एक शरमेची गोष्ट होती, जी मी लपवत होतो. कधी विषय निघालाच तर सरळ ‘हो कित्येक पाहिलेत’ असे खोटे बोलून मोकळा व्हायचो आणि त्यात नेमके काय असते हे कोणी विचारलेच तर हसून टाळून न्यायचो. चाळीतल्या जवळपास सार्‍याच मुलांचे हे एकदा तरी बघून झाले होते. ज्या मुलाच्या घरात वी.सी.आर. आणून हे विडिओ बघितले जायचे ते माझ्या घराच्या अगदी जवळच असल्याने मला तिथे जायला भिती वाटायची. कारण चाळीत कोणतीही गोष्ट लपून राहायची नाही. सुटीच्या दिवसांत दुपारच्या वेळेला मुले क्रिकेट खेळायचे सोडून तिथे काय करतात हे चाळीतील शहाण्या आणि अनुभवी मंडळींनी केव्हाच ओळखले होते. फरक इतकाच की आजवर कोणी रंगे हाथ पकडले गेले नव्हते. कारण सोबतीला कॉलेजला जाणारी मोठी मुलेही सामील असायची. कॅसेट आणायची कामे तेच करायचे. एक दोन हिंदी-ईंग्लिश सिनेमांच्या कॅसेटही आणल्या जायच्या जेणेकरून कोणी दरवाजा खटखटवलाच तर ती कॅसेट काढून हि कॅसेट लावणे एका मिनिटाचे काम. थोडक्यात पकडले जाण्याचे चान्सेस कमीच होते.

अश्यातच एके दिवशी माझ्या घरचे गावी जाणार होते. मी बारावीचे निमित्त करून टाळले. चाळीच्या ठिकाणी अश्या खाली घरांचा लगेच अड्डा बनतो. मग या अश्या अड्ड्यांवर जुगार, सिगारेट, दारू अशी सारी व्यसने चालतात. मला मात्र यापैकी कशातही रस नसल्याने आणि आमचे शेजारी सतर्क असल्याने तसे काही मी घडू दिले नाही. मात्र रातच्याला एखादी ब्ल्यू फिल्म आणायची का अशी विचारणा झाली तेव्हा नकार देऊ शकलो नाही. दुसरीकडे कुठे बघण्यापेक्षा स्वताच्या घरातच बघणे सोयीस्कर वाटले वा बघण्याची उत्सुकता इतकी होती की पकडले गेलो तर सर्वात पहिला मी मरणार याची भिती देखील झटकून टाकली. काहीही म्हणा, लगेच तयार झालो एवढे मात्र खरे.

त्या दिवसानंतर पुढच्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत किती वेळा हे पाहिले असावे याची गिणती नाही मात्र ती पहिली वेळ आणि तो पहिला सिनेमा कधीही विसरू शकणार नाही. माझ्यासारखे अजून एक दोन नग होते जे असला सिनेमा पहिल्यांदाच बघत होते. त्यानंतर आमच्यात त्या सिनेमाशी संबंधित असलेला ‘टारझन’ हा शब्द असल्या सिनेमांसाठी वापरायचा एक कोडवर्ड झाला होता.

रात्री बाराला हिंदी सिनेमा संपल्यावर तो लावला होता. दिड-दोन तासांत आटपला आणि मी समाधानाने झोपलो. काही जण मात्र त्यानंतर अजून एक सिनेमा लाऊन पहाटेपर्यंत जागे होते. काही जणांना काय एवढी मजा येते तेच तेच बघण्यात असा विचार मी नेहमी करायचो. मात्र संधी मिळताच स्वत:देखील कधी नकार द्यायचो नाही.

माझे नशीब चांगले की कधी हे सारे करताना मी पकडलो गेलो नाही. कदाचित माझ्या वडीलांच्या कानावरही असावे की चाळीतील मुले जमून असले उद्योग करतात आणि त्यात तुमचा ही एक असतो. पण माझ्याकडे हा विषय त्यांनी मुद्दामूनच काढला नसावा, ते कदाचित आईच्या कानावर यातले काही जाऊ नये या हेतूनेच. खरेच, तेव्हा पकडले गेलो असतो आणि आईला हे सारे समजले असते तर.........

अगदी आजही हे आईला कळले तर त्याला सामोरे जायची माझी हिंमत नाही.

जे झाले ते झाले. वयाच्या त्या टप्प्यातून देखील बाहेर पडलो. उत्सुकता संपली, नावीन्य गेले, आवड कमी झाली. प्रगल्भता आली, आयुष्यात इतरही नवीन गोष्टी आल्या. कित्येक महिने कित्येक वर्षे यातले काही पाहिले नाही. आज मोबाईल ईंटरनेटच्या जमान्यात जिथे पेनड्राईव्ह, ब्ल्यूटूथने झटपट देवाणघेवाण होते, एखादी छोटीशी क्लिप बसल्याबसल्या मोबाईलमध्ये बघता येते तिथे एखाद्या किशोरवयीन मुलाच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता फारशी टांगणीला नक्कीच लागत नसावी. स्वताचे म्हणाल तर आज कितीही फावला वेळ असला तरी किंवा कितीही सहजगत्या हे सारे उपलब्ध झाले तरी बघायची, काय म्हणतात ती क्रेझ तितकीशी उरली नाहीये.

तरीही मागे एकदा एका मित्राने आमंत्रण दिले होते ज्याला परत एकदा नकार देता आला नव्हता. कारण यावेळी ते आमंत्रण खासच होते. मोठ्या पडद्यावर बघायचे.

कॉलजच्या दिवसांत हॉस्टेलला राहत असतानाची ही गोष्ट. एका मित्राने कुठलेसे थिएटर हुडकून काढले होते जिथे असले सिनेमे दाखवले जातात. घरात टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघणे वेगळे पण स्टेडीयममध्ये जाऊन बघण्यात एक वेगळीच मजा. हे देखील अगदी तसेच वाटून लगेचच कार्यक्रम सर्वानुमते फायनल झाला. चौघे जण होतो आम्ही. तिकिटही बर्‍यापैकी स्वस्त. सिनेमागृह देखील त्याच योग्यतेचे होते म्हणा. ईंग्लिश भाषेतला सिनेमा होता. भाषेशी आमचे देणेघेणे नव्हतेच. उलट ईंग्लिश सिनेमा असणे ही जमेचीच बाजू होती. थिएटरच्या बाहेर लावलेला सिनेमाचा छोटासा पोस्टर पाहून फारशी उत्सुकता वाटली नाही. मात्र पोस्टर असेच साफसुधरे लावले जातात इति आमच्यातीलच एक मित्र. त्याच्यावर विश्वास ठेऊन आत गेलो, तर आतले प्रेक्षक पाहून कुठे येऊन फसलो असे वाटायला लागले. ईंग्लिश समजणे दूरची गोष्ट, कधी शाळेचे तोंड तरी पाहिले असावे की नाही असा प्रेक्षकवर्ग आणि त्यात आम्ही चार इंजिनीअर. सिनेमाच्या सुरुवातीलाच दोन गोर्‍या हिरोईनी पडद्यावर अवतरल्या ज्यांच्यासमोर हिंदी सिनेमांतील सार्‍या नट्या झक मारतील. (हे बाकी प्रत्येक सिनेमा बघताना असेच वाटायचे आम्हाला.) पण मध्यंतरापर्यंत सिनेमाची ना स्टोरी समजत होती, ना जे बघण्यास आलो होतो त्यातील काही घडत होते. सिनेमात रात्र झाली की वाटायचे आता काही तरी बघणेबल येईल. पडद्यावरील पात्रांचा त्या दिशेने प्रवास व्हायचा खरा, मात्र जेव्हा ‘आता तर नक्कीच’ असे वाटायचे तेव्हा दिवा मावळला जायचा आणि थेट सुर्योदय. मग पुन्हा रात्र कधी होते याची वाट बघा. बरे संवाद काही समजत नव्हते. त्यामुळे त्या हिरो-हिरोईनींच्या मनात काय चालू आहे ते त्यांच्या चेहर्‍यावरील माशीही न हालणार्‍या बथ्थड मुद्राभिनयावरून अंदाजायाची कसरत करावी लागत होती. इतर वेळी मध्यंतराला उठून गेलो असतो पण जे बघायला आलो आहोत नेमके तेच मध्यंतरानंतर राखून ठेवले असेल तर असा विचार करून उठवतही नव्हते. पण तसे काही नशीबी नव्हते. जे एवढ्या रात्रीत झाले नव्हते ते आणखी चार रात्रींमध्ये काय घडणार होते. मध्यंतरानंतर ही पुन्हा तेच चक्र सुरू राहिले. अन याच दिवसरात्रीच्या खेळात "दि एण्ड" ची पाटी देखील लागली. बाहेर पडताना फजिती झाल्यासारखे चेहरे होते आम्हा सार्‍यांचे. मात्र आजूबाजूची सारी पब्लिक तृप्त होऊन बाहेर पडताना दिसत होती. कदाचित त्यांच्या अपेक्षाच त्यापलीकडल्या नसाव्यात. काही का असेना, तो देखील एक आठवणीत राहावा असाच अनुभव होता.

एक तो दिवस आणि एक आजचा दिवस, जेव्हा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बीपी उर्फ बालक-पालक बघून घरी परतत होतो. माझे किस्से आणि आठवणी मी बायकोला मोडके तोडके जमेल तसे सांगितले आणि तदनंतर आम्ही चित्रपटावर चर्चा करायला लागलो. माझ्याशी तो सिनेमा बर्‍यापैकी रीलेट झाल्याने मला फार आवडला होता पण तिच्या चेहर्‍यावर मात्र तसे काही जाणवत नव्हते. विचारले असता म्हणाली की सिनेमा अपुरा वाटला. शेवट अधुरा वाटला. प्रश्नाची योग्य उकल दाखवली नाही. जी दाखवली ती पटली नाही. पण मी मात्र तिच्या या मताशी किंचित असहमती दर्शवली. खरा प्रश्न हा आहे की मुळात हि एक समस्या आहे हेच कोणी कबूल करत नाही. काही लोकांच्या हे गावीही नसते तर काही कळूनही न कळल्यासारखे करतात किंवा सोयीने दुर्लक्ष करतात. अश्यांना निदान आरसा दाखवायचे काम तरी या चित्रपटाने केले. यापुढे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण याचे सर्वसाधारण उत्तर काढणे शक्य नाही. परिस्थितीनुसार ते बदलत जाणार.....

"तू कसा पालक बनशील रे?", बायकोने मध्येच माझी गाडी अडवली. ज्या प्रश्नाला टाळत होतो नेमका तोच विचारला.

"ह्म्म, बघू... आपला नारळ किती पाणीवाला निघतोय, त्यानुसार ठरवू." नेमके उत्तर द्यायचे मी देखील हसूनच टाळले... खरे होते तिचे... हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच होता..!

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला प्रामाणिकपणा लिखाणातला. Happy
ते इंग्रजीसिनेमाबद्दल अगदी अगदी. गोर्‍या हिरविणी आणि चेहर्‍यावरचे रद्दड भाव आणि त्या वयातली आमची समज याची सांगड आमच्याबाबतीतही सेम. Lol

सुरेख ... एकदम पटेश.....

माझ्या बाबतीत म्हणजे.... साधारण ११ व्या वर्षी मोठ्या डॉक्टर चुलत बहिणीने " वयात येताना " हातात ठेवले... ते वाचे पर्यंत असे काही असते तेच माहित नव्हते.... खुप दिवस त्याच धुंदीत काही काही विचार करत फिरत होते.... मग अनेक नजरांचे अर्थ कळायला लागले... एकदम मोठीच झाले.... बिल्डिंग मधल्या मुलांच्या पाठीवर हात मारताना आता वेगळेच वाटायला लागले किंवा त्यांनी मारले तर अंग चोरुन पळणे...... जग बदललं... पण एक मात्र झालं... जे काही ज्ञान मिळालं ते शास्त्र शुद्ध मिळालं.... आर्थात सगळेच अर्थ कळले नव्हते... दादा कोंडकेच्या सिनेमातले जोक ऐकुन बाबा का हसतात? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाल....

बाकी बी.पी. वगैरे काही प्रकार असतो हे माहित नव्हते... सगळ्या मैत्रिणीं मधे मीच काय ती वासरात लंगडी.... मित्रांशी ह्या विषयावर बोलण्या इतकी जवळीक नव्हतीच.... एकदा आम्ही मैत्रिणींनी हिय्या करुन माझ्या घरी आई वडिल नसताना त्या वेळी शेरॉन स्टोन च्या उत्तान दॄष्याने गाजलेला " बेसिक इन्स्टींग्ट' ( लिहिताना गंडलय)...बघायचा ठरवला... खुप प्लॅन करुन परत परत रीवाइंड करुन तो सिनेमा पाहिला.... खुप काही तरी घाण पाहिल्याची भावना झाली...

मग तीही फेज गेली. अजुनही बी.पी. पाहिली नव्हतीच.....मग रीतसर प्रेम-लग्न--- हे टप्पे पार पडले... सहज फिरायला म्हणुन थायलंडला गेलो होतो १९९९ ला. तेंव्हा ट्रिप मधल्या सगळ्यांनी आग्रह केला म्हणुन "अ‍ॅडल्ट शो" बघायला गेलो पट्टायाला.... आणि हादरलेच.... बापरे आर्धा वेळ तर हात डोळ्यावर होता.... बापरे ... माझं भाव जीवन एकदम ढवळुनच निघालं... काही अमेरेकन आणि जर्मन बायका पहिल्या रांगेत बसुन मस्त एंजॉय करत होत्या.... त्या प्रसंगा नंतर मात्र बी.पी. बघायची हौस ही राहीली नाही... आणि उत्सुकता संपली... खुप गळगळीत वाटायला लागले....

जी मुलं/ मुली ह्या बिबत्स प्रकाराने ह्या शिक्षणाची सुरुवात करतात, त्यांना पहिले पहिले काय वाटत असेल... ते समजले... ( बालक पालक मधल्या "चीउ" शी पटकन रीलेट झाले)

आता बालक पालक बद्दल...

परवा माझ्या १२ वर्षाच्या मुली बरोबर मुद्दाम जाउन पाहिला.... तिला खुप प्रश्न विचारले... तुला कळला का? समजला का?.... उत्तरं खुपच मॅचुअर आली... शाळेत सुरु केलेल्या लैंगिक शिक्षणाचा परिणाम असावा का?

धन्स अभिषेक... ह्या विषयाला माबो वर आणलस ते.... आत्म परिक्षण....

माझ्या बाबतीत, त्याकाळी प्रसिद्ध होत असलेल्या The Daily या वर्तमानपत्रातली लेखमालिका उपयुक्त ठरली.
अगदी योग्य शब्दात लिहिलेली ती लेखमालिका, पुस्तकरुपाने प्रसिद्ध व्हायला हवी होती. पुढे अभ्यासात अति गुंतल्याने वेळ नव्हताच.

नंतर आफ्रिकेतील एम नेट्वर जे चित्रपट बघितले, त्यानंतर खास वेगळे काही बघायची गरज वाटली नाही.
मग थेट मेडिकल ( गायनिक ) पुस्तकेच वाचून काढली !

सुंदर लिहलंय..! विचारही आवडला.

मंगला गोडबोलेंचं "कळी उमलताना" (असेच काहीतरी) पुस्तक छान आहे मात्र कुमारांसाठीच असलेले असे पुस्तक वाचनात नाही.

शाम...

मंगला गोडबोलेंचं पूस्तक मी वर लिहिलय ते " वयात येताना" . आता मला वाटतं इंग्लीश ट्रान्स्लेशन पण झालय त्याचं... हे पूस्तक मंगल गोडबोले आणि डॉ. वैजयंती खानवलकर ह्यांनी लिहिलेलं आहे....

http://www.bookganga.com/eBooks/Book/5076967515087264064.htm

वयात येताना" वरून आठवले.

आमच्या वर्गात फक्त मूली होत्या. बाईंनी त्या पुस्तकाचे सामूदाईक वाचन करायचे ठरवले. वर्गातल्याच एखाद्या मूलीने ते मोठ्यांदा वाचायचे. सातवी-आठवीच्या वयात सहाजीकच वाचायला कोणीच तयार झाले नाही.

बाईंचा हेतू चांगला होता. पुस्तकही चांगले होते. पण मुलींनी मोठ्यांदा वाचायचे त्यामुळे उपक्रम flop झाला.

अभिषेक __/\__ ...
ज्या विषयावर बोलणं सहजासहजी लोकं टाळतात त्या विषयावर इतकं प्रामाणिक, सुंदर , सहज रीतीने लिहिलंयस ना अगदी... खूप आवडला लेख!!!
सचमुच अब तुम बड़े हो गये हो... Happy
मोकिमी ची पोस्ट पण फार आवडली...

अगदी अगदी माझ्या मनातले लिहीले आहेस रे...
मला वाटतं आपण सगळेच या फेजमधून गेलो आहोत...
असेच इकडून तिकडून मिळवलेले ज्ञान, मोठ्या वयाच्या मुलांनी पुरवलेली चमत्कारीक माहीती, बीपी पाहून लैंगिक क्रियेबद्दलच्या अवास्तव कल्पना आणि सगळेच....
नंतर लग्नापूर्वी होऊ घातलेल्या बायकोला घेऊनच शशांक सामंत यांचे एक लेक्चर ऐकले आणि एकदंरीच आपण या सगळ्या विषयात किती ढढ्ढोबा आहोत याची जाणीव झाली...
आणि आता इतक्या वर्षांनंतर आता पोरगा जसा जसा मोठा होऊ लागलाय तशी मनात धास्ती बसू लागलीये...आपण ज्या फेजमधून गेलो त्याच फेजमधून तो जाणार या कल्पनेनी...

आणि आता इतक्या वर्षांनंतर आता पोरगा जसा जसा मोठा होऊ लागलाय तशी मनात धास्ती बसू लागलीये...आपण ज्या फेजमधून गेलो त्याच फेजमधून तो जाणार या कल्पनेनी...
>>
आशू, मला हे वाक्य फार आवडलं Happy
मला नेहमी हा प्रश्न पडतो, ज्यांचे आई वडील मुलांशी कुठल्याही विषयावर मोकळेपणाने बोलत नसतील, ती मुलं कुठल्याही नव्या प्रश्नांशी कशी डिल करत असतील? Uhoh
मागच्या पिढीचं जाऊ द्या, आताच्या पिढीने हा ट्रेण्ड बदलण्याचं मनावर घ्या Happy

अभिषेक,

उत्तम लेख! मला वाटतं की मुलींना हे प्रश्न अधिक सतावतात. मुलग्यांना कुठून तरी माहिती कळतेच. मला दहाव्या वर्षी एका बारावर्षीय मित्राने गर्भधारणेची सगळी प्रक्रिया २ वाक्यांत सांगितली. मात्र बालकाचा प्रत्यक्ष जन्म कुठून होतो ते नंतर तेराचौदाव्या वर्षी (शाळेत असतांनाच) कळले.

त्याच वेळेस शाळेतील अनेक मुलगे 'वयात' येत होते. त्यांना ज्ञानवितरणाचा कार्यक्रम होत असे. नीलफीत मात्र कॉलेजात (अकरावीला) असतांना बघितली. जे माहीत असायला हवे ते अगोदरच माहीत असल्याने फार काही वेगळं वाटलं नाही. बारावीपर्यंत चारेक नीलफिती बघून झाल्या होत्या. पुढे पदवीसाठी वसतिगृहात होतो. तिकडे नीलफिती सर्रास दाखवीत. पण तोवर रस संपला होता.

आ.न.,
-गा.पै.

खूप छान, मनापासून लिहिलंय .... बहुतेकांच्या या विषयातल्या प्रवासाला अतिशय सुरेख शब्दबद्ध केलंय.

अभिषेक मस्त आणि अगदी मनातलं लिहिलयसं.
अश्यातच एके दिवशी माझ्या घरचे गावी जाणार होते. मी बारावीचे निमित्त करून टाळले. >>> 'त्या 'पुस्तकांत एक तरी अशी ओळ सापडेलचं Lol

हे असे वैयक्तिक अनुभव ओपन फोरमवर शेअर करणे योग्य की अयोग्य हा खरेतर प्रश्नच आहे,

असो, एक प्रश्न असा पडला आहे की अनेक लोकांना या असल्या निलचित्रफिती पहाण्याच्या चैनी मिळू शकत नाहीत, किंवा अगदी पुस्तके देखील मिळू शकत नाहीत त्यांचे काय होत असेल ? खरेतर टी.व्ही. सारखे माध्यम येण्याच्या आधी पर्यंतच्या पिढ्यांनी काय केले असेल ?

Pages