बीपी पाहावा !

Submitted by सागर कोकणे on 19 January, 2013 - 11:09

काही चित्रपट पाहायचे तर त्याआधी विचार करावा लागतो की तो घरच्यांसोबत पाहता येईल की नाही. ते सिनेमागृहात मित्रांसोबत जाऊन तसे पाहता येतात हे खरे पण तोच सिनेमा घरी टी.व्ही.वर पाहताना अजूनही अवघडल्यासारखे वाटते. बीपी अर्थात बालक-पालक या सिनेमाच्या बाबत हीच परिस्थिती असली तरी त्याचे कारण वेगळे आहे. बोल्ड समजले जाणारे, पुरेपूर अंगप्रदर्शन असणारे सिनेमे पाहताना अमुक एका दृश्याला अवघडलेपणा येत असेलही, पण बीपी सिनेमाचा विषयच ह्या अवघडलेपणावर भाष्य करतो आणि चांगला, सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आवश्यक अशी विचारसरणी मांडतो. त्यामुळे बालकांनी अगदीच पालकांसोबत चित्रपट नाही पाहिला तरी ठीक पण स्वतंत्रपणे मात्र दोघांनीही आवर्जून पाहायला हवा.

अव्या, भाग्या, चिऊ आणि डॉली ही चौकट चित्रपटातील प्रमुख पात्रे आहेत. एकाच शाळेतले आणि एकाच चाळीतले सवंगडी. चाळीतली कोणी ज्योतीताई 'शेण खाते' म्हणून ती चाळ सोडून निघून जाते आणि 'शेण खाणे' म्हणजे नक्की काय हे कोणीच त्यांना समजावून न सांगितल्याने त्यांची उत्सुकता अजूनच वाढत जाते. त्यातच त्यांना भेटतो 'विशू' जो इतरांच्या नजरेत वाया गेलेला टवाळ मुलगा असला तरी त्या चौघांच्या नजरेत त्यांना 'मौलिक ज्ञान' देणारा मार्गदर्शक गुरु आहे.


विशुच्या मार्फत या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागल्याने ती वाहवत जातात. बीपी पाहण्याविषयी असलेल्या उत्सुकतेतून मुले पालकांशी खोटे बोलू लागतात, पैसे जमवण्यासाठी खोटी कारणे देतात. एकीकडे बीपीविषयी कुतूहल आणि दुसरीकडे हे सारे करताना कुणी पाहू नये, कुणाला कळू नये याची भीती. कारण आपल्या समाजात लैंगिक विषयावर पालक आणि मुले मोकळेपणाने बोलत नाहीत. मुले म्हणजे खळखळ वाहणारे पाणी आहे असा संवाद चित्रपटात भाग्याच्या वडिलांच्या तोंडी आहे. मुले त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे असल्याने पालकांनी उत्तर देण्याचे टाळून एक रस्ता बंद केल्यावर ते शक्य त्या मार्गाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवतात व त्यातून त्यांच्या मनावर झालेले संस्कार, त्यांनी स्वत:च काढलेले निष्कर्ष नक्कीच तितके परिपक्व नसतात जे त्यांना लैंगिकदृष्ट्या सुसंस्कृत बनवू शकतील.

विशू म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात 'ढिंच्याक ढिच्याक' वाजत असते- ज्याच्या मनातील आवाज इतरांना ऐकू येतो तो असभ्य, ज्याचा नाही येत तो सभ्य'. एकूण काय तर सभ्यतेचे पांघरून घेऊन चादरीखाली सगळेच असभ्य आहेत. ते चारचौघात बोलायला लाज वाटते म्हणून ते बोलायचे टाळतो पण किमान वयात येणाऱ्या मुलांना विश्वासात घेऊन ते समजावता आले तर तो/ती पुढे जाऊन 'शेण खाणार नाही' याची शक्यता नक्कीच वाढीस लागेल. परदेशात सेक्स या विषयावर मोकळेपणाचे वातावरण असते. तिथल्या सिनेमात आणि एकूणच समाजात ही गोष्ट नॉर्मल समजली जाते त्यामुळे योग्य त्या वयात मुले/ मुली स्वत:हून त्यांना हवे ते ज्ञान मिळवतात आणि त्याचा बाऊ केला जात नाही.

पौगंडावस्था ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची काही वर्षे असतात. या वयात बरेच काही नव्या गोष्टी कळू लागतात आणि शारीरिक बदलही वेगाने घडत जातात. आजच्या घडीला शहरी भागात मुला-मुलींना पुरेसे स्वातंत्र्य असले तरी ८०च्या दशकात ती नसल्याने आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकाची घुसमट होत राहतेच. चित्रपटातून चारही मुलांनी ही घुसमट, त्यातून होणारे बदल उत्तम रीतीने साकारले आहेत. विशेष म्हणजे हा विषय केवळ मुलांच्या दृष्टीकोनातून न मांडता मुलींच्या भावविश्वातून मांडून त्याला योग्य न्याय दिला आहे. पूर्वीचे जवळचे मित्र त्यांच्या मुलींकडे पाहण्याच्या नजरा बदलल्याने परके वाटू लागतात आणि नकळतपणे ते आपले निरागस बालपण गमावून बसतात. हे सारे ज्ञान मिळाल्यावर 'अज्ञानात सुख असतं' असंही म्हणता येईल.

महेश लिमये यांचे कॅमेरावर्क उत्तम झाले आहे. विशाल-शेखर यांचे बीपी द्वारे मराठीत जोरदार पदार्पण झाले आहे. 'सुसंगती सदा घडो' गाणे फार अचूक जागी निवडले आहे. ज्या क्षणी मध्यंतरची पाटी झळकते त्या दृश्यासाठी तर १०० पैकी १००. पण याच इतक्या संवेदनशील दृश्यालाही प्रेक्षक हशा आणि टाळ्यांचा कडकडाट करतात तेव्हा ते खटकतेसुद्धा. या व्यतिरिक्तही बीपीमध्ये योग्य त्या ठिकाणी विनोदनिर्मिती आहे आणि ते सगळे विनोद प्रेक्षकांनी कुठेतरी अनुभवले असल्याने त्याचाशी चांगल्या प्रकारे रिलेट करता येते. 'कल्ला' आणि 'हरवली पाखरे' ही दोन्ही गाणी अनुक्रमे विशाल-शेखरच्या आवाजात मस्त झाली आहेत. चिनार-महेश याचे पार्श्वसंगीत उत्तम आहे. उत्तम संगीत आणि पार्श्वसंगीतामुळे मुळातच रंजक असणारा विषय अधिकच परिणामकारकरीत्या पडद्यावर आला आहे.

कदम काका जेव्हा भाग्याच्या वडिलांशी मुलांच्या वयात येण्याच्या संदर्भात बोलत असतात, तेव्हा एक १३ वर्षीय मुलगा २२ वर्षीय मुलीच्या प्रेमात पडणे हा त्यांना नाटकासाठी उत्तम विषय वाटतो पण तेच प्रत्यक्षात त्यांच्या मुलाबाबत घडले तर त्याला गच्चीवरून ढकलून देण्याइतपत तो गंभीर गुन्हा आहे असे त्यांचे मत आहे. २५ वर्षापूर्वीची ही परिस्थिती अगदी तशीच नसली तरी याबाबत पालकांकडून मुलांना समजून घेण्याइतका किंवा त्यांना समजावून सांगण्याइतका सुज्ञपणा आजही समाजात नाहीये.

चित्रपटातील सर्वच मुलांची कामे उत्तम झाली आहेत. ती तशी झाली आहेत म्हणण्यापेक्षा तशी करवून घेतली आहेत आणि याचे श्रेय बीपीच्या सगळ्याच टीमचे आहे. आजची बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर 'नेहा ताई'च्या रोलमध्ये असल्याने तिने हा बोल्ड विषय आणि तिचे पात्र चांगले रंगवले आहे. किशोर कदम याचे पात्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण ते मुलांना समजूनही घेते आणि त्यांना आवश्यक असलेले 'योग्य' मार्गदर्शनही करते. हा चित्रपट पाहणारा बहुतांश वर्ग तरुण असला तरी चित्रपटातून जे काही शिकण्यासारखे आहे ते पालकांनी आहे. या विषयावर त्यांच्या पालकांनी मौन पाळले असले तरी त्यांनी स्वत:हून मुलांशी याबाबत बोलायला हवे. कित्येक मुले भीतीपोटी वा शरमेने याबद्दल पालकांशी बोलत नाहीत तिथे पालकांनी पुढाकार घेऊन संवाद साधला पाहिजे.

एक आपण लक्षात घ्यायला हवे ते म्हणजे काळ फार वेगाने बदलत आहे आणि त्याप्रमाणे संस्कृतीही बदलत आहे. लहान मुलांवर समाजाचा आणि विशेष करून टी. व्ही. आणि सिनेमाचा फार मोठा प्रभाव असतो. ज्या गोष्टी शिकायला आपण वेळ लावला त्या ते या इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात आपल्या नकळत सहजपणे शिकतात. तेव्हा पालकांनी त्यांना योग्य ती दिशा दाखवली नाही तर ते स्वत: ती शोधू शकतात आणि ते शोधतातही. इथे असाही युक्तिवाद मांडता येईल की आधीच्या सगळ्याच पिढ्या या अवस्थेतून गेल्या आहेत, त्यांना कोणीच या विषयांवर स्वत:हून सांगितले नव्हते/नसावे. पण केवळ या विषयाची शरम वाटते म्हणून मुलांना आवश्यक ते ज्ञान न देणे आजच्या काळात तरी चुकीचे वाटते.

इतका उत्तम 'बीपी' पडद्यावर आणल्याबद्दल रवी जाधव यांचे मनापासून आभार. रितेश देशमुखने निर्मितीत उतरताना हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीत योग्य ती दखल घेतली जाईल याची काळजी घेतली आहे आणि कौतुकाची पावतीही मिळवली आहे. एकंदर मराठी सिनेमा हिंदीहून काहीतरी वेगळे देतोय याचा विशेष आनंद आहे. बीपीच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रशांत, कोणीतरी समविचारी आहे हे पाहून बरे वाटले.

>>एकूण चित्रपटाच्या लांबीच्या मानाने ते बौद्धिक फार कमी वाटते

अहो आजकाल अनेक चित्रपटांच्या बाबतीत हे असेच होते, आणि लोक म्हणतात की चित्रपटांनी काय ठेका घेतलाय का समाज प्रबोधनाचा ? Angry (हा फार मोठा आणि वेगळा चर्चेचा विषय आहे)
काही गुन्हेगारी क्षेत्रावरचे गाजलेले सिनेमे आहेत, मी आधी पाहिले नव्हते, पण मित्रांच्या आग्रहाखातर पाहिले, तेव्हाही मला हेच जाणवले होते. नाही त्या गोष्टींचे उदात्तीकरण आणि संदेश अगदीच चिमूटभर. Angry

>>हेच तुम्ही न करता मोठ्यांशी बोला, प्रश्न विचारा आणि मोठ्यांनी त्याची खरी खरी उत्तर देऊन निरसन करा हेच तर सांगायचय त्यांना सिनेमातून

मुळात हे असे किती पालकांना जमणार आहे ? ठीक आहे एका ठराविक वयात मुलांना हे कळणे आवश्यक आहे, पण पालकांनाच विचारले पाहिजे असे नाही, आजकाल कितीतरी चांगली पुस्तके आहेत, शैक्षणिक सीडीज असतील.

खरच मला फार उत्सुकता आहे की असे कोण (आणि किती) पालक असतील की जे मुलांना हे सर्व अगदी कोणताही आडपडदा न ठेवता डायरेक्ट सांगू शकत असतील.

महेश, माझ्यावर मुलाना हे सांगायची वेळ येईल तेव्हा आडपडदा न ठेवता नक्की सांगेन. तुम्हालाही मुले असतील तर ती या वयाची असतील तर नक्की सांगा.

एवढ्या सहजपणे जमणारी गोष्ट नाही ही. कदाचित तुम्ही डॉक्टर आहात म्हणुन तुम्हाला जमेल.
चांगली माहितीपर पुस्तके, इ. देऊन सुद्धा माहिती देता येऊ शकते.

जेव्हा बघणं शक्य असेल तेव्हा नक्कीच बघणार.

महेश, सीडी, पुस्तकं देऊन माहिती नक्कीच देता येते पण बोलल्याने संवाद साधता येऊ शकतो ना? जर या विषयावर मुलांशी मोकळेपणाने बोलायचंच नाही म्हटलं तर आपल्या आईवडिलांचीच जनरेशन आपण पुढे नेतोय असं म्हणायला हरकत नाही.

जेव्हा आईवडिल-मुलांमध्ये मोकळं संभाषण नसतं, एखादा विषय टॅबू असतो तेव्हाच मुलं चुकीच्या मार्गाने माहिती शोधणं, लपून छपून माहिती मिळवणं असे उपाय करतात.

तुला मुलांना शिकवणीला घेऊन बसल्यासारखं शेजारी घेऊन बसायचं आणि धडा शिकवल्याप्रमाणे शिकवायचं असं वाटतंय का? तर तसं काही नाही. मुलं माहिती मिळवण्याकरता पूर्णपणे पालकांवर अवलंबून रहात नाहीत. त्यांच्या वयानुसार ते बाहेरुन इथून तिथून माहिती मिळवणारच पण त्यांना किती माहिती आहे आणि जे माहिती आहे ते कितपत बरोबर्/योग्य आहे हे पडताळून पहाण्याचं काम पालक म्हणून तुम्हांलाच करावं लागणार.

सायो +१
उगीच चोरून गप्पा मारून अर्धवट माहिती मिळवण्यापेक्षा पालकांशी मोकळा संवाद बरा.
हे कुतूहल या वयात असतंच, ते तसं असणं नॉर्मल आहे, आणि याबाबत आपले पालक माहीती देऊ शकतात हा मानसिक आधार आपल्या मुलामुलींना देणे गरजेचं आहे.

माझी मुलगी आता लहान आहे पण अजून काही वर्षांनी आम्ही नक्कीच बोलू या विषयावर.

एवढ्या सहजपणे जमणारी गोष्ट नाही ही. कदाचित तुम्ही डॉक्टर आहात म्हणुन तुम्हाला जमेल.
>> महेश इथे प्रोफेशनचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. मुलांशी कोणताही आडपडदा न ठेवता 'या' विषयाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणं हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधला महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं.

काहींना सिनेमाच समजला नाहीये बहुदा
>>>>>>>>>>>>>>>>>>

रीया, म्हणूनच माझ्या रिइव्ह्यूचं शीर्षक मी "कोणाला कल्ला, कोणाला नाय कल्ला" असं ठेवलं होतं. Happy

त्यानिमित्ताने अश्या चर्चा होत रहाव्यात आणि त्याचं फलित पॉझिटिव्ह असावं हाच दिग्दर्शाकाचा हेतू आहे.

यातून बालक-पालक संवाद वाढेल हे निश्चित..... कदाचित पालक अजूनही त्यांच्या पिढीच्या विचारानुसार पटकन स्वतःहून बोलणार नाहीत पण हा चित्रपट पाहणारा अर्धवट वयातला मुलगा/मुलगी थेट जे काय शंकानिरसन करायचं ते पालकांकडेच करूया का असा किमान विचार करायला प्रवृत्त नक्कीच होतील....

आणि संवादात कोणी पहिलं पाऊन पुढे केलं यापेक्षा संवाद घडतोय, तो घडेल हेच महत्वाचे आहे......!

आणि चित्रपटात दाखवलेला काळ आपल्या लहानपणीचा आहे. आता तर बीपी शब्द जाऊन त्याची जागा "पॉर्न" ने घेतलीय.....

सुसंगती सदा घडो...... Wink

प्रशांत
तशी शक्यता कमी आहे.
सिनेमागृहात हा U/A सिनेमा आहे. टी.व्ही.वर तो इतक्यात काही यायचा नाही आणि नेटवरून ज्यांना तो मिळवतो येईल ती मुले नक्कीच तितकी लहान नसतील.
आणि जी लहान मुले अगदीच अनभिज्ञ आहेत ती मुले सिनेमा न पाहता या गोष्टी शिकणार नाहीत असे तर नाहीये ना. शेवटी सिनेमात काय चूक आणि काय बरोबर हेही सांगितले आहे.

खरच मला फार उत्सुकता आहे की असे कोण (आणि किती) पालक असतील की जे मुलांना हे सर्व अगदी कोणताही आडपडदा न ठेवता डायरेक्ट सांगू शकत असतील.
निदान मी तरी माझ्या मुलांना त्यांना समजेल त्या भाषेत हे सगळे काही सांगेन.

+१ "आणि संवादात कोणी पहिलं पाऊन पुढे केलं यापेक्षा संवाद घडतोय, तो घडेल हेच महत्वाचे आहे......!"

धन्यवाद साती आणि भुंगा
तुम्हाला विषय समजला याचा आनंद आहे.

का काढू नयेत? >>>>>नंदिनी +१

चित्रपट २ कारणांसाठी आवडला.

१. चित्रपटात अतिशयोक्ती नाही. १५-२० वर्षांपुर्वीचा काळ आठवला (म्हणजे मी त्या वयाचा असतानाचा).
२. आत्ताच्या काळात पालकांनी (म्हणजे मीच) काय करावं याची कल्पना आली.

सादरीकरण उत्कृष्ट आहे. नेमका संदेश प्रेक्षकांपर्यंत पोचेल याची खबरदारी घेतली आहे.

सागर एकदम छान लिहिले आहेस

अरूण एकदम मनातलं लिहीलेस
<<<<<
१. चित्रपटात अतिशयोक्ती नाही. १५-२० वर्षांपुर्वीचा काळ आठवला (म्हणजे मी त्या वयाचा असतानाचा).
२. आत्ताच्या काळात पालकांनी (म्हणजे मीच) काय करावं याची कल्पना आली.
>>>

सातीने लिहिले आहे तसे संवाद साधणे महत्वाचे. खुप वर्षांपुर्वी एका इन्फर्टीलिटी क्लिनीक चालवणार्‍या डॉक्टरशी गप्पा मारताना, असे कळले होते कि लग्नापर्यंतच काय लग्नानंतरही काही समाजातील तरुण या बाबतीत पूर्णपणे नव्हे पण बरेच अनभिज्ञ असतात.

त्यांनीच असेही सांगितले होते, कि अशा प्रकारच्या फिल्म्स मधे अतिदेखणी मॉडेल्स आणि चित्रिकरणाच्या तंत्राने केलेली करामत, यामूळे गैरसमजच जास्त वाढतात. त्यांच्या पेशंटसना योग्य ते ज्ञान देणारी फिल्म्स त्यांना त्यावेळी सापडली नव्हती. नंतर आमची भेट झाली नाही.

उगीच चोरून गप्पा मारून अर्धवट माहिती मिळवण्यापेक्षा पालकांशी मोकळा संवाद बरा.
>>>
अगदी अगदी!
तिसर्‍या माध्यमातून ज्ञान मिळवण्यापेक्षा आपले आई वडील बेस्ट!

मला वाटतय अनेकांचं म्हणणं आहे की मुलांनी काय करावं हे कळेल अस सांगितलं नाहीये म्हणुनच बालकांनी आणि पालकांनी हा सिनेमा एकत्र पहावा. मुलांना त्यातुन "नेम्कं" काय सांगायचय ते कळत नसेल तर तुम्ही सांगा की नेमकं काय सांगायचय.

हा सिनेमा पाहून आल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया होती की आई बाबा तुम्ही पाहिला नाही तरी चालेल. तुम्हाला नव्याने काही सांगावं अस त्या सिनेमात काहीच नाहीये. Happy

मला लहानपणी जे प्रश्न पडले, मी आईला विचारले आणि आईने अगदी खरी उत्तर दिली ( म्हणजे मी कुठुन आले हे कळण्याचं पण कशी ते माहित नसलेलं वय झालं तेंव्हा). आता माझी बहिण तिला पडणारे प्रश्न मला विचारते आणि मी तिला उत्तर देते...

थोडक्यात काय तर बीपी मध्ये काय असतं हे पहाण्याची उत्सुकता निर्माण होण्याच्या आधीच आम्हाला कळालं आणि खर सांगायचं तर "ईईईईईई असलं असतं होय Uhoh " अशी फीलींग निर्माण झाली...

कदाचित हेच प्रत्येक घरात झालं पाहिजे आणि तरिही एखाद्याने बीपी पाहिलाच तर तो केवळ ज्ञान मिळवण्याच्या हेतूने पाहिला गेला पाहिजे हा सरळ साधा विचार त्या सिनेमातून माझ्यापर्यंत तरी पोहचला आणि पटला...

इथे अवांतर होईल पणहा मूव्ही पाहिल्यावर माझी एकच प्रतिक्रिया होती, 'भविष्यात मला माझ्या आईसारखीच आई बनायचय' Happy

छान लिहिलंय , आमच्या वेळी आम्हाला विशू खूप भेटले, पण माझ्या पुढच्या पिढीला बालक पालक दाखवीन मी.

Pages