तुझी स्पंदने आज लपवू नको...

Submitted by अ. अ. जोशी on 27 January, 2013 - 02:26

मुखी ओढणी फार ओढू नको
तुझी स्पंदने आज लपवू नको

तुझी स्वप्न पडतात जागेपणी
मला एवढे वेड लावू नको

मनाशी तुझ्या खेळलो फार मी
अता तू पुन्हा तेच खेळू नको

तुला सांगण्याचे किती ठरविले
तरी प्रश्न, सांगू कि सांगू नको ?

तुला वाटते काय माझ्याविना ?
मनातील सोडून ऐकू नको

जगाशी तुझे काय नाते असे...
असू दे, मला फार पटवू नको

किती चांगले चालते आपले..
जुने पान मध्येच चाळू नको

शिकविण्या धडा वासनेला 'बले'
कुणाचीच तू वाट पाहू नको

असे ठाण मांडून हृदयात तो
मनी मान ईश्वर कि मानू नको

सवय लागते खूष करण्या कुणा...
'अजय' फार टोळीत राहू नको..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली...

.. स्पंदनांचा चेहर्‍याशी संबध जुळ्वता आला नाही मात्र स्पंदनांचा ओढणीशी असणारा संबंध ध्यानी घेता मतला मस्तच.

असे ठाण मांडून हृदयात तो
मनी मान ईश्वर कि मानू नको....इथे मना .. असे आणि

किती चांगले चालते आपले.... इथेही चालले.. असायला हवे होते का असे वाटले. गै.स. नसावा..

नको आणि नकोस बद्दल काय सांगाल?

.......................................शाम

शाम,
स्पंदनांचा चेहर्‍यावर होणारा परिणाम- असा अर्थ घ्यावा. म्हणून ती स्पंदने चेहर्‍यावरही उमटत आहेत असा अर्थ घेतला आहे.

मनी मान ईश्वर कि मानू नको.... --- यात समोरच्याला/स्वतःला उद्देशून आहे. म्हणजे, तुझ्या/माझ्या मनी (मनी=मनात)

>> किती चांगले चालते आपले.... इथेही चालले.. असायला हवे होते का असे वाटले. << याने अर्थात फरक होईल असे वाटत नाही. (प्रथम चालले असेच होते. ते मी बदलले.)

धन्यवाद..!

मनी मान ईश्वर कि मानू नको.... --- यात समोरच्याला/स्वतःला उद्देशून आहे. >>> नक्कीच
म्ह्णूनच इथे नकोस असे आले असते तर अधिक स्पष्टता आली असती .. हो ना..

...सकारात्मकते बद्दल खूप धन्यवाद !

तुला सांगण्याचे किती ठरविले
तरी प्रश्न, सांगू कि सांगू नको ?<<< शेर आवडला.

गझलही छानच!

तुझी स्वप्न पडतात जागेपणी<<< यात स्वप्न हा शब्द अनेकवचनी घेतलेला आहे कारण स्वप्ने असे वृत्तात बसणार नाही. मागे कोणाच्यातरी गझलेवर या शब्दाच्या अश्या वापरावर झालेली चर्चा आठवली.

धन्यवाद

तुझी स्वप्न पडतात जागेपणी
मला एवढे वेड लावू नको.....वा ......!!!!

तुला सांगण्याचे किती ठरविले
तरी प्रश्न, सांगू कि सांगू नको ?.......क्या बात!

जगाशी तुझे काय नाते असे...
असू दे, मला फार पटवू नको.......अरे वा !

मस्त शेर.

गझल आवडली

शामजींचे अनेक मुद्दे पट्ण्यासारखे आहेत

मी स्वप्न बद्दलच सांगायल आलो होतो .....मी ती ओळ अशी वाचली .....

<<<तुझे स्वप्न पडतेय (/बघतोय)जगेपणी>>>

'बले' चा वपर आवड्ला ..........'अबले' च्या विरुद्ध ना ?

तुला सांगण्याचे किती ठरविले
तरी प्रश्न, सांगू कि सांगू नको ?

किती चांगले चालते आपले..
जुने पान मध्येच चाळू नको

व्वा.
शेर आवडले.

बेफिकीर, सुप्रिया, वैभव, समीर धन्यवाद..!

वैभव,
>>> 'बले' चा वापर आवड्ला ..........'अबले' च्या विरुद्ध ना ? <<<
येस. अगदी बरोबर.

अ.अ.जोशी,
मतला असा केला तर?

ढळो ओढणी आज अडवू नको!
तुझी स्पंदने आज लपवू नको!!

गझल आवडली ..:)
पण,
>>>>> 'बले' चा वापर आवड्ला ..........'अबले' च्या विरुद्ध ना ? <<<
>>येस. अगदी बरोबर.
अबलेच्या विरुद्ध सबले होईल..
बलारहित ती 'अबला'
बलासहित ती 'सबला'

सतीशजी,

>>> मतला असा केला तर? <<<

पण, का करावा...?

तुम्ही सुचवलेला मतला जरी ठीक असला तरी ...
>>>
ढळो ओढणी आज अडवू नको!
तुझी स्पंदने आज लपवू नको!!
<<<
यात "अवू" अशाप्रकारचा काफिया येत आहे. माझ्या गझलेत "ऊ" हा स्वरकाफिया आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तसा मतला घेता येणार नाही. क्षमस्व..!

देवा,
>>>
अबलेच्या विरुद्ध सबले होईल..
बलारहित ती 'अबला'
बलासहित ती 'सबला'
<<<

मुळात "अबला" आणि "सबला" हा मूळ शब्द नाही. "बल" हा मूळ शब्द आहे. त्यामुळे "बले" हा शब्दप्रयोग योग्यच आहे. "अबला" हा शब्द आल्यामुळे "सबला" चा वापर योग्य वाटू शकतो. पण, मुळात "अबला" हा शब्दच मानायचे नाही, असे ठरविले तर "सबला" हा शब्द अर्थहीनच होईल. स्त्रीला "अबले" म्हणणार्‍यांना "सबले" हा शब्द बरोबर वाटेल. मला "बले" हाच शब्द योग्य वाटतो.

तरी आपले मत प्रदर्शित केल्याबद्दल धन्यवाद..!

पण का करावा<<<<< Rofl

बले अबले सबले चर्चा छान झाली आहे
मी बला चा हिंदी अर्थ लावला त्यामुळे शेरास जो मजेशीर अर्थ आला तोही आवडला Happy