बीपी पाहावा !

Submitted by सागर कोकणे on 19 January, 2013 - 11:09

काही चित्रपट पाहायचे तर त्याआधी विचार करावा लागतो की तो घरच्यांसोबत पाहता येईल की नाही. ते सिनेमागृहात मित्रांसोबत जाऊन तसे पाहता येतात हे खरे पण तोच सिनेमा घरी टी.व्ही.वर पाहताना अजूनही अवघडल्यासारखे वाटते. बीपी अर्थात बालक-पालक या सिनेमाच्या बाबत हीच परिस्थिती असली तरी त्याचे कारण वेगळे आहे. बोल्ड समजले जाणारे, पुरेपूर अंगप्रदर्शन असणारे सिनेमे पाहताना अमुक एका दृश्याला अवघडलेपणा येत असेलही, पण बीपी सिनेमाचा विषयच ह्या अवघडलेपणावर भाष्य करतो आणि चांगला, सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आवश्यक अशी विचारसरणी मांडतो. त्यामुळे बालकांनी अगदीच पालकांसोबत चित्रपट नाही पाहिला तरी ठीक पण स्वतंत्रपणे मात्र दोघांनीही आवर्जून पाहायला हवा.

अव्या, भाग्या, चिऊ आणि डॉली ही चौकट चित्रपटातील प्रमुख पात्रे आहेत. एकाच शाळेतले आणि एकाच चाळीतले सवंगडी. चाळीतली कोणी ज्योतीताई 'शेण खाते' म्हणून ती चाळ सोडून निघून जाते आणि 'शेण खाणे' म्हणजे नक्की काय हे कोणीच त्यांना समजावून न सांगितल्याने त्यांची उत्सुकता अजूनच वाढत जाते. त्यातच त्यांना भेटतो 'विशू' जो इतरांच्या नजरेत वाया गेलेला टवाळ मुलगा असला तरी त्या चौघांच्या नजरेत त्यांना 'मौलिक ज्ञान' देणारा मार्गदर्शक गुरु आहे.


विशुच्या मार्फत या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागल्याने ती वाहवत जातात. बीपी पाहण्याविषयी असलेल्या उत्सुकतेतून मुले पालकांशी खोटे बोलू लागतात, पैसे जमवण्यासाठी खोटी कारणे देतात. एकीकडे बीपीविषयी कुतूहल आणि दुसरीकडे हे सारे करताना कुणी पाहू नये, कुणाला कळू नये याची भीती. कारण आपल्या समाजात लैंगिक विषयावर पालक आणि मुले मोकळेपणाने बोलत नाहीत. मुले म्हणजे खळखळ वाहणारे पाणी आहे असा संवाद चित्रपटात भाग्याच्या वडिलांच्या तोंडी आहे. मुले त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे असल्याने पालकांनी उत्तर देण्याचे टाळून एक रस्ता बंद केल्यावर ते शक्य त्या मार्गाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवतात व त्यातून त्यांच्या मनावर झालेले संस्कार, त्यांनी स्वत:च काढलेले निष्कर्ष नक्कीच तितके परिपक्व नसतात जे त्यांना लैंगिकदृष्ट्या सुसंस्कृत बनवू शकतील.

विशू म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात 'ढिंच्याक ढिच्याक' वाजत असते- ज्याच्या मनातील आवाज इतरांना ऐकू येतो तो असभ्य, ज्याचा नाही येत तो सभ्य'. एकूण काय तर सभ्यतेचे पांघरून घेऊन चादरीखाली सगळेच असभ्य आहेत. ते चारचौघात बोलायला लाज वाटते म्हणून ते बोलायचे टाळतो पण किमान वयात येणाऱ्या मुलांना विश्वासात घेऊन ते समजावता आले तर तो/ती पुढे जाऊन 'शेण खाणार नाही' याची शक्यता नक्कीच वाढीस लागेल. परदेशात सेक्स या विषयावर मोकळेपणाचे वातावरण असते. तिथल्या सिनेमात आणि एकूणच समाजात ही गोष्ट नॉर्मल समजली जाते त्यामुळे योग्य त्या वयात मुले/ मुली स्वत:हून त्यांना हवे ते ज्ञान मिळवतात आणि त्याचा बाऊ केला जात नाही.

पौगंडावस्था ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची काही वर्षे असतात. या वयात बरेच काही नव्या गोष्टी कळू लागतात आणि शारीरिक बदलही वेगाने घडत जातात. आजच्या घडीला शहरी भागात मुला-मुलींना पुरेसे स्वातंत्र्य असले तरी ८०च्या दशकात ती नसल्याने आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकाची घुसमट होत राहतेच. चित्रपटातून चारही मुलांनी ही घुसमट, त्यातून होणारे बदल उत्तम रीतीने साकारले आहेत. विशेष म्हणजे हा विषय केवळ मुलांच्या दृष्टीकोनातून न मांडता मुलींच्या भावविश्वातून मांडून त्याला योग्य न्याय दिला आहे. पूर्वीचे जवळचे मित्र त्यांच्या मुलींकडे पाहण्याच्या नजरा बदलल्याने परके वाटू लागतात आणि नकळतपणे ते आपले निरागस बालपण गमावून बसतात. हे सारे ज्ञान मिळाल्यावर 'अज्ञानात सुख असतं' असंही म्हणता येईल.

महेश लिमये यांचे कॅमेरावर्क उत्तम झाले आहे. विशाल-शेखर यांचे बीपी द्वारे मराठीत जोरदार पदार्पण झाले आहे. 'सुसंगती सदा घडो' गाणे फार अचूक जागी निवडले आहे. ज्या क्षणी मध्यंतरची पाटी झळकते त्या दृश्यासाठी तर १०० पैकी १००. पण याच इतक्या संवेदनशील दृश्यालाही प्रेक्षक हशा आणि टाळ्यांचा कडकडाट करतात तेव्हा ते खटकतेसुद्धा. या व्यतिरिक्तही बीपीमध्ये योग्य त्या ठिकाणी विनोदनिर्मिती आहे आणि ते सगळे विनोद प्रेक्षकांनी कुठेतरी अनुभवले असल्याने त्याचाशी चांगल्या प्रकारे रिलेट करता येते. 'कल्ला' आणि 'हरवली पाखरे' ही दोन्ही गाणी अनुक्रमे विशाल-शेखरच्या आवाजात मस्त झाली आहेत. चिनार-महेश याचे पार्श्वसंगीत उत्तम आहे. उत्तम संगीत आणि पार्श्वसंगीतामुळे मुळातच रंजक असणारा विषय अधिकच परिणामकारकरीत्या पडद्यावर आला आहे.

कदम काका जेव्हा भाग्याच्या वडिलांशी मुलांच्या वयात येण्याच्या संदर्भात बोलत असतात, तेव्हा एक १३ वर्षीय मुलगा २२ वर्षीय मुलीच्या प्रेमात पडणे हा त्यांना नाटकासाठी उत्तम विषय वाटतो पण तेच प्रत्यक्षात त्यांच्या मुलाबाबत घडले तर त्याला गच्चीवरून ढकलून देण्याइतपत तो गंभीर गुन्हा आहे असे त्यांचे मत आहे. २५ वर्षापूर्वीची ही परिस्थिती अगदी तशीच नसली तरी याबाबत पालकांकडून मुलांना समजून घेण्याइतका किंवा त्यांना समजावून सांगण्याइतका सुज्ञपणा आजही समाजात नाहीये.

चित्रपटातील सर्वच मुलांची कामे उत्तम झाली आहेत. ती तशी झाली आहेत म्हणण्यापेक्षा तशी करवून घेतली आहेत आणि याचे श्रेय बीपीच्या सगळ्याच टीमचे आहे. आजची बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर 'नेहा ताई'च्या रोलमध्ये असल्याने तिने हा बोल्ड विषय आणि तिचे पात्र चांगले रंगवले आहे. किशोर कदम याचे पात्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण ते मुलांना समजूनही घेते आणि त्यांना आवश्यक असलेले 'योग्य' मार्गदर्शनही करते. हा चित्रपट पाहणारा बहुतांश वर्ग तरुण असला तरी चित्रपटातून जे काही शिकण्यासारखे आहे ते पालकांनी आहे. या विषयावर त्यांच्या पालकांनी मौन पाळले असले तरी त्यांनी स्वत:हून मुलांशी याबाबत बोलायला हवे. कित्येक मुले भीतीपोटी वा शरमेने याबद्दल पालकांशी बोलत नाहीत तिथे पालकांनी पुढाकार घेऊन संवाद साधला पाहिजे.

एक आपण लक्षात घ्यायला हवे ते म्हणजे काळ फार वेगाने बदलत आहे आणि त्याप्रमाणे संस्कृतीही बदलत आहे. लहान मुलांवर समाजाचा आणि विशेष करून टी. व्ही. आणि सिनेमाचा फार मोठा प्रभाव असतो. ज्या गोष्टी शिकायला आपण वेळ लावला त्या ते या इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात आपल्या नकळत सहजपणे शिकतात. तेव्हा पालकांनी त्यांना योग्य ती दिशा दाखवली नाही तर ते स्वत: ती शोधू शकतात आणि ते शोधतातही. इथे असाही युक्तिवाद मांडता येईल की आधीच्या सगळ्याच पिढ्या या अवस्थेतून गेल्या आहेत, त्यांना कोणीच या विषयांवर स्वत:हून सांगितले नव्हते/नसावे. पण केवळ या विषयाची शरम वाटते म्हणून मुलांना आवश्यक ते ज्ञान न देणे आजच्या काळात तरी चुकीचे वाटते.

इतका उत्तम 'बीपी' पडद्यावर आणल्याबद्दल रवी जाधव यांचे मनापासून आभार. रितेश देशमुखने निर्मितीत उतरताना हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीत योग्य ती दखल घेतली जाईल याची काळजी घेतली आहे आणि कौतुकाची पावतीही मिळवली आहे. एकंदर मराठी सिनेमा हिंदीहून काहीतरी वेगळे देतोय याचा विशेष आनंद आहे. बीपीच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे बालकांनी अगदीच पालकांसोबत चित्रपट नाही पाहिला तरी ठीक पण स्वतंत्रपणे मात्र दोघांनीही आवर्जून पाहायला हवा.
>>>
यासाठी हजार मोदक
अतिशय सुंदर आणि योग्य शब्दात संपुर्ण परिक्षण
बाकी तो मध्यांतराचा सिन मला काही केल्या आठवत नाहीये Sad
पहायलाच हवा असा सिनेमा Happy

छान परीक्षण Happy
चित्रपट पाहिला आणि खुप आवडला Happy

महेश लिमये यांचे कॅमेरावर्क उत्तम झाले आहे. विशाल-शेखर यांचे बीपी द्वारे मराठीत जोरदार पदार्पण झाले आहे. 'सुसंगती सदा घडो' गाणे फार अचूक जागी निवडले आहे. ज्या क्षणी मध्यंतरची पाटी झळकते त्या दृश्यासाठी तर १०० पैकी १००. पण याच इतक्या संवेदनशील दृश्यालाही प्रेक्षक हशा आणि टाळ्यांचा कडकडाट करतात तेव्हा ते खटकतेसुद्धा. या व्यतिरिक्तही बीपीमध्ये योग्य त्या ठिकाणी विनोदनिर्मिती आहे आणि ते सगळे विनोद प्रेक्षकांनी कुठेतरी अनुभवले असल्याने त्याचाशी चांगल्या प्रकारे रिलेट करता येते. 'कल्ला' आणि 'हरवली पाखरे' ही दोन्ही गाणी अनुक्रमे विशाल-शेखरच्या आवाजात मस्त झाली आहेत>>>>>+१ Happy

असल्या विषयावर चित्रपट काढल्याबद्दल.>> का काढू नयेत? मग कुठल्या विषयावर चित्रपट काढावेत?

बीपी बद्दल अजून एका मैत्रीणीने तूफान तारीफ केली आहे. डीव्हीडी येणेस्तवर वाट बघावी लागणार. क्सा, माबो खरेदीमधे मराठी चित्रपटांच्या डीव्हीडी उपलब्ध होतात का?

धन्यवाद रिया...
पुन्हा एकदा पहा म्हणजे आठवेल...
सुंदर चित्रपट आहे...पुन्हा-पुन्हा पाहायला आवडेल.

>>त्यामुळे बालकांनी अगदीच पालकांसोबत चित्रपट नाही पाहिला तरी ठीक पण स्वतंत्रपणे मात्र दोघांनीही आवर्जून पाहायला हवा.
जर हा चित्रपट आणि त्याचा विषय एवढा चांगला असता तर हे वाक्य लिहायची वेळ आली नसती असे वाटते.

महेश
मी पहिल्या परिच्छेदात तेच नमूद केले आहे.
आपल्याकडे अजूनही या विषयावर इतकी मोकळीक नाहीये की पालक आणि मुले एकत्र हा चित्रपट पाहू शकतील.
जे पालक मुलांसोबत हा चित्रपट पाहू शकतात त्यांनी त्या दिशेने योग्य पाऊल उचलले आहे असे म्हणता येईल.

छान लिहिले आहे. नवेनवे विषय मराठी चित्रपटात येताहेत, हे खरेच चांगले आहे. ( नाटकात आधीच हा विषय आला होता. "खोल खोल पाणी" )

मी पण चित्रपट पाहिला..छान आहे..त्यातून छान संदेश देण्याचा प्रयत्न केलाय ,पण कुठेतरी तो तोकडा वाटतो...एकूण चित्रपटाच्या लांबीच्या मानाने ते बौद्धिक फार कमी वाटते...मला असे वाटते के जी लहान मुले खरोखरच ह्या सगळ्यापासून अभिनज्ञ(unknown to this) आहेत त्यांनी हा चित्रपट पाहून कुतूहल चाळवल्यामुळे अश्या गोष्टी केल्या तर काय?कुतूहल हा लहान मुलांचा स्थायी भावच आहे मग आपण काय करणार .निसंशय छान विषय घेतलाय पण त्यालापण खूप मर्यादा आहेत किंवा आल्यायत.

त्यांनी हा चित्रपट पाहून कुतूहल चाळवल्यामुळे अश्या गोष्टी केल्या तर काय?
>>
हेच तुम्ही न करता मोठ्यांशी बोला, प्रश्न विचारा आणि मोठ्यांनी त्याची खरी खरी उत्तर देऊन निरसन करा हेच तर सांगायचय त्यांना सिनेमातून
काहींना सिनेमाच समजला नाहीये बहुदा Sad

@काहींना सिनेमाच समजला नाहीये बहुदा

तुम्ही म्हणताय ते पटलं /जाणवलेल पण लहान मुलांच्या दृष्टीने बघता अस होईलच असही नाही ना!! नुसत बघणं / ऐकणं ( कुठल्याही x गोष्टीसाठी )त्यानंतर ते न बघता त्याबद्दल ऐकण किंवा ती गोष्ट करू नका म्हणून सांगितली तरी करावीशी वाटण ह्या वास्तविक घडणाऱ्या गोष्टी आहेत....म्हणून मी तस म्हणालो.

Pages