वालाच्या डाळिंब्या.

Submitted by सुलेखा on 28 January, 2013 - 03:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

dalimbee usal.JPG
वालाच्या तयार डाळींब्या.
[वाल भिजवुन्,मोड आणुन्,गरम पाण्यात ठेवुन सोललेल्या वालाच्या डाळींब्या.]
सुका मसाला--
किसलेले सुके खोबरे,धणे-जिरे-मिरे-दालचिनी चा तुकडा-थोडीशी जायपत्री,लाल सुक्या मिरच्या हे सर्व भाजुन त्याची पुड करुन घ्यावी.
ओला मसाला:--
खवलेले ओले खोबरे,आले,लसुण पाकळ्या ,१ लहान कांदा चिरलेला,चवीला हिरवी मिरची,कढीपत्त्याची पाने.कोथिंबीर हे सर्व थोडे पाणी घालुन मिक्सरमधे बारीक वाटुन घ्यावे.
फोडणीसाठी तेल्,मोहोरी,जिरे ,हिंग. व हळद
१ लहान कांदा बारीक चिरलेला,
तिखट,मीठ.
गरम मसाला .
आवश्यकतेनुसार पाणी.
आंबटपणासाठी कोकम आगळ किंवा लिंबु.
वरुन घालायला कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

एका जाड बुडाच्या पॅन मधे फोडणी साठी तेल तापवुन त्यात मोहोरी-जिरे व हिंग घालावा.त्यात बारीक चिरलेला कांदा पारदर्शी होईपर्यंत परतावा.त्यात वालाच्या डाळिंब्या घालुन छान परतुन घ्याव्या.
त्यावर वाटलेला ओला मसाला व सुका कोरडा मसाला घालुन परता.त्यावर चवीप्रमाणे तिखट ,मीठ,हळद,गरम मसाला पसरवुन पातळ ग्रेव्ही होईल इतके पाणी घाला..वर झाकण ठेवुन अगदी मंद आचेवर डाळिंब्या शिजु द्या.अधेमधे चमच्याने छान ढवळा.डाळिंब्या शिजल्यावर गॅस बंद करा.डाळींबी थोडी रसदार असली पाहिजे. चवीप्रमाणे कोकम आगळ मिसळुन वर कोथिंबीर पेरा.
या डाळींब्यां बरोबर गरम भात किंवा पोळी,तांदुळाची मऊसुत भाकरी काहीही चालेल.

अधिक टिपा: 

डाळींब्याच्या प्रमाणानुसार ओला,सुका मसाला व इतर साहित्य घ्यावयाचे आहे.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव तोंडाला पाणी.....आजच भिजत टाकलेत वाल...आम्हि याला वालाचे बिर्डे म्हणतो...कधि कधि नुस्त कांदा टोमॅटो वर पण करुन पहा छान होते.... तेल, कांदा, वाल, मसाला, गरम मसाला, टोमॅटो, खोबरं, मीठ , थोडी साखर/ गुळ , कोथिंबीर .....कधी कधी वाटण घाटण करायला वेळ नसतो पण हे खायची इच्छा होते तेव्हा हे पटकन होते...

जगातला सर्वात आवडता पदार्थ!
मस्त फोटो. मला डाळिंब्या काहीही वाटण घाटण न करता फक्त फोडणी, तिखट, मीठ, ओलं खोबरं आणि गुळ घालून पण तितक्याच आवडतात.
कडवे वाल घरात नाहीत याचं फार दु:ख होतय.

अहा! फोटो तोंपासु आहे.

देशातून कडवे वाल आणलेत हे विसरूनच गेले होते. आता भिजत घालायलाच हवेत.

मस्त. मी नारळाचं (रेडिमेड) दूध आणि थोडसं आल्यालसणाचं वाटण घालून, हिरव्या मिरच्या (मिर्ची पावडर ऐवजी), कांदा, कढिपत्ता, कोथिंबीर इ घालून करते.

डाळींब्या,बिरडं,डाळींबी उसळ हे सगळं एकच आहे..वाल जास्त प्रमाणात घेतले तर ,सुरवातीला तर काही प्रॉब्लेम येत नाही पण काही महिन्यानंतर हे च वाल भिजवुन ,कपड्यात बांधुन ठेवले तरी त्याना छान मोड येत नाही ,साले सुटत नाहीत किंवा बरेच गणंग निघतात.जीव हळहळतो .त्यामुळे जास्त प्रमाणात घेवु नये.[महाराष्ट्राबाहेर राहिल्याने वालाची महती जास्तच कळली.]त्यापेक्षा वालाची डाळ-ज्यावर साले नसतात-वर्षभर टिकते.लौकर -अर्ध्या तासात गरम पाण्यात भिजते.सुके खोबरे वापरुन लगेच चवदार कालवण करता येते."त्या" वालाच्या जवळपास ची चव येते

मस्त. आमच्याकडे शिजतानाच यात वेलची पावडर टाकतात. खास करुन हिरव्या वाटणाची केली तर. उग्र वासही जातो आणि पोटासाठी पण चांगले.

सिंडे, वाटण लावून करतात ते बिरडे आणि मोड आलेले वाल फोडणीला टाकून करतात ती डाळींब्यांची उसळ असे मी समजत आलेय.

शूम्पी, सेम पिंच! Wink
सायोने लिहिलिय तशीच डाळींब्यांची उसळ मला आवडते, ब्राह्मणी पद्धतीची.

माझी अतिशय आवडती भाजी.. जराशी शिळी झालेली तांदूळाची भाकरी किंवा चपाती आणि सोबत वालाची भाजी जरा जास्तच प्रिय आहे..

- पिंगू