ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

Submitted by सुज्ञ माणुस on 24 January, 2013 - 06:49

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य
( हे छायाचित्र दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा.)

bus123.jpg
हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.
वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती. साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा थांबा असल्याने तिथूनच परत जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यतच मर्यादित राहिले.. ( इथे मला गहिवरून आलेले आहे ).
तर मुद्दा हा कि हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते ?
मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत. हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी ....कधी लाल टोपी घालून येउन माझे "परीवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा स्वतः नाही आला तर "ऐरवता" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून देतो.
हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे डोळे लाऊन असतो.कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यत आम्हाला पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn busy today" अश्या "माजात" परत निघून जातो.
हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो कि खिरेश्वर पर्यत सोडायला हा संध्याकाळ ४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरु केली कि मग आपला परत निघून जातो. माहुली ला गेलो कि मात्र याचे काय बिनसते काय माहित .. येतच नाही हा पठ्या.
याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्टभर हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा संपूर्ण संसार ...तर कधी लग्नाचे पूर्ण व्हराड .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच .... १७००० पेक्षा जास्त रस्ते माहित आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो ..असे एकाही गाव नाही जिथे हा दिवसातून एकदातरी "फ्लायिंग व्हिजीट " देत नाही.
शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर माणुसकीला आणि स्वतच्या उपयुक्ततेला जास्त महत्व देतो. जेष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत हि देतो.सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते कि आगाऊ आरक्षण करूनही नेत नाही मग तो आपल्याला.

रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु.ल.नी वर्णन केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लाऊन भांडणे सुरु झाली कि मात्र इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी म्हणल्याप्रमाणे .."हमारा बस है ना .. वो सर्वसामान्य के बस मे है."
काही गोष्टी न पटणारया करतो ..पण "आडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही.
जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी लोकांनी पान/तंबाखू खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची आजीबात इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची अपेक्षा असते.त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले बाकडे हे निव्वळ बाकडे याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा घेतो तेव्हा क्षणार्धात या वाल्मिकी चा परत वाल्या कोळी होतो.

अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही ??

कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेऊन हे दहावे. मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.

सागर
http://sagarshivade07.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद महेश, नव्यानेच लिखाण चालू केले आहे ( म्हणजे लिखाणाचा घाट घातला आहे.) बघू कुठपर्यंत पोहोचते आमचे गाडे ! Happy

चान्गले लिहीलय.
एस्टी अन तिची सेवा ग्रेटच आहेत Happy फक्त राजकारणी अन वरचे अधिकारी यान्नी महामण्डळाला पोखरले आहे.
(मी अनुभव्/अनुभूतीशिवाय बोलत नाही, माझे वडील, दोन मामा, एक काका इतके जण एस्टीच्या सेवेत होते, ८०/९० च्या दशकात रिटायर झाले, ती पिढि गेली, अन (वरच्या लेव्हलला) आता आलेत ते फक्त खाबुगिरी करणारे /कामचूकार लुटारू आलेत, असो)

एसटीला पर्याय नाहीये. कुठल्या कुठल्या कोपर्‍यातल्या गावांपर्यंत एसटीचं जाळं गेलंय हे बघितलं तर खरोखर आश्चर्य वाटतं.
एसटीच्या व्होल्वो गाड्या आणि खाजगी व्होल्वो यांच्यात बहुतेक सगळ्या बाबतीत एसटीच सरस आहे.

लहान गावातील जनता , जनसामान्यांचे हक्काचे वाहन. खाजगी वाहने ( ट्रॅव्हल्स , जीप) ह्यांची सेवा , एस टी अस्तीत्वात असताना कशी आहे ती आपण बघतो. एस टी नसल्यास जनसामान्याच जिणंच असह्य होईल.
लाल डबा करीत असलेली सेवा मान्यच करावी लागेल , पण ड्रायव्हर/ कंडक्टर , कर्मचारी ह्यांचे पगार , सोयी सुविधा ह्याची मात्र बोंबच आहे.

लाल डब्याला लाल सलाम.

४ वर्षे सांगली इचलकरंजी पास घेऊन अपडाऊन केलेले आम्ही . त्या प्रवासाने जेवढ शिकवल तेवढ वालचंद मधे जाऊन शिकलो नाही (अर्थात इंजि. कॉलेजला आपण पुढे लागणार काय शिकतो हा संशोधनाचा विषय आहे)
अजूनही जेव्हा शक्य असेल तेव्हा ST नेच जातो .
आपलेच सरकार ज्यावेळी तिचा गळा घोटू पाहत तेव्हा फार त्रासही होतो Sad
(उदा . नुकताच घेतलेला ST ला १० रू जास्त दराने डिझेल द्यायचा निर्णय , आत्ता आपण दुर्लक्ष करतोय , पण ती आहे म्हणून खाजगी वाहने आणी वडापला चाप आहे , एकदा ती संपली की मग ? )
आणी जेव्हा ४ माणसे एकत्र जात असताना २ वडाप मिळाले की वडापने जातात आणी २ एस टीने (कारण त्याना हाफ तिकीट असते ) तेव्हा लोकांच्या क्रुतघ्नपणाचा ही राग येतो . Sad

मस्त. फक्त वारंवार लिंगबदालाचे ऑपरेशन केले आहे. ते जिवावर आले.

बाकी एस. टी. म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी. Happy

मी हा अनुभव आधी लिहिला आहे.

कोल्हापुर स्टँड , संध्या ५.२० मि. आरक्षण खिड़की बंद झालेली.

रात्रीच्या बिड गाडीचे रिझर्वेशन हवेच होते मित्राकरीता , काय करावे ह्या विचारात असतानाच एक व्यक्ती म्हणाली काय पाहीजे ? आम्ही आमची अडचण सांगीतली , दोन मिनिट थांबा म्हणाला , तेच सदग्रुहस्थ खिडकीत. आम्हाला ते २ की ५ रु. चे रिझर्वेशनचे तिकिट दिल्यावर थँक्स म्हणाल्यावर ," अहो , आभार आम्हीच मानायला हवेत , प्रायव्हेट गाडीने जाण्याऐवजी एस टी ने जाताय त्याबद्दल." वेळ संपल्यावर देखील सेवा दिल्याबद्दल त्याचे किती उपकार झाले होते ते कसे सांगणार ?

हा अनुभव आमच्या काही सहकार्‍यांना मात्र वारंवार सांगावा लागतो , तरीही त्यांच्यात हवी ती सुधारणा होत नाही , ह्याचे जास्त वैषम्य वाटते.

लिंबू टिंबू , खरे आहे तुमचे मलाही याचा प्रत्येय आलाय,
माधवी, खरे तर हा फोटो खूप कॉम्प्रेस केलेला आहे. मूळ फोटो अजून छान आहे.पूर्ण डोंगर रांगांमध्ये फक्त ST.
लिंक : https://plus.google.com/u/0/photos/104678855081644041237/albums/58269656...
विप्रा, आपण लिहिलेला अनुभव आमच्या पिताश्रीना पण आला होता त्यामुळे जास्त 'Relate' झाला .
केदार, वडाप म्हणजे नाही कळाले हो. बाकी छान.
विजय, सुज्ञ माणूसच दुसर्याची सुज्ञता ओळखू शकतो असे माझे मत आहे Happy
बाकी सगळ्यांना धन्यवाद. पहिलेच ललित लेखनचा प्रयत्न होता.

माझ्या नोकरीच्या आयुष्याशी कित्येक वर्षे अगदी अटळ असा जोडलेला भाग म्हणजे आमची लाडकी लालपिवळी. खुद्द एस.टी.च्या कर्मचार्‍यांनी जेवढे प्रेम केले नसेल इतके मी एस.टी. वर [त्यात अर्थात साधी, निमआराम आणि एशियाड यांचा समावेश आहेच...डावेउजवे कधी केले नाही....] प्रेम केले आहे. कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर तर नित्याचाच प्रवास आणि आज जरी रस्ते चौपदरी आहे, उद्या सहा पदरी रस्ता झाला, तरी ज्या दिवसात एकपदरीच....म्हणजे नित्यनेमाने समोरून वाहने येजा करायची तो काळ... रस्ता होता त्याकाळी ड्रायव्हरमामाचे गाडी नेण्याचे कौशल्य पाहताना त्याच्याविषयी आदरमिश्रीत कौतुक मनी निर्माण होत असे. मी कधीही गाडीच्या अवस्थेविषयी तक्रार केली नाही.... कधी रस्त्यात रुसून जरी बसली तरी त्याबद्दल नापसंती दर्शविली नाही.... दरात कितीही फरक पडला तरी एस.टी. ही कायमपणे तोट्यात जाणारे व्यवस्थापन असूनही अथकपणे जनतेच्या सेवेसाठी तयार असते हे माहीत असल्याने एस.टी.कारभाराविषयी कधीही माझे मत 'डावे' होणार नाहीत. खाजगी व्होल्व्होजचे कुणी कितीही गुणगाण गावो, पण लालपिवळीला 'माहेरपणा'चा जो गंध आहे तो अन्य कुठल्याही सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला येणे शक्य नाही.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांची मुख्यालये तर राहू देतच पण येथील तालुका पातळीवरील ठिकाणी जात असताना मी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात [ऑफिसची सरकारी जीप नसताना] एस.टी. ने इतका प्रवास केला आहे की अक्षरशः डझनावारी कंडक्टर्स ड्रायव्हर्स यांच्या अगदी अरेतुरेच्या ओळखी तर झाल्याच होत्या पण कित्येक प्रसंगी त्यांच्या डब्यातील पिठलं भाकरी, मसाला भरून त्यांच्या आईने केलेली भरलेल्या वांग्याची चमचमीत भाजी, ओल्या मिरच्यांचा ठेचा....यांचा आनंदही घेतला आहे..... सायंकाळी एखाद्या तालुक्यातील काम संपले आणि एस.टी. सुटण्याची वेळ झाली तरीही सकाळी जाधव कंडक्टरला सांगून ठेवलेले असल्याने तो गाडी सुटण्याची नित्याची वेळ टळून गेली तरी बाकीच्या पॅसेन्जर्सना [त्याच्या भाषेत पाशिंजर] 'थांबा हो पावणं वाईच, आमचं ऑडिटवालं पाटीलसर येतील आता दोन मिन्टात...' असं सांगून बोलण्यात गुंतवून ठेवत असे. गाडीत बसलेल्या बर्‍याच लोकांना 'हे ऑडिटचे पाटीलसर' माहीतच असल्याने मग तेही तकार न करता, 'आस्सं व्हय, बरं बरं, थांबू या....' म्हणत नव्याने तंबाखू मळायला सुरुवात करीत..... ही खरी आपुलकी निर्माण होत गेली ती एस.टी.च्या नित्याच्या प्रवासामुळे.

एस.टी. हे एक चालतेबोलते 'घर' च बनते ग्रामीण भागातून जाताना... [वर फोटोत दाखविलेल्या बसप्रमाणे]. हाय वे वरील गाड्यांमध्ये एकप्रकारचा 'बिझिनेस' पणा जाणवतो....कोल्हापूर-पुणे २७४ चे तिकिट टरकावून झाले की प्रवाशाचा आणि कंडक्टरचा संबंध संपला....तोही दरवाजा बंद करून ड्रायव्हरशेजारील सीटमध्ये जाऊन विसावतो...., पण ग्रामीण भागात लालपिवळी हे तुमच्या सुखदु:खाचे एक निश्चित ठिकाण बनते. एस.टी.च्या आवाजावरही ताण करीत कंडक्टरला सामील करून घेत मोठ्याने गप्पा हाणणारे रामभाऊ, संभाजीराव, जोतिबा, यल्लाप्पा, तुक्या आणि त्या कान देवून ऐकणार्‍या त्यांच्या डोईवरून पदर घेऊन अंग चोरून बसलेल्या कस्तुर्‍या..... वा ! संभाषणात भाग न घेताही मी कित्येक घरातील संसारांच्या भांड्यांचे विविध आवाज ऐकले आहेत. चालत्या गाडीत पोराच्या वागण्याने खंगलेले आईवडील जसे पाहिले तसेच पोरगीला त्रास देणारी सासू भेटली म्हणून डोळ्यातून पाणी काढणारी राधाक्काही पाहिली. जावयाच्याबाबतीत गणित पक्के जमल्याची खुशी जशी गणपतरावाच्या चेहर्‍यावर पाहिली तशीच धाकट्या भावाने वसंताने चारचौघात उसाच्या बिलावरून थोरल्याचा अपमान केल्यामुळे धक्का बसलेला यशवंताही पाहिला. असल्या दु:खावर खरे तर फुंकर घालायची नसतेच, कारण हे तर रोजचेच....पण इंग्रजीमध्ये ज्याला 'व्हेन्ट' म्हणतात त्यानुसार आपल्या वेदनेला कुठेतरी वाट करून दिल्याशिवाय मन मोकळे होत नसते.....

....आणि असे मन मोकळे करून देणारी हक्काची एक जागा म्हणजेच एस.टी. ~

श्री.सुज्ञ माणूस यानी अतिशय अचूकपणे घडवून आणलेला 'एस.टी.' चा प्रवास भावला असेच मी म्हणेन.

अशोक पाटील

सुज्ञ माणुस ,
सांगली कोल्हापूर भागात खाजगी प्रवास वाहतूक करणार्या गाड्याना वडाप म्हणतात .
त्याला वडाप का म्हणतात माहीत नाही Happy

आमच्या भटक्यांसाठी तर एसटीच प्यारी !! वरचा फोटो दाखवलाय अगदी तशीच वेळ आम्हाला परवाच केलेल्या ट्रेकमध्ये आली.. आम्ही गडावरून उतरतोय आणि एसटी आम्हाला बाय बाय करत निघून गेली..

सांगली कोल्हापूर भागात खाजगी प्रवास वाहतूक करणार्या गाड्याना वडाप म्हणतात . >>>>

त्याला विदर्भात "डुक्कर" म्हणतात, ते दिसतेच डुकरासारखं Happy

"....त्याला वडाप का म्हणतात माहीत नाही ...."

केदार.... अगदी सोपं आहे.
आमच्या कोल्हापुरातच सर्वप्रथम ग्रामीण भागातून शहरातील उद्यमनगर येथील कामगारांना आणण्यासाठी रिक्षांचा वापर होऊ लागला. एस.टी.ची वेळ सोईची नसली आणि त्यातही कारखान्यात पहिली पाळी असली की मग रिक्षाशिवाय पर्याय राहिला नाही [आजकाल होंडाचाही सुकाळ झालेला दिसेल तुम्हाला.....]. तर साहजिकच मीटरप्रमाणे भाडे देऊन एकट्यादुकट्या कामगाराला रिक्षा प्रवास परवडणारा नव्हताच. पण धंदा आकर्षक होणार हे रिक्षा युनियनने ओळखले आणि त्यानी मग दिसेल त्या सीटी बस नाक्यावरून अशा कामगारांना ठराविक अल्प भाड्यात रिक्षात 'ओढून' घेणे सुरू केले. असे आठदहा प्रवासी झाले की रिक्षावाल्यालाही ती फेरी फायद्याची ठरू लागली.

हे 'ओढून' घेणे आमच्या कोल्हापूरी भाषेत 'वढणे....वडणे' होते....मग साहजिकच असे 'वडणे' करणार्‍या रिक्षाला नाम प्राप्त झाले...."वडाप रिक्षा".

गंमत म्हणजे पोलिस आणि आरटीओ यांच्या नियमवलीत 'वडाप' ला कायद्याने बंदी असूनही सध्या खूप तेजीत चालू आहे हा धंदा इथे कोल्हापूरात.... प्रवासी आणि रिक्षावाले दोघांच्याही दृष्टीने फायद्याचा.

अशोक पाटील

अशोक मामा जियो.
तुमचा प्रतिसाद मस्तच. आवडलाच. Happy

लेख तर मस्तच आहे. Happy
अनेक आठवणी आहेत एस टीच्या.
लाल पिवळा तर आम्हाला सुट्टी पडली की मामाच्या, मावशीच्या गावाला घेवुन जायचा.
त्यामुळे लयीच आवडतात. Happy

अशोकजी,
पण लालपिवळीला 'माहेरपणा'चा जो गंध आहे तो अन्य कुठल्याही सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला येणे शक्य नाही. >>>
जिंकलत हो तुम्ही ....
असल्या दु:खावर खरे तर फुंकर घालायची नसतेच, कारण हे तर रोजचेच.>>>.... भिडले हो ....

सागर

सुज्ञ माणुस....चांगले वर्णन,

अशोक मामा..... तुमचा प्रतिसाद नेहमी प्रमाणे मन मोकळा ...