जाने क्यां तुने कही..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

साहिर.. म्हणजे जादू.

सात आठ वर्षांपूर्वी पंचप्रयागच्या ट्रेकवर असताना साहिर दोन वेळा अचानक भेटला. आधीही भेटला होता पण आता भेटला तेव्हां .. जो खत्म हो किसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं हे जाणवून गेलं.

रुद्रप्रयागपासून ट्रेक सुरु झाला होता. बर्फ़ाळ पहाटे चंद्राची फ़िक्कट कोर आणि भोवती धूसर ढग.
"तो वर चपटा गोलाकार खडक दिसतोय ना अधांतरी वाटणारा?" आमच्या कॅम्पलिडरने काठावरच्या जंगलाच्या दिशेने हात दाखवत सांगितले.
"त्यावर नेम धरुन कॉर्बेट रात्रभर बसून राहीला होता. अशीच पहाट झाली आणि त्याने त्या नरभक्षक वाघाचा बळी घेतला",
" तेव्हा अमावस्येचा मिट्ट काळोख होता."

आम्ही होतो तिथून फ़क्त दहा पावलांवर. थरथरायला झालं भितीने उगीचच. नशीब आत्ता वर आकाशात फ़िकट का होईना चंद्र होता. आम्ही कॉर्बेटच्या वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टी सांगत तिथल्या चहाच्या छोट्या टपरीबाहेरच्या बाकड्यावर टेकलो. पहाटेच्या सन्नाटा आता खूपच गडद वाटत होता. ढगाळ वातावरण. उजाडायलाही वेळ होता. दवाने ओलसर झालेली जमीन. काठावरचं जंगल ज्यांत आता आम्हाला शिरायचं होतं. जिम कॉर्बेटच्या नावाचा फ़लक असलेला तो दगड, पर्वतांच्या उंच कड्यांवरुन खाली झेपावत येणारे ते जंगल. खोल दरीतून फ़ुसांडत आवाज करत वहाणारी बियास. सगळे आपोआप शांत बसून होते. अपरिचीत पहाट. वरचा चंद्र पण त्या जंगलातलाच वाटत असल्यासारखा. अनोळखी. टपरीवाला चहाचे ग्लास कधी हातात आणून देतो ह्याची वाट पहात गारठलेली बोटे एकमेकांत गुंतवून सगळेच चुपचाप.
अचानक टपरीवाल्याच्या मागच्या खोपटातून रेडिओवरचं कानावर पडलेलं ते गाणं

रात भी है कुछ भिगी भिगी
चांद भी है कुछ मध्धम मध्धम...

कॉर्बेटच्या गोष्टींमधली अंगावर काटा उमटवणारी भिती कुठच्या कुठे गेली. कातडीवर नवे रोमांच उठले. दवभरल्या पहाटेच्या धूसर अंधाराचा, आकाशातल्या चंद्रकोरीचा आणि त्या शिरशिरीचा संबंध थेट साहिरच्या शब्दांशी जाऊन भिडत होता. वरच्या आकाशातला चंद्राचा तुकडा आता फ़िकट झाला पण भोवतीच्या चांदण्यांचा सडा नजर मोहवून टाकायला लागला.

सब के दिल पर युं गिरती है
तेरी नजर से प्यार की शबनम

जलते हुए जंगल पर जैसे
बरखा बरसे रुक रुक थम थम..

जयदेव ने त्या शब्दांत घुंगरांची आणि तबल्याच्या ठेक्यांची जान ओतली होती.

होश में थोडी बेहोशी हैं
बेहोशी मे होश है कम कम
तुझको पाने की कोशीश में
दोनों जहां से खोये गये हम

रात भी कुछ भिगी भिगी
चांद भी है कुछ मध्धम मध्धम
तुम आओ तो आंखे खोले
सोयी हुई पायल की छम छम..

अहा... रुद्रप्रयागच्या त्या जंगलात रात्र्-दिवसाच्या धूसर सीमेवर फ़िक्या चंद्राला तळहातावर घेऊन भेटलेला साहिर. क्षणापूर्वी भीषण वाटणार्‍या जंगलातल्या पहाटेला आणि अनोळखी चंद्राला आपल्या शब्दांच्या जादूने भुलवत आमच्या अगदी जवळ आणून पोचवणारा साहिर मग ट्रेक संपताना पुन्हा भेटला.

शेवटच्या रात्री पूर्ण चंद्र आकाशात होता. बियासचा काठ, समोरच्या टेकडीवरच बर्फ़ाळ धुक्याने वेढलेलं चांदण्यांच्या प्रकाशात जास्तंच एकाकी वाटणार एक कोणतंतरी छोटं देऊळ. आणि बियासच्या दुसर्‍या काठावर ट्रेकची शेवटची कॅम्पफ़ायर साजरी करताना नेहमीच साकळून येणारी उदासी मनात वागवत कॅम्पलिडरने हातात दिलेला बोर्नविटा घातलेला दुधाचा कप हातातं पकडून तो पिवळसर चंद्र पहात शेकोटीभोवती गोल करुन बसलेले आम्ही. केदार गाणी म्हणत होता. हे म्हण, ते म्हण असं काहीही आम्ही सुचवत नव्हतो. समोरचा चंद्र पाहून सुचतील, आठवतील ती गाणी तो म्हणत होता. आम्ही ऐकत होतो..

कोने कोने मस्ती फ़ैल रही है
बाहे बनकर हस्ती फ़ैल रही है
तुझ बीन डुबे दिल को कौन उभारे...

चूप है धरती चूप है चांद सितारे...

आकाशातला चंद्र आता अगदी माथ्यावर आला. साहिरच्या श्ब्दांमधलं ते डुबतं दिल. बियासच्या समोरच्या काठावरची पांढरी शुभ्र बारीक वाळू आणि दगड बर्फ़ाच्या चुर्‍याप्रमाणे चमकू लागले... तरुण चंद्र आपल्या उभार सौंदर्याची जादू आसपास पसरवीत होता..

निखरा निखरा सा है चांद का जोबन
बिखरा बिखरा सा है नूर का दामन.. चूप है धरती.. चूप हैं चांद सितारें..

मधरात्र कधीच उलटून गेली. सहा वाजता निघायचय झोपा आता. कॅम्पलिडरने टेन्टबाहेर मान काढून हाक मारली. तसेही शेकोटीतल्या निखार्‍यांवरही आता राख साचायला लागली होती. थंडी वाढली होती.

आणि मग ते शेवटचं गाण!

बिछड गया हर साथी देकर पल दो पल का साथ
किस को फ़ुरसत है जो थामे दिवानोंका हाथ
हम को अपना साया तक अक्सर बेजार मिला..

दुसर्‍याच्या दु:खाने कळवळून रडू फ़ुटण्याची ती माझी पहिली वेळ. प्यासा प्रत्यक्षात खूप उशिरा पाहीला. पण त्यातल्या विजयच्या कवीहृदयाची भग्नता साहिरच्या शब्दांतून त्या रात्रीच अचूक मनापर्यंत पोचली होती. प्यासातल्या विजयमधे साहिर होता कारण साहिरच विजय होता.

इस को ही जीना कहते है तो यूं ही जी लेंगे
उफ़ ना कहेंगे लब सी लेंगे आसूं पी लेंगे
गम से अब घबराना कैंसा गम सौ बार मिला..

जाने वो कैसे लोग थे जिन के प्यार को प्यार मिला..

त्यानंतर अनेक वर्षांनी परत एकदा तसंच आतून फ़ुटून रडू बाहेर आलं होतं. तेव्हा फ़ाटून टाकणारं दु:ख माझं एकटीचं होतं. पण तेव्हाही साहिरचेच शब्द सोबत होते.. जे ते दु:ख शब्दांत मांडू शकले.

तुम ना जाने किस जहां मे खो गये
हम भरी दुनिया मे तनहा खो गये..

त्यातली परत ती डुबती नजर.

आओ तुमको देख लें डुबती नजरोंसे हम
लूट कर मेरा जहां छुप गये हो तुम कहां?

बियासच्या काठावर कोजागिरीच्या चंद्रासोबत भेटलेला साहिर नंतरही अनेकदा भेटला. भेटत राहीला. फ़ैली हुई है सपनोंकी बाहे असं म्हणत.. आजा चल दे कहीं दूर.. सांगत.
झूला धनक का धीरे धीरे हम झुलें
अंबर तो क्या हैं तारों के भी लब चुमें
मस्तीमें झुले और सभी गम भुलें
देखे न पिछे मुडके निगाहें.. आजा चल दे कहीं दूर...

प्रत्येकच गोष्ट त्याची आणि तिची असते. म्हंटल तर नेहमीचीच. पण साहिर च्या तोंडून ती ऐकताना इश्क तोहमत असली तरी काय झालं? वो तोहमत उठाने को जी चाहता है.. म्हणावसं वाटलं!.. नेहमीचंच रुसना मनाना.. पण साहिर म्हणतो.. किसी के मनाने में लज्जत जो पायी वो फ़िर रुठ जाने को जी चाहता हैं .. तेव्हां दिल खुश होऊन जातं.. त्याचं तिचं आणि दुनियेचंही.

त्याची आणि तिची ती गोष्ट फ़ुलत जाताना साहिर भेटत राहणं अपरिहार्य असतं. साहिरच्या गाण्यांमधून सामोर्‍या येत रहाणार्‍या त्या जादूभर्‍या रात्री आणि ते चंद्र.. कधी त्या रात्री ची दास्तां सांगणार्‍या. जेव्हां ती भेटली होती...

हाये जिस रात मेरे दिल ने धडकना सिखा
शोख जजबात ने सीने में भडकना सिखा
आसमनोंसे उतर आयी थी वो रात की रात..

आयुष्यातल्या सर्वात बेहतरीन रात्रीला 'रात की रात' साहिरनेच म्हणावं. साहिरचे शब्द अजब होते. जादूभरे होते. नजरेतली कश्म्कश व्यक्त करत ती त्याच्याकडे व्याकूळ नजरेनी पहात असते. पण आता ती परकी झालेली असते. अशावेळी साहिरच्या शब्दांतला तो तिच्या त्या नजरेला काय सुंदर शब्द वापरतो..

न तुम मेरी तरफ़ देखो गलत अंदाज नजरोंसे... वाह!
ना जाहीर हो तुम्हारी कश्म्कश का राज नजरोंसे

तुम्हें भी कोई उलझन रोकती हैं पेशकदमी से
मुझे भी लोग कहते है की ये जलवे पराये है..

त्या आधीच्या भेटींमधला साहिर असा सावध नव्हता कधीच. उलट शृंगारातला धीट थेटपणा व्यक्त व्हावा तो त्याच्याच शब्दांतून.. परत एक रात्र साहिरचीच. तिला शरमा के न यूहीं खो देना रंगीन जवानी की घडियां असं सांगतानाच .. दूर राहू नकोस सांगणारा तो त्याच्या शब्दांतला उघड रोमान्स

दूर रह कर ना करो बात करीब आ जाओ
याद रह जायेगी ये रात करीब आ जाओ

एक मुद्दत से तमन्ना थी तुम्हें छूने की
आज बस में नही जजबात करीब आ जाओ

ती संकोचत रहाते तेव्हां साहिर म्हणतो.. इस कदर हम से झिझकने की जरुरत क्या है... झिझकना काय अचूक शब्द..

तिच्या आणि त्याच्या पहील्या नजरभेटीचा तो जादूभरा खेळ सांगताना साहिरने म्हणावे..

सनसनाहट सी हुई थरथराहट सी हुई
जाग उठे ख्वाब कई बात कुछ बन ही गई

जाने क्या तुने कही..

साहिर अनेकांना अनेक कारणांसाठी आवडतो. त्याच्या कवितांतून दिसणारा सामाजिक राजकिय आशय, स्त्रियांबद्दलचा त्याचा आदर, त्याच्या प्रेमातली ती कडवाहट.. त्याचे उर्दू नजाकतदार शब्द.. कित्येकदा ते नक्की काय आहेत ते समजणंही कठीण अर्थ तर पुढचीच गोष्ट. पण तरी ते कधी खटकत नाहीत. त्याचा अर्थ हृदयाला कळलेलाच असतो. वो घडी मेरे लिये ऐश की तमहीद हुई. मधला तमहीद म्हणजे काय हे आधीच्या जिस घडी मेरी निगाहोंको तेरी दिद हुई.. मधून आधीच उलडलेला असतो. अनेकदा त्याचं शब्दांशी खेळणं किती लोभस असतं. हा दिद शब्द तर त्याने अनेकदा इतक्या खुबसुरतीने वापरलाय..

मुझे मिल गया बहाना तेरी दिद का
कैसी खुशी लेके आया चांद
ईद का..

साहिरचा तो जेव्हा तिला भेटून आल्यावरही तेरा खयाल दिल से मिटाया नही अभी.. म्हणतो आणि वर तिला सांगतो.. बेहोश होके जल्द तुझे होश आ गया
मैं बदनसीब होश में आया नही अभी..

खरंतर त्याला तिला सोडून यायचेच नसते. ते मखमली गाणं त्याच्या ह्या हट्टातूनच तर फ़ुललंय! कोणं विसरणार ते? प्रत्येकच त्याने अनेकदा तिला सोडून जायची वेळ आल्यावर गुणगुणलय ते..

ये शाम ढल तो ले जरा
ये दिल संभल तो ले जरा
मैं थोडी देर जी तो लूं
नशे के घूंट पी तो लूं
अभी तो कुछ कहां नही
अभी तो कुछ सुना नही...

अभी न जाओ छोड के.. के दिल अभी भरा नहीं..

तो आणि ती भेटतात तेव्हाचा दोघांच्या दिलाचा मदहोश माहोल व्यक्त व्हावा साहिरच्या शब्दांतून.. मग ते हम जब सिमट के आप के बाहों में आ गये म्हणतानाचं दोनों जहान आज गवाहों में आ गयें.. असो किंवा ते बेहतरीन ड्युएट ..

ये बोझल घटायें बरसती हुई...
ये बेचैन रुहे तरसती हुई
ये सांसों से शोले निकलते हुए
बदन आच खाकर पिघलते हुए..

धडकने लगी दिल की तारों की दूनियां..

साहिरने आपल्या तल्खीयां मधे तो जेव्हा तिला भेटत नसतो तेव्हाची त्याची स्थिती इतकी सुंदर लिहिलेली आहे..

तु मेरे पास न थी फ़िर भी सहर होने तक
तेरा हर सांस मेरे जिस्म को छू गुजरा
कतरा कतरा तेरे दीदार की शबनम टपकी
लम्हा लम्हा तेरे खुशबू से मौतार गुजरा...

साहिर ने हिंदी चित्रपटासांठी गाणी कधी लिहिलीच नाहीत. लिहिल्या त्या फ़क्त कविता..

देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से.. मधे तो लिहितो..

कहने को दिल की बात जिन्हें ढूंढते थे हम
महफ़िल मे आ गये है वो अपने नसिब से..
नीलाम हो रहा था किसी नाजनी का प्यार
किमत नही चुकाई गयी इक गरीब से
तेरी वफ़ा की लाश पे आ मै ही डाल दूं
रेशम का ये कफ़न जो मिला हैं रकीब से..

इतरांना कशासाठीही आवडत असो साहिर मला आवडतो ते पुन्हा पुन्हा त्याच्या शब्दांतून भेटत रहाणार्‍या रात्रीं साठी आणि रात्री दिसत रहाणार्‍या चंद्रा साठी. . त्याच्या तिला मनवत असतानाही दिसणार्‍या ऎटीट्यूड साठी.. मुलाकात पर इतने मगरुर क्यों हो.. हमारी खुशामत पे इतने मजबूर क्यों हो.. विचारावं ते साहिरनेच. . किंवा

तख्त क्या चीज है और लालो जवाहर क्या है
इश्क वाले तो खुदायी भी लुटा देते है..

जुल्म ए उल्फ़त पे हमें लोग सजा देते हैं
कैसें नादां है शोलों को हवा देते है.. wow.. when one is in love, the rest of the world can go take a jump हा attitude सुद्धा दाखवावा तो साहिरनेच!

इतक्या सगळ्या मुलाकाती.. इतकं सगळं उधळून टाकलेलं प्रेम.. तरीही ताटातूट अटळच असते. अफ़साना अंजाम चं रुप घेऊ शकलेलाच नसतो. हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक.. असं वचन दिल्यावर प्रत्यक्षात कायमच्य विरहाचीच कयामत येऊन ठेपते. त्या शेवटच्या भेटीत तो तिला कळवळून विचारत रहातो.. मैं ये ख्वाहिश ये खयालात किसें पेश करुं.. रंग और नूर की बारात आता कोण सजवणार? इश्क की गर्मी.. सुलगते हुए दिन रात आणि ते सारे जजबात आता कोण पेश करणार? कुणासाठी? ..

तुम्हारी हैं तुम ही सम्हालों ये दुनियां म्हणत तो तर केव्हाच निघून गेलाय.

आज सुद्धा आकाशात तोच कोजागिरीचा चंद्र आहे. स्वत:च्या शब्दांतून इतक्या सुंदर रात्री आणि त्या रात्री दिसत रहाणार्‍या चंद्रांचे तितकेच सुंदर दीदार करवणार्‍या साहिरने आजच्याच चंद्रभरल्या रात्री ह्या दुनियेतून रुखसत घेतलेली असावी हा काय अजब योगायोग? 25th Oct.ला साहिर गेला तेव्हां मागे फ़क्त एकच चुकीची ओळ लिहून गेला.. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक हैं तुमको.. चुकीचं नव्हतं का ते?
आमची बात च कुछ और आहे.. हमने तो मुहोब्बत की हैं!

विषय: 
प्रकार: 

अ प्र ति म
इतके सुंदर लिखाण कस्काय वाचायचं राहिलं Sad

रात भी है कुछ भिगी भिगी
चांद भी है कुछ मध्धम मध्धम...

सब के दिल पर युं गिरती है
तेरी नजर से प्यार की शबनम

जलते हुए जंगल पर जैसे
बरखा बरसे रुक रुक थम थम..

जयदेव ने त्या शब्दांत घुंगरांची आणि तबल्याच्या ठेक्यांची जान ओतली होती. >>>>>>१०००००% अनुमोदन Happy

साहिर आवडत होताच. पण
‘ ये चमन-ज़ार ये जमुना का किनारा ये महल
ये मुनक़्क़श दर ओ दीवार ये मेहराब ये ताक़
इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर
हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से ’
वाचलं अन् सर्रकन अंगावर काटा आला.

वहीदा रहमानची करारी मुर्ती जेव्हा साहिरच्या शब्दात म्हणते

मैं तुझे रहम के साये मे न पलने दुंगी
जिंदगानी की कडी धुप मे जलने दुंगी
ताकी तप तप के तू फौलाद बने
मां की औलाद बने, मॉं की औलाद बने
तेव्हा मग अमिताभचा कडवटपणा नीट उमगत जातो त्रिशूलमधे.
आणि
चुप भी रहिए ये क्या कयामत है
आपकी भी अजिब आदत है
इतना हंगामा किस लिए आखिर
प्यार है या कोई मुसिबत है
अरे जब भी मिलते हो
जाने तुम क्या क्या
उल्टे सिधे सवाल करते हो
जानेमन तुम कमाल करते हो
लिहीणारा साहिर हाच का असा प्रश्न पडतो.

उसके आनेसे मेरे आंगन मे
खिल उठे फुल मुस्कुरायी बहार
देखकर उसके जी नही भरता
चाहे देखो उसे हजारो बार
हे तर ऑल टाईम फेवरेट

Pages