मन मानसी..

Submitted by Manasi R. Mulay on 26 January, 2013 - 01:16

"जरी रोज कितीही बोललो तरी मला नाही वाटत आपलं हितगुज कधी संपेल.. मी चंचल, हळवा, हसरा, लाजरा आणि वाटलं तर तितकाच शांत, सुधीर, गंभीर आणि खंबीरही आणि तू अगदी माझीच प्रतीकृती आकाशीचा चंद्र प्रत्यक्षपणे पाहणाऱ्याला तू दिसावस आणि नदीच्या पाण्यातून पाहणाऱ्याला मी दिसावं इतकाच काय तो फरक..
मला आठवतं आपण दोघं समुद्रकिनारी बसलो होतो.. मला वाटलं अन एकदम मी त्या लाटांमध्ये शिरलोदेखील.. क्षितिजाला स्पर्श करून तुझ्यापाशी परतलो, तेव्हा केवढं समाधान होतं माझ्याकडे..ते दिसलं तुझ्या डोळ्यात.. तू मात्र आली नव्हतीस माझ्यासोबत.. किनाऱ्यावरच वाळूचा किल्ला बनवत बसली होतीस. आठवतं तुला आपण कोकणात गेलो होतो..नारळी-पोफळीच्या बागा बघून केवढी खुश झालेली तू..मी सर्रकन चढून गेलो अगदी शेंड्यापर्यंत पण तू मात्र आली नव्हतीस..त्या माडाची उंची आजमावत तिथेच थांबलेली पायथ्याशी..
मला आठवतं एकदा पाऊस आला होता तेव्हा आपण दोघेही बाल्कनीत बसलो होतो चहा पीत.. मला भिजावसं वाटलं अन ह्यावेळी तूही आलीस माझ्यासोबत..तू भान हरपून नाचलीस.. त्या मोतियांच्या जलधारांत नखशिखांत भिजलीस..पण मी मात्र कुठेतरी हरवून गेलो होतो. तुला तिथे तसाच सोडून आकाशात गेलो होतो..आणि मग मेघांआड लपून तुला पाहत होतो..मला पाहताच तू लाजलीस..
आपला तो रंगलेला लपंडाव! उन-पावसाने लपंडाव खेळावा अन सप्तरंगांची उधळण व्हावी तसाच! वेगवेगळ्या कंगोऱ्यांआड माझं ते लपणं.. अन मला शोधताना तुझं भुवया उंचावणं. मी सूर्यासारखा तळपत असताना तू श्रावणमेघ व्हावं..इतकं बरसावं की सोनेरी सूर्यालाही सप्तरंगात भिजवावं..असं नेहमीच व्हावं.
आपला तो पाठशिवणीचा खेळ.. तू येते आहे समजताच मी पळत सुटावं वाट फुटेल तिथे..तुला चकवत चकवत पळण्यात मी अगदी सराईत..तुला हैराण झालेलं पाहून मला होणारा आनंद आणि मला पकडण्याच्या घाईत मधेच कुठे धडपडलीस, तुझ्या सजल नेत्रांनी ओलावल्या मातीचा सुगंध.. सगळं काही वेगळंच! तरीही ना थकता तू माझा वेध घेणारच.आणि तरीही असं कसं शक्य आहे? किंवा तुला कसं ठाऊक असं काहीतरी विचारून मी तुला हुलकावणी देणार.
मी तुझ्या सोबत असलो तरी मला नाही वाटत तू मला पूर्ण ओळखंलस..मी अनेकदा तुझ्याशी बोलताना तुला बरंच काही सांगितलंय..तुझ्या सोबत असताना त्या नीरव चांदण्यात मी तुला बरंच काही सुचवलंय..मला समजून घेण्यासाठी धडपडताना मी तुला पाहिलंय.. बरंच काही तू उचललं आणि काही मात्र तिथेच विरून गेलंय.
अनेकदा मी सांगितलं आणि तू ऐकलंय आणि तसं केलंस. माझं ऐकल्यानं तुझ्या करण्याला रुपेरी किनार मिळाली. कधी मी चुकलोदेखील आणि परिणामी तू सुद्धा! मला वाईट वाटलंच.. तू रागावशील म्हणून काहूर माजलं.. पण तू खूप मोठी अगदी माझ्यासारखी.. मला सहजच माफ केलंस.माझं चुकलं म्हणून मला शिक्षा न करता हळुवार सांभाळून घेतलं.
त्या निर्जन रस्त्यावर मी तुझा सोबती झालो.. तुला आधार दिला.. तुला कधी एकटं वाटू दिलं नाही. म्हणून गर्दीत गेल्यावरही तू मला विसरली नाहीसच. अनेक हितचिंतकांच्या पसाऱ्यात माझं मत नेहमीच महत्त्वाचं वाटलं तुला. स्वतःवरला विश्वास उडाला पायाखालची जमीन सरकली, तेव्हा तू माझं म्हणून गौरवलं अन माझ्या पंखात बळ आलं.
मी कधी हळवा झालो तेव्हा माझ्याभोवती तुझ्या भक्कम हातांनी तू बांधलेलं काटेरी कुंपण मला आधार देऊन गेलं. मी काटेरी बनलो तेव्हा तुझ्या नाजूक हातांनी विणलेलं रेशमी वस्त्र माया देऊन गेलं. काळ बदलला.. कालानुरूप सारं जगही, तुझं आणि माझंही! तू मला नेहमी जपलं काळासोबत बदलताना माझी निरागसता माझं माधुर्य जपलं. माझं एक वेगळं जग फुलवलं. माझं मांगल्य राखलं. बाहेरून अनेक आघात झाले त्याची झळ लागू दिली नाही मला.. म्हणूनच मी आजवर मंदिरासारखा पवित्र आणि पाण्यासारखा निर्मळ आहे.
तू माझ्यासारखी असलीस तरीही विवेकाच्या आधारानं तुझं वेगळेपण जपलंस. आणि मला जिंकून घेतलं. मी तुझ्यावर अधिराज्य करता करता तूच माझी साम्राज्ञी झाली. पण माझ्यासाठी तू सदैव माझी आणि माझीच आहेसच.. अगदी माझ्यासारखी. चंद्र पौर्णिमेचा असो अथवा असो रुपेरी चंद्रकोर, प्रत्यक्षपणे पाहिलं की तू दिसावंस आणि नदीच्या पाण्यातून पाहणाऱ्याला मी! इतकाच काय तो फरक. "

Group content visibility: 
Public - accessible to all site users